जिद्द आणि कर्तृत्त्वातून साकारलेले व्यक्तिमव्य - मधुकर शंकर तळपाडे उपाख्य भाऊ

Tribal Mahavikas
ही यशोगाथा आहे एका हरहुन्नरी पोलीस अधिकाऱ्याची. ज्यांना नुकतेच मोठ्या समारंभपूर्वक पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले, अशा नाशिक येथे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मधुकर तळपाडे साहेबांची! सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत गड-किल्ल्यांना वानवा नाही. अशाच एका औंढा पट्टा किल्ल्याच्या (विश्रांतगड) पायथ्याशी असलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या नैऋत्य दिशेला जाणाऱ्या म्हैस वळणाच्या घाटाने देश आणि महालदेश जोडलेल्या रस्त्यावर असलेल्या सांगवी ह्या गावी दि. ५ मे १९६१ रोजी भाऊंचा जन्म झाला. वाहतुकीच्या आणि सर्वच सुविधांपासून वंचित असलेल्या अतिदुर्गम परिसरातून शिक्षणाची जिद्द मनात ठेवून अतिशय हालापेष्ठा सहन करत,आपला प्रवास सुरू ठेवणारा हा ध्येयनिष्ठ तरूण म्हणजेच आजचे पोलीस अधिक्षक मधुकर तळपाडे होत!! माझ्या तालुक्याची झालेली शैक्षणिक दैना मला अजिबात पहावत नाही, अशी रास्त कळकळ व्यक्त करणारे आणि पोलीस अधिक्षक पदाचा क्षणार्धात त्याग करून आपल्याला ना पैसा कमवायचा ना फुकट वाटायचा. फक्त ह्या बांधवांचे हाल बघवत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी काही करता येते का? ह्यासाठीच मी राजकारणाचा मार्ग अवलंबिला असे छातीठोकपणे बोलणारेही मधुकर तळपाडेच!!!

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण कसेबसे रडतखडत सांगवीच्या प्राथमिक शाळेतच झाले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे जे म्हटले जाते ते तेवढेच खरे. घोडे गुरूजींनी बरोबर हुशार आणि चुणचुणीत ज्या मुलाला निवडून काढले होते, ते तळपाडे ह्यांनाच. महाराष्ट्रात १९६६-६७ पासून जे दुष्काळाचे सत्र सुरू झाले ते १९७३-७४ पर्यंत ह्या दुष्काळाने गर्भश्रीमंतांचे कंबरडे मोडले म्हटल्यावर आदिवासींच्या वाड्या पाड्यांची काय अवस्था झाली असेल, ती न वर्णिलेली बरी. अमेरिकेतून मिलू, जवसाची जी आवक झाली होती. त्यांचा थोडा बहूत वाटा दुष्काळग्रस्तांना देण्यात आला होता. तळपाडे ह्यांच्या शिक्षण घेत असलेल्या वसतिगृहातही मिलू, जवसाच्या भाकरीचे तुकडे, हुलग्याच्या घुगऱ्या आणि कधीकधी बाजरीचा घाटा दिला जायचा. तो नरडीच्या खाली उतरायचा नाही. मात्र कसेबसे दिवस काढल्याशिवाय गत्यंतर नसायचे. अशा दिवसांतही सांगवीच्या साळदऱ्यात आंब्यांची मोठी अंबराई असल्याने, ती अंबराई ठरावीक माणसांच्या मालकीची होती. 

