आदिवासी समाज कृतीसमितीचा अधिष्ठाता - श्री. सीताराम रखमा जोशी

Tribal Mahavikas

'येथे अडलेल्या-नडलेल्यांना मोफत सल्ला मिळेल.' अशी पुणेरी स्टाईल'मधील पाटी. श्री. सीताराम जोशी, उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ ह्यांच्या कॅबीनच्या दारावर कधी लटकविण्याची गरजच पडली नाही. त्यांनी मात्र आज अखेरपर्यंत हजारो जनांना 'आदिवासी समाज कृती समिती'च्या माध्यमातून फुकटचा सल्ला दिला. त्याची गणती करणे अशक्य आहे. त्यांच्याकडे आजही सल्ला घेण्यासाठी लांबलांबून लोक येतच असतात. अशा जोशीसाहेबांचा जन्म शासकीय नोंदीनुसार दि. १ जून १९५३ रोजी मु. पो. गोहे, बु।। ता. आंबेगाव, जि. पुणे येथे झाला. दोन किमी अंतरावर असलेल्या शेजारच्या गावी प्रथम शाळा सुरू झाल्याने, त्या शाळेसाठी आलेल्या पाडळे नावाच्या मास्तरला घेऊन जाण्याचे काम साहेबांच्या चौथी इयत्ता शिकलेल्या चुलत्यांनी त्यांच्यावर सोपवले होते.ते कामही मोठ्या आवडीने चटपटीत जोशी करू लागले होते. अशातच त्यांची पहिलीची शाळा वर्गात न बसताच पूर्ण झाली. पुढे ते गावच्याच प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीला जाऊ लागले. 

गावातील एक शिक्षिकी शाळेतच त्यांनी कसेबसे थेट सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्याने त्यांना 'हुतात्मा बाबू गेणू विद्यालय, म्हाळुंगे-पडवळ' येथे जावे लागले. शाळेतच वसतिगृहाची सोय असल्याने ते तेथेच राहू लागले. घर पहिल्यांदाच सोडल्याने, त्यांना घरच्यांची आठवण येत असे. वसतिगृहात जेवणाचे हाल आणि घराचे अठराविश्व दारिद्य ह्यांचा जंगी सामना चालू असतानाच, काही दिवस त्यांना चटणी-भाकरीचा डबा घरून येत असे. पुढे तर काही दिवस हातानेच स्वयंपाक बनवून खाण्याची वेळही त्यांच्यावरच आली होती. अशातच ते कधी गावी गेले तर आई म्हणायची, "ह्य वक्ताला कह्याला आला?, कोंबडीही बस्तरवारीच 'खुडूक' झाली हाय. आता मी तुला काय देऊ?' पण शेवटी आईचीच माया ती. काहीबाही गाडग्या लोटक्यात शोधून ती साहेबांची बोळवण करायची. कसेबसे दिवस जात होते. 

एके दिवसी वसतिगृहातील सर्व मुलांना मुख्याध्यापक शिवराज पाटील की जे पुढे आमदार झाले, त्यांनी बोलविले. आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, का रे नुसते वसतिगृहात फुकटचे खाऊन झोपता का? सांगा बघू, की आठ मोठे?" त्यांच्या प्रश्नाचा रोख अनेकांना समजलाच नाही.त्याकाळी जुन्या अकरावीत आठ पैकी सहा विषयात पास असला तरी चालत असे. म्हणजे आजच्या 'बेस्ट ऑफ फाईव्ह'सारखे. त्यावेळी महादेवकोळी समाजाचे वसतिगृहात अकरा विद्यार्थी होते. त्या सर्वांनी आठ विषय घेतले होते. मुख्याध्यापक पाटील ह्यांनी सर्वांना दम दिल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की, केशव पंगाजी गेंगजे, दिगंबर घोडे आणि सीताराम जोशी ह्या तीन विद्यार्थ्यांनी त्या क्षणी दोन विषय गाळून इंग्रजी घेतले. खूप मेहनत घेऊन विशेष म्हणजे तिघेही चांगल्या मार्कांनी पास झाले. जोशी साहेब आजही म्हणतात, "त्यावेळी शिवराज पाटील सर भेटले नसते तर आज आपण कोठे असतो." १९७१-७२च्या काळात शिक्षकांची मोठी भरती झाली. हेडमास्तर पाटील ह्यांनी जर मुलांना बोलावून हा सल्ला दिला नसता तर, बीएड. करून कुठेतरी शिक्षण आणि मुख्याध्यापकापर्यंत पोहचता आले असते.

