महाराष्ट्राला जशी संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, तसे अहमदनगर जिल्ह्याला कम्युनिष्टांचा बालेकिल्ला म्हणणे तेवढेच उचित ठरते. अशा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका. ह्या तालुक्यातील देवठाण गावानजिक पूर्वीचे नाव 'दोडक' नदी. आताचे 'आढळा' होय. तेथे गणेशखिंडवाडीत साधारण सातशे ते हजार लोकवस्ती असलेल्या प्रसिद्ध ठाकर वस्तीत ७ जून १९२८ रोजी सक्रुभाईंचा जन्म झाला. 'दोडक' नदी येथे एकेकाळी एक भला मोठा तीनशे माणसांचा वाडा होता. त्यात वाढ होत गेली आणि एके दिवशी त्यातील जवळजवळ पंचेचाळीस कुटुंबे आणि तीनशे एकर जमीन असलेल्या वाड्याची छकलेछकले उडाली. त्यातून भाऊबंदांच्या वाटण्या झाल्या. पुढे तर उरलेली जमीनही धरणात गेली. ह्या कुटुंबातील बऱ्याच जणांवर मोलमजुरीची कुऱ्हाड कोसळली. राहिलेल्या जमिनीचे तुकडे होतच राहिले. अशाच अवस्थेत पाण्याचे साधन नसल्याने आहे ती माती उकरत रहावे लागल्याने माणसे होती तशीच राहिली. अशाच वातावरणात सक्नुभाई लहानचे मोठे झाले. सकुभाईंचे शिक्षण चौथीपर्यंतचे देवठाण येथे झाले आणि अकोल्यात त्यांनी सातवी कशीबशी पूर्ण केली.
१९३६ मध्ये शाळेत असतानाच डॉ. भुतेकर ह्यांच्यामुळे राष्ट्रीय विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. सातवी पास झालेल्या सक्कुभाईंना सहज कुठेही नोकरी मिळाली असती परंतु त्यांना 'समाजसेवेची'च नोकरी करायची होती. म्हणूनच त्यांनी बुवासाहेब नवले, बी. के. देशमुख, धर्मा कमा भांगरे, ठाकूरभाई, अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या समवेत कम्युनिष्ट पार्टीच्या चळवळीत सहभाग घेतला. त्याकाळी कष्टकऱ्यांचे संघटन करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संघर्ष करणे आणि त्यासाठी जीवन उधळून देणे हा त्यांचा जीवनधर्म बनलेला होता. त्या कम्युनिष्टांची चळवळ संगमनेर, अकोले आणि संपूर्ण नगरजिल्ह्यात १९४५-४८ ह्या काळात शिगेला पोहचली होती.
मुंबईतील टिटवळा येथे झालेल्या 'किसान सभेच्या अधिवेशनानंतर वरूडी पठार, ता. संगमनेर आणि करंजी ता. पाथर्डी येथे झालेल्या 'किसान सभे'च्या आधिवेशनामुळे शेतकऱ्यांत जागृती होऊन कम्युनिष्ट चळवळ वेड्यापाड्यात रूजू लागली होती. अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, चंद्रभान पाटील आठरे, पी.बी. कडू, भाऊसाहेब थोरात, बुवासाहेब नवले, मुरलीधर नवले, धर्मा कमा भांगरे (साकीरवाडी), लक्ष्मण बुधा खोडके तथा ठाकूरभाई (शेवगाव, खानापूर), सनु बुधा मेंगाळ (देवठाण), गोपाळा भांगरे (साकीरवाडी), भाऊसाहेब वाक्चौरे (वाशेरे), मंजुळा फापाळे (लिंगदेव), विठ्ठल माळवे (राजूर), बी. के. देशमुख (केळुगण), पी. जी. भांगरे (मनोहरपूर), धर्मा पोखरकर (वरूडी पठार), रामभाऊ नागरे, विष्णूबुवा हासे, के. आर. खतोडे, दगडू मनाजी हासे, तबा कानवडे, पर्बत रहाणे, दगडू गोडे (वैतागवाडी), बळवंत कोकतरे (बलठण)... इत्यादींनी आपले सर्वस्व ह्या चळवळीत पणाला लावले होते.
