निसर्गाच्या गाभ्यातून उमलेले काव्यसुमन कविवर्य - तुकाराम शिवराम धांडे

Tribal Mahavikas

इगतपुरी, घोटी तेथे उतरायची खोटी, एक मोटार गाडी आणतो नारी बसण्याला, बसण्याला नारी, बसण्याला… असे गाणे एके काळी सह्याद्रीच्या कुशीतील तमासगिरांपासून ते थेट गुराख्यांपर्यंत अतिशय प्रसिद्ध होते. अशाच इगतपुरी शहराच्या दक्षिणेला मध्य रेल्वेचे फाटक ओलांडून आपण पुढे जाऊ लागलो की, नकळत रामवाडीतच प्रेवशकर्ते होतो. अशा वाडीत तुकाराम धांडे ह्यांचे घर कशावरून ओळखायचे. तर आंबा, फणस, चिक्कू, पेरू, चिंच, पपई, अंजीर, बदाम, जांभळ... अशा नाना तऱ्हेच्या फळझाडांच्या बनात तसेच तुळस, आद्रक, आंबीहळद, चित्रुक, कडूलिंब, लाजाळू, गुलतोडा, अर्जुनसादडा, घावटी, शेतावरी... अशा वनौषधी तर कोथिंबीर, पालक, पडवळ, टोमॅटो पासून ते शेवग्यापर्यंत कितीतरी पाले आणि फळभाज्यांच्या नजीक पोहोचलो आणि झेंडू, मोगरा, शेवंती जाई-जुई, सदाफुली, गुलाब अशा पन्नास साठच्यावर फळभाज्या, वनौषधी आणि फुलझाडांच्या मळ्यात आपली पावले थबकली की, समजून घ्यायचे आपण तुकाराम धांडे ह्यांच्या घरी येऊन पोहोचलो आहोत. त्यातही काही शंका आली तर, लगेचच पंधरा-वीस कोंबड्यांचा कळप त्यांच्याच तालात आपल्या स्वागताला दरवाज्याजवळ आलेला दिसला की, हमखास समजायचे आपण तुकाराम धांडे ह्यांच्या घरचा रस्ता अजिबात चुकलेलो नाही. अशा तुकाराम धांडेंची कर्मभूमी जरी इगतपुरी असली तरी त्यांची जन्मभूमी आंबेवंगण आहे.

श्री. धांडे ह्यांचा जन्म दि. २ जून १९६१ रोजी बितिंगा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवंगण पो. मान्हेरे ता. अकोले जि. अहमदनगर येथे झाला. त्यांचे प्राथामिक शिक्षण गावातच झाले. पुढे शिक्षणाची गैरसाय होती. मात्र अशाही डोंगर दऱ्यांत शिक्षणाची पवित्र गंगा का पोहोचू नव्हे. म्हणून राहुरी येथून काही धाडसी शिक्षक गाडी घेऊन आले, आणि गाववाल्यांना आव्हान करत म्हणाले, "गावकरी मंडळींनो तुमच्या मुलांना शिक्षणासाठी राहुरी येथे तुम्ही जर पाठवले, तर आम्ही त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते कपड्यालत्यांपर्यंत सर्व काही करू. हे ऐकूण गावातील काही चार-सहा टाळकी तयारही झाली. मात्र पाच-सात महिन्यातच बाकीच्यांनी आपले चंबूगबाळ तेथेच टाकून पोबारा केला. पळणाऱ्यांच्यात तुकाराम धांडे ह्यांचा धाकटा भाऊही सामील होता. तेथे फक्त तुकाराम धांडेंचाच निभाव लागला. त्यांनी 'संत गाडगे महाराज आदिवासी आश्रम शाळा राहुरी' येथे आपले पाचवी ते दहावीपर्यंतचे अतिशय चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. 