पुढील शिक्षण घेण्यासाठी श्री. जोशी ह्यांना मंचर येथील रयत क्षण संस्थेचे 'अण्णासाहेब आवटे, महाविद्याल', मंचर' येथे प्रवेश घ्यावा लागला. तेथे त्यांनी 'मराठी' हा विशेष पेपर घेऊन अभ्यास केला, आणि उत्तम गुणांनी पदवी मिळवली. त्यावेळी त्यांना शिकविण्यासाठी प्रा. वसंत घारगे आणि प्रा. संभाजी देसाई होते. बी.ए.ची पदवी मिळविल्यावर पुढे काय करायचे? हा प्रश्न सतावू लागला होता. शिक्षणाची आवड असूनही नेमकी जायचे कुठे हे समजेना. सीताराम जोशी ह्यांचे चुलत बंधू पुण्यातील 'ॲम्युनेशन' फॅक्टरीत नोकरीला होते. तेही जुनी अकरावी झालेले. त्यांनी जोशी साहेबांना पुण्याला आणले. सायकलवरून 'ह्युमॅनिटी बिल्डींग, पुणे विद्यापीठ (आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन)' येथे बारा-तेरा रूपये भरून एम. ए. ला प्रवेश घेतला, आणि म्हणू लागले. तू कसलीही चिंता करू नको. फुगेवाडीला माझ्याकडे राहा, व सायकलवरून ये-जा करीत जा. कसेबसे पुणे विद्यापीठातील मराठी विभागात जोशी ह्यांचे एम. ए. सुरू झाले. 

कवी अनिलांचे 'भम्नमूर्ती' हे खंड काव्य साहेबांच्या तोंडपाठ होते. ते पाहून त्यांचे वर्गमित्र डॉ. सीताराम निघुट अचंबित होऊन त्यांना सारखे कविता म्हणायला सांगायचे. पुणे विद्यापीठात जोशीसाहेब रूळतात कुठे नाहीतर घरीहून त्यांना लग्नाचे आमंत्रण आले. साहेबांचे कुटूंब एकत्र पद्धतीचे होते. पासष्ट माणसांच्या कुटूंबाचा तो खटला. त्यांच्या कुटुंबात लग्न हे 'रोटेशन’ पद्धतीने होत असे. साहेबांचे वडील शेवटच्या नंबरला असल्याने, ते अकरावीत शिकत असतानाच, एकदा त्यांचा नंबर आला होता. असा आलेला नंबर सहजा कोणी डावलत नसे. साहेब शिकत असल्याने मात्र त्यांनी वडिलांना बजावले. काही झाले तरी मला लग्न करता येणार नाही. मग ज्या बहिणीने मंचरला असताना वेळेचे भान ठेऊन वर्षभर डबे पुरवले होते, जिणे कधीच शाळेचे तोंडही बघितले नव्हते, त्या धाकट्या बहिणीचे लग्न केले गेले .

जोशीसाहेबांचे एम. ए.चे शिक्षण चालू असताना तत्कालीन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. देवदत्त दाभोलकर हे होते. त्याचवर्षी म्हणजे १९७६ साली दुसरी 'टर्न' आली, आता काही जोशीसाहेबांना कारण सांगणे कठीण होते. त्यांना छोट्या बालबच्चांपासून ते शहात्तर वर्षाच्या आजीपर्यंत लग्नाचा आग्रह करत होते. मात्र जोशीसाहेबांचे शिक्षण जास्त झाल्याने मुलगी कोठे मिळते की नाही, अशी अडचण पुढे आली. ती अडचण सोडविण्यासाठी आताचे 'साखर संकुल'चे रिजनल डायरेक्टर श्री. डी. आर. घोडे धाऊन आले. त्यांनी ताबडतोब तसा निरोप दिला, आणिभांबुर्क्यात (शिवाजीनगरला) मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. १६ फेब्रुवारी १९७६ ला लग्नाचें मुहूर्त काढून जुन्नर येथे पासंडेच्या गवारवाडीत लग्नसोहळा पार पडला. देण्याघेण्याची काही अट नव्हती. 