त्यात भाऊंच्या मामांच्याही वाट्याला बरीच चांगली झाडे होती. मुळात मामांची परिस्थिती सुधारलेली होती, परंतु मामी खडूस असल्याने भाऊचा राग केला जाई. अशावेळी आजीला खूप वाईट वाटायचे. ती तिच्या पद्धतीने गुपचूप धान्य, आंबे लपवून आणायची, आणि मामीचा डोळा चुकवून त्यांच्या घरी पोहचवायची. तेव्हा कुठे तळपाडेंची थंड असलेली चूल पेटली जायची. अशा परिस्थितीतही वडिलांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते म्हटल्यावर लगेच आडकाठी म्हणून काकांनी वायलं घ्यायचा फतवा काढला, आणि क्षणार्धात घर फुटले. त्याचवर्षी चौथीच्या केंद्राची परीक्षा असल्याने त्याचा परिणाम भाऊंवर होणार, तोच मेंगाळ गुरूजींनी मध्यस्थि करून, धीर देऊन चौथी इयत्तेत समाधानकारक मार्कस् तर मिळालेच, शिवाय भाऊ केंद्रात दुसरे आले. पुढे पाचवी ते सातवीत कोंभाळण्याच्या बोंर्डिंगमध्ये असतांना सदगीर गुरूजींसारखे अतिशय प्रेमळ आणि हुशार गुरूजी भेटले. त्यामुळे मधुकर तळपाडे ह्यांच्या जीवनाला अधिकच पैलू पडत गेले. तळपाडे ह्यांच्या वर्गाला एक-एक निर्णायक शिक्षक लाभत गेले, आणि तळपाड्यांची बौद्धिक क्षमता अधिक तेजोमय बनत गेली. बांबळे गुरूजींच्या आगमनाने तर सर्वामध्ये एक नवा उत्साह संचारला. त्यांच्या सहवासात सर्व मुले अतिशय चांगल्या पद्धतीने घडत होती.अशा वातावरणाचा फायदा उचलत तळपाडे ह्यांनी सलग वर्गात पहिला येण्याची 'हॅट्रिक'च साधली. त्याचा परिणाम असा झाला की, भाऊ सर्व शिक्षकांचे कमालीचे लाडके बनले.सातवीची बोर्डाची परीक्षा पहिल्या क्रमांकाने परीक्षा पास झाल्यावर कोंभाळण्याची बोर्डिंग अचाकन बंद पडली, आणि सर्व होतकरू विद्यार्थ्यांवर पुढील शिक्षणाचे मोठे संकट कोसळले. त्यातूनही अनंत अडचणींवर मात करत काहींनी समशेरपूर येथे आठवी इयत्तेत प्रवेश घेतला. भाऊ ह्या प्रक्रियेत सर्वात पुढे होते. प्रवेश तर मिळला, परंतु घरच्या अठराविश्व दारिद्यामुळे एक-एक दिवस कंठणे फारच जिकीरीचे होऊन बसले होते.

त्यामुळे दिवाळीची अथवा मे महिन्याची सुटी लागते कुठे नाहीतर सर्व मुले आपापल्या आई-बाबांबरोबर 'रोजगार हमी योजने'च्या कामावर हजर असायचे. तशा कामावर माणसामागे तीन रूपये, तर छोट्यांना एक रूपया हजेरी मिळायची. भाऊ देखील आपल्या कुटुंबीयांवर टाहकरी, देवठाण,समशेरपूर आणि काम मिळेल तेथे जाऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा. कोंभाळणे येथील लोहकरे, वांजुळशेत येथील के. के. नवले सरांमुळे इंग्रजीची भाऊला भलतीच गोडी निर्माण झाली. जेव्हा बघावे तेव्हा त्यांचे इंग्रजीचेच वाचन सुरू असायचे. त्याचा अनुकूल परिणाम असा झाला की, पुढे इंग्रजी विशेष घेणे सहज शक्य झाले. समशेरपूर येथे असतांना तळपाडे ह्यांच्या नाजूक परिस्थितीमुळे शाळेसाठी काही नवा ड्रेस घेता आला नव्हता. जुन्यावरच काम चालू होते. अशातच एके दिवशी शाळेतच मुलांचे कपडे शिवण्यासाठी टेलर आला होता. तो स्वभावाने अतिशय चांगला होता. भाऊची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्या टेलरने उरलेल्या कापडातून एक पॅन्ट शिवून दिल्यावर भाऊला भलताच आनंद झाला. 

स्वभावाने अतिशय नम्र आणि तेवढाच हुशार असलेल्या भाऊला पवार सर फुकट शिकवायचे. सद्गीर सरांना पाणी आणून दिले की,हंड्यामागे प्रत्येकी पाच रूपये मिळायचे. ही स्वतःची पहिली कमाई पदरात पाडून घेतल्याने त्यांना भरभरून आले होते. रोजचे कष्ट हाकेच्या अंतरावर होतेच. ते काही पाठ सोडायला तयार नव्हते, आणि भाऊही त्या दारिद्याला भीक घालायला तयार नव्हते. दिवसाकाठी पोटात काहीतरी गेले पाहिजे, म्हणून शाळेच्या व्यतिरिक्त भाऊ आणि मित्र खेकडे, मासे पकडण्यासाठी नदीवर धावायचे. ते सर्वजन अभ्यासाइतकेच ह्या कामातही पटाईत होते. पकडलेल्या खेकडे, माशांचा फडशा तिकडेच नदी ओहळाला भाजून केला जायचा. बाकीच्यावेळी दोन पैशांना एक गुळाचा खडा मिळायचा. तो खाऊन वरून दोन-तीन तांबे पाणी पिऊन भूक भागविण्याचे काम करावे लागायचे. घरचे वातावरण आणखी मन उडवणारे होते. घरी आई-बाबांना शेतीचे काम उरकावे लागे.मोठे चुलते कामचुकारपणा करायचे. त्यावेळी ब्राह्माणाची सुपीक जमीन भाऊच्या एकत्र कुटुंबाकडे होती, परंतु चुलत्यांच्या भांडणामुळे ती गमवावी लागली होती. घरात भाऊ एकटाच शिकतो आहे म्हटल्यावर सर्व काका हसून थट्टा करत म्हणायचे, "हा काय मोठा दिवा लावेल शाळेचा?"

