खोट्या बोगस आदिवासींचे कर्दनकाळ डॉ. गोविंद मोघाजी गारे

Tribal Mahavikas

ज्या सह्याद्री पर्वताला महाराष्ट्राचे भूषण मानले जाते, ज्याकडे बघून गर्वाने महाराष्ट्रवासियांची छाती अभिमानाने फुलते अशा सह्य पर्वताच्या रांगेने आपल्याला देश आणि कोकण असे भाग दिले. घाट माथा दिला. स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांना मदत करणारे व जीवाला जीव देणारे मावळे दिले. कृष्णा, गोदा, भीमा, वारणा, प्रवरा ह्यांसारख्या नद्या दिल्या. शिवनेरी, हरिश्चंद्र, रतनगड, कळसूबाई, अलंग-कुलंग, पट्टा किल्ला इत्यादी किल्ले बहाल केले. शंकर, खंडोबा, वाघोबा, मरीआई, विसोबा, खेसोबा ही डोंगरी भागातील रांगडी लोकांची दैवतं दिली, आणि त्याच बरोबर आदिवासींचे तारणहार, जाणता राजा, आधारवड, कैवारी अशा कितीतरी उपमा दिल्या, तरी त्या कमी पडतील असे डॉ. गोविंद गारे साहेब दिले. पण इतर 'नाणेघाटा'ला सुरूवात होण्याआधी काही फर्लांगावर असलेल्या दौंड्या डोंगराच्या पायथ्याशी 'निमगिरी' नावाचं एक चिमुकलं टुणटुणीत गावांपेक्षा साक्षरतेने पुढारलेलं गाव. ह्याच गावी दि. ०४ मार्च १९३९ रोजी डॉ. गोविंद मोघाजी गारे ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच समाजाची बांधिलकी सांभाळणारा हा खरा आदिवासींचा सुपूत्र होता. त्यांची तळमळ फार दांडगी होती. ते नेहमी म्हणायचे, 'माझा समाज पुढे आणला पाहिजे. त्याचे ऋण फेडले पाहिजेत.' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांनीही आपल्या धर्माचा चिकित्सक अभ्यास करण्यासाठी पुण्याकडे धाव घेतली. 

प्राथमिक शिक्षण निमगिरी, माध्यमिक शिक्षण जुन्नर आणि पुढे 'कॅम्प एज्युकेशन, फर्ग्युसन कॉलेज' अशी वाटचाल करत ते बी.ए. झाले. ह्या चाणाक्ष अभ्यासकाच्या असे लक्षात आले की, समाजशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय मागास समाजाला पुढे आणण्याची आपली बैठक तयार होणार नाही. म्हणूनच त्यांनी एम. ए. ला पूर्ण समाजशास्त्र घेऊन उत्तम गुण संपादन केले. त्यावेळी त्यांनीच सांगितलेली गोष्ट अशी की, 'मी एम.ए. पास झालो तेव्हा आईला भेटण्यासाठी मोठ्या आनंदात गावी गेलो. आईच्या पायांवर डोके ठेवले, आणि आनंदाश्रुंनी पाद्यपुजा केली. भोळी- भाबडी आई म्हणाली, गोविंदा! कोळी महादेव कुळाचे नाव मोठे केलेस बाबा! मला वेडीला काय समजतय त्यातलं. ?' कोळी महादेव समाजातील युवक पहिला एम.ए. काय होतो. पीएच.डी. आणि आय.ए.एस. अधिकारी म्हणून नावलौकिक काय मिळवतो. अशा प्रकारची शैक्षणिक वाटचाल करणारा आणि परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणारा एकमेवाद्वितीय काय ठरतो. तेव्हा स्वतः बरोबरच गावाचे, चिमुकल्या पाड्या-वस्त्यांचे, आपल्या तालुक्याचे, राज्याचे नि देशाचेही कर्तृत्त्व उंचउंच भरारत सिद्ध करतो. तेव्हा इथल्या उघड्या बोडक्या आदिवासीला,डोंगरदऱ्यातील प्राण्यांना, कड्याकपाऱ्यांतील गंधीत मातीला अन् मुक्त उसळी मारणाऱ्या अवखळ वाऱ्यालाही नक्कीच धन्यता वाटली असणार, खरोखर नक्कीच! पडीक जमिनीची मशागत केल्यावर कसे पीक येते, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. गोविंद गारे होय. निर्भेख, प्रामाणिकपणे आणि पोटतिडकी आदिवासींच्या प्रश्नांवर भाष्य करणारी व्यक्ती म्हणजेही डॉ. गोविंद गारेच. 