जोशीसाहेबांची फक्त एकच अट होती. ती म्हणजे 'लग्नात माझे कमीत कमी चार फोटो काढायचे.' ती अट पूर्ण करण्यासाठी श्री. घोडे ह्यांना जुन्नरहून एक फोटोग्राफर पायपीट करीत घेऊन जावे लागले होते. श्री. जोशी एम.ए.च्या शेवटच्या वर्षाला शिकत असल्याने पत्नी माहेरी व ते वसतिगृहात राहत होते. साहेबांच्या पत्नी त्या काळी आपटे प्रशालेतून जुनी अकरावी झाल्या होत्या. त्यांच्या सासूबाई ह्या निरक्षर असल्या तरी त्यांनी सुपे साहेबांना भेटून त्यांच्या पत्नीला नोकरीला लावून दिले. नोकरी लागल्यावर साहेबांना नाईलाजास्तव पत्नीच्या पगारावर अवलंबून राहावे लागत होते. पुढे तर १९७६-७७ ह्या काळातील शिक्षणाचा पूर्ण खर्च त्यांच्या पत्नीनेच केला होता. थोड्याच दिवसात त्यांनी नोकरीसाठी नावनोंदणी केली. जानेवारी १९७७ साली 'आगाखान पॅलेस'समोर 'सी.डी.ए. 'येथे ऑडिटरची नोकरी मिळाली. त्यानंतर दोघांच्या पगारातून कसाबसा वडगावशेरी येथे त्यांनी संसार थाटला.

श्री. सीताराम जोशी ह्यांनी एम.ए.ची पदवी चांगल्या मार्कांनी पास केली. त्यावेळी स्पर्धा परीक्षाही दिली होती. डॉ. गोविंद गारे साहेबांची पहिलीच भेट श्री. दिगंबर घोडे ह्यांनी घालून दिली. ते गोखले इन्स्टिट्यूट येथे काम करीत होते. पुढे १९८५-८६ पासून डॉ. गारे परदेशातून शिक्षण पूर्ण करून आल्यावर त्यांनी 'आदिवासी प्रशिक्षण संस्था, राणीचाबाग, पुणे येथील संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सतत येणेजाणे सुरू झाले. आगाखानची नोकरी १९७७-८० पर्यंत केली. दरम्यानच्या काळात श्री. सीताराम जोशी ह्यांनी अतिशय मेहनतीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून "महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा वर्ग-१' ह्या पदावर लोकसेवा आयोगामार्फत मुंबई येथे प्रशिक्षण पूर्ण केले. 

सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पहिली नेमणूक वरळी, दूध डेअरी येथे उपनियंत्रक दुग्धलेखा पदावर झाली. ह्या एकामागोमाग झटपड घडणाऱ्या घटना दिसत असल्या, तरी साहेबांना त्यामागे खूप कष्ट उपसावे लागले होते. ह्या काळात साहेबांच्या कुटुंबाची संख्या तीन झाली होती. सासरे पुण्यात असल्याने मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी अतिशय उत्तमपणे बजावली होती. डेअरीची नोकरी दोन वर्ष मुंबईतच केल्यावर तेथेच स्थाईक व्हायचे की, पुण्याला बदली करून घ्यायची. असा विचार चालू असतानाच १९८३ ला पुण्यात शासकीय दूध योजना वाकडेवाडी येथे 'लेखाधिकारी वर्ग-१' पदावर ते रूजू झाले. काही दिवस ते रूळतात कोठे नाही तर त्यांच्यावर एक मोठा आघात झाला. ह्या पदासाठी आवश्यक असणारी खात्यामार्फत घेण्यात येणारी लोकसेवा आयोगाची परीक्षा साहेब उत्तीर्ण होऊ न शकल्याने आक्टोबर १९८४ला त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. त्यांनी ताबडतोब उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. 

