आदिवासींचे तारणहार - मधुकरराव काशिनाथ पिचड

Tribal Mahavikas
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील मातीशी इमान राखून दसदिशांना झेपावणाऱ्या पर्वतराज्ञांनी, ज्या उघड्या-बोडक्या आदिवासींची कवेत घेऊन पाठराखण केली. ऊन, वारा, पावसापासून ज्यांना आश्रय दिला, ते आदिवासी आणि त्यांचे परिसराचे नाव 'डांगाण' अशा डांगाणी मुलखातून मुळा आणि प्रवरा ह्या दोन भगिनी इथल्या आदिम सृष्टीच्या संस्कृतीचे जतन करत-करत आपले कार्य पार पाडण्याच्या कार्यात मग्न असताना इथल्या अज्ञानरूपी अंधःकाराचा पर्दापाश करण्यासाठी, एका नयनरूपी ताऱ्याला जन्म घ्यावा लागला. त्यांचे नाव मधुकरराव पिचड साहेब होय. त्यांचा जन्म दि. १ जून १९४१ रोजी राजूर सारख्या त्याकाळी मागासलेल्या खेड्यात काशिनाथ पिचड व श्रीमती कमलाताई पिचड ह्या दाम्पत्याच्या पोटी झाला. पिचडसाहेबांचे वडील हे हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या मुलांना योग्य ती शिस्त लावली होती. 

मात्र बदल्यांमुळे वडील जिथे जातील त्या तालुक्याच्या व जिल्ह्यातील कोणत्याही खेड्यात साहेबांच्या प्राथमिक शिक्षणाची फरफट झाली. कधी मेहेंदुरी तर कधी वीरगाव. कधी सावरगावपाट तर कधी समशेरपूर अशा ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्याकाळी संपूर्ण नगर जिल्ह्यात ज्या विद्यालयाची हवा होती ते संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यामंदिर होय. साहेबांच्या चाणाक्ष वडिलांनी त्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी तो मार्ग निवडू नये तरच नवल! त्याकाळात साहेब प्रथमच आपल्या कुटुंबापासून दूर आले होते. पुढे तर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी १९५८ साली पुण्यातील नावाजलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले होते. त्यावेळी अभ्यासाबरोबर साहेबांना मदन बाफना, प्रसाद तनपुरे हे सहकारी जसे मिळाले तसेच त्यांचेत्याकाळातील प्रेरणास्थान प्रा. ग. प्र. प्रधान हेही निश्चित झाले होते. अशा विद्येच्या माहेर घरात साहेबांनी फार चिकाटीने शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी सातवी पास असेल तर लगेच शिक्षकाची नोकरी मिळत असे. साहेब तर पदवी प्राप्त होते. त्यांना ताबडतोब सत्यनिकेतन विद्यामंदिर, राजूर येथे शिक्षकाची नोकरी मिळाली. नोकरी मिळाली ती घराजवळच, मात्र त्यांचे मन काही नोकरीत रमणारे मुळी नव्हतेच. 

संध्याकाळी फिरायला जाताना त्यांना दूर गावच्या ठाकर आदिवासी पाड्यावरची माणसे काही काम मिळतय का? ह्या आशेपायी आलेली इकडे तिकडे फिरताना दिसत असत. त्यांची मोठ्या प्रमाणात वाणी, उदमी फसवणूक करत. त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत असे. संपूर्ण डांगाण भागातील आदिवासींचे शोषण आणि पिळवणूक त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर त्यांना खूप वाईट वाटत असे. ह्या माणसांच्या काळ्याकभिन्न अंधारमय जीवनात कोणी आशेचा प्रकाश आणणार आहे का? असा प्रश्न त्यांना सतावत असे. त्याचे उत्तर न मिळाल्याने साहेबांनी विचार केला.  

समजा आपणच हे काम करायला पुढे सरसावलो तर, मग काय क्षणाचाही विलंब न लावता नोकरीचा राजीनामा दिला आणि कायम स्वरूपी समाजसेवेच्या नोकरीवर ते रूजू झाले. तो काळ साधारणः १९६०-६१ चा असेल. नोकरी सोडल्यावर साहेबांचे डोळे उघडले. आपल्याला हे काम जमेल का? मात्र वडिलांची शिकवण होती की, पाण्यात उतरल्याशिवाय काही पोहता येत नाही, त्यामुळे साहेबांनी चाळीसगाव, मुळा-पेहर, नेरूर ह्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर भटकंती केली. तेथील लोकांकडे ह्यापेक्षा त्यांच्याकडे काय आहे हे साहेबांच्या नजरेणे अचूक हेरले होते..