आदिवासींचा जाणता राजा, आदिवासींचे चालते बोलते विश्वविद्यालय म्हणजेही डॉ. गोविंद गारे होत. डॉ. गोविंद गारे हे आदिवासींचे 'हिरो' जरूर होते, पण त्याहीपेक्षा ते 'हिरा' अधिक होते. त्यांनी आदिवासी समाजाला उंच शिखरावर पोहचवलं. एक चकाकी आणि उजाळा आणून दिला. म्हणूनच अशा खडतर परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्या व अधिकाऱ्याविषयी म्हणावेसे वाटते, 'हिरा शोभला कोंदणी। जडीत माणिकांची खाणी।।' काही माणसे स्वतःसाठीच जगतात आणि इतरांवर ओझे ठेऊन जातात. परंतु काही माणसे स्वतः जगतानाच समाजासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्य करून जीवनमूल्य प्राप्त करतात, अशापैकी रानकुसाबाहेरील समाजात, दारियाच्या दलदलीत ताऊन-सुलाखुण उमललेलं एक फूल म्हणजे त्यागमूर्ती डॉ. गोविंद गारे साहेब होत.

कचऱ्यातून कांचन मिळावा, चिखलातून कमळ उमलावे, काट्यातून गुलाब फुलावे अशाच खडतर वाटेवरून चालण्याचा प्रसंग डॉ. गारे ह्यांच्याही वाट्याला आला. चरित्र सर्वांनाच असते, परंतु चारित्र्यवान माणसांची वानवा सगळीकडेच दिसते. नुसती माणसांची गर्दी पहावयास मिळते. त्यातच जीवघेणी स्पर्धा, 'पळा पळा कोण पुढे पळतोय अशी शर्यत जणूकाही लागली आहे. अशा गर्दीत माणसे दिसत असली तरी त्यांच्यातला 'सच्च दिला'चा माणूस मात्र हरवला आहे. ह्या 'माणसा'चा शोध घेण्याचे काम कवी करतो. तो लिहितो, “कोलाहालात साऱ्या, माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। मंदिर, मस्जिदही धुंडाळून सारी झाली,भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी ॥' अशा प्रकारे कवी अखंडपणे सर्वत्र माणूस शोधतो आहे. क्वचितच ठिकाणी तो सापडतो आहे. तसे मला संपूर्ण आदिवासी समाजात डॉ. गोविंद गारे 'माणूस, मित्र आणि संशोधक' म्हणून भावले. 
एका सुभाषितात असे म्हटले आहे की,

'अंजलीस्थानी पुष्पाणी। वासयंती करोद्वोयम्
अहो सुमणाशीप्रीति। वामदक्षिणोयसमः
हातांच्या ओंजळीत घेतलेल्या फुलांचा सुगंध फक्त हातानांच मिळतो,
असे मुळीच नाही तर तो संपूर्ण दशदिशांना दरवळतो. सगळीकडे घुमतो.
डॉ. गोविंद गारे हेही असेच एक सुगंधी फूल होते. ते भारतातच नव्हे तर
भारताबाहेरही जाऊन त्यांनी आदिवासींचा सुगंध दरवळविला. म्हणूनच
मोठ्या अभिमानाने म्हणावेसे वाटते,
'पुत्र व्हावा ऐसा गुंडा।
त्याचा तिन्ही लोकी झेंडा ।।'