त्यामुळे शासनाने त्यांची फलोत्पादन संचालनालय, पुणे येथे लेखाधिकारी म्हणून बदली केली. उच्च न्यायालयाने सेवा समाप्तीचा आदेश देताना एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली की, 'श्री. जोशी ह्यांना परीक्षेची एक संधी देण्यात येईल.' मात्र दुर्दैवाने ती संधीही त्यांच्या हातून हुकल्याने डिसेंबर १९८५ला कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन श्री. सीताराम जोशी ह्यांना सेवेतून काढून टाकल्याने त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेळी काय करावे, ते कळत नव्हते. त्यावेळी काही ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार श्री. जोशी ह्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविले. खादीचा नेहरू-पायजमा आणि काखेत शबनम घेऊन आदिवासी बांधवांची पडली, रखडलेली कामे करायला त्यांनी सुरूवात केली होती. काही दिवस गेल्यानंतर ही बातमी डॉ. गोविंद गारे ह्यांच्या कानावर गेली. त्यांनी ताबडतोब कार्यालयातील सेवकाला जोशी ह्यांच्या घरी जाण्यास सांगितले, आणि ताबडतोब भेटायला या. असा निरोप दिला. 

भेटल्यावर तुला नोकरी करायची का? असा प्रश्न डॉ. गारे ह्यांनी केला. त्यांनी होकारार्थी मान हलवल्यानंतर डॉ. गारे ह्यांचे मित्र ए. डी. वसावे हे भू-विकास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्याकडे जोशी ह्यांना पाठवून कोल्हापूर येथे त्यांना नोकरी दिली. ती फक्त पाच वर्षाचीच नोकरी होती. ती संपल्यानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह समोर होतेच. एकदा ते सुटीच्या दिवशी पत्नीबरोबर पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ फेरफटका मारण्यासाठी आले होते. ते सहजतेने मुख्य इमारतीकडे बघून म्हणाले, "आता नोकरी करेन तर पुणे विद्यापीठातच.” नोकऱ्या आधी सुटल्याने ह्यांना नोकरी मिळते का नाही? ह्या त्यांच्या पत्नी ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्या म्हणाला, "का हो, दिवस अशी फरपट चालू राहणार, आपल्याला सुख का?" त्यावर साहेबांना काय उत्तर द्यायचे तेच कळेना. थोड्या दिवसांनी मात्र साहेब म्हणाले होते तसेच घडले.

पुणे विद्यापीठाची व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची जाहिरात आली. त्यांनी त्वरीत दोन्हीही ठिकाणी अर्ज केला. आणि काय आश्चर्य! दोन्हीही ठिकाणी ते पास झाले. त्यानंतर त्यांना लगेच आमंत्रण आले. अशा वेळी योग्य निर्णय घेण्याची ती वेळ होती. विचारपूर्वक ते दि. २ एप्रिल १९९० रोजी पुणे विद्यापीठात रूजू झाले, ते वादातितच, तो पुणे विद्यापीठातील नोकरीचा पहिला दिवस जोशी साहेबांचा अविस्मरणीयच म्हणावा लागेल. त्यांचा पूर्वीचा दहा वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन पुणे विद्यापीठात त्यांना सहायक उपकुलसचिव, वित्त ह्या विभागात नियुक्त केले गेले खरे. मात्र तसे पदच नसल्याने अनेक संघटनांनी हरकत घेतली. निषेध, मोर्चे काढून पत्रकेही वाटली. त्यावेळचे वित्त लेखाधिकारी, श्री. जोगळेकरांनी त्यांच्या दालनात बोलावून कागदपत्रे दाखवा, असा तगादा लावला. अशा वेळी जोशी साहेबांनी आपला पावित्र बदलत आणि कणखर भूमिका घेत सांगितले, “मी सकाळी नोकरीस हजर झाल्यावर प्रशासनाला कागदपत्रे दिली आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. असे उत्तर देऊन वित्त लेखाधिकाऱ्याची पहिल्या भेटीतच 'विकेट' घेतली. तेथूनच पुढे खऱ्या अर्थाने विद्यापीठातील सेवकांचा आणि जोशी ह्यांचा संघर्ष सुरू झाला. बरेच कर्मचारी जोशी ह्यांना बघण्यासाठी येत असत. ते अशा आर्विभावात बघत की जणू काही जोशी म्हणजे, एखादा गुन्हेगार आहे. मात्र अशा सेवकांना जाग्यावर आणायला जोशी साहेबांना अजिबात वेळ लागला नाही.