त्यावेळी अदमाने नावचे सर शिकविण्यासाठी लाभले. आदमाने सर शिस्तीचे पक्के होते. अशा सरांशी आणि धांड्यांसहीत इतर मुलांची बरोबर गाठ पडावी. एखाद्या मुलाने वेळेत गृहपाठ, अभ्यास केला नाही अथवा काही चूक केली तर, त्या विद्यार्थ्याला खाली झोपवले जायचे आणि त्याच्या पायांच्या तळव्यांवर काठीने सपासप वार केले जायचे. ही आदमाने सरांची रांगडी पद्धत होती. धांड्यांच्या हुशारीमुळे मात्र त्यांच्यावर कधीच मार खाण्याची वेळ आली नाही. उलट विविध कार्यक्रमात भाग घेत असल्याने धांडे हे अदमाने सरांसह सर्वांचे लाडके विद्यार्थी बनले होते. पाच वर्षात गाडगे महाराजांच्या नावाने चालू असलेल्या आश्रम शाळेने त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. तेथूनच धांडे ह्यांना पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याची जी सवय लागली, ती आज घडीला.……..बोर्डाची परीक्षा इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच धांडे कसेबसे पास झाले. पुढे अकरावीला अकोले महाविद्यालयात येऊन प्रवेश घेतला. कितीही झाले तरी आदिवासी मुलखातील बोली वाड्यापाड्यांतून आलेल्या मुलांच्या तोंडी असणार नाही तरच नवल. अशा मुलांना उपहासाने काही मुले-मुली चिडवायचे. टिंगल-टवाळी करून त्यांना गावंढळ म्हणून नावे ठेवायची. 

ही गोष्ट तुकाराम धांडेंच्याही बाबतीत नेहमीच घडायची. काही ब्राह्मण मुली तर फिदीफिदी हसायच्या. ह्या गोष्टीची आदिवासी मुलांनी भलतीच धास्ती घेतली होती. बोलतांना आपल्या शेजारी कोण आहे, ह्याची चाचपणी घेऊनच कसेबसे तोंडातून शब्द काढायचे. साधं बोलणही त्यांना दहशतीचे वाटायचे. पुढेपुढे तर ही मुले स्वप्नातही ह्या गोष्टींच्या आठवणीने घाबरून जागे होत असत. बरोबर हीच गोष्ट तुकाराम धांडे ह्यांना खटकली. त्याच दिवसापासून त्यांनी 'बिरसा प्रतिज्ञा' केली. “आमच्या गरिबीला आणि गावंढळ बोलीला हसता काय ?' त्यानंतर धांडे ह्यांनी जाणीवपूर्वक रात्रीचा दिवस करून, आपली भाषा सुधारली. ते मित्रांबरोबर अस्खलित मराठी बोलू लागले. त्यांचे शुद्ध उच्चार ऐकूण ज्या ब्राह्मण मुली आधी तोंडे वेंगाडून हसत होत्या, त्या कावऱ्या बावऱ्या होऊन त्यांचे बोलणे ऐकण्यात मग्न होत. जी मुले डांगाणी, गावंढळ म्हणून अव करत होती, ती मात्र धांडेंचे संभाषण ऐकूण गारद होत होती. ह्या सर्वांच्यावरती कुरघोडी केल्यावर धांड्यांनी पुन्हा आपल्या मूळ बोलीकडे मोर्चा वळविला. त्यांना आपल्या बोलीतील स्पंदनांचा स्पर्श जाणवला. तो अतिशय नाजूक आणि चेतना देणारा असल्याने त्यांनी आपल्या निसर्गाच्या पांढरीची पूजा करण्याचे ठरविले. ह्या आपल्या 'माय'च्या बोलीत जो दम आहे, तेवढा दुसऱ्या कोणत्याही बोलीत नाही. ह्याचे उत्तर धांडे ह्यांना आतूनच मिळाल्याने ह्याच बोलीत पुढे तुकाराम धांडे ह्यांनी आपल्या उपजत कलेला मोकळी वाट करून द्यायचे ठरविले.

तुकाराम धांडे ह्यांच्या घराण्याची परंपरा म्हणाल तर, नामवंत तमासगीर कलावंताची. आजोबा, बाप उत्तम तमासगीर म्हणून उभ्या अकोल्याला परिचित होते. त्यांच्यातील थोडी का होईना मूळची कला मुलात येणार नाही तरच नवल! त्यासाठी फक्त वेळ यायची बाकी होती. ती अकोले महाविद्यालयात आली. त्यावर्षी अभ्यासाला असलेले वि. वा. शिरवाडकरांचे 'नटसम्राट' त्यातील शब्दफेक त्याच्या काळजाला जाऊन भिडली. त्यातूनच धांड्यांनाही आपल्या अस्सल बोलीतून काही सादरीकरण करण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी त्यांनी 'ठाकरी' बोलीचा हुबेहूब वापर करण्याचे ठरविले. माणसांच्या महत्त्वाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या गरजाही आदिवासींच्या २१व्या शतकातही पूर्ण झालेल्या नाहीत, ना त्या पुढे होतील. बरोबर ह्याच गोष्टीवर थेट दिल्ली सरकारचे तक्त हलविण्याची भाषा केली तर काय होऊ शकेल. 

