यमाचे दूत बंदिस्त (Yama's messenger confined)

Tribal Mahavikas

'एके ठिकाणी एक दयाळू स्वभावाचा कुणबी राहात होता. त्याच्या जवळ एक बैलजोडी होती. त्यांना तो फार दयाळूपणे वागवीत असे. बैलही आपल्या धन्यावर प्रेम करीत असत. एके दिवशी ह्या बैलांना समजले की यमाचा दूत आपल्या धन्याचा जीव घेण्यासाठी येणार आहे. आपल्या धन्याच्या मृत्यूची कल्पना ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले कारण त्यांना त्याच्याकडून जी वागणूक मिळत होती तशी

वागणूक दुसऱ्या धन्याकडून मिळाली नसती. सुदैवाने त्यांना वाचाशक्ती प्राप्त झाली व त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या धन्याला सांगितली. त्यांनी ह्या संकटातून मुक्त होण्याचा एक मार्ग त्याला सुचविला. बैल आपल्या धन्याला म्हणाले, 'लाकडाचा एक पाट आणा. त्या पाटावर देवीची मूर्ती कोरा. गावातील सर्व लोकांना ह्या देवीच्या उत्सवासाठी बोलवा. यमदूत उद्या तेथे येईल व अंगणात बसेल. तो त्यावेळी कुणासही दिसणार नाही. तो तुझा जीव घेण्याच्या संधीची वाट पाहात असेल. ह्या देवीच्या मूर्तीची एका लाकडी पेटीत प्रतिष्ठापना कर. तेथे जमलेल्या सर्व लोकांना देवीचे दर्शन घेण्यास व तिला वंदन करण्यास आमंत्रण कर. जेव्हा सर्व लोक देवीला नमस्कार करतील तेव्हा अंगणात उभे राहून सांग, 'तू तेथे का बसला आहेस ? जसे इतरांना देवीचे दर्शन घेतले तसे तू का घेत नाहीस?' यमदूतांना वाटेल, 'हा मनुष्य आपल्याकडे पहात आहे, चला आपण देवीकडे जाऊ.' जेव्हा ते येऊन पेटीच्या आत डोकावू लागतील, तेव्हा लगेच पेटी बंद कर व बाहेरून तिला कुलूप लाव.

'धन्याने बैलाच्या सूचना तंतोतंत पाळल्या. यमदूतांना पेटीत कोंडण्यात आले त्यामुळे माणसाचे जीवन वाचू शकले.'

यम विचार करू लागला की त्याचे दूत परत का आले नाहीत. त्यांना कोणी तरी इजा केली असली पाहिजे. त्यांना कोणी बंदिस्त केले आहे ते त्याने जाणून घेण्याचे ठरविले. त्याने त्यासाठी एक कल्पना लढवली. त्याने विचार केला 'दारू सर्व गोष्टी उजेडात आणते.' त्याने दारू निर्माण केली, सर्वत्र दारूची दुकाने उघडण्यात आली आणि लोक वाजवीपेक्षा जास्त दारू पिऊ लागले.

ज्या शेतकऱ्याने यमदूताला कोंडून ठेवले होते तो दारूच्या दुकानात एका माणसाबरोबर भांडत होता. त्याला तो म्हणाला, 'मी यमदूतालाही कोंडून ठेवले आहे तुलाही मी सोडणार नाही.' तेथे जे यमदूत माणसाचे स्वरूप घेऊन फिरत होते त्यांना हे गुपित माहीत झाले. त्यांनी त्या शेतकऱ्याबरोबर मैत्री केली व त्याला भरपूर दारू प्यावयास दिली. त्यामुळे त्याला नशा चढली. हे दूत त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी जावयास निघाले. त्यांनी पेटीत कोंडून ठेवलेल्या यमदूताला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. शेतकरी दारूच्या नशेत असल्यामुळे त्याने पेटी उघडली. कोंडून ठेवलेले यमदूत त्वरित उडून गेले व त्या बिचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले.'