डॉ. गोविंद गारे ह्यांच्या संशोधन कार्याला अधिक प्रोत्साहन व बळकटी जर कोणी दिली असेल तर त्यांचे गावचे मित्र किसन साबळे गुरूजी, डॉ. धनंजयराव गाडगीळ, डॉ. वि. म. दांडेकर आणि आदिवासी बांधवांनी साहेबांचे मार्गदर्शन व अध्यापक डॉ. दांडेकर व डॉ. गाडगीळ ह्यांनी पुढील शिक्षणासाठी व संशोधन कार्यासाठी 'ब्रिटीश कौन्सिल'ची फेलोशिप मिळवून दिल्याने त्यांचा लंडन विद्यापीठात जाण्याचा मार्ग खुला झाला. लंडनहून शिक्षण घेऊन आल्यावर महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती प्रथम सदस्य विभागीय निवड मंडळ, पुणे ह्या पदावर केली. भूतपूर्व मा. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी डॉ. गारे ह्यांना मोठ्या सन्माने ते पद स्वीकारण्यास सांगितले. परंतु त्याचवेळी त्यांची निवड संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ह्या पदावरही झाली होती. हाडाच्या खऱ्या आदिवासी कार्यकर्त्याला नि अधिकाऱ्याला ही सुवर्णसंधी चालून आली होती. त्यांनी बरोबर आपल्या कामाचे पद स्वीकारले. नवीनच सुरू करण्यात आलेल्या संस्थेच्या संचालक  पदाची धुरा मोठ्या जबाबदारीने तब्बल तेरा वर्षे सांभाळली. अशा काळात त्यांनी आदिवासी कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. संस्था नावारूपाला आणली. ह्या संस्थेत असताना साहेबांच्या एका कामाचे कौतुक फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही झाले. ते काम म्हणजे त्यांनी उभे केलेले 'आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय' होय.

आदिवासींच्या कार्याचे कौतुक कोणीही करत नाही. ही खंत साहेबांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून आदिवासी क्षेत्रात स्वतःला झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याचा बहुमान करण्यासाठी साहेबांनी शासनाकडून 'आदिवासी सेवक' हा सन्मान सुरू केला. आदिवासी जीवनाची व संस्कृतीची ओळख आदिवासीतरांनाही व्हावी, म्हणून संस्कृती वैशिष्ट्यांचे चित्रिकरण, लोकजीवनातील पारंपरिक नृत्याच्या स्पर्धा, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळेचे नियोजन, आदिवासी समाजातील कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती तपासण्यासाठी बेंचमार्क सर्वेक्षण केले. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी 'आदिवासी संशोधन पत्रिके'ला जन्म दिला. पुढे 'महाराष्ट्र आदिवासी दर्शन' आणि 'आदिवासी महासंघ वार्ता' ही मासिके काढून उभ्या महाराष्ट्राला आदिवासी जीवनाचा जवळून परिचय करून दिला. डॉ. गोविंद गारे साहेबांनी आदिवासी विकास कार्यासाठी जे योगदान दिले, त्याचे मूल्य कदापिही करता येणार नाही. आदिवासींच्या वाड्या- पाड्या आणि वस्त्यांपर्यंतच नव्हे तर त्यांच्या न पेटणाऱ्या चुर्लीपर्यंत डॉ. गारे केव्हाच पोहचले होते. 

शासनाच्या सेवेतील वीस-बावीस वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्र व अनुसूचित क्षेत्राची आखणी, उपयोजना क्षेत्रातील योजनांची पुनर्मांडणी, सांख्यिकी माहितीचे पृथःकरण, आदिवासी जमातीच्या सद्यःस्थितीची माहिती उपलब्ध करून देण्याचे महत कार्य केले. त्याचबरोबर आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या गरजेनुसार वेगळ्या योजना आखण्याचे व त्यासंबंधी शासनाला मार्गदर्शन करून सल्ला देण्याचे कामही त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केले. वरील कार्यासाठी त्यांनी आदिवासी आमदार, खासदार, कार्यकर्ते व संघटना ह्यांचे विचारमंच उभे करून आदिवासी विकासाच्या कार्याला व परिवर्तनाला वीस वर्षात प्रचंड गती दिली. भारतातील आदिवासी विकास कार्यात डॉ. गारे ह्यांचे योगदान एवढे मोठे आहे की, आदिवासीच काय पण आदिवासीतर समाजही त्यांना विसरू शकणार नाही.