त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे ठाकले होते. कॉ. अण्णा भाऊ साठे, कॉ. म. द. गव्हाणकर, कॉ. अण्णा डांगे ह्या तिघांच्या कलापथकाने रस्त्यावरच्या आम माणसांबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जागरण घातले. हे सर्व कार्य सक्नुभाईंनी जवळून बघितले होते. त्याचा परिणाम असा झाला की, बुवासाहेब नवले, ठाकूरभाई, मुरली नवले, कुशाबा नवले, ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या मेंगाळ ह्यांना शांत बसणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या विचारांशी पाईक राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचे पक्के केले. कॉ. सकुभाईंच्या सांसारिक वंशवेलीला एकूण अकरा अपत्य आली. पैकी सात मुले आणि सात मुली जन्माला आल्या. त्यांचे शिक्षण साधारण पाचवी ते सातवी पर्यंत कसेबसे आश्रम शाळेत झाले. त्यातील त्यांची नयना ही मुलगी बारावी कलेपर्यंत पोहचली होती. त्याकाळात तिने कबड्डी, खो-खो आणि मैदानी खेळांमध्ये अनेक पारितोषिके जिंकून
राज्यपातळीवरची खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला होता, परंतु शेवटपर्यंत तिला काही नोकरी मिळाली नाही. मेंगाळ साहेबांना अशा घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे होता? त्यांनी तर कम्युनिष्ट पक्षाशी संसार करायला सुरूवात केली होती. पायीपायी फिरून संपूर्ण नगर जिल्ह्यातच काय परंतु भीमाशंकर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मंचर आणि मावळ हा भागही पिंजून तेथेही नवीन कार्यकर्त्यांची फळी उभारायला सुरूवात केली होती. आताशी कुठे कॉ. सकुभाई चळवळीचा एक धडपड्या कार्यकर्ता म्हणून नावलौकिक पावत होते. अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला होता.
कॉ. सक्नुभाई आपण 'कम्युनिष्ट' कसे झालो त्याबद्दलचा एक किस्सा नेहमी सांगतात, “मी असाच गणेशखिंडीच्या ठाकर वस्तीत कधी हाताला मिळेल ते काम अथवा चकाट्या पिटत मित्रांबरोबर वणवण भटकत होतो. एके दिवशी कम्युनिष्ट चळवळीचे धुरीणी कॉ. बी. के. देशमुख व ठाकुरभाई हे दोघेही माझ्या घरचा रस्ता शोधत थेट घरीच आले, आणि घरच्यांना
म्हणू लागले हा मुलगा चळवळीच्या लायक आहे. तेव्हा त्याला काम करण्यासाठी पाठवता का ? आपल्या मुलाविषयी चांगली बोलणारी माणसे कॉ. सक्नुभाईंचे वडील प्रथमच बघत होते. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ताबडतोब मोठ्या आनंदाच्या भरात मला देऊन टाकले, आणि झालो मी एकदाचा पूर्णवेळ कम्युनिष्ट कार्यकर्ता." १९४२ च्या 'चलेजाव आंदोलना'त कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्त्वाने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे चळवळीचे खूप नुकसान झाले होते. तरीही मोजक्या कार्यकर्त्यांच्या अथक परीश्रमांमुळे कामगारांच्या संघटना व चळवळी नव्याने चांगल्याच फोपावत होत्या. संगमनेर, अकोले आदी भागातून कम्युनिष्टांनी कार्यमुक्तीचा लढा सुरू केला होता. दुष्काळ असूनही गरीबांच्या 'लेव्ही साखर सक्ती'ने माथी मारली होती. त्याविरूद्ध ही चळवळ सुरू झाली होती. शेतकऱ्यांमध्ये 'किसान सभे'च्या कार्याने चांगले मूळ धरले होते.
'ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे' ही काम चांगले जोमाने सुरू झाले होते. एके दिवशी दोन्हीही तालुक्यात बुवासाहेब नवलेंनी कचेरीवर मोर्चा काढला. अण्णासाहेब शिंदेंनी मोर्च्याला मार्गदर्शन केले. मोर्च्यात त्यावेळचे काँग्रेसचे आमदार दत्ता देशमुखही सहभागी झाले होते. त्यांनी विधानसभेत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर मोरारजी सरकारवर कडाडून हल्ला चढविल्याने मोरारजींना ते फारच खटकले होते. थोड्याच दिवसांनी अकोल्याच्या मोर्च्यानंतर अण्णासाहेब शिंदे, बुवासाहेब नवले, दत्ता देशमुख ह्यांना अटक करण्यात आली. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते. चंद्रभान आठरे पाटील, रावसाहेब शिंदे ह्यांना वारंट निघाले आणि पकडून देणारांना दहा हजार रूपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
ह्यावरून तत्कालीन सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिष्ट नेत्यांचा किती धसका घेतला होता. ह्याचा अंदाज सर्वसामान्यांना येतो. सामान्य कार्यकर्ते चळवळीसाठी अक्षरशः जीव कुरबान करत होते, आणि पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रत्येक वेळी अंदाज घेण्यात चुकत होते. त्यामुळे चळवळीवर नको तेवढे वार होत होते. ही चळवळ चांगले बाळसे धरू लागली आहे असे म्हटल्यावर विरोधकांनी पुन्हा हल्ले सुरू केले. पक्षाची गळचेपी केली. अशा परिस्थितीत चळवळीला दिशा मिळावी, म्हणून शामराव व गोदावरी परूळेकर मार्गदर्शन करण्यासाठी ह्या भागात आले होते. ते भूमीगत असल्याने भाऊसाहेब थोरात, विष्णुबुवा हासे आणि सक्नु बुधा मेंगाळ ह्यांच्या मदतीने ते गणेशवाडी, देवठाण येथे राहिले. ह्या दोघांनाही अनेक दिवस भुसाऱ्यात लपून ठेवण्याचे दिव्य काम सक्नुभाईंनाच करावे लागले होते. एवढेच नव्हे तर सक्नुभाई ह्या पक्षातील भूमिगतांना भाकरी पुरविण्याचे अतिशय अवघड कामही करत असत. पुढे १९४४ साली त्यांना स्वतःलाच भूमीगत व्हावे लागले होते. ह्या कालावधीत त्यांनी अनेकदा पोलिसांच्या पलटणींना समोरासमोर चकवून त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. पुढे परूळेकर श्री. व सौ. ह्यांना अशा ज्वालाग्राही भागात दिवस काढणे धोक्याचे वाटल्याने सोनेवाडी, पाडळी, सोनांबे, कोनांबे, भरविहीर, वाडीवऱ्हा येथे जागा बदलून अखेर त्यांना अस्वली स्टेशनवर बसवून देण्यात आले. त्याकाळात काँ. सक्नुभाई आणि त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यानी परूळेकर उभयतांची जिवापाड काळजी घेतली होती.
७ नोव्हेंबर १९४९ पासून सावकारशाही आणि गुंडांचे कारस्थान वर डोके काढू पहात होते. त्याला कारणही तसेच होते. सावकारशाहीला आणि गुंडगिरीला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. कॉ. मुरलीधर नवले आणि भाऊसाहेब थोरात ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खिरविरे येथील न्हालाशेठ आणि इतर सावकारांविरूद्ध केलेल्या आंदोलनाने कम्युनिष्ट पुन्हा चर्चेचा विषय झाला होता. नवलेवाडी, देवठाण, राजापूरचे कार्यकर्ते त्यात आघाडीवर होते. मुरलीधर नवले, सक्नु बुधा मेंगाळ, ठाकूरभाई, धर्मा कमा भांगरे, कुशाबा शिंदे, वाक्चौरे मास्तर आदिंच्या नेतृत्त्वाखाली वेगवेगळ्या तुकड्या करून दिवसाढवळ्या सावकारांकडील गहाण खते व कागदपत्रे भर चौकात आणून जाळण्यात आली. शिवनारायण सारख्या सावकाराला सकुभाईंच्या कार्यकर्त्यांनी हालहाल करून काठीने बदडून काढले आणि शेवटी यमसदनाला पाठविले. त्या परिसरातले सावकारांचे गुंड शेतकऱ्यांची भयंकर अवहेलना करायचे. एकदा तर कर्ज वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी हाताशी मिळेल ते उचलायला सुरूवात केली. एका गरीब शेतकऱ्याने "गाय घेऊन जा!" अशी विनवणी करूनही मुद्दाम गुड कालवडच घेऊन पोबारा करू लागले. ते पाहून सक्नुभाई आणि मोजक्या कार्यकर्त्यांनी अशा गुंडांना अद्दल घडविली. त्यांना तेथेच झाडाला बांधून ठेवले आणि त्यांचे मालक, सावकार सारडा ह्यांना तेथे जाऊन जागीच ठार केले. मग काय सक्नुभाई आणि काही कार्यकर्त्यांवर तात्काळ खटला भरण्यात आला. मात्र ते न डगमगता अशा गोष्टींना सामोरे जात राहिले. त्यातच सर्व विरोधक वकील एकत्र आल्याने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची तातडीने सुटका केली.
