ऐसा मोहरा होऊन गेला, पुढे ना होणार, कृष्णराव मुंढे नाव ह्या देशात गर्जत राहणार...' असे ज्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, त्यांच्याचबद्दल श्री. गो. ध. हिंगे लिहितात,
“साहेब, तुमचे मन मातेचे,
हृदय होते कवीचे.'
"हास्य फुलांचे,
दास्य दिनांचे,
जीवन तुमचे योग्याचे,
जीवन ध्येयठरविले तुम्ही,
केवळ अश्रू न पुसण्याचे,
ब्रीद ठेऊन गेला तुम्ही जगी,
ज्ञानदीप तेवण्याचे...
पण काळ थांबला,
घाव घातला कोण थांबवी त्याला
अभिवादन करितो आम्ही तुमच्या पवित्र स्मृतीला.
ह्या काव्यपंक्ती ज्यांच्याविषयी लिहिल्या गेल्या त्या शिक्षण महर्षीचे नाव कृष्णराव मुंढे साहेब होय. म्हणतात ना, जगाची नाविन्यपूर्ण जडणघडण करू पहाणारे आणि नव समाज जागृत करू इच्छिणारे महापुरूष कधीही समाजाच्या पारंपरिक चाकोरीतून जात नसतात. त्यांचे मनोधैर्य प्रबळ असल्याने ते कालबाह्य, जुनाट चालीरिती, परंपरा, रूढी इत्यादींना मूठमाती देत पुढचा प्रवास करतात. अज्ञानी लोक नेहमी दास्यरूढी ह्यामध्येच अडकून पडतात, परंतु ध्येयवेडे कर्मयोगी ती सारी बंधने कुठल्या कुठे झुगारून देतात. कालवश कृष्णराव मुंढे साहेब (माजी आमदार) हे त्यातीलच एक तेजःपुंज्य आणि करारी नाव होय. अशा ह्या दूरदृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांचा जन्म २ एप्रिल १९३४ रोजी श्री. रामचंद्र व आई धोंडाबाई ह्या दाम्पत्याच्या पोटी जुन्नर तालुक्यातील राजूर ह्या छोट्याशा डोंगराळ व अतिदुर्गम आदिवासी खेड्यात झाला.
कृष्णराव मुंढे ह्यांनी प्रथमपासूनच अत्यंत हालाखीचे दिवस काढले. प्रथमपासूनच लंगोटी परिधान करून आपल्या शेतीत रेड्याचे औत हाकून नको ते काबाड कष्ट करून त्यांच्या कुटुंबीयांसोबत गुजरान केली. असे असतानांही त्यांना शिक्षणाची विलक्षण आवड होती. मुळात हुशार असल्याने त्यांनी शाळेत धाव घेतली, आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी घोडेगाव येथे जावे लागले. तेथील शिक्षण कसेबसे पूर्ण केले नाही तोच उच्च शिक्षणासाठी साहेबांनी पुण्याचा रस्ता धरला, आणि ज्ञानेश्वर वसतिगृहात प्रवेश घेतला. शहरात राहून शिक्षण घेणे हे त्याकाळी काही तोंडाचे काम नव्हते. ह्याची जाणीव त्यांना असतांनाही परंतु कितीही त्रास झाला तरी माघारी हाटायचे नाही. असे मनाशी पक्के केल्यामुळे ते पुढे जातच राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर महात्मा फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा आदर्श होता. त्यामुळे डोंगराएवढी संकटे त्यांना काहीच वाटेनाशी झाली होती.