१९८० नंतर महाराष्ट्रात ठरावीक भागात खोट्या आदिवासींची जी लाट आली, ती लाट सविस्तर माहितीच्या, संशोधनाच्या आधारावर आदिवासी विभाग, मंत्री ह्यांच्या मदतीने थोपविण्याचे काम साहेबांनी केले. खोट्या आदिवासींची माहिती विविध धनांच्याद्वारे व संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी तज्ज्ञ व जाणकारांसमोर मांडली. केवळ शासनाच्याच पातळीवर त्यांचा हा लढा सुरू होता असे नव्हे तर आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी ते हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाची पायरी अनेकदा चढल्याने खोट्या बोगसांचे कर्दनकाळ ठरले. त्यावेळी ही जबाबदारी 'सक्षम आदिवासी समाज कृती समिती'वर सोपवली होती. त्याकाळी साहेबांवर खोट्यांचा एवढा दबाव व दहशत होती की, शासनाला तब्बल पाच-सहा वर्षे त्यांना वैयक्तिक संरक्षण देणे भाग पडले. डॉ. गारे ह्यांच्यासारखा खंदा व लढवय्या अधिकारी आदिवासी समाजाला लाभला नसता तर खऱ्या आदिवासींचे काय झाले असते? हे न सांगितलेलेच बरे! एवढे मात्र खरे आदिवासींचे आजचे चित्रण वेगळेच दिसले असते. खरा आदिवासी खोटा करून खोटे बिनधास्तपणे सवलती लाटत फिरले असते. बिचाऱ्या आदिवासींना हे दुर्दैव सहन करावे लागले असते. त्यांचा आवाज बदं झाला असता. 

आज संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य सरकारी नोकऱ्यांत आज जी प्रगती झाली आहे तिचे बरेच श्रेय डॉक्टरांच्या कार्याला द्यावे लागेल. जात पडताळणीचे हत्यार त्यांनी अतिशय काटेकोरपणे हाताळले. कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता, काम चोखपणे केले. हे काम करत असताना त्यांच्यावर खोट्या आदिवासींनी अनेकवेळा हल्ले केले. मोर्चे, आंदोलने, असेम्बलीत चर्चा, विरोध, निषेध असे अनेक प्रयोग केले. एवढेच काय पण …..त्यांच्या 'सह्याद्रीतील आदिवासी : महादेव कोळी' ह्या संशोधन ग्रंथाची चर्चगेट येथे जाहीर होळीही केली. एवढ्यावरच ते थांबतील तर मग ते 'बोगस - खोटे' कसले ? त्यांनी पुढे शनिवारवाड्यावरून 'टी. आर. आय. (आदिवासी प्रशिक्षण संस्था)' र्यंत मोर्चा काढून डॉ. गारे ह्यांना संचालक पदावरून दूर करा, असे नारे लगावले होते. परंतु त्याचा परिणाम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या साहेबांवर न होता, उलट ते दुपटीने कार्यमग्न राहिले. आदिवासींवर घाला झाला, घुसखोरी झाली की लोक म्हणायचे, 'डॉ. गोविंद गारे ह्यांचा सल्ला घ्या. त्यांच्या कानावर घाला. 'असे त्या काळचे समीकरण होऊन बसले होते. डॉ. गारे ह्यांनी आदिवासी साहित्य व संस्कृतीची जी सेवा केली, तिला तोड नाही. 