जेलमधून सुटून आल्यावर कॉ. सक्नुभाईनी आपले नित्याचे काम चालूच ठेवले. गोरगरीब आदिवासी, दलित भटक्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सावकार आणि गुंडांना त्यांनी मनमुराद झोडपून काढले. चाणाक्ष सक्नुभाईंनी प्रथम स्वतःच्या गावातील गुंडांना वठणीवर आणत त्यांचा प्रथम बंदोबस्त केला. मग नंतर सावरगाव, समशेरपूर, खिरविरे, ठाणगाव ते थेट सिन्नरच्या भागातही जाऊन गुंडगिरीचा खात्मा केला होता. देवठाणचा धोंडू पाटील सहाणे हा एक नंबरचा मवाली होता. गोरगरीबांना लुबाडण्याचा जणूकाही त्याचा व्यवसायच होता. एके दिवशी एका गरीब शेतकऱ्याचे कर्ज फेडत नाही म्हणून उभे बाजरीचे पीक कापताना त्याला सक्नुभाईंच्या साथीदारांनी रंगेहात पकडले, आणि मग सहाणे सावकाराची अवस्था काही विचारू नका.
धोंडू पाटील सहाणे, सक्नुभाईपेक्षा कितीतरी पटीने देहयष्टीने उजवा होता. कॉ. सक्नुभाई म्हणजे 'काडी पहिलवान मात्र अंगी नाना कळा' एकदा गुंडांसमोर उभे ठाकले की ते वीजेसारखे सरसळायचे आणि आपला बेत फत्ते करायचे. त्या दिवशी असाच दोघांचा सामना झाल्यावर सक्नुभाईंनी हवेत उंच उडी मारून गिरकी घेत साहण्यांच्या दोन छाताडात अशा काही लाथा लगावल्या की, रक्ताच्या गुळण्याच त्याला कराव्या लागल्या. तशा अवस्थेत त्याला पळती भूई थोडी केल्यावर सकुभाईच्या साथीदारांनी शेजारच्या गुंडांचा समाचार घेतला. त्यानंतर आपोआपच सर्व गुंडांवर वचक बसला. पुढे सर्व गुंड आणि सावकार सक्नुभाईला बघितले की, चळाचळा कापायचे, त्यांना घाम फुटायचा. आपल्यावर हल्ला करतो की काय ? ह्या भीतीपोटी ते पळून जायचे, लपून बसायचे. अशातच एके दिवशी कोणीतरी सकुभाईंबाबत पोलिसांत खोटी तक्रार दिली. पोलिसांनाही तेच हवे होते. त्यांनी सक्नु मेंगाळांना अटक करून रू. १००/- दंड भरण्यास भाग पाडले. ती तक्रार पुढच्या कोर्टात गेली; मात्र न्यायाधिशांनी सांगितले की, "हा काही खाजगी गुन्हा नाही. तो सामाजिक गुन्हा आहे.' त्यामुळे मेंगाळसाहेबांना सोडून देण्यात आले. 'लाल बावठ्यावाल्यां'ना जर का कोणी चॅलेंज केले तर ते त्यांची पुरे पाडल्याशिवाय सोडत नसत. अशा वेळी पोलिसांचा कितीही ससेमिरा पाठी लागू द्या, ते त्यांना बरोबर चुकून संबंधीत गुन्हेगाराला अद्दल घडविल्याशिवाय राहत नसत.
