कॉम्रेड वाहरू सोनवणे ह्या कार्यकर्त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी श्रीखेड, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे झाला. प्राथमिक शिक्षण श्रीखेड येथेच झाले. अक्षरांची शीबशी ओळख करून त्यांनी कॉलेजच्या प्रथम वर्षापर्यंत धडक मारली, परंतु पुढे यमचीच शाळा सुटली. इतरांप्रमाणे वाहरूजींनीही विद्यापीठाच्या पदव्या संपादन केल्या असत्या, पण तो काळ आदिवासींसाठी अत्यंत खडतर होता. मात्र तरीही अख्या श्रीखेडमध्ये वाहरूजींइतका शिकलेला दुसरा कोणी तरूण नव्हता. कॉ. वाहरूदादा कार्यकर्ते कसे झाले? हा प्रश्न तेवढाच चिंतन करायला लावणारा आहे. ते दस्तूरखुद सांगतात की, "जीवनाचे सुख, दुःख, राग, समाधान, आनंदाची भाव-भावना व्यक्त करून सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या परंतु व्यवस्थेने दरिद्री बनविलेल्या आदिवासी समाजात माझा जन्म झाला.
पाटी-पेन्सिल. घेऊन शाळेत गेलो, दोन पुस्तके शिकलो आणि शिक्षण सुटले. गावी आलो आणि आई, वडील, भावंडे, गावातील आया-बाप्यांबरोबर सावकारांकडे मोलमजुरीला जाऊ लागलो. गावातील लोक म्हणत, भाऊ तू इतका शिकलास! काहीतरी दुसरे काम बधं, आमच्या बरोबर ढोरमेहनत करतोस, आम्हांलाच "लाज वाटते. मला त्यांचे म्हणणे पटत होते पण नोकरी मागण्यासाठी कोणाकडे जाऊ ? हाच मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता. सातपुड्याच्या पायथ्याशी तापी नदीच्या किनारी धडगावजवळ एका सरदाराच्या पोटी जन्माला आलेला 'अंबरसिंग महाराज भिल्ल सेवा मंडळा'चे नेतृत्त्व करून भजन-जागरण करत लोकांच्या मनांतील द्वेषाची भावना कमी करत होते.
त्यांनी भजनाचा वापर तलवारीसारखा करून लोकांना सत्याचा मार्ग शिकविला होता. सगळ्या परिसरात त्यांचे चांगले नाव झाले होते. असे हे अंबरसिंग महाराज आदिवासींचे नेते आहेत, हे मला समजल्यावर मी लगेच अर्ज लिहून त्यांच्याकडे गेलो. त्यांनी अर्ज वाचून बघितला आणि तो बाजूला ठेवत म्हणाले, "जिस समाज में तुमने जनम लिया है, वह समाज अन्याय, अत्याचार की धदकती अंगार में गिरा है, और हाथ फैलाकर चिल्ला रहा है, की भैय्या बचाओ, दादा बचाओ, लेकिन जिसमें बचाने की ताकद (क्षमता) है, वह तेरे जैसा नोकरी के नशे में धूत" महाराजांचे बोलणे ऐकूण मी हैराण झालो. ते बोलणे माझ्या जिव्हारी लागले आणि मी त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला.
तो काळ १९७०- ७१ चा होता. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची करूण कहाणी महाभयंकर होती. ते सर्व चित्र मी पाहिले आणि त्या दिवसापासून मी दलित, आदिवासी, कष्टकरी चळवळीचा कार्यकर्ता झालो.' सन १९७८ सालातील गोष्ट असेल. आदिवासींची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. पहाटे चार वाजल्यापासून कामाला सुरूवात व्हायची, ते रात्री ९-१० वाजेपर्यंत आणि नंतर थकले- भागलेले, उघडे-बोडके जीव पायपीट करीत कसेबसें आपल्या कच्चा- बच्च्यांत परतायचे. अत्यंत कमी मजुरी, काबाडकष्ट अधिक आणि पावलापावलांवर अपमान, अत्याचार सहन करीत केविलवाणे जीणे जगणारी हाडा-मांसाची माणसे वाहरूजींनी नुसती पाहिलीच नाहीत तर त्यांच्याही वाट्याला ते सारे आले. मालदारांना पैशाची खूप मस्ती होती. ह्या मस्तीच्या जोरावर ते अनेक बलात्कार पचवत होते.