प्रत्येक आदिवासी माणासाच्याजवळ एखादी तरी गाय वा म्हैस असतेच. मग अशा सर्व गावांचे दूध जर एकत्र केले आणि ते बाहेर पाठवले तर? खऱ्या अर्थाने साहेबांच्या आवाहनाला आदिम आवाजाने तत्क्षणी होकार दिला होता. मग काय झपाटलेल्या त्या एकाच विचाराने साहेब कामाला लागले. त्याचे प्राथमिक फळ म्हणजे १९६२ साली राजूर येथे 'सहकारी दध संघा'ची स्थापना करण्यास त्यांना कमालीचे यश प्राप्त झाले होते. आदिवासींची दुसरी महत्त्वाची समस्या साहेबांनी बरोबर अचूक हेरली, ती म्हणजे आदिवासी भगिनींना लाकडी मुसळ घेऊन शेतात पिकलेल्या भाताचे मुस ळाने तांदूळ करण्याशिवाय गत्यंतर नसे. जर आपण त्यासाठी भात गिरणी सुरू केली तर? ह्या विचारांनी साहेबांचा चेहरा खुलला. आपल्या माता-भगिनी नक्कीच आपल्याला दवा देतील. ते झपाटल्यावाणी कामाला लागले. नको त्या अधिकाऱ्यांचे उंबरे झिजविले आणि एकदाची भात गिरणी आपल्या पदरात पाडून घेतली. 

अशा कितीतरी कामांतून तालुक्याला एक नवी चेतना दिल्याने, जनतेने १९७३ साली अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून तर पुढे तालुका पंचायत समितीचा सभापती म्हणून साहेबांना निवडून दिले. इथूनच खऱ्या अर्थाने साहेबांच्या वादळी आणि संघर्षमय राजकारणाला सुरूवात झाली. अतिशय धीर गंभीर पावले उचलत त्यांनी सत्तेच्या राजकारणात साध्य आणि साधनांची अजिबात गल्लत होऊ दिली नाही.

                  १९८० साली ज्यांचा महाराष्ट्रावर चांगलाच दबदबा होता, असे राजकारणात तावून सुलाखून निघालेले व्यक्ती म्हणजे आमदार यशवंतराव भांगरे साहेब होत. त्यांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर राखीव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर पिचड साहेब निवडून आले. १९७२च्या दुष्काळातून माणसे नीट सावरलीही नव्हती, अशा दुष्काळाने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्या दुष्काळाचा सर्वात जास्त फटका दलित आदिवासींना बसला होता. अशा दीन-दुबळ्या बांधवांना दिलासा देण्यासाठी साहेबांनी कंबर कसली आणि भांगरे साहेबांनी जो मार्ग तयार केला होता, त्यामार्गानेच पुढे जाऊन त्यांनी रोजगार हमीची कामे, पाझर तलाव, रस्ते, ताली, नालाबडींग अशी कितीतरी कामे आपल्या भागात सुरू केली.ह्या काळातच भारतीय राजकारणात आणीबाणीचा मोठा प्रसंग गुदरला होता. स्वर्गीय इंदिराजींना त्याकाळी अटक झाली आणि त्यापूर्वीच्या शासकीय नोकरशाहांनी घेतलेल्या अकालनीय निर्णयासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर अनेक खटलेही भरण्यात आले होते. ह्या सर्व गोष्टींचे पडसाद क्षणार्धात ग्रामपातळीवर उमटले गेले. वाड्या-पाड्यांवरच्या बाया-बापुड्या,मुले हळहळू लागली. 