त्यामुळे कम्युनिष्टांच्या वरिष्ठांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत संपूर्ण नगर जिल्ह्यात एक दहशत निर्माण झाली होती. भले-भले ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांजवळ नांगी टाकत होते. त्यामुळेच अख्या नगर इलाख्यात कॉ. सकुभाईंना सावकार, गुंडांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्याकाळी देवठाणवरून अकोले आणि गणेशखिंड, ठाकरवाडी (देवठाण) येथे जाण्या-येण्यासाठी आजचा प्रवरानदीवर असलेला पूल नव्हता. त्यामुळे पाण्याच्यावरून दोन तारा बांधलेल्या असायच्या. एकाबाजूला लोखंडी शिडी बसवलेली, त्यात ठरावीक माणसे बसले की, त्या शिडीला असलेली स्टेरींग जोर लावून फिरवली म्हणजे ती शिडी हवेतून तरंगत माणसांना घेऊन पैलतिरी नेत असे. कॉ. सक्नुभाई आणि त्यांचे साथीदार मात्र नदीला कितीही पाणी असू द्या, कपडे डोक्याता बांधून पक्षाच्या सभेसाठी नेहमी पोहून जायचे. त्याकाळी कम्युनिष्ट कार्यकर्त्यांत जेवढी हिंमत होती, तेवढी इतर कोणत्याच पक्षात नव्हती. त्यावेळचे कार्यकर्ते रात्री-अपरात्री पक्षाच्या कोणत्याही कामासाठी सहजतेने वावरत असत. 'कॉम्रेड नवले सभागृह' ह्या मातीत झाले पाहिजे, म्हणून सगळीकडे गहजब करीत होते. कम्युनिष्ट पक्षाची शिस्त आणि कार्य पाहून मुस्लीम बांधवांनीही ह्या पक्षाला सर्व गोष्टींनी मदतीचा हात दिला होता. बरोबर त्याचवेळी कम्युनिष्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी हे पद सक्नुभाईंकडे आले ते तब्बल पंधरा वर्षे. ते त्यांनी मोठ्या मेहनतीने भूषविले. त्याकाळी सत्ताधाऱ्यांना ह्या पक्षाची ताकद चांगलीच समजल्याने त्यांनी ह्या पक्षाला अनेकदा दाबण्याचा प्रयत्न केला होता. सक्नुभाईतर म्हणतात, "पंडित नेहरूंनी तर पक्षाची छकलेछकले कशी करता येतील ह्यासाठी बरीच मेहनत घेतली होती." त्यावेळी जर का कुणी त्यांच्या विरोधात गेला तर त्याला तुरूंगाची हवा दाखविल्याशिवाय राजकारण्यांना शांत झोप येत नसे. थोड्या दिवसांनी काय झाले कुणास ठाऊक. १९६२ नंतर अनेक कम्युनिष्ट कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सामील झाले. कारण काँग्रेसवाल्यांनी आमच्याकडे आल्यास आमदार, खासदार ही पदे मिळतील, असे आमिष दाखविल्या गेल्याने पक्षात फूट पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कॉ. सक्नुभाई काँग्रेसच्या कोणत्याही मोहाला बळी न पडता, आपला पक्ष कसा टिकेल, ह्याकडे जातीनिशी लक्ष देत होते. ह्या पक्षाच्या 'पॉलेट ब्युरो' ह्या पदावर भारत देशातील ७२ सभासद असतात. ह्या सभासदांपैकी फक्त बुवासाहेब नवले आणि बी. के. देशमुख ह्या दोनच शिलेदारांची वर्णी कार्यकारणीवर लागली होती, आणि तिसऱ्या नावाची जी चर्चा सुरू झाली होती ती अर्थात कॉ. सक्नुभाई ह्यांचीच. जुन्या कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध कार्याची आठवण झाली की, मेंगाळ साहेब आजच्या कार्यकर्त्यांबद्दल नाराजीच्या सुरात म्हणतात,
