सूर्य आणि चंद्र हे ‘देवाचे दोन डोळे' आहेत, असे वारली समजतात. काही भगत त्यांना रामलक्ष्मण म्हणूनही ओळखतात. 'प्रकट होणारा' सूर्य हा एकच देव आहे अशी त्यांची भावना आहे. एक दिवसही असा जात नाही की ज्या दिवशी सूर्य उगवत नाही. पाऊस हा सुद्धा देव असून तो धान्य पिकविण्यास मदत करतो म्हणून त्यास पावसदेव असे संबोधतात. 'माणसाचे दोन गोष्टीवर नियंत्रण नसते. एक म्हणजे पाऊस व दुसरा मृत्यू'. मानवी जीवनाला सर्वांत मोठी देणगी ही पावसाची आहे. ते पावसाला परमेसर ( परमेश्वर ) म्हणून संबोधतात. त्यांच्या मृत्यू म्हणून प्रसंगाच्या गीतात पाऊसदेवाला वगळलेले असते कारण तो अमर असतो अशी त्यांची भावना आहे.
वारा, ढग, वीज, समुद्र, वादळ ह्या नैसर्गिक घटना त्यांना दैवी वाटतात. भूमी ( धरती ), गाय (गावली) आणि धान्य ( कणसरी) ह्या तीन देवता आहेत. ह्या तीन नारी देवतांत स्त्रीचा (अस्तरी) समावेश केला जातो व ह्या चौघीजणींतच कलीयुगातील सत् म्हणजे खरी शक्ती आहे, असे मानले जाते. जोपर्यंत धान्यासंबंधीचा विधी केला जात नाही तोपर्यंत नवीन धान्य घरात आणले जात नाही. धान्याचा कधीही पाय लावून अनादर केला जात नाही. असा एकही विधी नाही की ज्यात भाताचा समावेश नसतो. अन्नाचा प्रत्येक कण ही धन-संपत्ती आहे. धान्यातून त्यांना अन्न मिळते व जीवन हे अन्नावर अवलंबून असते. वारल्यांना धान्याबद्दल आदर असून ते धान्याला देवता म्हणून मानतात त्यांना अन्न हे जीवन आहे.
गाईबद्दलही त्यांना फार आदर असतो. जर कुणी मुद्दाम किंवा अनावधानाने गाईची हत्या केली तर त्याने जीवनात सर्वांत मोठे पाप केले असे समजले जाते. अशा माणसास जातीबाहेर काढले जाते. त्याला जातीत जर पुन्हा घ्यावयाचे असेल तर गावातील काही वजनदार माणसांच्या उपस्थितीत शुद्धीकरणाचा विधी करावा लागतो. ह्यावेळी त्यास गाईचे थोडेसे शेण गोमूत्रातून प्राशन करावे लागते. ह्या शुद्धीकरणाच्या विधीला 'गावली' म्हणजेच गाईचे नाव दिले आहे. त्याद्वारे अशुद्ध माणूस शुद्ध होऊ शकतो. त्यांच्या दंतकथेनुसार देव इसर हा ज्यावेळी गाईच्या मृत्यूस अप्रत्यक्षपणे कारणीभूत झाला तेव्हा तोही ह्या शुद्धीकरणाच्या विधीपासून सुटू शकला नाही.
वारली हा जमीन कसणारा असल्यामुळे त्याला धरती मातेबद्दल आदर असणे स्वाभाविक आहे. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले अन्न व वनस्पती धरतीमातेतूच निर्माण होतात. भगत आपल्या अंगात शक्ती यावी म्हणून सूर्य देवास प्रथम नमस्कार करतात त्यानंतर ते वाकून धरतीमातेला स्पर्श करतात.