अनेकदा त्यांना गावी येण्यासाठी पैसे नसल्याने साठ-सत्तर मैल पायीच प्रवास करावा लागे. कित्येकदा एकदाच जेवण मिळे. बऱ्याचदा बाजरीच्या कोरक्यांनवर साहेबांनी गुजरान केली असली तरी त्याही परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतांना अनेक लहान मोठी कामेही केली होती. अशा बिकट परिस्थितीतून १९५४ साली मॅट्रीक पास झालेले साहेब. करीच्या निमित्ताने मुंबईला गेले आणि एका कापडगिरीणीत काम करू लागले. मात्र त्यांना प्रथमपासूनच सामाजिक कार्याची आस्था असल्यामुळे त्यांचे मन त्या नोकरीत काही केल्या रमेना. शेवटी त्यांनी राजीनामा दिला आणि ते थेट येऊन पुण्यात दाखल झाले. खडकी येथे अॅम्युनेशन फॅक्टरीत नोकरी करू लागले. त्याचवेळी जुन्नर, आंबेगाव, खेड, मंचर येथूनच नव्हे तर अहमदनगर, नाशिक, ह्या भागातील मोठ्या प्रमाणात मजुरांचे थवेच्या थवे पुण्याच्या आसपास पोट भरण्यासाठी मजुरी शोधायला, जगायला येत होते. अशा तरूणांना साहेबांनी एकत्र करून मार्गदर्शन केले, आणि त्यांच्याकडेच कारखान्यात कामाला घेतले. त्यातील बऱ्याचजनांचे पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
त्यावेळेपासून त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क साधला आणि तरूणांना आपलेसे केले. अशा वेळी जुन्नर, आंबेगाव परिसरात 'ढेबरभाई कमिशन' कार्यरत होते. मुंढे साहेबांनी त्यांना आदिवासी समाज बांधवांच्या व्यथा परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे ह्या गोष्टीचा फायदा आदिवासी समाजाला झाला व तो इलाखा आदिवासी विभाग म्हणून जाहीर केला गेला. काही दिवसांनी शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक श्री. भाऊसाहेब राऊत ह्यांच्याशी मुंढे साहेबांचा परिचय झाला. बरोबर त्याचवर्षी म्हणजे १९५२ साली स्वर्गीय भाऊसाहेब राऊत ह्यांनी श्री. क्षेत्र आळंदी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला होता. बी. ए. च्या वर्गात शिकणारे श्री. कृष्णरव मुंढे ह्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. उपस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यावेही मेळाव्यातील आदिवासी आणि संयोजकांच्या नजरा चाळवल्या गेल्या. मुंढे ह्यांचे मार्गदर्शन भलतेच प्रभावी झाल्याची ही पावतीच होती. तिथेच भाऊसाहेब राऊतांसारख्या द्रष्ट्या नेत्याने मुंढे ह्यांच्यातील राजकराणाला अनुकूल असणाऱ्या गुणांची चमक पारखली नाही तरच नवल.
भाऊसाहेब मुंढे ह्यांना म्हणाले, "तू समाजासाठी आणि समाज तुझ्यासाठी आहे.तुझ्यात समाजाची सेवा करण्याची धमक आणि क्षमताही आहे. मात्र त्यासाठी तुला नोकरीवर पाणी सोडावे लागेल आणि ते तुला करणे तुझ्या समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे.' असा गुरूमंत्र श्री. राऊत ह्यांनी कृष्णराव मुंढे ह्यांना दिला आणि मुंढे आपल्या समाजासंबंधी अधिकाधिक जागृततेने विचार करू लागले.
स्वातंत्र्यानंतर आदिवासी बांधवांना शिक्षणाची दारे खुली झाली. गावोगावी चौथीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मात्र आदिवासी भागात शिक्षक यायला नाखुश असायचे. आले तरी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत नसत. परिणामी मुलांचा पायाच कच्चा राहून जायचा. यातून मार्ग काढणाऱ्यांना पुढे पाचवीच्या वर्गात जाण्यासाठी खूप धावपळ करावी लागे. त्यात गरिबीमुळे इच्छा असूनही होतकरूंना शिक्षणाला मुकावे लागत होते. ह्या सर्व समस्यांचा अभ्यास करून काही उपाय सूचवेल असा आदिवासींचा हितचिंत कोणीही नव्हता. पुढे १९५०-५१ साली पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आदिवासी भागात श्री. कांडू मारूती बोकड उर्फ बोकड गुरूजी नावाचे एक आदिवासी तरूण शिक्षक निमगिरी येथील शाळेवर शिक्षक म्हणून आले. ह्या ध्येयवादी शिक्षकाने आपल्या परिसरात पुढील शिक्षण घेण्यासाठी कुठेच कशी सोय नाही म्हणून सातवीपर्यंत वर्ग वाढविण्यास खूप आटापिटा केला. शेवटी कसेबसे त्यांचे पारडे जड भरले.