म्हणून धांडे ह्यांनी ह्या सवाल जबाबात डोंगराच्या एका मोढ्यावरून 'मंगळ्या'ला हाळी देऊन दुसऱ्या मोढ्यावर आपल्याच नादात असलेल्या सख्याला जेव्हा प्रश्न करतो, आणि त्यांची बातचित होते, ती सर्वांची उत्सुकता वाढविणारी आहे. मंगळ्याने जोरात हाळी दिली, म्हणाला "अरं ये, सख्यादादा, सांग रांगुड्या लई दिस झाला, कुक रं जेलाथा ?" त्यावर सख्या म्हणाला, "मा जेलुथू दिल्लीला, मा पंतपरधानजीला भेटलु, आन् म्हणालू, दाऽऽजी... काय चाललाय भारतामंधी...? ही दरिद्री... ही बेकारी, ही उपासमारी आन् ही बेघरी? कुहीकं जेला पैसा...? कुखय देस आन् कुखय राजा आन् कुहीक चाल्लाय तुहा डोका...' तव्हा पंतपराधनजी म्हणाला, "भावय, मुकाट बस... तुला काय नही कळत. पक्का यडाय तू..." तव्हा मा आखीनच कातावलो, म्हणलू “दाजी आसा वेडाबिडा म्हणायचा काम नही... आऽऽ मा सांगुन ठेवितो, मा लय वेडा माणूस हाय, मा जर कातवलू ना त मह्यासारका वगाळ माणूस आख्या पुरथीवं गवसायचा नही. तवा मा सांगुतो तसा करायला पयजे, या भारतामंधी समद्या उघड्यांना आन् नागड्यांना पांघरूना दिली पयजे. येडावाकडा का व्हईना त्यांनला निवाऱ्याला एखादा खोपाट बांधून दिया पयजे, त्येच्या पोटाला लई नय पन थोडं दोन घास खाया दियाला पईजे.”

तुकाराम धांडे ह्यांचा वरील संवाद ऐकूण अनेकांना महाकवी कालिदास आणि महर्षी वाल्मिकी ह्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा ह्या पहिल्याच संवादाने तुकाराम धांडे ह्यांनी स्वतःची वेगळी ओळख संपूर्ण महाविद्यालयात करून दिली. ह्या संवाद निर्मितीचा फायदा असा झाला की, घरकुले, कपडे-लत्ते, खावट्या अशा विविध योजना कुणीतरी का होईना, थेट दिल्ली दरबारी पोहचविल्या. तेव्हापासून कागदोपत्री का होईना योजना येत राहिल्या, आणि जात राहिल्या. काही अंशाने आदिवाशांच्या पाड्यापर्यंत पोहचत राहिल्या. कवी तुकाराम धांड्यांशी आजही गावपातळीवरच्या गप्पा मारू लागलो की, ते सांगू लागतात, “जागतिकीकरणाच्या रेट्याने आदिवासींचे पुरते कंबरडे मोडून पार होत्याचे नव्हते झाले आहे. आमच्या लहानपणी लोकशाहीची बीजे खूप चांगल्या पद्धतीने विकास पावली होती. गावात वा वाड्या वस्त्यांवर काही कारणास्तव भांडण तंटा झाल्यास तो झगडा मिटविण्यासाठी पुरावेदार प्रामाणिकपणे आणि सहजतेने परिणामकारक पुरावा द्यायचे.