“आजचे कार्यकर्ते मोठमोठ्यांपदांवर आरूढ झाले असून ज्यांनी पक्षाचा पाया मजबूत केला, खस्ता खाल्ल्या आणि पक्षाला उभारी दिली. अशा जुन्या कार्यकर्त्यांना कस्पटासमान लेखतात, त्यांना तुच्छतेची वागणूक द्यायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. अशाने कुठे पक्ष मोठा होणार आहे का? आजच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला 'भाऊ'ची वागणूक द्यायला हवी. ती दिली जात नाही. अशी माझी रास्त खंत आहे.' असे ते आजही कळकळीने बोलतात.कॉ. सक्नुभाई हे १९७२च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून थोड्याच मतांनी दुसऱ्या स्थानावर गेले होते. हे आपले काम नाही म्हणता म्हणता पुन्हा १९७८ साली जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी चांगलीच गाजविली. त्यावेळी भरपूर मतांनी ते विजयी ठरले. आपल्या हातात थोडा बहुत कारभार आला आहे, म्हटल्यावर त्यांनी चांगलेच हात धुऊन घ्यायचे ठरविले. डोंगरमाथ्यांवर रस्ते करण्यासाठी सर्वात मोठे योगदान कुणाचे असेल तर ते सक्नुभाईंचे. त्याकाळी 'वाडी तेथे रस्ता आणि घर तेथेही रस्ता' अशी भूमिका आखून ती फक्त कागदांवरच न ठेवता, कृतीत आणण्याचा प्रथम प्रयत्न सक्नुभाईंच्या योगदानानेच झालेला होता.
पक्ष कोणताही असू द्या. पदाधिकाऱ्यांपेक्षा कार्यकर्ते खूप खस्ता खात असतात. पक्षाचा विस्तार होत असताना सक्नुभाईंनी ह्या गोष्टींची उत्तमरितीने काळजी घेतली.असे करूनही आज सकुभाईंच्या वाट्याला काय आले.असा अनेकांचा प्रश्न आहे. मात्र दस्तुरखुद्द सक्नुभाई असे अजिबात मानत नव्हते. भाई पारखलेल्या माणसांचे मूल्यमापन अचूक करत. माजी आमदार यशवंतराव भांगरे ह्यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. ते
म्हणत, "भांगरेसाहेब मोठे सज्जन गृहस्थ होते. ते म्हणायचे, पक्ष कोणताही असू द्या. माणसांच्या विचारांचे, मनाचे स्वागत करायला आपण शिकलो पाहिजे. यशवंतराव भागऱ्यांचे असे खास वैशिष्टये होते ते पक्षाला बाजूला ठेऊन आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायचे." पुढे आपल्या आठवणी सांगतांना मेंगाळसाहेब म्हणतात, "यशवंतराव भांगऱ्यांसारखा माणूस आजतरी कोणत्याही पक्षात सापडणे अवघडच आहे. दुष्मणांना जेवण, चहा, नास्ता देऊन त्यांना आपल्या बाजूने वळविणे, ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र भांगरेसाहेब ती सहजतेने करत असत.'कम्यु निष्ट पक्षात कोळी महादेव समाजातील कितीतरी पट्टीचे शिलेदार होते. ज्यांच्यामुळे पक्ष अधिक गतीने वाढीस लागला होता. मुळात ही माणसे अतिशय प्रामाणिक असल्याने त्याकाळात नगरजिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात घेतले जायचे. ते केवळ ह्या पक्षाच्या झंजावाती वादळामुळेच.धर्मा कमा भांगरे, गोपाळा धोंडू भांगरे, बी. के. देशमुख, बुधा डावखरे आणि ह्यापेक्षा कितीतरी मंडळींनी ह्या पक्षाला वाहून घेतले होते. त्यात बळवंत कोकतरे (बलठण), हे सक्नुभाईंचे लंगोटी यार होते, असे म्हणतात .की, "बळवंत कोकतरे आणि सक्नु बुधा मेंगाळ ह्या दोघांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा असायचा. मात्र अनेकदा पोलिसांना समोरासमोर” फसवून ते पसार झालेले असायचे. पुढे तर पोलीसच ह्या दोघांना घाबरत असायचे. अशा ह्या पक्षाबद्दल सकुभाई म्हणतात, 'दुर्वे' नाना ह्यांच्या 'समाजवादी' पक्षातून 'कम्युनिष्ट पक्षा'चा जन्म झाला. ह्या पक्षाचे विशेष म्हणजे शोषणाऱ्यांच्या विरोधात भक्कमपणे पावले उचलणारा आणि त्यांच्या कृत्याला विरोध करणारा पक्ष म्हणूनच त्याच्याकडे आजही पाहिले जावो, अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे.'