शासन दरबारातून त्यांना परवानगीचे पत्र मिळाले आणि मग ह्या धडपड्या गुरूजींनी काही निवडक बांधवांच्या मदतीने समाज संघटन करण्यास सुरूवात तर केलीच शिवाय जुन्या 'गोतराणी' पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या संघटना बनवण्यासाठी गुरूजींनी पद्धतशीरपणे उपयोग करून घेतला. त्याकाळचे गोतराणे जमाती परंपरेचेपुढारी होते, हरिभाऊ साबळे 'निमगिरी' रामभाऊ लांडे 'केवाडी', वाल्हू बोकड 'उसरान', अनाजी रावते 'घाटघर', काशिनाथ कोरडे 'मानकेश्वर', रामभाऊ शेळकंडे 'चावंड', हरिभाऊ दिवटे 'पूर', देवळा शेकरे 'सोनावळे', जावजी रढे 'निमगिरी', सखाराम साबळे 'हिरडी', नामा गोडे 'तळेरान', धर्मा केदारी 'खैरे', दादू कोकणे 'हडसर', रामभाऊ सुपे 'राजूर', मोतीराम नांगरे 'उंडेखडक', धर्मो गागरे 'खटकाळे', गंगाराम डामसे 'इंगळून', आवाडाजी बोऱ्हाडे 'देवळे', मारूती भांगिले, धोंडू साबळे 'निमगिरी', इ. मंडळींच्या सहकार्याने बोकड गुरूजींनी १९५४ साली 'आदिवासी शिक्षण संस्था निमगिरी' ह्या नावाची शिक्षण संस्था स्थापन केली. ह्या संस्था संघटनांच्या कार्यात आदिवासी कार्यकर्त्यांना बाबूराव भालेराव, वि. भा. आल्हाट, अण्णा आढारी ह्यांनी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ ह्या भागात रोवली गेली.
ह्या शैक्षणिक संस्थेचे विशेष असे की, आदिवासींनी पुढाकार घेऊन स्थापन केलेली पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच शिक्षण संस्था होय. त्याकाळी ह्या भागात रस्तेच नव्हते तर शिक्षणाचे काय घेऊन बसलात. आरोग्य आणि पाण्याची गैरसोय तर काही विचारूच नका. अशा अवस्थेतही बोकड गुरूजींनी कार्यकर्त्यांच्या आणि गावोगावाच्या मदतीने धान्य रूपाने निधी गोळा करून पहिली दोन वर्ष संस्थेने वसतिगृहाचा भार सांभाळला, आणि समाजात नवचैतन्य निर्माण केले. वसतिगृहाला शासनाची मान्यता यायला १९५६ ची वाट बघावी लागली. १९५२ ते १९६२ हा कालावधी म्हणजे कृष्णाराव मुंढे ह्यांच्या शिक्षण नोकरी, आणि नोकरीबरोबर समाजकार्याचा कालावधी होय. साहेबांची शिक्षणाची जिद्द इतकी दांडगी की, त्यांनी नोकरी करता-करता १९६८ साली एम. ए.ची परीक्षा दिली, आणि चांगल्या मार्काने पासही झाले. त्याकाळी त्यांनी 'पुणे वेध शाळा,' 'अॅम्युनिशन फॅक्टरी, पुणे', 'आर. टी.ओ. कार्यालय, पुणे' अशा विविध ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे नोकऱ्या केल्या. मात्र पुढे भाऊसाहेब राऊतांच्या गुरूमंत्राने त्यांनी क्षणार्धात अॅम्युनिशन फॅक्टरीतील उच्च पदाचा त्याग केला; आणि ते पूर्णवेळ समाजकार्य करू लागले.
त्याकाळी साहेबांचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची भयंकर गरिबी होती. दिवाळी जवळ आली की, काकड भाकरी, जंगली भाकरी, पिसोळी,रानठी कंद... असे पक्वान्न खाणारा आदिवासी साहेबांनी पाहिला होता, व तेला-तुपात तळून करंज्या-लाडू खाणारा वाणी, उदमीही पाहिला होता. आदिवासींच्या असाह्यतेचा फायदा घेणारा इतर समाज साहेबांनी पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये बंडाची ठिणगी पेटली. पण ते बंड विध्वंसक प्रवृत्तीचे नव्हते. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे नव्हते. अथवा समाजमनास धोका पोहचेल असेही नव्हते. त्यांनी आलिशान अशा नोकरीला रामराम ठोकला, आणि जुन्नरच्या सह्याद्रीच्या तांबड्या मातीत आले, त्यावेळी काही लोक म्हणू लागले, "किसना नोकरी सोडली व्हय.' त्यावर त्यांनी लोकांना सांगितले, ते फार महत्त्वाचे होते. “व्यक्तिच्या हितापेक्षा समाजहित फार मोठे आहे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे.