त्यावेळी आदिवासींचे सहकार तत्त्व म्हणजे 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' ह्यापेक्षाही उच्च दर्जाचे होते. पडकईसारखे काम लक्षात घेण्यासारखे आहे. वीस-पंचवीस तरूण गवत कापू लागले अथवा रोपांसाठी राब राबू लागले की नवखा पाहणारा माणूस चाट झाला नाही तरच नवल. त्या रात्री ईरजुकीचा बेत हा ठरलेलाच असायचा. बैल बडवणे, त्यांची शिंगे घोळणे, जनावरांची निगा कशी राखायची ह्याचे प्रशिक्षण घ्यायला आदिवासींना काही एखाद्या विद्यापीठात जावे लागत नसे. मुळात तोच पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, तत्त्ववेत्ता नि संशोधकही तोच असे. बारा बलुतेदारांचा कारभार स्वच्छ, पारदर्शी आणि चोख चाले. आज उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या बागूलबुवाने सारे काही मातीमोल केल्याचे आपण पाहतच आहोत.' एके काळी आदिवासींकडे कोणी जंगल दऱ्यात जाण्याचा शहाणपणा करीत नव्हता. तसा आदिवासीही सुशिक्षित माणूस नावाच्या महाजालात कधी गुरफटत नव्हता, तोपर्यंत त्याचे छान चालले होते. पुढे हळूहळू तो शहरवासियांच्या तावडीत सापडला, आणि त्याची रया गेली. दोन बुके शिकल्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला आदिवासी तरूण त्याच्या कपड्यांकडे आणि केसांच्या स्टाईलकडे अधिक लक्ष देऊ लागला. आपल्या म्हाताऱ्या आजोबांना, आई-वडिलांना अथवा गावातील वयस्कर माणसांना तो जुमानेना. 

शेतातून भाताचे भारे आणतांना आपल्या म्हाताच्या आई- वडिलांना वाकत-वाकत येतांना त्याने पाहिले की, तो लपून बसू लागला. मंदिराजवळ तिरट, रमी, सट्टा... टवाळगिरीत धुंद होऊ लागला. बलाची उपासना, पहेलवानाची मेहनत, कुस्त्या, कसरती, दगडगोटे उचलणे आणि निसर्गाची पूजा करणे त्याला महत्त्वाचे वाटेनासे झाले. अशा कामचुकार तरूणांबद्दल धांडे ह्यांना भयंकर चीड आहे. ते अशा तरूणांना सडेतोडपणे झिडकारतात. तावडीत सापडल्यावर त्यांची बीनपाण्याने केल्याशिवायअजिबात सोडत नाहीत.

तुकाराम धांडे आपला एक मुद्दा मांडतांना म्हणतात, “आदिवासींना रानात आर्यांनी हाकलले की अजून त्यांचे काय झाले, ह्याच्याशी मला फार देणेघेणे नाही. मात्र तो हाकलला गेलेला आदिवासी तिथल्या दगडधोंड्यांशी,कृमी कीटकांशी आणि पशुपक्षांशी इतका एकरूप झाला की, निसर्गाशी तादातम्य पावायचे हे उपजत शहाणपण त्याच्या ठिकाणी आले कुठून ह्याचा अर्थ भल्याभल्यांना कळत नाही. आजच्या शास्त्रज्ञांपेक्षा कितीतरी आधी आदिवासींनी अशा विविध गोष्टी विकसित केल्याचे आपणास बघावायास मिळतील. असे असले तरी आज मात्र आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा खोटा डाव रचला जातो आहे. खोट्या गोष्टींचा आव आणून त्यांच्या हक्काच्या मालकीत म्हणजेच जंगलात धरणे, अभयारण्य असे प्रकल्प मुद्दामहून उभे केले जात आहेत. त्यातून जन्माला आलेला 'पुनर्वसन' हा शब्द कशाशी खातात, हे त्यांना माहीत नसतांनाही त्यांचे नको तेथे पुनर्वसन केले जाते. त्यावर धांडे शासनाला प्रश्न करतात, “फक्त आदिवासी माणसाचेच पुनर्वसन का करतात? खरे तर प्रथम पक्षी, झाडे, खेकडे, मासे किड्या मुंग्यांचे, कृमी कीटकांचेही पुनर्वसन करा. इतके ते त्यांच्यात एकरूप आहेत. त्यांना त्यांच्यापासून बाजूला काढणे एकदम रानटीपणाचे ठरेल." पुढे धांडे म्हणतात, 

"जीवसृष्टीतील रहस्य म्हणजे तुमच्या भाषेत 'पंचमहाभूते' मात्र आम्ही जन्माला येतानाच ज्यांच्याशी जवळीक साधली ते ऊन, वारा, पाऊस, डोंगर आणि आभाळ हेच आम्हाला जवळचे वाटतात. त्यांनाच आम्ही आमची 'पंचमहाभूते' जन्मल्यापासून मानीत आलो आहोत. ह्यामध्येच तर खरे पृथ्वीतलावरचे सारे तत्त्वज्ञान सामावलेले आहे." आदिवासींना निसर्गाची दौलत जणू काही भेटच मिळाल्याने त्याने जीवाभावे निसर्गाला जपले, आणि त्याची पूजा आरंभली, आणि तो त्याच्याशी इतका एकरूप झाला की विचारायची सोय नाही.