किरकोळ कारणावरून किंवा कारण नसतानाही मजुरांना बेदम मारहाण होत होती. कुमारी मुलींचे पोट आले तर जाब विचारण्याची सोय नव्हती. गावातील व नजीकचे शेट- सावकार, पाटील, जमीनदान, ठेकेदार हे वाटेल तशा माना मुरगाळत होते. अनेकदा आदिवासींच्या घरांवर आक्रमक हल्ले व जाळपोळ होत होती. वेठबिगारांना वेठीला धरले जात होते. जिथे-जिथे आदिवासींची वस्ती आहे, तेथे अशा खेड्यापाड्यांतून वाहरूजी अविश्रांत भटकले आणि त्यांनी आदिवासींचे आत्मभान जागविले. नीट धडूत नाही नेसायला,अन्न नाही खायाला अशा फाटक्या माणसांच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. ह्या चळवळीत कार्यरत असताना त्यांना अनेकदा चटके आणि फटकेही बसले. त्यातूनच त्यांच्या मनाला पाझर फुटले आणि त्यांची पहिली 'भिलोरी' बोलीतील कविता जन्माला आली ती 'पालमांडी वस्ती' 'एक वस्ती, तिथं पाल मांडतात, पोटासाटी पोट आलं, तरी त्यांना, पाल मांडावच लागतं, पालमांडी वस्ती ती.' किंवा 'देवदासी' 'एक मुलूख, " तिथं देवाच्या नावावर मुली सोडतात, बकऱ्या कोंबड्यागत,. तरूण होता होता, बगलेत घ्यावे, कानाकोपऱ्यांत जाऊन, वापरून घ्यावे, कोण पाहतो, घर नाही दार नाही, देवाच्या बकऱ्या त्या देवदासी म्हणतात त्यांना.. वाहरूजींची कविता द्वंद्वात्मक, सेंद्रीय, लढाऊ आणि वैश्विक जाणीवेची व आशयाची आहे. ही कविता शोषित समाजाच्या दुःखाची मीमांसा करतानाच, ती जनलढ्यात कधी सामील होते ते समजतही नाही. त्यांच्या काव्याचे विषय सर्वस्पर्शी व भाषा, अभिव्यक्ती साधी पण थेट असल्याने श्रमिक आणि कष्टकरी वर्गाला सहज समजते.
विशेषतः 'भिलोरी' बोलीतील कविता लक्षवेधक आहे. उदा. 'मां पाहिली लढाई आपनीच' ही कविता बघितल्यावर समजते,
'मां मला पोलीस मार टाकीत.
करीतन भिवी गई?,
मला बंदुकच मारी, अशी बात नाहा मि', मां!,
जीव लेनारं, चौफेर सत, घरमा-बाहेर, समा-साई,
मानूस्कीची लढाईत लढनाच पडी!'