होकायंत्र हे एकच दिशा दाखवते. सर्वात श्रेष्ठ म्हणजे, समाजहितही एकच. एकाच दिशेने माणासांना दिशा दाखवायला हवी. हेच काम मी करणार आहे. मला दुसऱ्याकडे बोट दाखवून चालणार नाही." असे म्हणून साहेबांनी प्रथम स्वतः समाजकार्यात उडी घेतली. आणि मग ते इतरांना सांगू लागले. "" १९६२ साल उजाडले. सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. 'खालापूर मतदारसंघ' राखीव झालेला होता. कुलाबा जिल्ह्यातील रायगड शेतकरी कामगार पक्षाचे त्याकाळचे नेते भाऊसाहेब राऊत उमेदवाराच्या शोधात होते. १९५२ पासून भाऊसाहेबांच्या संपर्कात आलेल्या मुंढ्यांकडे त्यांचे लक्ष गेले, आणि मग काय राऊतांनी ताबडतोब मुंढे ह्यांना शेतकरी कामगार पक्षाचे तिकीट दिले. त्यानंतर उत्तमरित्या प्रचार करून निवडूणही आणले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका कार्यकर्त्याचे अनेकांना नावही माहीत नव्हते, तर कामाचे काय माहीत असणार. असा माणूस कुलाब्यात राहतो काय, आणि निवडूनही येतो काय? त्यामुळे अनेकांनी मुंढे ह्यांचा धसका घेतला. तर जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांध बातमी ऐकून अतिशय आनंद झाला. हळूहळू परिचय होता-होता लोकांना नवा कार्यकर्ता, उमेदीचा नेता मिळाल्याने पुणे व रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना ह्या कार्यकर्त्याच्या निवडीतून मोठी प्रेरणा मिळाली, आणि दोन्हीही भागात कृष्णराव मुंढे हिरीरीने काम करू लागले.
जुन्नर तालुक्यातील गोतरानी नेत्यांच्या मदतीने अतिशय खडतर परिस्थितीतून बोकड गुरूजींनी उभी केलेली 'आदिवासी शिक्षण संस्था, निमगिरी' ही डबघाईला आली होती. तिला कोणीही वाली नव्हता. ह्या संस्थेची पुढील धुरा कृष्णराव मुंढे ह्यांनी सांभाळून कार्यभार स्वीकारावा अशी कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट करताच साहेबांनीही तेच हवे होते. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि कृष्णराव मुंढे ह्या संस्थेचे नवे अध्यक्ष झाले. अशा तरूण व होतकरू नवनिर्वाचित आमदाराच्या नेतृत्त्वाखाली संस्था अधिकच विस्तारत गेली. ह्या सर्व कार्याचे आणि धडपडीचे श्रेय आमदार मुंढे ह्यांचेकडेच जाते. कालांतराने मात्र संस्थेतील जुन्या कार्यकर्त्यांचा संच संस्थेपासून हळूहळू दूर झाला आणि समाजात काही काळ दुही माजून दरी निर्माण झाली. मात्र तो संधीकाळ लवकरच संपला. आमदार मुंढे साहेबांनी पुन्हा कंबर कसली आणि त्यांच्या अथक परिश्रमाने व कुशल नेतृत्त्वामुळे संस्थेची भरभराट झाली. साहेबांनी आदिवासी डोंगराळ अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक उन्नती व्हावी ह्या दृष्टीकोनातून चार आश्रम शाळा, सहा माध्यमिक विद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये आणि विशेष म्हणजे मुले-मुलींसाठी सात वसतिगृहे काढली असून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील सात हजाराच्यावर सर्व समाजाचे विद्यार्थी ह्या संस्थेत शिक्षण घेत असून जवळ-जवळ दोन हजाराच्यावर विद्यार्थी संस्थेच्या विविध वसतृिहांमध्ये निवासी आहेत. निवासी विद्यार्थ्यांना भोजन, शैक्षणिक साहित्य कपडे, साबण इ. सुविधा पुरविल्या जातात.