भाऊ आजही ती आठवण सांगतात आणि म्हणतात, "मी अतिशय जिद्दीने, चिकाटीने शिकून पोलीसमध्ये अधिकारी झालो आणि माझ्या गाडीला लाल दिवा आला तर सगळेच काका खजील होऊन खाली मान घालू लागले, आणि इतर त्यांची थट्टा करू लागले.' एकदा काय गंमत झाली, कोंभाळणे येथील निवृत्ती शेटे कुंदे ह्यांची चिल्लरची पिशवी चुकून भाऊच्या हाती लागली. एवढे पैसे बघून, प्रथम थरथरणारे हात आणि मन विचारात पडले, काय करावे? असे हरामाचे घेण्यास त्या हातांना आधी अजिबात सवय नव्हती. परंतु पोटातील भुकेच्या धडपडीने विजय मिळविला आणि त्याच हातांनी ती पिशवी लपवून त्यातील थोडेथोडे पैसे काढून भूक लागली की, शेंगादाणे, गूळ विकत घेऊन खाण्याची चटक लागली. बरोबर त्याचवेळी कुंदे ह्यांनी दुकानदाराला बजावून ठेवले की, "तुमच्याकडे नेहमी गूळ, शेगांदाणे घेण्यासाठी कोण येते ते बघून ठेवा.' दुसऱ्याच क्षणाला भाऊ मुद्देमालासह पकडले गेले. मग काय, घरच्यांना हात उसने पैसे घेऊन सर्व भरून देणे भाग पडले. मात्र तेथून पुढे भाऊच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी पुढे कुणाच्याच वस्तूला हात लावला नाही. १९७७ रोजी सर्वसामान्यांसारखेच ५६.०० टक्के गुण मिळवून भाऊ मॅट्रिक पास झाले, आणि त्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्ग खुला झाला. 

असा एक दिशाहीन युवक आपल्या धडपडीतून, कष्टातून हात धुवून मागे लागलेल्या डोंगराएवढ्या प्रश्नांना तितक्याच सहजतेने कवेत घेऊन जी मुसंडी मारतो ती भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. त्यातीलच एक प्रसंग महाविद्यालयाचे प्रवेशद्वार जरी खुले झाले होते, तरी महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांच्याजवळ ना गणवेश ना पायताण. अशावेळी तुकारामबुवा त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्यांच्या मुलांचे जुने कपडे अल्टर करून दिले, आणि भाऊंचे त्या कपड्यावर कॉलेज सुरू झाले. श्री. गोंगे सर ह्यांच्या सल्ल्यानुसार अकारावी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला, परंतु अडचर्णीमुळे पुन्हा कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. असे असतानाही येणाऱ्या संकटांवर मात करत अकरावीत प्रथम येण्याचे खाते खोलण्यात भाऊ कुठेही कमी पडले नाहीत. त्यावेळी प्राचार्य पराडकरांनी पाठीवर टाकलेल्या पहिल्या शब्बासकीची थाप आणि केलेले कौतुक भाऊ आजही स्मरणात साठवून आहेत.बारावीच्या गुणांवर वर्ग प्रतिनिधी बनण्याची चालून आलेली संधी भाऊ दवडतीलच कसे? त्याचवर्षी नाटक, एकांकिकेडे आकर्षित होत जाणारे भाऊ अभ्यासाकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देत नव्हते. 