वाहरूजींनी आपल्या डोळ्यांनी समाजाची जी वास्तवता पाहिली त्यावरच स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. आपण काय लिहिले आहे, हे एकदा आपल्याच बांधवांपर्यंत पोहचवावे असे त्यांना वाटल्याने, ती हकिगत ते नेहमी सांगतात, ती अशी, "एका खेड्यावर एका झोपटीच्या ओट्यावर असेच पंधरा-वीस लोक जमून बसलो होतो. त्यांत काही म्हाताऱ्या बायका पण होत्या. मी कविता वाचू लागलो पण ह्या लोकांना कविता हा प्रकार नवीनच होता, मात्र कवितांचे रसग्रहण करण्याचा त्यांचा दृष्टिकोण लक्षात घेण्यासारखा होता. मी कवितांची वही उघडली आणि माझ्या 'भिलोरी' कविता वाचावयास लागलो, तर कविता वाचल्यावर त्या आदिवासी शेतमजुरांनी 'वाहऽ वाहऽ' केली नाही, तर ते स्वतःच खूप हसून पडले आणि पुन्हा कविता वाचायला सांगितल्या. मी पुन्हा तीच कविता वाचली, ते पुन्हा खूप हसले आणि शेवटी गंभीर होऊन म्हणाले, "खरा स भाऊ, खरा स, आपू बी काय करतूस? आपना जीवनच तस्याय.' "" स्वतः भिल्ल समाजातील आदिवासी असल्याने वाहरूजींच्या चौकसवृत्तीने वास्तवता आणि कटुसत्य रेखाटले. जंगलातला आणि पहाडी मुलखातला माणूस मराठी साहित्यात आणल्याने त्यांचे नाव मराठी जगताला परिचयाचे झाले.
आदिवासी साहित्य चळवळीतील ज्येष्ठ ख्यातनाम कवी व महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांत सुप्रसिद्ध झाले. त्यांच्या 'भिलोरी' बोलीतील 'गोधड' ह्या काव्यसंग्रहाला 'कवी कुसुमाग्रज काव्य पुरस्कार' मिळाला आहे. पाचवे आदिवासी साहित्य संमेलन, पालघर, जि. ठाणे (१९९०), 'विद्रोही साहित्य संमेलन', कोल्हापूर २०००, 'परिवर्तनवादी साहित्य संमेलन', भंडारा. ह्या संमेलनांची अध्यक्षस्थाने आपोआपच त्यांच्याकडे चालत आली. आदिवासींचे संघटन करताना, श्रम करणाऱ्यांना व घाम गाळणाऱ्यांना कॉ. वाहरूजींनी मोठ्या शिताफीने एकत्र केले. खरोखरच त्यांची ही अविस्मरणीय कामगिरी म्हणावी लागेल. 'श्रमिक संघटना' शहादा १९७३, ह्या संघटनेचे ते खरेखुरे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात, तर 'श्रमिक मुक्तीदला'तील १९८३, एक खंदा आणि लढवय्या शिपाई म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेत आदिवासींचे होणारे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक शोषण आणि त्यांची अन्याय-अत्याचारांतून मुक्तता हा त्यांच्या चिंतनाचा विषय असून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये पडलेले दिसते. 'नर्मदा-मेधा आणि आदिवासी', 'कोर्ट', 'आमच्या दुःखाबद्दल', 'घोर', 'गोधड', 'मंथन', 'स्त्री', 'देवदासी', 'रोजगार हमीच्या रागेत' ही कवितेची नुसती नावे जरी पाहिली तरी त्यांतील मथितार्थ काय असेल ते जाणवते.