आज ह्या शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची धुरा काही काळ देवराम मुंढे तर आज मितीला मुंढे साहेबांच्या कन्या श्रीमती सुरेखाताई मुंढे ह्या समर्थपणे पेलीत आहेत. श्री. कृष्णराव मुंढे ह्यांचेकडे चौकस बुद्धी असल्यामुळे त्यांनी आपले कार्य फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता धरणग्रस्तांचे पुनर्वसन,अल्पभूधारकांच्या समस्या, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, शेती मालास योग्य बाजारभाव, मुख्य रस्त्यांना पक्के रस्ते जोडणी कार्यक्रम, सुक्षिक्षितांच्या बेकारीचा प्रश्न इ. विकासाचे कार्यक्रम अग्रक्रमाणे तर हाती घेतलेच शिवाय खोटारड्या बोगसांच्या नोकरीत घुसणाऱ्यांच्या टोळक्यांना वेसन घातली व आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा संपूर्ण जिल्ह्यात उमटविला.हे कार्य करीत असताना धर्म, जात, पात हा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे तळमळीचे कार्य अनेकांनी जवळून बघितले होते. म्हणूनच तर योग्य वेळ येताच तत्कालिन मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक ह्यांच्या आग्रहाखातर १९६७ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व १९७८ साली जुन्नर मतदार संघातून ते विधान सभेवर निवडून आले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाला आदिवासी भागातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एक वेगळी चकाकी प्राप्त झाली.
मुंढे साहेबांचे ह्या निवडणुकीमागचे विशेष म्हणजे राखीव मतदार संघातून तर कोणीही निवडून येऊ शकतो, मात्र जनरल मतदार संघातून आणि तोही आदिवासी उमेदवार निवडून येणे ही खरी पहिलीच घटना असल्याने विविध स्तरांतून त्यांचे कौतुक झाले. तर काहींना मुंढे ह्यांचा विजय पचविणे जडही गेले. पुढे साहेबांच्या कार्याविषयी काही बोलू नका अतिशय प्रामाणकिपणे मेहनत घेत कामाचा प्रचंड व्याप ते सांभाळत होते. त्यात आदिवासी सहाकारी महामंडळ, सभासद महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा विकास बोर्ड, पुणे विभागीय व जिल्हा निवड मंडळ, पुणे, आदिवासी विकास रस्ते व दळणवळण कमिटी, पुण्याचे मानस सल्लागार, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख, बजाज अँटो कंपनी व ॲम्युनेशन फॅक्टरीचे सल्लागार इ. महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या हातून यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या. आमदार कृष्णराव मुंढे ह्यांचे शिक्षणानंतरचे अतिशय उल्लेखनीय काम जर कोणते असेल तर कुकडी प्रकल्प हा नगर-सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी मुख्यतः राबविण्याचा दृष्टीकोन ठेवून त्याचा आराखडा कैला गेला. परंतु ज्या जुन्नर तालुक्यात चार धरणे बांधण्यात आली त्या तालुक्यात थेंबभर पाणी सुद्धा दिसू नये हा शासनाचा डावच म्हणा की, त्यामुळे पिंपळगाव जोगे धरणाचा डावा कालवा काढताना त्याची आखणी अगदी नदीच्या कडेकडेने करण्यात आली होती.
त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जमिनीला एक एकरभर क्षेत्रास सुद्धा त्या पाण्याचा उपयोग होणार नव्हता. हे धोरणी नवनिर्वाचित आमदार कृष्णराव मुंढे ह्यांच्या ध्यानी येणार नाही तरच नवल. त्यांनी ताबडतोब कुकडी प्रकल्पाच्या अभियंत्यास बोलावून घेतले व त्याबाबत डावा कालवा असा का काढला? धरण उंचवरून असूनही हा कालवा पिंपळगाव, डिंगोरी, उदापूर, ओतूर, पिंपरीपेंढार इ. गावांच्या वरच्या बाजूकडून काढता येणार नाही का? कालव्याला लेव्हल मिळणार नाही का? अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांची गुळगुळीत उत्तरे पाहून यात कुठेतरी धरणाच्या पाण्यातच पाणी मुरतेय हे मुंढे ह्यांच्या ध्यानी यायला वेळ लागला नाही. त्यांनी ताबडतोब पाटबंधारे मंत्र्याची भेट घेऊन ह्या गोष्टीचा छडा लावला आणि डाव्या कालव्याचा पूर्वीचा आराखडा बदलून नवीन आखणी केली. त्यामुळे सदरचा कालवा डिंगोरे, उदापूर, ओतूर, खामुंडी, पिंपरीपेंढार इ. गावांच्या जास्तीत जास्त उत्तर बाजूकडून काढण्यात आला. त्यामुळे हजारो एकर जिमिनीला पिंपळगाव जोगे धरणातून पाणी मिळू लागले.