तुकाराम धाड्यांच्या मालकीची तब्बल पन्नास हिरडीची झाडे होती. आजही आदिवासी वाड्या-वस्त्यांत ज्यांच्या मालकीची हिरड्यांची झाडे जेवढी अधिक तो श्रीमंत समजला जातो. धांडे तर मोठ्या अभिमानाने सांगतात, "हिरड्यांनीच तर माझे शिक्षण पूर्ण केले. 'अशा धडपड्या कवीच्या आईची 'आवंजी' म्हणजे तरी काय? कोंबड्या तितड्यांचा कारभार. त्यांची जपवणूक करण्याचा, त्यांना लळा लावण्याचा जणू काही म्हातारीने चंगच बांधलेला. ती त्यांना तळहाताच्या फोडांपेक्षाही जास्त जपत असे. थोड्या दिवसांनी इगतपुरी येथे 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा' कंपनीत नोकरीत लागलेल्या कवी धांड्यांनी नवीन घर बांधण्यांचा आपला इरादा आपल्या आईजवळ बोलून दाखविल्यावर त्या भोळ्या भाबड्या माऊलीला असे वाटले की, आपण जीवाच्या अकांताने राबून, कष्टून उन्हातान्हात घाम गाळून सर्वा वेचून आणतो. त्यातील चिमूटभर दाणं आपल्या जीवाभावाच्या कोंबड्यांना टाकतो. आपला जसा त्यांच्यावर जीव हाय, तसाच त्यांचाही आपल्यावर जीव हाय. 

मी दिसले की, त्या चिवचिवाट करून माझ्याभोवती गोळा होतात, आणि जणूकाही मी थकले-भागले आहे, म्हणून माझी विचारपूस करतात. पण हे कार्ट नवं घर बांधून आपल्या कोंबड्यांचा संसार उधळून तर लावणार नाही ना! अशी भीती वाटणाऱ्या आईने काहीही न बोलता फक्त कटाक्ष धांड्यांवर टाकला. आईला काय म्हणायचे आहे, ह्याची त्या क्षणी धांड्यांना तोबडतोब जाणीव झाली. ते स्वतःशीच सावरासावर करत म्हणाले, "आई आपण नवीन घर बांधू, पण कोंबड्यांना थोडं आवरायला हवं. त्या फार घाण करतात." त्यावेळी धांडे ह्यांच्या आईने शांत मनाने कोंबड्यांचे सांगितलेले तत्त्वज्ञान भल्याभल्यांना विचार करायला लावणारे आहे. ती माता म्हणाली, “माणसं माणसांच्या आधाराने जगतात आन् वागतातही. एवढच कह्याला, माणसेचं माणसाच्या पाठीत बिनधास खंजीरही खुपसतात. पन् मह्या कोंबड्या तश्या नहीत रे बाबा. वखत आला की, त्याच माणसांच्या कामाला येतात." आईला काय म्हणायचे आहे, हे तुकारामच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. 

आपला पवित्रा बदलत नवीन कोंबड्यांसाठी खुराडा बनवून आईला म्हणाले, "आई तू असे अजिबात मनात आणू नकोस की, मी तुह्या कोंबड्यांना वायले देणार आहे. अगं त्यांचा ह्या दोन्हीही घरांवर सारखाच अधिकार असेल, मग तर झाले. तेव्हा कुठे त्यांच्या आईने शांततेने घेतले.गा "" आदिवासी साहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक आणि तत्त्ववेत्ते डॉ. गोविंद गारे ह्यांनी आदिवासींतील कला, साहित्य, वस्तू अतिशय बारकाव्याने पारखल्या होत्या. म्हणूनच त्यांनी आदिवासी प्रशिक्षण संस्था, पुणे येथे अतिशय मेहनतीने वस्तुसंग्रहालय उभारले होते. अशीच कल्पना धांडे ह्यांच्याही मनात खूप वर्षांपासून असल्याने त्यांनी तर खास घराशेजारीच दोन गुंठे जागा आदिवासींचे वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी घेतली आहे. त्या संग्रहालयात नांगर, पाभर, कुळव, केनी, फळी, जू... आणि एकूणच शेतकऱ्याचे सारे सरजाम ते ठेवणार आहेत, हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे.