इंदिराबाईंना ह्या अवर्तनातून सही सलामत सोडव म्हणून त्यांच्या निसर्ग देवतेला साकडे घालू लागले होते. नेमकी हीच सुवर्ण संधी साधून साहेबांनी सर्वांची मने जिंकत संकटाच्या कठीण समयी इंदिरांजींची पाठराखण केली. आमची सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे, असे कळवले. आणि काय आश्चर्य पिचड साहेबांनाही काही दिवस का होईना, कारावासाला सामोरे जावे लागले. १९८० साली पिचड साहेब प्रथमच अकोले मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले, आणि अकोल्याचे प्रतिनिधीत्व करता-करता अख्या महाराष्ट्राला परिचित झाले. ब्रिटिशांनी त्या काळात बांधलेल्या (विल्सन डॅम) भंडारदरा धराणातील पाणी ज्यांच्या जमिनीत धरण बांधण्यात आले आहे, अशांनाच पाणी पिण्यास दुरापास्त झाले होते. तर जमिनीचे काय घेऊन बसलात. मोक्याच्या वेळी धरणातील पाणी वाटपाचा गंभीर प्रश्न अकोले तालुक्यात त्यातल्या त्यात चाळीसगाव डांगाणात उभा राहिला त्यावेळी साहेबांनी अस्तन्या सावरल्या. आणि भले स्वपक्षीयांविरूद्ध लढावे लागले तरी मागे हटायचे नाही, असे पूर्णपणे मनाशी ठरवूनच ते पाणी वाटप चाक बंद आंदोलनात सक्रीय झाले. ते आंदोलन जिंकून साहेबांनी संपूर्ण तालुक्याला पाणी मिळवून दिले. 

त्यातून लहान थोरांची वाहवा मिळवली. खरे तर प्रथमपासूनच अन्यायाविरूद्ध झगडण्याचा पिंडच साहेबांचा असल्याने ज्या ज्या वेळी तालुक्यावर अवकळा येईल त्या त्या वेळी सर्वात पुढे धाव घेणारे साहेबच असत. पिचड साहेबांना शिक्षणाविषयी खूप चाड होती. आपल्या भागात १९६४ साली एकनाथ देशमुख आणि आमदार यशवंत भांगरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन 'आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर संस्था नावारूपाला आली. पुढे ह्या संस्थेची धुरा साहेबांनी १९८२ सालापासून स्वीकारली. व पुढे ती तब्बल दहा वर्षे सांभाळली. ह्या दहा वर्षाच्या काळात संस्थेचा चांगलाच विस्तार झाला. आज ह्या संस्थेच्या अनेक आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालये, छात्रालये प्रगती पथावर कार्यरत आहेत.

त्याची पावती म्हणून १९९२ साली उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाचा बहुमानही प्राप्त झाला. १९८५ साल उजाडले आणि महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात प्रथमच पिचड साहेबांची आदिवासी विकास राज्य मंत्री म्हणून निवड झाली. त्यावेळी आदिवासी जनतेला जो आनंद झाला, तो अवर्णनीय असाच म्हणावा लागेल. अकोले तालुक्याच्या इतिहासातील साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचे जे काम केले ते म्हणजे १९९० साली. मान्यता मिळालेल्या कारखान्यांची उभारणी केली. १९९१ ते १९९२ ह्या कालखंडात वने व सामाजिक वनीकरणाची मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असतांना एक अतिशय जटील प्रश्न डोके वर काढत होता. तो प्रश्न होता, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे, असा आग्रह धरला जात होता. 

अशा सक्रीय चळवळीमध्ये साहेबांनी स्वतःला झोकून दिले. मग काय ह्या यशाच्या चढत्या कमानीला यश आणि यशच मिळत गेले. साहेबांच्या कारकदीत यशस्वी घटना पूर्णत्त्वास गेलेल्या पहावयास मिळतात. त्याचबरोबर काही दुखद घटनांचीही नोंद झाल्याचे दिसते. त्यातील एक प्रसंग १९९४च्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी 'गोवारी' समाजाचा एक मोठा मोर्चा आला होता. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय म्हणून नियंत्रणासाठी पोलिसांनी गोवारींवर लाठी हल्ला केला. त्या लाठ्या चुकविण्याच्या भीतीने अनेकांनी सैरावैरा पळायला सुरूवात केली. त्यातच बेसावध जीव इतरांच्या पायदळी तुडविले गेले. एकच गोंगाट झाला. आणि काही कळण्यापूर्वीच अनेकांचा बळी गेला.मग काय विरोधकांनी आकाशपातळ करून सगळीकडे रान माजविले. निषेधाचे कितीतरी मोर्चे रस्त्यावर आले. म्हणतात ना, 'चोर तर चोर, मात्र वर शिरजोर.' असाच काहीसा प्रकार गोवारींनी केल्याने हा प्रसंग उद्भवला होता. त्यांचे म्हणणे आम्हाला अनुसूचित जमातींच्या सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत, आणि आम्हाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा. मात्र साहेब अशा बोगसांना आश्रय देतील कसे? काहींना वाटले त्या घटनेनंतर पिचड साहेब नरमतील, आपला निर्णय मागे घेतील. मात्र तसे कदापिही होणार नव्हते. मग विरोधकांनी नको त्या चाली खेळून बघितल्या. त्यांची व्यक्तिगत बदनामी केली गेली. आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली. 