अशी ही साहेबांची कोणत्याही कामाच्या संदर्भातील धावपळीतून विरोधकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय रात नसे. साहेबांच्या उदार दृष्टीकोनामुळेच सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील फक्त आदिवासीच नाही तर सर्वच जाती धर्मातील मुला-मुलींना आदिवासी शिक्षणसंस्थेत शिक्षण घेऊन सह्याद्रीच्या कपारीतून हिमालयाच्या शिरावर गरूडझेप घेण्याची ताकद मिळावी, म्हणून हे भोळ्या शंकरा, ढाकच्या ढाकेश्वरा, शिरपुंजेच्या आणि अबिटखिंडीच्या बहिरोबा, कुकडीनेरच्या कुकडेश्वरा, दुर्गाडीच्या दुर्गाई, रंध्याच्या घोरपाडादेवी, डोंगरच्या वसुबाई, सह्याद्रीच्या कळसूबाई माझे आदिवासी बालके अज्ञानी आहेत. ती नुकतीच आता त्यांच्या हक्काच्या संस्थेत शिकून मोठी सुज्ञ होऊन पंडितांनाही मागे सारून उत्तम प्रकारे वाक्चातर्य करतील, असा मला विश्वास दे. अशी प्रार्थना साहेबांनी आपल्या निसर्गदेवतेकडे तर केली नसेल ?इतरांप्रमाणे मुंढे साहेबही ऐषाआरामात जगू शकले असते, परंतु नग्न अवस्थेतील आदिवासी बांधव लंगोटी व कोपरी घालून, खांद्यावर घोंगडी, कमरेला कोडक्यात कोयता लटकवलेला असे आदिवासी जुन्नर आठवडी बाजाराला काही थोडे किडूकमिडूक घेऊन आले की, वाणी उदमी 'ये मावळ्या, लंगोट्या' काय आणलं आहे ते दे ओतून, असे म्हणून डोक्यावरचे गाठोडे चक्क हिसकावून घेताना अनेकदा साहेबांनी पाहिले होते.
आपल्या बांधवांची ही अवहेलना साहेबांना झोप येऊ देत नव्हती. त्यांच्या डोळ्यांसमोर आदिवासींची चिल्लिपिल्ली शिमग्याच्या अथवा यात्रेच्या बाजाराला आली की, आपल्या बा कडे गोडीसेवीसाठी तगादा लावून रडत बसायची. परंतु आठराविश्व दारिद्याने पूर्ण होरपळून निघालेला आदिवासी आपल्या मुलांना त्या पदार्थांच्या वासा व्यतिरिक्त काहीच देऊ शकत नव्हता. ही आदिवासींची परवड कधी थांबेल, म्हणून ते सतत चिंता करायचे, त्यासाठी त्यांनी आंगठे बहाद्दर मात्र एकनिष्ठ मावळे जमवून त्यांना आपला विचार पटवून सांगितला. त्यात दाजी चिमा गोडे, धोंडू कारभळ, मारूती मुंढे, रा. गो. साबळे, नामदेव सांगळे आदिंना उद्देशून सांगितले, “बंधूनो आपल्या अशिक्षित आई बांची डोक्यावरची मोळी उतरावयाची असेल तर आपला समाज बांधव आता शिकला अशाच विश्वासू सहकार्यांना घेऊन छ. शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नरमध्ये शाळा व वसतिगृह सुरू केले. आज साहेबांच्या ह्या विद्यालयाला व वसतिगृहाला 'कृष्णराव मुंढे विद्याल', जुन्नर' असेच नाव देण्यात आले आहे. पुढे साहेबांनी आंबेगाव, खेड, मावळमध्ये शाळा आणि वसतिगृह सुरू करण्याचा जो सपाटा लावला तो विचारता सोय नाही. शिक्षण क्षेत्रात एक पायवाट निर्माण करणारे, आदिवासी बांधवांचे तारणहार ठरलेले कृष्णराव मुंढे म्हणजे दऱ्याखोऱ्या आणि डोंगर कपारीत जन्मलेले एक पहाडी फुलच होते. अशा आमदार साहेबांनी समाजाच्या कोणत्याही दीन-दुबळ्या, गरीब माणासांकडून पैशाची अपेक्षा केली नाही. अगर त्यांना त्रास दिला नाही.ह्या सर्व गोष्टी अतिशय जवळून १९ वे जवाहरचे श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे महाराज ह्यांनी बघितल्या होत्या.