तुकाराम धांडे हे मुळातच कवी मनाचे असल्याने ते संपूर्ण निसर्गाच्या चराचरात माणसांना त्याच पद्धतीने बघतात. त्यांना आईच्या काबाड कष्टाची आठवण होते, ते म्हणतात, "आईने आपल्यावर किती मौल्यवान संस्कार केले. म्हणून तर आपण आज येथे आहोत." "आई व्हती तव्हा" ह्या कवितेत ते म्हणतात,

"आई व्हती तव्हा, जातं गाणं गायचं,
उखळामधी नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं,
आई व्हती तव्हा...,
मला कड्यावर घेऊन पाण्याला जायची,
पाठीवर बांधून शेतात काम करायची,
मातेचं आन् मातीचं छान जमायचं,
दिवसभर त्या एकमेकींशी हितगुज करायच्या,
त्यांचं बोलणं मात्र इतरांना अजिबात समतज नसे"

अशा वेळी दस्तुरखुद कवी धांडे ह्यांनाच मोठा प्रश्न पडे की, त्या दोघीजनी नक्की कोणत्या विषयावर 'खल' करीत असाव्यात. तेव्हा न राहवून ते उन्हाने लालेलाल झालेल्या त्या मातीलाच प्रश्न करत, "माते मला पाठीवर घेऊन आई काम कराची,तव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची ?" तेव्हा माती मायेच्या मायाळूपणात सामील होत म्हणायची, "तिचं एकच म्हणणं असायचं बाळ, मह्यानंतर मह्या बाळाला संभाळ!" आपल्याकडे लोकसमूहाची एक म्हण आहे, 'आई मरो आणि मावशी जगो.' कवीच्या आईचं आणि मातीचं सख्या बहिणंचं हे नातं असल्यानं म्हणून तर मोठ्या हक्काने आणि विश्वासाने ती माता आपल्या बहिणीला तिच्या लेकराचा सांभाळ करायला सांगते.

तुकाराम धांडे हे विठ्ठलाचे सच्चे भक्त शोभतात, ते 'विठ्ठला तूच खरा कवी' ह्या कवितेत संवाद साधतात. "विठ्ठला हा खेळ लई बेक्कार बाबा, लय जीवघेणा, परंतु तू म्हणतो कसा, हे जीवनच एक मजेशीर खेळ आहे. विठ्ठला हे तुझ्याच कवितेच्या वहीत वाचलयं बरं! तुझा विसरभोळेपणा कधीकधी लय फायद्याचा ठरतोय, मागे म्हणे तू एकदा जणाबाईकडे गेला आन् शेला विसरून आला. असाच एकदा कधीतरी ह्या डोंगरदऱ्यांमध्ये आला आन् कवितेची वहीच विसरून गेला. आरं त्याच कविता इथल्या झाडवेलींच्या पानापानांवर उमटल्या गेल्या. त्याच कविता इथली रानपाखरं गाऊ लागली. त्याच कविता इथली फुलपाखरं पंखावर मिरवू लागली. त्याच कवितांच्या अर्थाचा काढा करून इथली माणसं पिऊ लागली. सारं रान तुझ्याच कवितांची वही झालं. कविताच झाली ऊन, वारा, पाऊस. आन् कविताच झाली आभाळ  येथे धांडे गद्यात्मक शैलीतूनही कवितेचा नावीन्यपूर्ण बाज मांडत राहतात, आणि त्यांना जे सांगायचे ते सांगतच सुटतात. म्हणूनच तर डॉ. संजय लोहकरे म्हणतात, "कवी धांडे ह्यांची कविता ही फक्त कविताच न राहता ती आत्मकथन कधी बनते आणि निसर्गाच्या सर्व शक्तींना आपल्यात एकवटत ती पुढील दीर्घ प्रवासाला कधी निघते हे वाचकाला देखील नाही." निमित्त होते १९८८ सालचे. धांडे ह्यांची 'वळीव' ही पहिलीच कविता 'लोकप्रभा' ह्या साप्ताहिकात प्रकाशित झाली. त्यानंतर धांडे ह्यांच्या कवितेने मागे फिरून पाहिलेच नाही. तर ती वळवाच्या पावसासारखी रपरप बरसत राहिली. म्हणूनच तर सप्टेबर २००७ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक ह्यांच्या पुढाकारान आणि राजहंस प्रकाशन पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचे नाव जाणीवपूर्वक 'वळीव' असेच ठेवले गेले.