जाणीवपूर्वक कामचुकारपणा करणाऱ्या सेवकांना सरळ करण्याचे धाडस ह्याआधी कोणीही केले नव्हते. त्या कार्यालयात जोशी साहेब आले आणि संपूर्ण कार्यालयाचा नूरच पालटून गेला. पुढे मात्र कुरबुरी सुरू झाल्या. त्यामुळे सेवकांशी सरळ बोलावे की नाही, असे वातावरण मुद्दामच बनविले गेले. पुढे तर अनेकांशी विविध कारणांवरून वरच्यावर भांडणे होऊ लागली. जोशीसाहेब वित्त विभागातील साहेबांपासून कुणालाही जुमानत नाहीत, म्हटल्यावर त्यांच्यावर नको त्या चाली खेळण्यात आल्या. शेवटचे स्त्रियांचे शस्त्र बाहेर काढण्यात आले, आणि विभागातील सर्व बायका थेट कुलगुरू महोदयांकडे तक्रारकर्त्या झाल्या. तब्बल १५ महिलांनी ही लेखी तक्रार केली आहे म्हटल्यावर तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकरांना हा काय मामला आहे.' असे वाटले म्हणून त्यांनी प्रत्यक्षात तक्रारकर्त्या महिलांना बोलावून विचारपूस केली. तेव्हा त्या म्हणाल्या की " साहेब कितीतरी दिवसांपासून तुम्ही आमच्याकडे वाईट नजरेने बघतात. ते नेहमीच आम्हाला अपशब्द वापरतात.' हे ऐकूण घेतल्यावर शांत डोक्याने कुलगुरूंनी श्री. जोशी ह्यांची केस तपासली. ते हजर होऊन अवघे दीड-दोन महिने झाले असतील-नसतील, बायका तर म्हणत होत्या, खूप दिवसांपासून ते वाईट नजरेने बघतात. येथे काहीतरी, कोणीतरी वेगळीच चाल खेळत नाही मा. ह्याचा चाणाक्ष कुलगुरूंना संशय आला. त्यांनी तो विषय तडीस लावला, आणि गुन्हेगाराला योग्य ती समज दिली गेली. १९९१-९२ चा तो काळ होता. डॉ. सुधाकर पांडे हे इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख असताना, केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्यापीठ पातळीवर प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्याबाबत केंद्राने आदेश दिले होते. 

त्यांच्या आदेशानुसार डॉ. गोवारीकरांच्यानंतरचे कुलगुरू डॉ. श्रीधर गुप्ते व डॉ. पांडे ह्यांनी एक योजना तयार करून ती विद्यापरिषदेतून मंजूर करून घेतली, व त्यानुसार पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राची स्थापना करण्यात आली. जून १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र विद्यापीठात सुरू झाले. ह्या केंद्रास एक सहायक कुलसचिव, दोन क्लर्क, दोन शिपाई असा कर्मचारी वर्ग मंजूर केला गेला. गंमत अशी की, चांगल्याच्या वाईटावर नेहमीच कुणीतरी असते. शिक्षा म्हणून जोशी साहेबांना कोणत्याही देशाची तोंड ओळख नसताना 'परदेशी विद्यार्थी कल्याण केंद्रा'चे सहायक कुलसचिव नेमले गेले. त्यावर साहेबांना विचारले गेले असता, म्हणतात, “भाग्य माझे मोठे. कसलीही पार्श्वभूमी नसताना ह्या केंद्रातील प्रत्येक घटकाचा जवळून मला परिचय झाला. विविध देशांतील विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी आपुलकीने वागण्याचे समाधान मिळाले. हे काम करताना आपण आपल्य देशाचे प्रतिनिधीत्व करीत आहे, अशी भावना सतत मनात ठेऊन अत्यंत निष्ठेने १९९३-९४ ही दोन वर्षे मी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कल्याण केंद्राचा कार्यभार सांभाळला.

