वारली दंतकथा आणि लोककथा ह्या जमातीच्या देवदेवतांशी संबधित असतात. वेगवेगळ्या देवदेवता आणि आत्मे ह्यांचे जन्म, शक्ती आणि कार्य ह्यांच्याशी ह्या लोककथा निगडीत असतात. इतकेच नाही तर ह्या लोककथेत चालीरीती व लहानसहान विधी पण अंतर्भूत असतात. ह्या संबंधीचे संदर्भ मागील प्रकरणात योग्य जागी आले आहेत. काही दंतकथेमधले स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे. विशेषत: ह्या जमातीत ज्या प्रचलित कल्पना आहेत व विशेषत: धर्माविषयी ज्या कल्पना आहेत त्या ह्या स्पष्टीकरणात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. आधीच्या प्रकरणात ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्या येथे दिल्या आहेत. ह्या गोष्टी कमीअधिक स्वतंत्र स्वरूपाच्या आहेत
वारल्यांच्या दंतकथेत आणि धार्मिक गीतातील मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेला हिंदू दंतकथेचा प्रभाव. ह्या जमातीला काही हिंदू देवांचा परिचय असावा. हिंदू दंतकथेतील पंडूच्या मृत्यूसारख्या काही कल्पना ढोबळ स्वरूपात ह्या जमातीच्या गाण्यातही मांडण्यात आल्या आहेत. हिंदू जातीशी निकटचा संबंध आल्यामुळे वारंल्यांनी ह्या दंतकथा त्यांच्याकडून शिकल्या असाव्यात. एखादा हुशार वारली ह्या कथेमधील मध्यवर्ती कल्पना उचलून घेतो व त्याच्या सोयीप्रमाणे ती कल्पना व कथांना स्थानिक परिस्थितीची जोड देऊन तो वारल्याला अभिप्रेत असलेल्या आदर्शाचे वातावरण निर्माण करतो. त्यामुळेच ह्या दंतकथांत काही वेळा विपर्यास दिसून येतो. वारली श्रोते अत्यंत शांत चित्ताने गोष्ट ऐकतात. कारण त्यांची ह्या गोष्टीवर अत्यंत श्रद्धा असते. ते गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीला एखादा प्रसंग का घडला म्हणून कधीच विचारत नाहीत. वारल्यांवर हिंदू दंतकथेचा प्रभाव पडला आहे. रामायण ह्या हिंदूंच्या अत्यंत लोकप्रिय महाकाव्याचे वारली कसे वर्णन करतात. हे खालील उदाहरणांवरून दिसून येईल.
'एक जानकी (सीता) होती. तिला लग्नात जिंकून घ्यावयाची होती. अनेक देशाचे राजे तेथे आले परंतु कोणालाही सीता जिंकता आली नाही. शेवटी रामलक्ष्मण तेथे आले. रामालाही सीता जिंकता आली नाही परंतु लक्ष्मण मात्र त्यात यशस्वी झाला. आता सीता लक्ष्मणाची झाली. मोठा भाऊ अविवाहित असताना लहान भाऊ लग्न कसे करू शकेल ? लक्ष्मणाने फार आग्रह केल्यामुळे रामाने तिच्याशी विवाह करण्यास संमती दिली.
'राम आणि सीता एकत्र राहू लागले व त्यांना मुलगा झाला. लक्ष्मण व सीता ह्यांचे भांडण झाले व त्याने रामाला सांगितले की तू सीतेला सोड. रामाने तसे केले. सीता अबला झाली व तिच्या मुलाबरोबर ती पृथ्वीवर फिरू लागली. फिरत असताना ती सात समुद्रानजीक आली. सकोबा व इटोबा हे दोन ऋषी समुद्रकिनाऱ्यावर रहात होते. त्यांनी जेव्हा एक स्त्री मूल हातात घेऊन आपल्याकडे येत असलेली पाहिली तेव्हा त्यांना फार आनंद झाला. प्रत्येकाला ही स्त्री आपली होईल असे वाटत होते. तेथे पोहोचल्यावर सीतेने ती अबला कशी झाली ह्याचे कथन केले. त्या दोघांनीही तिचा मुलगी म्हणून स्वीकार करून तिचे व तिच्या मुलाचे रक्षण करण्याचे वचन दिले. एके दिवशी सीता पाणी आणण्यासाठी बाहेर जात होती. त्यावेळी तिने सकोबाला सांगितले की माझे मूल झोळीत झोपले आहे. त्याच्याकडे पाहा. झोळी हालवत असताना सकोवाला झोप लागली. ज्यावेळी त्याला जाग आली तेव्हा पाळण्यात मूल नाही हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. ह्या आकस्मिक घटनेमुळे ते दोघेही पावरले. त्या दोघांनाही असे वाटले की सीतेला आपले मूल हरविले आहे हे जर समजले तर ती अतिशय दुःखी होईल. सकोबाने समुद्राच्या पाण्यात बुडी मारली व मूल समुद्रात आहे का त्याचा शोध सुरू केला. परंतु हरवलेले मूल समुद्रात नव्हते. समुद्राच्या तळातून मूल आणण्याऐवजी त्याने तिथला चिखल आणला. त्या चिखलापासून त्याने मूल बनविले व झोळीत ठेवले.'
'जेव्हा सीता पाण्याचे मडके घेऊन आली तेव्हा तिच्याबरोबर मूल होते. चिखलाचे मूल झोळीत का ठेवले आहे, हे जेव्हा तिने विचारले तेव्हा त्याने घडलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन केले. त्या दोन्ही मुलांचे संगोपन करण्यात येऊन त्यांची कुशन आणि अनकुशन अशी नावे ठेवण्यात आली. कुशन हे खऱ्या मुलाचे नाव होते.'
'अशा तऱ्हेने बरीच वर्षे गेली व त्यानंतर राम आणि रावणात युद्ध सुरू झाले. सीता रामाला विसरली नव्हती. तिने जेव्हा युद्धाविषयी ऐकले तेव्हा तिने आपल्या दोन मुलांसह युद्धक्षेत्राकडे धाव घेतली. त्यावेळी ते दोघेही तरुण व तडफदार होते. रामाकडे फार कमी सैन्य होते तर त्याचा शत्रू रावण मात्र फार शक्तिशाली होता. राम आणि लक्ष्मण दोघेही जखमी झाल्यामुळे त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. सीता युद्धक्षेत्रावर आली व तिच्या दोन मुलांसह तिने युद्ध जिंकले. तिने आपल्या पतीशी मुलांचा परिचय करून दिला व ते पाहून रामाला फार आनंद झाला. अशा तऱ्हेने कुटुंबातील सर्वजण एकत्रित आले.' हे वर्णन सीतेच्या स्वयंवराने सुरू होते परंतु सीतेला लक्ष्मण जिंकतो. लक्ष्मणाऐवजी रामाने तिच्याशी का विवाह केला ही वारल्यांच्या कल्पकतेची उत्पत्ती आहे. सीतेच्या दोन जुळ्या मुलांसंबंधीचे येथे जे वर्णन आहे ते मूळच्या वर्णनापेक्षा भिन्न आहे.