मुकणे राजांना मोठा प्रश्न पडला की, आपण राजे असतांनाही ह्या सर्व गोष्टी करणे आपल्याला कसे शक्य होत नाही की, ज्या आमदार मुंडे ह्यांना सहजतेने जमतात. एकदा राजे जुन्नर प्रांताला भेट देण्यासाठी आले असतांना न राहून ते आमदार मुंढ्यांना म्हणाले, "मुंढे साहेब मला आपल्या समाजाची सेवा अगर त्यांची दुःखे ज्या पद्धतीने समजून घ्यायला हवीत, तशी घेता आली नाहीत. ती मात्र आपण उत्तम पद्धतीने जाणून घेतली. तेव्हा माझ्यामागे आपल्याकडून जास्तीत जास्त आपल्या बांधवांची सेवा घडत राहो, मी राजा असूनही मला फार काही करता आले नाही. आपल्यासारखे समाजहितदक्ष पुरूषच ह्या समाजात जन्म घेवोत, अशी प्रार्थना करतो.'
"मुंढे साहेबांनी भविष्याची वादळे पेलण्यासाठी आणि संघर्षाची वादळे अंगावर झेलण्यासाठी आदिवासी समाजावर कितीही झंझावाती वादळे आली तरी त्याकडे पाठ न फिरवता तोंड देण्यासाठी ज्ञानकुंभ उभारले. त्या ज्ञानकुभातील अमृत पिऊन आज कितीतरी कष्टकरी जिज्ञासू कृतार्थ झाले आहेत. अनेकांनी गगन भरारी घेऊन आपल्या कष्टांचे चीज केले आहे. त्याचे उदाहरण सांगायचे झाले तर मुंढे साहेबांनी सुरू केलेल्या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी श्री. शांताराम सांगडे, श्री. रामदास डामसे, श्री. दत्ता शेलार, श्री. तुकाराम उंडे, श्री. मनोहर गवारी, श्री. उमाजी धादवड आणि ह्यापेक्षाही असे कितीतरी विद्यार्थी आज सन्मानाने विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. एवढे सारे केले असतानाही साहेबांचे एक स्वप्न अधुरे राहिले, त्यांना 'उत्कर्ष सह्याद्री बँक' स्थापन करायची होती. त्या दृष्टीने त्यांचे खूप प्रयत्न चालू होते. मात्र वेळेअभावी ते राहून गेले. ते नेहमी म्हणायचे, "आपल्या अनेक पिढ्या अंधारात राहिल्या म्हणून शिक्षणाचा प्रसार व प्रचार खऱ्या अर्थाने युवा पिढीला होणे गरजेचे आहे. त्याशिवाय विज्ञानवादी समाज निर्माण होणार नाही. जातांध समाजाने आपल्या इतिहासाचे भांडवल करून आपणास अज्ञानात ठेवले, मात्र ती गुलामगिरी आपण लाथाडली नाही, तर आपल्या पुढील पिढ्या अधिकच गुलामगिरीच्या गर्तेत जातील.” ध्येयनिष्ठ, हसरे, करारी आणि धिप्पाड राजबिंड व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मुंढे साहेबांना कामाच्या माणसांची नेमकी पारख होती. नव्हे ती एक कलाच त्यांच्याजवळ होती.