१९९४ ला श्री. सीताराम जोशी ह्यांना मोठ्या मुश्कीलीने पदोन्नती दिली गेली. त्यांची नेमणूक आरक्षण विभागाचे उपकुलसचिव म्हणून झाली. तसा त्यांना हा विभागही नवखाच होता. आरखण धोरण, बिंदू नामावली ह्यांतील बारकावे त्यांना अजिबात माहीत नव्हते. मात्र प्रत्यक्ष काम करताना विविध संस्थांतील गचाळ आणि ढोंगी कारभार जवळून बघायला मिळाला. शासनाची विविध धोरणे आणि निर्णयांचा बारकाव्याने अभ्यास करता आला. अनेक मस्तवाल आणि मुजोर संस्था आरक्षण धोरणाची कशी पायमल्ली करत होते ते पाहता आले. चांगल्या वाईट संस्थांचा जवळून परिचय होत गेला. अशा ह्या विभागात काम करताना नगर, नाशिक, पुणे येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या, शिक्षक, कर्मचारी ह्यांच्या असंख्य तक्रारी येत राहिल्या. ह्या कामी अतिशय सचोटीने नियमांचा आधार घेऊन मागासवर्गीयांच्या तक्रारी निवारण्यात जोशी साहेबांना धन्यता वाटत असे. म्हणूनच शासकीय आणि निमशासकीय नोकरदारांना त्यांच्या रास्त भूमिकेला न्याय देण्याची जबाबदारी त्यांना सहजतेने पार पाडता आली. आरक्षणामध्ये अशी विविध कामे करताना नको तेवढे अनुभव पाठीशी जमा होत गेले. एकदा तर विद्यापीठात क्लर्क आणि शिपाईपदाच्या जागा सुटल्या होत्या. 

त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कॉल पोस्टात टाकले गेले. मात्र काय जादू झाली, एस. सी. कम्युनिटीचे कॉल सोडून बाकी सर्व कॉल संबंधितांना मिळाले आणि मग काय, जोशी साहेबांवर नको त्या मंडळींनी तोंडसुख घेतले, असे बन्याचदा होत असे. एकदा तर भयंकरच किस्सा घडला. नाशिक जिल्ह्यातील एका संस्थेत प्रा. बागडाने पूर्ण वेळ नोकरीला लागले. एक वर्ष झाले तरी त्यांना पगार देण्यात टाळाटाळ केली जात होती. एके दिवशी प्रा. बागडांनी लेखी तक्रार अर्जही जोशीसाहेबांकडे केला होता. दोन चार दिवस जात नाही तोच संबंधित संस्थेचे सेक्रेटरी जोशीसाहेबांच्या कार्यालयात आले आणि सांगू लागले. प्रा. बागडाने हे मागासवर्गीय होते. संबंधित संस्थेचे सेक्रेटरी सांगत होते, "मागासवर्गीय लोकांना काय कुठेही नोकऱ्या मिळतात. ते सरकारचे जावई असून सध्या त्यांचीच चलती आहे. साहेब, प्रा. बागडाने ह्यांना दुसरीकडे नोकरी मिळाली. त्यांनी आमची पूर्व परवानगी न घेता राजीनामा दिला. वगैरे वगैरे...' सेक्रेटरी महाशयांना जोशी म्हणजे ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त कोणी असतात हे माहितच नसल्याने त्यांनी हा मागासवर्गीयांचा बोभाटा केल्याने, जोशीसाहेबांनी अंदाज घेऊन त्या सेक्रेटरी महाशयांना वठणीवर आणण्यासाठी चक्क पोलिसांना फोन करून धमकीच दिली. हे काय प्रकरण आहे ते समजण्याच्या आत सेक्रेटरीसाहेब हाता-पाया पडू लागले आणि चौथ्या दिवशी प्रा. बागडाने ह्यांना चेक घेऊन त्यांच्यासह साहेबांच्या कार्यालयात आले. तो चेक जोशीसाहेबांच्या हस्ते प्रा. बागडाने ह्यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. 