ह्या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या समाजाच्या बांधिलकीसाठी, हितासाठी साहेबांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दुसरा कोणी असता तर त्याने काही पर्याय शोधले असते, मात्र साहेबांना मंत्रीपदापेक्षा आपली जनसामान्य माणसे प्रिय होती. अशा माणसांकरिता त्यांनी मंत्रीपदाला क्षणार्धात लाथ मारली. आणि आपली निणर्यक्षमता सिद्ध केली. अविरत परिश्रमाने साहेबांनी आपल्या यशाची कमान सतत उंचावण्याचा ध्यास घेतला. अनेक लहान मोठी कामे ते चुटकीसरशी करू लागले होते. बरोबर हेच विरोधकांना खपत नव्हते. त्यामुळे अनेकजन त्यांच्याकडे सुडाच्या भावनेने बघत होते. ते कुठे अडकतात का? ह्यावर विरोधक डोळ्यात तेल घालून पहारा करत होते. १९७६ साली क्षेत्र बंधन काढून घेण्यात आल्यामुळे आदिवासींच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. 

खऱ्या आदिवासींच्या सर्व जागा खोट्यांनी बळकावयाला सुरूवात केली होती. १९९५ ते २००० पर्यंत ही प्रकरणे वाढतच राहिली. एवढेच काय परंतु पिचड साहेबांच्या जातीच्या दाखल्याबाबत विधान परिषदेत त्यांचा दाखला खोटा असल्याच्या रेवड्या उडविल्या गेल्या. नाही म्हटले तरी त्याचे पडसाद विधानसभेवर उमटले. शेवटी साहेबांना 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' दाखवावेच लागले. त्यावेळी साहेबांनी विरोधकांना उद्देशून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. ते म्हणाले, "मित्र हो, मी विधानसभेवर सतत पाच वेळा निवडून आलो आहे, आपल्याला जर शंका येत असेल तर आपण माझे सर्व भाऊबंद, नातेवाईक, भाऊबंदकी जरी तपासली तरी मला आनंदच होईल. आणि त्यानिमित्ताने तुम्ही ते करावे असे मला मनापासून वाटते. ज्यांना कुणाला माझा संशय येईल, त्यांनी तर तपासावेच. शिवाय माननीय सभापती महोदयांच्या अध्यक्षतेखाली माझ्या चौकशीसाठी समिती नेमली तरी माझी मुळीच हरकत नाही.” असे त्यांनी सभागृहाला ठणकावून सांगितले होते. 

पिचड साहेबांवर खोटे आरोप करणारे आमदार अनंत तरे. खोटे मात्र रेटून बोलत होते. खऱ्यांनाच ते खोटे ठरवून पाहत होते. तेव्हा साहेब त्यांना एका बैठकीत म्हणाले, "तरेजी मी एकच प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर जर आपण बरोबर दिले तर मग तुम्ही खरे आणि आम्ही खोटे.” तो प्रश्न होता. 'वयांडा' म्हणजे काय? ह्या शब्दाचा अर्थच मुळी तऱ्यांना माहीत नसल्याने, तो शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच. त्यामुळे ह्या जन्मीच काय दुसऱ्या जन्मीही तऱ्यांना ते सांगणे अशक्य होते. हे साहेबांना चांगले माहिती असल्याने त्यांनी मुद्दामच असा प्रश्न खोचकपणे विचारला होता. असे असले तरी, तरे आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी अजिबात सोडत नव्हते. त्यावर साहेब चिडून एकदा म्हणाले होते, “जमातीला आणि जातीला काही पूर्वेतिहास, वंशपरंपरा असते की नाही. ? जात ही जन्मावरून ठरत नाही, तर बापाची जात हीच मुलाची जात ठरते. 