त्यांची 'स्टेज' नावाची कविता ते वाचू लागले की, आदिवासींना त्यांची पायरी प्रस्थापितांनी कशी दाखविली हे समजायला वेळ लागत नाही. कॉ. सोनवणे हे खरे हाडाचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी धरणग्रस्त जंगल-जमीनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि स्वास्थ्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं. अधिवेशने, चळवळी नि सत्याग्रह करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय अनेकदा तुरूंगवासही भोगला पण जिद्द सोडली ..नाही. कार्यावर निष्ठा ठेऊन ते कार्य पुढे रेटतच राहिले. ह्याला म्हणतात सच्चा कार्यकर्ता ! 'आदिवासी' हाच आपल्या कार्याचा अखेरचा श्वास असेल असे अभिमानाने सांगणाऱ्या सोनवणेंचा आदिवासींच्या अस्तित्वासाठी आणि आत्मसन्मानासाठी 'आदिवासी एकता परिषद' ह्या सामाजिक संघटनेद्वारे तमाम आदिवासींना जोडण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे, त्यांच्या ह्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून २९ नोव्हेंबर २००२ रोजी आदिवासी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 'आदिवासी सेवक' हा राज्यपुरस्कार विधान परिषदेचे अध्यक्ष मा. अरूणभाई गुजराती ह्यांच्या हस्ते प्रदान केला. तसेच काळाबरोबर आदिवासींचा वाहरूजींनी जो विचार केला, त्यांच्या भवितव्यासाठी अनेकदा कोर्ट कचेऱ्या आणि तुरूंगवास भोगला त्या त्रासाची ठणक किंचीत का होईना कमी व्हावी म्हणून 'आदिवासी समाज कृती समिती'ने मोठ्या समारंभपूर्वक सन २००६ चा 'आदिवासी भूषण' पुरस्कार देऊन त्यांचा येथोचित सन्मान केला.
आदिवासींच्या विविध समस्यांचा विचार करताना ते म्हणतात, 'आदिवासींना साहित्यात काय सथान आहे? एकीकडे साहित्य हे संस्कृती जपणारे, अस्मिता जागविणारे, स्वाभिमान फुलविणारे आहे असे सांगितले जाते. शिवाय साहित्य हे समाजजीवनाचा आरसा आहे, ते जीवनाला दिशा देते, गती देते, पण म्हणून आदिवासींचे काय? रामायण, महाभारतकाळापासून आदिवासींना पावलोपावली हिणवण्यात आले असेच दिसते. चातुर्वण्र्यांच्या रक्षणासाठी रामाने त्राटिकेचा वध केला, शिक्षणाचा अधिकार नाकारून एकलव्याचा अंगठा कापूर आदिवासींमधील जगज्जेता धनुर्धारी कायमचा उठवून त्यांना अपमानित केले. आमच्याकडे वीर बिरसा मुंडा, वीर रामजी भांगरे, रामा किरवा, तंट्या भिल्ल, खाज्या नाईक, होनाजी केंगले, भागोजी नाईक असे अनेक शूरवीर मायभूमीसाठी हसत हसत फाशीच्या तक्तावर चढले, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आले. परंतु त्यांच्या पराक्रमाचा इतिहास प्रस्थापितांनी कोठेही लिहिला नाही. लिहिले ते असे,
'कावळ्याहून काळे,
धरतीचे महापापी,
चपट्या नाकाचे,
चोर-दरोडेखारे,
चौथीच्या पुस्तकात एका धड्यात' ते भिल्ल चोरी करीत' असा उल्लेख आहे. म्हणजे भिल्ल फक्त चोरीच करू शकतात. इतर चांगली कामे त्यांना येतच नाहीत, असं भिल्ल समाजासंदर्भात बालमनावर बिंबविले की झाले. दुसरी गोष्ट उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ह्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी 'झडीचे दिवस' हे पुस्तक लावले आहे. ते आदिवासी जीवनावर वरपांगी भाष्य करतं. ह्या पुस्तकात आदिवासी नदीच्या पात्रात डांगरवाडी करतो आणि आदिवासींच्या तरूण मुली नदीत आंघोळ करतात. लेखकाला बरोबर त्यांच्या उघड्या मांड्या, शरीर, स्तन दिसावे! हे आमचे आदिवासींचे चित्रण? काय म्हणावे ह्या प्रवृत्तीला ? चिडलेले वाहरूजी म्हणतात, “अशा बेताल व लंपटखोर लेखकांना झाडाला बांधून मार मारले पाहिजे.' आदिवासींचे पारंपरिक देव-देवता म्हणजे डोंगऱ्या देव, वाघ्या, बहिरोबा,मरियाआई, खंडोबा आणि महत्त्वाचे म्हणजे 'याहामोगी'.