म्हणूनच डॉ.विजय बाणकर ह्यांनी लॉजिकला जो कुणी ९५ पेक्षा जास्त गुण मिळवील,त्याला रूपये ५ चे ठेवलेले बक्षीस भाऊंच्याच खात्यात जमा झाले होते. ते प्रामाणिकपणे म्हणतात की, "अकरावतीत 'एन. सी. सी.' मध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने मी शिस्तीचा भोक्ता बनलो." पुढे माझ्यातील बुजरेपणा कुठल्याकुठे पळून गेला. त्याचा तपासही लागला नाही. ह्या सर्व गोष्टींचे श्रेय ते विशेषत्त्वाने शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शिवाजीराव दिघे ह्यांना देतात, आणि पुढे म्हणतात, "आदरणीय दिघे सरांच्या चांगुलपणामुळेच मी कॅडेटचा अंडरऑफिसर होऊ शकलो. ह्याच माणसाने माझ्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पारखले आणि योग्य मार्गदर्शन केल्याने, कितीतरी खाचखळगे आले तरी त्यांना ओलांडून माझी शिक्षणाची गाडी न अडखळता योग्य मार्गाने व योग्य दिशेन चांगल्याच गतीने धावू शकली भाऊंची अभ्यासाबरोबर एन.सी.सीतील चढती कमानही थक्क करणारी अशीच आहे. कॅडेट, एस.सी.पी.एल., सार्जंट, अंडर ऑफिसर, जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय दर्जाची पाच-सहा शिबिरे यशस्वीरित्या तर गाजवलीच.

शिवाय अतिशय अवघड असणारी 'सी' सर्टिफिकेट परीक्षा देखील अतिशय कष्टातून ते सहज पास झाले. अशाच एका शिबिर निवडीच्या किश्श्याविषयी भाऊंबद्दल दिघे सर 'अगस्ते' ह्या वार्षिकामध्ये लिहितात, “आमच्या महाविद्यालयाची यशोगाथा मधुच्या नामोल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकणारी नाही, मधुकरसारखा गुणवंत आणि कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे सद्भा आमच्या महाविद्यालयास आणि आम्हास लाभले, ह्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. माझ्या ३३ वर्षे सेवाकाळात अनेक गुणवंत विद्यार्थी / विद्यार्थिनीचा जवळून परिचय झाला. त्यात मधुचा क्रमांक फारच वरचा आहे. त्यावेळी मी एन.सी.सी. युनिटचे काम पहात होतो. धुळे ते दोंडाईचा ह्या मोबाईल कंपनीसाठी दोन सक्षम कॅडेटची निवड करून एन.सी.सी एच.क्यूला पाठविली होती. दरम्यानच्या काळात महाविद्यालयातील अंतस्थ संघर्षाचा परिणाम म्हणून त्यातील एकजणाने ऐनवेळी शिबिराला जाण्यास नकार दिला होता. परिणामी माझी बऱ्यापैकी धावपळ उडाली होती. 

नवीन कॅडेटची शोध मोहीम सुरू असतांना मधुला माझ्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी मधूचे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व पाहून त्याला ज्याने माझ्यासमोर आणले होते, त्याला मधूच्या योग्यतेविषयी माझ्या मनात असलेली शंका बोलवून दाखविली होती. तेव्हा मधूच्या सोबत्याने महाविद्यालयातून दिसत असलेला मोठा डोंगर दाखवून त्या डोंगराच्यापलीकडके मधूचे गाव असल्याचे सांगितले, आणि सकाळीच उठून आम्ही त्या गावाहून डोंगर ओलांडून पायी-पायी आलो आहोत, असे सांगितल्यावर माझी खात्री पटली, आणि काय आश्चर्य. मधूने आणि त्याच्या साथीदाराने माझ्या खात्रीपेक्षा उत्तम तऱ्हेने तो मोबाईल कॅम्प पूर्ण केला होता.' अशी झाली भाऊची एक झलक.

अशा ह्या यशस्वी शिबिरानंतरच आकस्मिकरीत्या का होईना, भाऊंचा सरांशी परिचय झाला, आणि त्यांच्या विचारांची नाळ जुळत गेली. त्यानंतर एकदा का होईना भाऊ आवर्जून सरांना भेटल्याशिवाय जात नसत. अभ्यास आणि अभ्यासेत्तर उपक्रमांवर जिज्ञासा आणि खूप काही करण्याची धडपड म्हणून सतत चर्चा घडत असे. अत्यंत थोड्या अवधीत भाऊंच्या एकूण मनस्वी व धडपड्या स्वभावाची कल्पना सरांना त्याचवेळी आली होती. असा हा मेहनती विद्यार्थी जसा आकार देऊ तसा तो वाकतो, घडतो ह्याची प्रचिती सरांना आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने भाऊंना मदत करण्याचे आश्वासन दिले नव्हे तर प्रत्यक्ष मदत करायला ते दोन पावले पुढे सरसावले. हा असामान्य क्षमता असलेला विद्यार्थी आहे.ह्याने महाविद्यालयीन अभ्यास व इतर पुरक उपक्रमांमध्ये भाग घेऊन स्वतःची क्षमता आजमावावी असे सरांना सतत वाटल्याने ते भाऊंना मार्गदर्शन करत गेले. परिणामी भाऊंनी प्रत्येक उपक्रमांमध्ये असामान्य यश मिळविले. म्हणता म्हणता ते उत्तम खेळाडू बनले. एस.सी.सी. अंडर ऑफिसर, उत्तम  नट, उत्तम वक्ता.., असं सारं काही ते झाले, ते केवळ जिद्द आणि चिकाटीमुळेच. म्हणतात ना 'गरजवंताला अक्कल नसते' एवढे सारे असतांनाही मजबुरीमुळे भाऊंना नको ती कामे करावी लागत होती. त्यावेळी बुवासाहेब नवले सभागृहाचे नुकतेच काम सुरू झाले होते. 