आदिमांची निसर्गाच्या सानिध्यातील बातच न्यारी असते. ही न्यारी बात नक्की कशी असते. ती कवी धांडे ह्यांच्या तोंडून आणि देहबोलीतून जी प्रकटते, तिचे बोल ऐकूण भलेभले आचंबित झाल्याबिगर राहत नाहीत. चाळीसगाव डांगाणात आदिवासी माणसांना फेब्रुवारी-मार्च मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वनवन भटकावे लागते. त्या काळात जणू काही पाण्याने आदिवासींच्या तोंडचे पाणीच पळवलेले असते. जिकडेतिकडे पाण्याची टिपवन आलेली असते. मात्र हेच चित्र पावसाळ्यात भयानक रूप धारण करते. झाड वेलींनी आच्छादलेला घाट माथ्यावरचा, डोंगरदऱ्यांचा भाग कुठल्याही वाटेने मार्गक्रमण करू लागलो की, गड, किल्ले, घाट-माथा, मंदिरे, कोकणकडे आणि चहूबाजूच्या डोंगरावरून फेसळणारे धबधबे, रानफुलांच्या गालिच्यात हरवून जावे, असा हा परिसर. येथे एखाद्या चिंदाडासारखा मुसळधार पाऊस कोसळत राहतो.पण ऐनवेळी पाण्याचा सगळीकडे निचरा होतो. पुढेतर विहिरीही कोरड्याठाक पडतात. चिटपाखरानांही पाणी पिण्याची शाश्वती नसते. अशा वेळी माणसांची काय अवस्था होत असेल. हा ज्वलंत प्रश्न धांडे ह्यांनी 'साहेब' ह्या कवितेत अधोरेखित केला आहे.

"साहेब...,
आवं, इठं कह्याचा देस धरम अन् जातपात,
इठं मरणासी आट्यापाट्या खेळत,
पाणी गवसीत फिरणं आन् पाण्यावाचून मरण,
हीच इठली रीतभात,
इठला पाणखळा आमाला आपटून थोपटून काढतो,
आन् आठ महिने खडकावं वाळात घालतो,
लय तरास व्हतो साहेब...,
त्या तिकडच्या धरणातून लिफ्टाना पाणी उचलून,
आन् एखाद्या कपारीतून भकाभका बहेर सोडलं,
त हा लक्शीमीचा चारा हातात घेऊन सांगतू साहेब,
आसं जर झालंना! त म्हातारी कोतारी माणसं, मुकी जनावरं,
आन् रानपाखरं ह्या सगळ्यांची लाकलाक मतं,
तुमालाच मिळतील साहेब, तुमालाच मिळतील."
         
ह्या कवितेतून गेंड्याचे कातडे परिधान केलेल्या साहेबाला किती झणझणीत फोडणी आहे, ह्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. 

तुकाराम धांडे ह्यांची 'बाप' ही कविता आदिवासींच्या आभाळा एवढ्या कष्टांचे प्रतिकच म्हणावे लागेल, त्यामुळेच ही बापाची कामगिरी सरस आहे, असे कवीला वाटत राहते. म्हणूनच ते 'बाप' ह्या कवितेत लिहितात, 

"बाप डोंगरी नांदतो, हाका कुतऱ्याला मारितो,
दूर बकऱ्या चारितो, बाप डोंगराचा राजा,
कशी लंगुटी नेसतो, लई दमतो भागतो,
हात सुर्याला जोडितो, त्याच्या काळजाचं दुःख,
आख्या रानाला सांगतो..."
अशा 'बा'ची नाही पैश्याची गाठभेट,
बाप चांदण्या मोजितो...