'सेझ'ची आठवण काढली की,मेंगाळभाईंचे म्हणणे, शंभर एकर जमीन उद्योगाला दिली, त्यातून शंभर पट्टीने उत्पन्न निघत असेल तर ती जरूर द्यायला हवी. मात्र जमीन खराब असेल तर द्यावी, पण चांगली चुकूनही देऊ नये. असे मत असलेले सक्नु भाई आजच्या वर्तमानाविषयी म्हणतात, "आज जपान कुठं चालला आहे? आणि आपला देश कुठे?" ह्या नाराजीवर ते तुटून पडतात आणि शेवटी म्हणतात, "काहीही करा, शेवटी आयुष्य म्हटले की, आपुरेच पडते. माणसांनी काळाचे भान ठेऊन पुढे चालले पाहिजे. ही माझी आजही ठाम भूमिका आहे, आणि ती पुढेही राहणार आहे." ह्याचाच धागा पकडून ते म्हणतात, “माझे एक स्पप्न होते, ते म्हणजे जग सगळे 'भाई' (कॉम्रेडमय) होईल. मात्र ते होऊ शकले नाही." अशा वेळी ते जगाच्या लोकसंख्येबद्दलही चिंता व्यक्त करत, आणि संतती नियंत्रण, शेतीची सुधारणा, मुलीला पहिला मान द्यायला हवा. अशा पुरोगामी विचारांबद्दल भरभरून बोलत. कायद्याची उत्तम जाण असलेले सक्नुभाई वन कायद्याविषयीही आपले मन हालके करत. वय वर्षे ८९ असलेल्या सक्नुभाईंचा संसार हा कोंबड्या-तितड्यांचा आणि बकऱ्या-मेंढ्यांच्यात एखाद्या सामान्य माणसाने रमावे असाच होता.
ते ह्याच विश्वाला आपला संसार मानत. अशा सक्नुभाईंना काल परवापर्यंत जर कोणी बघितले असते तर एकेकाळचे कम्युनिष्ट लढवय्ये आणि खंद्दे कार्यकर्ते, तसेच सावकारांचे कर्दनकाळ असतील ह्यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. त्यांचे शरीर जरी थकले होते, तरी त्यांचे मन मात्र ताजेतवाने असलेल्या सक्रुभाईंना कुणी त्यांच्या जमान्यात घेऊन गेला तर काय सांगावे आणि किती बोलावे? असे त्यांना होऊन जाते असे. ते उत्साहाच्याभरात संपूर्ण पक्षाची जातकुळी आणि इतिवृत्तता कथन करत भाई जाताजाता तरूणांना आपल्या पठडीतला सल्ला द्यायलाही अजिबात विसरले नाहीत. ते म्हणत, "एक लक्षात ठेवा, विचार कधीही म्हातारे होत नसतात. डांगे बाबा, एस. एम. जोशी ह्यांच्या विचारांनी मी पेटलो, तावून सुलाखूण निघालो. त्यामुळे तत्त्वाशी लबाडी मला कुडीत प्राण असेपर्यंत करता आली नाही.” अशा ह्या कार्यकर्त्याला समजून घ्यायला 'नगरकरांना 'च काय? परंतु महाराष्ट्रवासीयांनाही आपले मन नक्कीच मोठे करावे लागेल.
तसे त्यांनी केले नाही तर एके काळी सक्नुभाईंनी सामान्यांच्या सुखासाठी सावकार - गुंडांशी केलेली लढाई निष्फळ ठरली असती. त्यामुळे उदार अंतःकरणाने महाराष्ट्रातील जाणकार तसे करणार नाहीत. अशी खात्री वाटते. असा हा प्रवरेचा प्रपात बेधुंद लाटांनी कुडीत त्राण असेपर्यंत उसळला आणि बुधवार दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी तमाम नगरकरांना हुरहूर लावून काळाच्या पडद्याआड कायमचे जय काँग्रेडस् करत निघून गेले. अशा ह्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या धुरंधर विचारांना अभिवानद!.....