आदिवासींची कुलदेवता असून तिला विश्व हिंदू परिषदवाले याहामोगी आणि जगदंबा ह्या एकच देवता आहेत असे म्हणतात. दुसरे म्हणजे, पावरा जमातीत 'इंदला करतात. इथेही असेच म्हणणे आहे की, सत्यनारायण आदि इंदल हे एकच आहेत. अशा प् आदिवासींचे हिंदूकरण करण्याची मोहीम जोरात आहे. तर दुसरीकडे 'वनवासी' करण केले जात आहे. ह्या सर्व हल्ल्यांना उलथून टाकण्यासाठी स्वतः सोनवणे आपल्या बांध एकजूट करण्यास.
आज आदिवासी संस्कृतीचा नायनाट करण्याचा चंग बांधला जातोय, मात्र अशा देशद्रोहींनी हेही ध्यानी घ्यावे की, आदिवासी संस्कृती ही फक्त आदिवासींठीच वाचवली जावी असे नव्हे, तर संपूर्ण जगासाठी ती वाचविणे हिताचे आहे, हे कोणीही मायीचा लाल आता नाकारू शकत नाही. अजूनही आदिवासींजवळ अशा गोष्टी आहेत की, त्या इतरांनी शिकल्या पाहिजेत. म्हणून चवताळलेले वाहरूजी तावातावाने म्हणतात, “आदिवासींकडून शिका, आदिवासींना काय शिकविता? आम्हांला शिकवता की, विद्रप करता, नक्की काय?' 'आदिवासींचा विकास की भकास?' अरे ! कसे जगायचे, वागायचे ह्याचा विचार करायला आदिवासी समर्थ आहेत. तुम्ही आदिवासींना मुख्य प्रवाहात घेऊन जाण्यास निघाला आहात, पण लफंगे, चोरांनो, हा मुख्य प्रवाह काय भानगड आहे. तो कोंणी निर्माण केला? हे तुम्हांला तरी ठाऊक आहे काय?'
अशा शब्दांत प्रस्थापितांची कानउघडणी करायला वाहरूजी अजिबात कचरत नाहीत. आदिवासींचे पाडे-वाडे नि संपूर्ण वस्ती पायाखाली तुडवल्यावर ते आदिवासींची व्यथा मांडताना सांगतात, "अनेकजण आदिवासींना आपल्या धर्माचे वाटेकरी बनवू पाहत आहेत. त्यांचा देशपातळीवरचा एकच एक असा धर्म नाही, पंथ नाही, पक्ष नाही आणि संघटनाही नाही. त्यामुळे आदिवासी चळवळीला दिशा नाही, वैचारिक बैठक नाही. देशाच्या वेगवेगळ्या विभागांत ज्या धर्माच्या, पक्षाच्या आणि संघटनांच्या प्रभावाखाली जो आदिवासी गेला आहे असा आदिवासी त्यांच्यासाठी इमान राखून आपले जीवन जगतो आहे. मानवी मूल्यांचा आधार घेऊन जगणारा समाज मात्र विस्कळीत आणि खिळखिळा झाला आहे, विभागला गेला आहे. कोणी हिंदुधर्म म्हणतो, कोणी ख्रिश्चन म्हणतो तर कोणी मुसलमान. प्रत्येक धर्मवाले आपल्या ताब्यातील आदिवासींवर जोरदार आपला प्रभाव जमवत आहेत.