दि. २६ सप्टेंबर १९८६ रोजीचा तो दिवस अजूनही स्मरणात राहील असाच आहे. त्या दिवशी 'बोगस अखिल कोळी परिषद, मुंबई व आदिवासी कोळी परिषद, पुणे' ह्या स्वार्थी, मतलबी लोकांनी गरीब बिचाऱ्या आदिवासींच्या सवलती लुबाडणाऱ्या विविध संघटनांनी एक मोर्चा शनिवारवाड्यापासून काढून तो आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे डॉ. गोविंद गारे हे संचालक असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 'खोटे बोल पण रेटून बोल' अशी प्रवृत्ती असणाऱ्या माणसांचा आवाज बंद करण्यासाठी, त्यांना वठणीवर आणण्यासाठी १९८६ रोजी 'आदिवासी समाज कृती समिती'ची स्थापना करण्यात आली. 

ह्या कालावधीत श्री. सीताराम जोशी कोठेही नोकरीस नसल्याने पुणे शहर आदिवासी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रतापराव देशमुख ह्यांनी कृती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दापोडी येथील बैठकीत जोशी ह्यांच्याकडे सोपविली. ह्या संस्थेला पुणे येथून सुरूवात झाल्याने खोट्या बोगस आदिवासींची गळचेपी करण्यासाठी ही संस्था अग्रेसर राहिली. तिने प्राधन्याने तसाच विचार केला. ह्या कामासाठी विविध शासकीय पातळीवर मेळावे आणि निवेदन घेऊन लोकजागृती करण्यासाठी कृती कार्यक्रम आखला आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून बोगसांना कंठस्नान घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ह्या काळातच सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांत प्रमाणापेक्षा जास्त खोट्यांची घुसखोरी चालू झाली होती. ती घुसखोरी एवढ्यावरच मर्यादित राहिली नव्हती, तर गृहनिर्माण मंडळाने राखीव ठेवलेली घरे बळकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. खोटी जातीची प्रमाणपत्रे त्यावेळचे तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पन्नास-साठ हजारात मॅनेज करून मिळवली जात होती. हे कृती समितीच्या लक्षात आल्यावर ताबडतोब त्यांनी जात पडताळणीसाठी अग्रह धरला. त्यातून काही प्रमाणात का होईना ही घुसखोरी थांबायला मदत झाली. 

जात पडताळणीच्या तपासणीबरोबरच कृती समितीने अनेक कृती कार्यक्रम घेण्याचा विक्रम केला. शालेय पुस्तकांचे, वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दहावीच्या वर्गाला गणित-विज्ञान आणि इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांसाठी चर्चासत्रे, विद्यार्थी करिअर गाईडन्स, कातकरी समाजाचे संघटन, शासकीय योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी अरूण कमाजी मरभळ ह्यांचे प्रकरण त्यांना अटक करेपर्यंत शासकीय यंत्रणावरती दबाव आणून कृती समितीने हे प्रकरण तडीस नेले. त्याचबरोबर घोडेगाव येथील प्रकल्प कार्यालय, पुणे येथे स्थलांतर करण्याचा प्रयत्न होत असताना कृती समिती त्यावेळी रस्त्यावर उतरली नसती तर कदाचित ते कार्यालय पुण्यातच आले असते. मात्र कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध संघटनांनी सर्व रस्ते अडवून शासनाला आपवित्रा बदलण्यास भाग पाडले. 

कृती समितीचा सुरूवातीचा इतिहास बघितला तर बोपोडी- दापोडी येथे छोटेखाणी भाड्याच्या खोलीत आपला छोटासा संसार थाटून सुरू झाली. अनेक उन्हाळे-पावसाळे पचवल्यानंतर आज सांगवी येथे चार गुंठे जागा घेऊन दोन हजार स्क्वेअरफूट बांधकाम, धडपड्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेऊन उभे केले आहे. ह्याचे मोठे श्रेय आपोआपच सीताराम ह्यांच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. आज ह्या कार्यालयाचा उपयोग समाजबांधव विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी करू लागले आहेत. हे कार्यालय कोणताही शासकीय निधी न घेता केवळ जनवर्गणीतून उभे राहिले आहे. हे ऐकल्यानंतर भल्याभल्यांना आश्चर्य नाही. 