आदिवासी समस्यांचे आणि संस्कृतीचे साहित्य त्यांनी मोठ्या प्रमाणात लिहिले. आदिवासी समाजात जन्मास येऊन त्यांच्यावर एवढीग्रंथसंपदा निर्माण करणारी ही एकमेव व्यक्ती असल्याने मोठ्या अभिमानाने म्हणावेसे वाटते की, 'झाले होतील परी या सम हा ' शेवटपर्यंत त्यांनी पन्नासच्यावर ग्रंथ लिहिले. त्यापैकी त्यांच्या पाच ग्रंथांना मराठी साहित्य वाङ्मय निर्मितीची महाराष्ट्र शासनाची पारितोषिकेही मिळाली होती. डॉ. गारे हे नुसते वैचारिक व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करणारे लेखक नव्हते, तर ते चांगल्याप्रकारचे कवीही होते. त्यांचा 'अनुभूती' हा काव्यसंग्रह १९९४ साली प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह दुसरे-तिसरे काही नसून प्रत्यक्ष फाटक्या तुटक्या आदिवासींनी डॉक्टरांना काहीतरी लिहिण्यास भाग पाडले आणि ते त्यांच्या लेखनीतून जातीवंत चितारले. त्याचपुढे कविता झाल्या. त्यापैकी 'ती माणसंच होती,' 'त्यांना भेटलो तेव्हा,' आणि 'मूळ निवासी' ह्या कविता अधिकच वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. ते लिहितात, 'उपाशीपोटी पोटं खपाटीला गेलेली, उघडे संसार डोक्यवर घेऊन चालणारी, उघडीवाघडी कळपाने चालणारी, अहो! ती माणसंच होती...' तर शेवटी लिहितात, 'घरातल्या चाऱ्यासाठी, रानातल्या वाऱ्यासाठी,  दारिद्याच्या काटेरी पायवाटा, तुडवत चाललेली, ती माणसंच होती. 

डॉ. गारे ह्यांनी आदिवासींचा कष्टमार्गी प्रवास नुसता पाहिलाच नाही तर त्यांच्याही वाट्याला आला होता. त्यामुळे त्यांच्या विषयीचा विलक्षण आदर, कुतूहल, जिव्हाळा आणि न मोजता येण्यासारखे त्यांचे दःख, दैन्य थोडेफार तरी कमी करण्याची त्यांची सात्त्विक, संयुत व स्वाभिमानी धडपड त्यांच्या वरील कवितांमधून जाणवते.

आपल्या समाजबांधवांच्या सामाजिक हक्कांवर झालेल्या आक्रमणाची भगवान बिरसा मुंडाने जशी प्रतिज्ञा केली होती.तशाच प्रकारची प्रतिज्ञा साहेबांनी करून खोट्यांचा रोष ओढून घेतला होता. मात्र समाजासाठी कोठेही हलगर्जीपणा केला नाही. शेवटपर्यंत आदिवासींची सेवा करण्याचे व्रत घेतलेला हा अधिकारी आपल्या लेखनीच्या सामर्थ्याने आदिवासी वाडे-पाडे नि वस्त्या धुंडाळून त्या भारताच्या नकाशात आणण्याचे अमूल्य काम करतो, तो धन्य होय. आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक करता-करता एक दिवस हा झुंजार अधिकारी सेवानिवृत्त झाला. पण त्यांचे कार्य चालूच राहिले. 

पुढे आदिवासी विकास परिषद व आदिवासी साहित्य परिषद ह्यांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत व तरूण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहिले. ते नेहमी म्हणायचे, 'कुडीत प्राण असेपर्यंत मला जे माहीत आहे ते मी सांगत राहणार बस!' अशा ह्या कार्यकर्त्याला दि. २४ एप्रिल २००६ रोजी सर्वांचा निरोप घेऊन जावे लागले. मात्र ते त्यांच्या कार्याच्या रूपाने आजही आदिवासींमध्येच आहेत. आदिवासी बांधवांच्यावतीने त्यांच्या स्मृतिस कोटीकोटी प्रमाम!