एकदा त्यांची खात्री झाली की, ते कितीही महत्त्वाचे काम संबंधितांवर सोपवत असत. श्री. अनंतराव पाटील,मुख्याध्यापक, हुतात्मा राजगुरू विद्यालय, खेड साहेबांविषयीची अशीच एक १९७५ मधली आठवण सांगतात. साहेब म्हणाले, "पाटील सर, आपल्या संस्थेत सेवकांच्या जागा वेळोवेळी भराव्या लागतात. मला तर ह्या वेगवेगळ्या कामाच्या व्यापातून पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मी तुमच्याकडे ह्या नेमणूक ऑर्डर सह्या करूनच ठेवतो. तुम्ही तुमच्या भागातील वा जिल्ह्यातील लोकांना जागेप्रमाणे नेमणुका द्या." हा आपल्या संस्थेतील सेवकावर केवढा मोठा दृढ विश्वास होता. आमदार मुंढे ह्यांचे कार्य पाहून शिक्षक श्री. गाडेकर राजेंद लिहितात, माध्यमिक आश्रम शाळेतील इंग्रजीचे "Krishnarao Mundhe was the M. L. A. so he gave facilities to the poor students to take Education. He was the man with action and confidence. He worked to this favour in social, politios and education. His most endurious contribution however is the praise that milian's give every day as the look at education & their children are learning in sanstha \$s high school....' .''At last we say, "In the prison of his day, Teach the free man how to praise".
श्री. कृष्णराव मुंढे ह्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी असे होते. रोजच्या वापरात कोट, पॅन्ट, पेन, घड्याळ ह्या त्यांच्या आवडीच्या वस्तू होत्या. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवरी भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज, भाऊसाहेब राऊत ह्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा पगडा त्यांच्या मनावर होता. आपल्या समाजातील बांधवांनी अशाच प्रकारची प्रगती करावी असे त्यांना सतत वाटत असे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वतःच्या समाजातूनच शिकलेल्या माणसांनी जेवढा धोका दिला, तेवढा कुणीच दिला नाही. मुंढे साहेबांचेही असेच झाले. अहोरात्र ज्यांच्या हितासाठी धडपडले त्या समाजाने आणि स्वार्थी राजकारण्यांनी मुंढे साहेबांना उघड-उघड विरोध करावा ? काय म्हणावे ह्या यंत्रणेला ?असे असतानाही कामाच्या घाईगर्दीत जेवणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सतत सभा, मीटिंग, मेळावे ह्यातच त्यांची दैनंदिनी जात होती. एक दिवस अचानक साहेब मुंबईहून पुण्यात आले आणि त्यांनी २६ नोव्हेंबर १९८२ रोजी आपल्या बांधवांचा अखेरचा निरोप घेतला. कुणी म्हणू लागले हर्ट अॅटॅक आला. कुणी म्हणू लागले कोणत्याही आजाराची चिन्हे दिसत नसताना असं अचानक झालच कसं? मात्र मुंढे साहेबांच्या मृत्यूचे गूढ आजही भल्याभल्यांना उकलेले दिसत नाही. साहेबांच्या जुन्नरच्या संस्थेत कार्यरत असलेल्या इमानदारबाईंनी हळूहळू साहेबांशी लगड केली.
त्यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले. पुढे संस्थेच्या सर्व शाखा बाईंना खुणावू लागल्या, त्यातच काहींनी बाईंना फुकटचा सल्ला दिला; असे जर केले तर सर्व गोष्टी तुमच्याच मालकीच्या होतील. मग काय इनामदारबाईनी यशस्वीपणे आपला प्रयोग राबवला. जेवणातून बाईंनी साहेबांवर विष प्रयोग केला, आणि सारे काही थंड झाले. साहेबांच्या मृत्यूनंतरही विरोधकांचा त्यांच्या कार्याला विरोध होतच राहिला. त्यांचे कार्य झाकाळून टाकण्यासाठी जणू काही राजूर गावाने चंगच बांधला होता. अलिकडेच काही दिवंगत मुंढे साहेबांच्या नातलगांनी त्यांचा अर्धकृती पुतळा राजूर गावात बसविण्याचे ठरविले. त्यावेळी अख्या गावाने कडाडून विरोध केला. शेवटी मुंढे साहेबांचे जन्म गाव सोडून त्यांच्या नातेवाईकांना हडसर येथे साहेबांचा पुतळा बसवावा लागला. दुर्भाग्य म्हणा, अशा समाजासाठी झटणाऱ्या नेत्याचे, दुसरे काय? मात्र साहेबांची ध्येय धोरणे आणि विचारसरणी जरी आज युवा पिढीने पुढे नेली तर खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतिस अभिवादन ठरेल.