शासनाने 'आदिवासी मुलींची हवाई सुंदरी योजना' सुरू केली. मात्र शासनाला आदिवासी मुलींचा शोध घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात काही अडचणी आल्या. त्यावेळी कृती समितीने पुढाकार घेऊन सर्वसुत्रे आपल्या ताब्यात घेतली. सर्व इच्छुकांचे अर्ज वेळेत कसे उपलब्ध होतील ह्याकडे जातीनिशी लक्ष दिले. ते प्रशिक्षण यशस्वी करूनही दाखविले. एकदा तर अशाच आदिवासी बांधवांच्या काही प्रश्नांवर चर्चा सुरू असताना आपल्याला अॅम्ब्युलन्स असायला हवी, असा कार्यकर्त्यांनी सूर लावल्यावर जोशीसाहेबांनी पुन्हा लोकांसमोर हात पसरून लोकवर्गणी जमा करून अॅम्ब्युलन्स खरेदी केली. तिचे उद्घाटन भीमाशंकर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याठिकाणी अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निणय घेण्यात आला. म्हणजे आदिवासी समाजासाठी संघटन, प्रबोधन, शिक्षण आदी क्षेत्रात सातत्याने धडपडणाऱ्या आदिवासी कार्यकर्त्याला 'आदिवासी भूषण' पुरस्कार देऊन गौरविण्याचे ठरले. तेव्हापासून कृती समिती आणि तिचे सर्व पदाधिकारी हा पुरस्कार नित्य देत आले आहेत. पहिला पुरस्कार आदिवासी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. गोविंद गारे ह्यांच्यापासून सुरू झाला. तो आज कवी वाहरू सोनवणे ह्यांच्यापर्यंत. 

आदिवासी समाज कृती समितीने कितीतरी आव्हानात्मक कामे केली. पैकी १९९७ साली समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खेड तालुक्यातील १८० कातकरी कुटुंबांची पाहणी करून जो अहवाल तत्कालीन मनपा आयुक्त मा. श्री. अरूण भाटिया ह्यांना सादर केला, त्यावर ताबडतोब निर्णय घेत अरूण भाटिया ह्यांनी त्या सर्व कुटुंबांना भारताचे नागरीक असल्याचे सिद्ध केले. त्यांना रेशनकार्डही देऊ केली. त्याचवेळी भोर येथील कातकऱ्यांच्या पाहणीचा प्रयत्नही जोशीसाहेब आणि आप्पा शिंगाडे ह्यांच्या चमुने अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे सगळीकडे बोलले जात होते. अशा साहेबांवर कित्येकदा अनेकांनी टीकेची झोड उठवली, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि ते पुढे आपल्या योग्य मार्गांने जातच राहिले. समाजासाठी काम करताना अनेकदा त्यांना धमक्याही आल्या. हात-पाय तोडण्याची भाषाही केली गेली. 

मात्र जातिवंत कार्यकर्ता असल्या धमक्यांना भीक घालत नाही. हे अनेकांच्या लक्षात आल्यावर काहींनी तर थेट रक्कम देऊ केली. नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर अशा बऱ्याच ठिकाणाहून त्यांना 'लालसे'ची आश्वासनाची निमंत्रणे आली. मंत्र्यासंत्र्यांनी फोनवर बातचित केली. मात्र ह्या सर्वांना 'कृती समितीयचे हत्यार दाखवत साहेबांनी सर्व बोगसांना चितपट केले. त्यानंतर 'कृती समितीची जी घोडदौड सुरू राहिली, ती आज अखेरपर्यंत. अशा ह्या कर्तव्यदक्ष सीताराम जोशींचा श्री.प्रकाश घोडके ह्यांनी १९९९ चा 'बंधुता पुरस्कार' देऊन उचित सन्मान केला. त्याचबरोबर धनकवडी येथून दि. २४ डिसेंबर २००७ रोजी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव आणि फुले-शाहू- आंबेडकर विचारसरणीचे अभ्यासक ज्येष्ठ नेते मा. प. मंगुडकर ह्यांच्या हस्ते 'लोकजागर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा धडपड्या कार्यकर्त्याला, समाजाची उन्नती व्हावी ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सीताराम जोशी ह्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून कोटी कोटी शुभेच्छा!...