भाऊ त्या सभागृहासाठी 'कमवा व शिका' योजनेतून डोक्यावर घमेले घेऊन मुरूम वाहण्याचे काम करत होते. कॉलेजचे मुले-मुली भाऊला बघून हसत होते. मात्र त्यांनी कसलीही लाज न धरता ते काम केले. त्यांच्या कधी मनातही आले नसेल की, आपणच बनवलेल्या ह्या स्टेजवर आपण नट बनून काम करू आणि बक्षीसे मिळवू. पण ह्या व्यक्तिने पुढे ह्याच मंचावरून अनेक पारितोषिके मान्यवरांकडून स्वीकारली. श्री. तळपाडे ह्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली, आणि एकापेक्षा अनेक नाटकांमध्ये नजरेत भरणाऱ्या भूमिका साकारल्या गेल्या. मग त्या ... आणि पुन्हा दोन ऑक्टोबर', 'भारत माझा देश आहे', 'अखेरचा सवाल'... कितीतरी एकांकिकांना प्रथम क्रमांक मिळत गेले. बास्केटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो अशा नाना खेळांशी मैत्री झाल्याने ते अधिकच प्रकाशझोतात येत गेले. भाऊंनी 'अखेरचा सवाल' ह्या नाटकात प्राध्यपकाची केलेली यशस्वी भूमिका अकोलेकरांच्या चर्चेचा विषय बनली होती. तो ऐटीत शिगारेट शिलगावणारा प्राध्यापक तेव्हापासून त्यांच्या डोक्यात फिट बसला होता. त्यातून त्यांना शिगारेट ओढण्याचे व्यसनही काही काळ लागले होते. आपणही प्राध्यापक झाले पाहिजे, असे स्वप्न त्याकाळी उराशी बाळगणाऱ्या तळपाडे ह्यांच्या आयुष्याची व्यावसायिक जडण-घडणच वेगळ्या दिशेन होत गेल्याने प्राध्यापक होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले...

आव्हाने स्वीकारण्याची सवय लागलेल्या तळपाडेंना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. प्रथम वर्षे कलेमध्ये असताना काळे नावाच्या अध्यापकाने 'खेडवळ पोऱ्या' म्हणून जाणीवपूर्णक कमी गुण दिले होते. ते भाऊंच्या ध्यानी आल्यावर त्यांनी त्याच क्षणी त्या शिक्षकांना ठणकावून सांगत चॅलेंज केले की, "इंटरनलला जरी मला कमी गुण दिले असतील तरी वार्षिक परीक्षेत माझ्याशिवाय दुसरा कुणीच पहिला येऊ शकणार नाही.' हे भाऊंनी केलेले विधान फारच धाडसाचे होते, मात्र झालेही तसेच. इंग्रजीचा पेपर लिहिताना भाऊ अक्षरशः तापाने फणफणले होते. तरीही निकाल लागला आणि भाऊंचीच सरशी झाली. संपूर्ण वर्गात भाऊच पहिले आले. त्यावेळी कटकारस्थान करणाऱ्या त्या शिक्षकाची केविलवाणी अवस्था बघण्यासारखी झाली होती. पुढे एस. वाय. बी. ए. मध्ये प्रवेश झाला, आणि आपल्या बुद्धिमत्तेची, धडाडीची चुणूक दाखविणाऱ्या ह्या तरूणाने जी मुसंडी मारली ती अकोलेकरांना चकीत करणारी अशीच राहिली. कला मंडळाचे सेक्रेटरी असेल, जनरल सेक्रेटरी (जी. एस.) ही अतिशय मानाची पदे त्यांच्याकडे चालून आली आणि त्यांनी ती मोठ्या खुबीने भुषविली. अकोल्यातील ते आश्चर्यच म्हणा. तिसऱ्या वर्षाला असताना शहरवासियांची मिरासदारी मोडीत काढीत, 'पुरूषोत्तम करंडक' शांताराम वाळूंज, पुंजा बर्वे ह्यांच्यामदतीने अकोल्याच्या मातीत जिंकून आणला आणि अकोलेकरांची शाबासकी मिळवली. एवढे सारे करूनही इंग्रजीसारखा विषय घेऊन त्यावेळी ७१ टक्के गुण मिळवून संपूर्ण वर्गात पहिले आले होते. तरीही ते नाराज होते. 