ह्यातील शेवटची काव्यपंक्ती भल्याभल्यांची झोप उडविणारी अशीच आहे. धांडे ह्यांच्या अलिकडील ‘भूगोल, पुनर्वसन, तुकोबा आणि आजोबा, विठ्ठला तूच खरा कवी, आई व्हती तव्हा, खोबण, साहेब...' ह्या कविता अतिशय सकसतेने उतरल्या आहेत. आपल्या कवितेविषयी स्वतः धांडे लिहितात, "लहानपणी आईच्या मागे तर कधी बालमित्रांबरोबर तर कधी एकटाच डोंगरदऱ्या, कडेकपारी, रानजंगल, दगडगोटे, टेकुटे आवळे, पिपरं, करवंदे, आंबे, आंभळकं, जांभळं, उंबर, तोरणं... शोधीत मोहळ, खेकडी, मासे, लावरी, व्हले, ससे, रानभाज्या व कंदमुळे गवसीत फिरलो. भूक लागल्यावर रानातून फिरून यावं... असं आजीचं सांगणं असायचं. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोनदोन कोस दूरवर जाऊन तिथे रातभर नंबरावर बसतो, कसली भीती वाटली नाही, कसली कुरबूर नाही, कुणावर राग नाही, रूसवा नाही, तर कधी रडतही बसलो नाही. ह्या गोष्टी डोंगरानं कधी शिकवल्याच नाहीत. पुढे तोच डोंगर त्याच्या साऱ्या पसाऱ्यासहीत माझ्या कवितेचा विषय झाला.

तुकाराम धांडे ह्यांची कविता आपले सुखदुःख साऱ्या जंगल जिव्हाऱ्यातील कृमी कीटकांपासून शहरातील मस्तवाल माणसांपर्यंत पोहचली. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयातील 'मंचीय कवीपीठा'पर्यंत तिने मजल मारली. एवढेच कशाला आखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजकांनाही धांडे ह्यांच्या कवितेने आकर्षित केले. आज तर तुकाराम धांडे ह्यांची कविता 'व्हॅटीगनसिटी, युरोप' येथेही जाऊन धडकली आहे. जॉन फेलीक मजाडो हे 'डॉ. सिसिलिया काव्होलोंचे बंधू ह्यांनी धांडे ह्यांच्या कवितेची खरी ताकद आजमावली, आणि तिला वैश्विक महत्त्व देण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यांनी आपल्या 'ब्लॉग'वर कवी धांडे ह्यांना फोटोसह आणले. अशा पद्धतीने कवी धांडे ह्यांच्या कवितेचा जागतिक सन्मानही झाला. अशा निसर्गाच्या कुशीतून अलगद घेतलेल्या आमाप सुगंधी उपमांची उधळण करणाऱ्या प्रेमळ स्वभावाच्या कवीवर पुरस्कारांनी तर अक्षरश: पाऊसच पाडला. सर्वप्रथम १९९२ रोजी पुण्यातून 'कविरत्न' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. २५ फेब्रुवारी २००७ रोजी 'सर्वतीर्थ टाकेद', १९ मे २००७ रोजी कवी रे. टिळक पुरस्कार, नाशिक, मुंबईचा 'सह्याद्री गौरव पुरस्कार', 'सह्याद्री भूषण पुरस्कार', यशवंतराव चव्हाण पुरस्कार, 'महाराष्ट्र कामगार कल्याण पुरस्कार' असे कितीतरी लहानमोठे पुरस्कार तर मिळालेच, शिवाय २००८ च्या महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय, 'बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कारा'नेही कवी धांडे ह्यांना सन्मानित करण्यात आले. 

कवी धांडे आज काव्यवाचनाचे शेकडो कार्यक्रम करीत आहेत. शाळा-कॉलेजांमध्ये 'काव्यनाट्य विनोद' ह्या स्वतंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती आणि लोकशिक्षण देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न चालू आहेत. २००२ पासून रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, प्रकाश होळकर, इंद्रजित भालेराव, नारायण सुमंत, सुरेश शिंदे... इ. नामवंत कवींबरोबर तर कधी स्वतंत्ररित्या आज त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू आहेत. 

अशा ह्या तुकाराम धांडेंच्या कवितेने निसर्गाची आस आणि विचारधारा अंगीकारली आणि त्याच्या उपयुक्ततेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ती साहित्य आणि संस्कृतीला आपल्या बरोबर घेऊन निघाली आहे. न थकता न थांबता खूप दूरचा प्रवास करायला. तिच्या व्यासंगी उर्मीला आदिवासी बांधवांच्या आभाळभर शुभेच्छा!.....