त्यांची संस्कृती व संस्कृतीची मूल्ये आदिवासींत रूजवत आहेत. राज्यातील व देशातील पक्षसुद्धा आम्ही तुमचे प्रश्न सोडवू, तुमचा विकास करू असे सांगून त्यांच्या ध्येयासाठी आदिवासींना वापरून घेत आहेत. त्यांचे कर्मठ विचार आदिवासींच्या मनात एवढे ठासून भरवत आहेत की, कोणताही आदिवासी कार्यकर्ता आपलेच काम समजून राजकारण आणि धर्मकारणाचे संरक्षण करण्यासाठी जीव द्यायला तयार होतात. मग अशा परिस्थितीत आदिवासीच आपापसांत भांडतात आणि देशोधडीला लागतात. तेव्हा कॉ. वाहरू सोनवणे म्हणतात, "हे काय आदिवासींचे हाल चालवलेत, त्यांना दिशाहीन करून सोडणाऱ्यांनो त्यांना तुम्ही काय वस्तू-बिस्तू समजल की काय? आदिवासी माणूस आहे, वस्तू नव्हे, हे प्रस्थापितांनी नीट ध्यानी घ्यावे." आदिवासींचा इतिहास खोटा कसा लिहिला गेला, त्या लफंग्या इतिहासकारांबद्दल वाहरूजी म्हणतात, "रामयण आणि महाभारतात जे काही वाईट घडले ते सर्व आदिवासींच्या माथी मराण्याचे कार्य ब्राह्मनांनी केले.
हे दोन्ही ग्रंथ आदिवासींवरील अन्याय आणि दमनांच्या कहाण्या आहेत. ह्या ग्रंथांनी शोषण, विषमता, दमन आणि जातियतेचा पुरस्कार केलेला आहे. असे असताना आदिवासींना जवळ करण्याचे, प्रेमाणे कुरवाळायचे नाटक करायचे आणि त्यांना फसवायचे, दिशाभूल करायची, त्यांना हनुमान करायचे आणि त्यांच्यावर अन्याय करणारे ग्रंथ, आदर्श गळी उतरावयाचे. हा कुठला न्याय? त्राटिका, वाली, सुग्रीव, म्हणूनच बिभीशन, वाल्मिकऋषी, वानरसेना हे कोण होते? ते आदिवासी होते, मात्र ते इतिहासकारांनी लपवण्याचे कपटी काम केले.' पुढे जाऊन एक ऐतिहासिक घटना वाहरूजी सांगतात की, "जिच्यावर अनेकांचा विश्वास बसायचा नाही, पण ती तेवढीच सूचक आहे ती अशी, रावणाने सीतेला पळवून नेले. एवढे आपल्याला ठाऊक आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, सीताच रावणावर भाळली आणि तीच स्वखुशीने रावणाबरोबर गेली. ती पुढे अशीही कशावरून म्हणाली नसेल, 'प्रियकरा ने रे मला पळवून' हे विधान किती धाडसाचे आहे ते समजते.
रामाने अनेकांना आपले दास बनवले होते. आपल्या ताब्यात ठेवले होते, आपल्या कार्यासाठी त्यांचा वापर करून घेतला सेतू बांधण्यासाठी लंकेत जाण्यासाठी रामाने हनुमानाला आज्ञा सोडली. तो उठाला की सुटलाच पळत. हनुमान जा, हनुमान ये, हनुमान रामाला आपला प्रभू मानत होता व स्वतःच्या हृदयात श्रीरामाला स्थान दिले होते. पण श्रीरामाने हनुमानाला आपल्या हृदयात थोडी जागा दिली होती का? हा खरा संशोधनाचा विषय आहे. खोटा इतिहास लिहून आदिवासींची दिशाभूल करून काय साधणार आहेत?'आदिवासींची नको तेवढी श्रद्धा नको त्या देवावर आहे. म्हणून कॉ.वाहरूजी बऱ्याचदा आदिवासींनाही आपल्या टीकेचे लक्ष्य करतात. ती कथा ते मोठ्या गमतीने नेहमी सांगतात, ती अशी, “एक दिवस आम्ही दोन-चार मित्र नदीवर मासे पकडण्यासाठी गेलो होतो.