माझा बाप कोणत्या जमातीतला आहे, ह्याची तपासणी करण्यास माझी अजिबात हरकत नाही, मात्र अशी कोणतीही जात कागदावर लिहिली म्हणून आपली ठरते का? कागदावर माझी जात ब्राह्मण लिहिल्याने मी खरच ब्राह्मण होऊ शकतो का? ब्राह्मणवृंद मला स्वीकारतील का? तेव्हा माझी जमात कोणती? हे माझ्या व्यापक जमातसमूहाने जन्माला येतानाच ठरविले. असून आमदार तरे आणि त्यांच्या जवळचा पुराव हा केवळ माझी जात ठरवू शकणारा अंतिम पुरावा कसा ठरवता येईल. म्हणूनच...

                      I am Genuine. I am Having Genuine Certificate. I am Proud of it. हे सारे संभाषण….त्यांनी सभेलाच उद्देशून काढल्याने सभा देखील स्तब्धपणे ऐकत होती.सभा संपल्यावर आमदार तरे प्रेमी साहेबांच्या वाऱ्यालाही थांबले नाहीत.

ना कुणाची काही बोलण्याची हिंमत झाली नाही. बोगसांच्या घुसखोरीला लगाम घालण्यासाठी डॉ. गोविंद गारे ह्यांच्या मदतीने पिचड साहेबांनी काही महत्त्वाचे कायदे करण्यास सरकारला भाग पाडले. आणि घुसखोरी विरोधात विधानभवनात आवाज उठवला. म्हणून पिचडसाहेब व डॉ. गोविंद गारे ह्यांना अनेक बोगसांनी उघडउघड धमक्या दिल्या. निदर्शने करून आंदोलने केली. अनेक शिष्टमंडळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भेटली. हा कायदा रद्द करावा म्हणून गळ घातली. मात्र पिचड साहेबांच्या दक्षतेमुळे त्या काळातील सर्व वादळे शांत झाली. तशा बांडगुळांना थोपविण्याची ताकद एकट्या पिचड साहेबांतच आहे, हे विरोधकांना चांगले माहीत होते. अन्यथा घुसखोरांनी होत्याचे नव्हते केले असते. आणि खऱ्या आदिवासींना देशोधडीला लावले असते. पिचड साहेबांनी राजूर आणि अकोले परिसरात जी शासकीय कार्यालयांची स्थापना केली, ती कठोर परिश्रमाने आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचीच फलश्रृती म्हणावी लागेल. मुत्सद्दी राजकारणी शैलीतून त्यांनी समाजकारण आणि राजकारण ह्यांची अतूट सांगड घातली. समाजकारण करतांना राजकारणात तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर यशस्वीरित्या मजल मारली. विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विभागाला स्वतंत्र स्थान, स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला. 

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी ज्या योजना आखल्या गेल्या त्या साहेबांच्या कार्यकुशलतेमुळेच हे सर्व करताना त्यांनी स्वतःसाठी जगणे सोडून समाजासाठी जगले, प्रसंगी प्राण पणाला लावले. जनतेच्या सर्वांगीन विकासाचा ध्यास घेतला. रयतेच्या कल्याणासाठी प्रसंगी सत्तेलाही झिडकारले, आणि जनतेच्या प्रेमाच्या वैभवाची कास धरली. त्यामुळेच साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाची नोंद घेऊन 'ऑल इंडिया दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली' ह्यांनी आदरापोटी प्रथमच 'वीर बिरसा मुंडा पुरस्कार' दि. ०५ डिसेंबर २००१ रोजी देऊ केला. आणि आदिवासी बांधवांचा जीव भांड्यात पडला. आजही साहेब तेवढ्याच तडपदारपणे काम करत आहेत. हे काम ते आपल्या बांधवांची सेवा समजतात. अशा धडपड्या कार्यकर्त्याच्या कार्याला आणि त्याच्या भावी जीवनाला प्रोत्साहन मिळो, त्यांना दुपटीने काम करण्याचे बळ मिळो, ह्यासाठी आदिवासी बांधवांच्या कोटी कोटी शुभेच्छा!