कारण सर्व भाषांचे सुवर्णपदक त्यावेळी थोड्याशा फरकाने श्री. राठी ह्यांना मिळाले होते. बी. ए. झाल्यानंतर पुढे काय करणार? असा सवाल प्रा. एस. बी. दिघे, शारीरिक शिक्षण संचालक, अकोले महाविद्यालय ह्यांनी विचारल्यावर भाऊंनी ताबडतोब, "माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य असल्याने, मला मिळेल ती नोकरी करणे क्रमप्राप्त आहे." असे उत्तर दिले होते. त्यावेळी सरांना वाटून गेले की, इतका हुशार आणि जिद्दी मुलगा पुण्यात गेला तर सहजच इंग्रजीचा प्राध्यापक होऊ शकेल, परंतु गावाकडे राहिला तर कुठेतरी शिपायाची नोकरी पकडेल आणि त्याची पुढील करिअर बरबाद होईल. अशी भीती त्यावेळी सरांना नक्कीच वाटून गेली असेल, म्हणूनच त्यांनी "तू पुण्याला जाण्याची तयारी कर, मी शक्य तितक्या सर्व प्रकारची मदत तुला करीन.” असे सांगितल्यावर फार आढेवेढे न घेता, भाऊंनी सरांचे ऐकले, आणि डॉ. विजय बाणकर ह्यांच्या खडकवासला येथील खोलीवर आपले साहित्य ठेऊन एस.पी. महाविद्यालयात एम. ए. ला प्रवेश घेतला. जे नको व्हायला तेच झाले. अडचणींवर अडचणी येत गेल्या. अडचणींचीच सरशी होते आहे, म्हटल्यावर भाऊंचे मन चलबीचल होऊ लागले. काय करावे ते समजेना. सरांना किती दिवस त्रास द्यायचा. आता आपण आपला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग त्यातच नोकरीची शोध मोहीम सुरू झाली. सायकलवर भटकंती करत असताना कुणीतरी सांगितले की, खमसे साहेबांना भेट. ते काहीतरी सोय करतील. ते ऐकूण भाऊंना थोडा धीर आला. 

त्यांनी जीवाचा आटापिटा करून खमसे साहेबांची भेट घेतली. म्हणाले, "साहेब मला आपल्याकडे शिपायाची का होईना, पण नोकरी द्या. मला फार गरज आहे.” अशी विनवणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. काय करावे ते समजत नव्हते. त्यांना धीर देणारे मित्र होते, परंतु तरीही त्यांचा धीर खचत चालला होता. बरोबर एके दिवशी 'सकाळ' पेपरला आयुर्विमा कंपनीची जाहिरात आली. त्या ठिकाणी क्लर्क पदासाठी अर्ज केला, आणि लगेचच भाऊंची अहमदनगर येथे निवडही झाली. काही दिवस तेथे काम करत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षाद्वारे 'स्टेट बँक ऑफ इंडिया' व 'बँक ऑफ महाराष्ट्र ह्या दोन्हीही बँकांच्या परीक्षा दिल्या, आणि काय आश्चर्य, दोन्हीही ठिकाणी ते चांगल्या गुणांनी पास झाले. दरम्यानच्या काळात पी.एस.आय. म्हणूनही निवड झाली होती. त्यावेळी शारीरिक क्षमता चाचणी आणि तोंडी परीक्षेचे मार्गदर्शन घेण्यासाठी ते दिघे सरांकडे आले असताना, “हे पद तुझ्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत आहे.' असे सांगितल्यावर भाऊंनी क्षणार्धात त्याचाही त्याग केला. पुढे विक्रीकर अधिकारी वर्ग-१ मुंबई येथे त्यांची नेमणूक झाली, आणि ते मुंबईत काही दिवस स्थिरावतात कुठे नाही तोच सौ. सुनीताताई ह्यांच्याशी लग्न झाले. त्यांचे सासरे श्री. कचरे हे मुंबईतच राहत असल्याने त्या काळात भाऊंना चांगलाच आधार मिळाला. त्यांनी त्यांच्याच एका खोलीत आपलं बिहाड धाटून एम.पी.एस.सी चा फॉर्म भरला आणि संपूर्ण लक्ष अभ्यावर केंद्रीत करून अठरा-अठरा तास अतिशय मेहनतीने अभ्यास केला आणि परीक्षा देऊन चांगल्या मार्कांनी ते फक्त पासच झाले नाहीत, तर त्यांची डी. वाय.एस.पी पदासाठी निवडही झाली. 