संध्याकाळच्या वेळी घरी येत होतो, तर चावडीजवळ बरेच लोक गर्दी करून होते. काय झाले आहे ते काही समजतच नव्हते. आम्हांला वाटले कुणालातरी पान- बिनच लागले की काय? काही अंतर गेल्यावर माझा पुतण्या जवळ आला. मी त्याला विचारले काय झाले ? तर तो थोडा हसायचा व शांत व्हायचा. काहीच कळत नव्हते. पुनःपुन्हा त्याला विश्वासात घेत विचारले की अरे काय झाले आहे ते सांगतो लवकर की देऊ एक कानाखाली, मग तो घाबरला आणि लाजत म्हणाला, 'काय झालं, हनुमानाची लंगोटी जळाली.' आमच्या तत्क्षणी ध्यानी आले हा उद्योग कुणाचा तरी असणार, पण अंधश्रद्धाळू आदिवासींना राहून राहून वाटू लागले देवाचे असे कसे झाले बर? कसला देव नि कसला का? तो रामाचा 'पर्सनल असिस्टंट' होता की म्हणाना.' तिसऱ्याच दिवशी मी वृत्तपत्राला लेख लिहिला, 'रावणाची लका जाळणाऱ्या हनुमानाची लंगोटी जळेलच कशी? आता अशा ह्या अंधश्रद्धेला काय म्हणावे बरे? आतापर्यंत आमच्या साऱ्या जीवनाबद्दल तेच सांगत आहे, त्याप्रमाणे आम्ही गुमानपणे वागत आलो. पण 'गोधड'ची जी गत झाली ती आता होता कामा नये, म्हणूनच ते म्हणतात, "ही समाजव्यवस्थाच फाटक्या गोधडीसारखी झाली आहे. ही ठिगळे पडलेली गोधडी (समाजव्यवस्था) आता बदलायलाच हवी. हा कविमनाचा माणूस जरी असला तरी केव्हाही बंड करू शकतो. त्याला सर्व गोष्टी सहज होतीलच असे नाही. म्हणून माधव सरकुंडे ह्या आदिवासी कवीच्या काव्यपंक्ती उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही. तो लिहितो-
'तुझ्या शास्त्रोक्त भडवेगिरीचे चोचले पुरविले,
तू सांगितले तसे धडेही गिरविले,
एवढेच काय पण तू म्हणाला, त्या दिशेला तोंडही फिरविले, तू फाडत गेला, मी फाटत गेलो... पण आता, आता मला तुझे काहीच मान्य नाही..., तू खोटा, तुझा देव खोटा, तुझा बाप खोटा, तुझ्या प्रत्येक फुलात लपला आहे निवडुंगाचा विखारी काटा...' आज आदिवासींसाठी नव्हे तर 'आदिवास' सोबत कॉ. वाहरूजींनी वेठबिगारी, जमिनीच्या हक्कांचे प्रश्न, झोपडपट्टीवासीयांचे हक्क, शेतमजुरांचे संघटन, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराचे प्रश्न तर सोडविलेच पण अन्याय- अत्याचारांविरूद्ध आवाज उठविणे, मोर्चे काढणे, आवश्यकतेनुसार त्यांचे लढे न्यायालयात नेणे हे कामदेखील त्यांनी संघटनेच्या माध्यमातून केले. यशस्वी कार्यकर्ता आणि अस्सल 'भिलोरी' बोलीतील कवी ही दोन्ही बिरूदं सहजा कोणाच्या वाट्याला येत नाहीत. पण कॉ. वाहरूजींच्या ती आली आणि तळागाळातील आदिवासी बांधवांना माणसांत आणण्याचा त्यांचा अट्टहास सुरू झाला तो आजही सुरूच आहे. अशा ह्या कार्यकर्त्यांच्या साच्यातून बनलेल्या कवीला दीर्घायुष्य चिंतितो व पुढील कार्यास जय सेवा, आपकी जय!