आधीच विक्रीकर विभाग वर्ग-१ ह्या पदावर पाच वर्षे काम केलेले असतानाही ती नोकरी सोडून पुन्हा वर्ग-१ ह्याच पदावर पोलीस खात्यात नोकरी करणे कितपत योग्य आहे. ह्या विषयावर त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे काही एकमत होत नव्हते. त्याहीवेळी त्यांना हटकून दिघे सरांचीच आठवण झाली, आणि सरांच्या घरी येऊन दोन्ही नोकऱ्यांतील योग्य नोकरीचा निवाडा करणे पूर्णपणे सरांवर सोपविले. सर जो निर्णय देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी सुरूवातीलाच सांगितले, आणि सरांनाच हा गुंतागुंतीचा प्रश्न कसा सोडवायचा त्याची चिंता वाटली. मात्र थोडा वेळ थांबून योग्य पवित्रा घेत सर म्हणाले, "हे बघा दोन्ही नोकऱ्या वर्ग-१ केडरच्या असल्या तरी सामाजिक मान्यता डी.वाय.एस.पी ह्या पदाला कितीतरी अधिक पटीने आहे. ह्या पदामुळे जो नावलौकिक मिळेल, त्याची मोजदाद करणे अशक्यच आहे. त्यामुळे प्रांजळपणे मला वाटते, पोलीसमधली नोकरी मधुने स्वीकारावी.' ठरल्याप्रमाणे सरांचा निर्णय उभयतांनी शिरसावंद्य मान्य केला आणि लगेचच नाशिक येथे दहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी हजर झाले. त्यावेळी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी पोलीस अधिकाऱ्याची ट्रेनिंग करणारे तळपाडे हे एकमेव अधिकारी होते.

श्री. तळपाडे ह्यांच्या ट्रेनिंगच्या उत्तरार्धातील एक स्फूरणीय आठवण दिघे सर बऱ्याचदा आम्हाला सांगायचे ती अशी, “असा एक दिवस दुपारी मी जेवणानंतर वामकुक्षी घेत असताना दारासमोर बुटांचा आवाज आला म्हणून पहातो तर नखशिखांत पोलीशी पेहरावात मधुकर तळपाडे उभा होता. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसतो ना बसतो तोच त्याने कडक सॅलूट ठोकला, आणि म्हणाला, “फर्स्ट सॅलूट टू यू सर” मला काय आनंद झाला म्हणून सांगू. एका शिक्षकाला आणखी काय हवे. माझे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले होते. एके काळी मी पाहिलेले स्वप्न माझ्या विद्यार्थ्याने पूर्ण केले होते. मधू सांगत होता, दुपारी बाराच्या दरम्यान त्यांचा पिपिंग सेरेमनी संपन्न झाला आणि लगेचच आपल्या होंडा मोटारसायकलवर अकोल्यात तो त्याच्या चहात्यांना भेटायला आला होता. येताना सांगवीला आपल्या आई-वडिलांना प्रथम भेटण्यास तो अजिबात चुकला नव्हता. असा तो क्षण मला परमोच्च आनंद देऊन गेला होता.' एका शिक्षकाने सामन्य विद्यार्थ्यांना जपले की, ते विद्यार्थी देखील आपल्या आनंदाच्या क्षणी अशा गुरूंना अजिबात विसरत नाहीत. हेच ह्यातून सिद्ध होते. ट्रेनिंग संपल्यानंतर भाऊंची शहापूर, ठाणे येथे २ वर्षांचा प्रोबेशन कालवधी पूर्ण करून, नियमित नियुक्ती वर्धा जिल्ह्यातील हिंगण घाट येथे झाली. नंतर ३ वर्षे डी. वाय.एस.पी. म्हणून कऱ्हाडला बदली झाली. 

तो हिंदू-मुस्लीम दलित सेन्सेटिव्ह दंगे होण्याचा एरिया. मात्र भाऊ तिथे गेल्यावर एकही मर्डर केस झाली नाही. हे त्यांच्या कार्याचे विशेष! तिथे असतानाच काही गोष्टींचे चिंतन सुरू होते. जवळच असलेल्या बाबा आमट्यांच्या आनंद वनात जायचे. समाजसेवा काय असते ते जवळून पाहू लागले होते. आपल्या समाजात शिक्षणाचा प्रसार वाढला पाहिजे, असे त्यांना मनोमनी वाटत होते. ते अनेकांशी चर्चा करतांना म्हणायचे,“राजस्थानमधल्या मीना समाजाचे अनेक आय.ए.एस. अधिकारी होतात, आणि आपला एकही कसा नाही. "आपण कुठे कमी पडतोत, ह्याचा शोध आपण घेतला पाहिजे.' पोलीशी नोकरीतही भाऊंना सामाजिक धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. परंतु त्यांना फार काही करता येत नव्हते. थोड्याच दिवसात त्यांची सहायक पोलीस अधिकक्षक म्हणून डोंबिवली येथे निवड झाली आणि पुढे मुंबईत गुन्हे अन्वेशन अधिकारी म्हणून काम करताना स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगी काही दिवस त्यांच्याच देखरेखी खाली जेल मध्ये होता. मुंबईत असतानाच त्यांनी आदिवासी समाज कृती समितीची शाखा सुरू केली होती. परंतु मुंबईत फार प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी पुढे विचारपूर्वक त्यांनी २००२ मध्ये नवीनच संघटना स्थापन केली. 'महादेव कोळी मित्र मंडळ' ह्या संघटनेद्वारे त्यांनी अनेक लहानमोठे कार्यक्रम घेण्याचा सपाटाच लावला. डॉ. नरेंद्र जाधव, कविता महाजन, वाहरू सोनवणे, प्रा. केशव मेश्राम... अशा कितीतरी अभ्यागतांना आमंत्रित करून त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी सत्काराचे कार्यक्रम घेतले आहेत आणि आजमितीलाही ते घेत आहेत. 

त्यांनी स्वतःच्या सांगवी गावात सुरू केलेला 'पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र' हा अनोखा असाचा प्रयोग म्हणावा लागेल. माझ्या बांधवांना पोलीस भरतीमध्ये अडचणी येऊ नयेत, हाच त्यामागील त्यांचा उदात्त हेतू होता. मात्र परिसरातील सर्व युवकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा तसे न झाल्याने शेवटी ते केंद्र बंद पडले. अकोले तालुक्यातील आदिवासी युवक युवतींनी स्पर्धा परीक्षेत आणि क्रीडा क्षेत्रात खूप मेहनत घेऊन आपले नाव कमवाने ह्यासाठी ते अनेकांना वाटेल ती मदत करायला तयार असतात. त्यासाठी ते अनेकांशी तासन्तास चर्चाही करतात. साहेब आज म्हणतात, “प्राध्यापक होण्याची खूप इच्छा होती, परंतु पोलीस खात्यात आलो :सतो तर माणसे वाचणे, माणसे पारखणे आणि त्यांच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बाजू कळल्या नसत्या. त्यामुळे जे घडले ते चांगले मानूनच मी हा प्रवास सुरू केला तो आजपर्यंत.” अशा ह्या पोलीस अधिकाऱ्याची बदली कुठेही होऊद्या. आपल्या जन्म भूमीच्या मातीची असामन्य ओढ इतकी आहे की, आपल्या तालुक्यातील कोणीही व्यक्ती भेटली तर त्याचा घरच्या पाहुण्यांहून अधिक अगत्यपूर्वक पाहुणचार केल्याबिगर त्यांना तसे जाऊ देत नसत. अशा काही गोष्टी ह्या संस्काराचाच एक भाग असतात. भाऊंच्या मेहनतीचा आणि कार्याचा गौरव अनेक संस्थांनी केलेला आहे. २००६ रोजी आळंदीच्या धर्मशाळेने दिलेला कालवश किसनराव भाऊराव भोईर पुरस्कार असेल, २००८ मधला अकोल्याचे भूषण अकोले गौरव पुरस्कार आणि २००९ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच कोतुळ आणि राजून गावाने त्यांचा केलेला जाहीर नागरी सत्कार असेल.

अशा कितीतरी पुरस्कारांनी आणि सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आज तर त्यांनी पोलीस अधिक्षकसारख्या माना मोलाच्या पदाचा क्षणार्धात त्याग करून राजकारणात उडी घेतली आहे. आज ते राजकारणाच्या नव्या उमेदीच्या वळणावर उभे आहेत. समाजाचे डोळसपणे निरीक्षण करून तरूणांना संघटित करून आणि सामान्यांना करता येईल ती मदत करणे. एवढेच ते आपले कर्तव्य करत आहेत. अशा ह्या समाजाभिमूख, कर्तृत्वान, गुणवान कार्यकर्त्याकडून निखळ समाजसेवा घडो म्हणून आदिवासी बांधवांच्यावतीने त्यांना शुभेच्छा!.....