झाडांची पूजा (Worship of trees)

Tribal Mahavikas

झाडांची नियमितपणे पूजा केली जात नाही. परंतु बेल, पिंपळ व उंबर ही झाडे पवित्र मानतात ह्या झाडांचे लाकूड जळणासाठी कधीही वापरत नाहीत. बेल हे झाड कापत नाहीत. आदिवासींच्या एका धार्मिक गाण्यात असे सांगितले आहे की पृथ्वीवर जे पहिले दोन मानवप्राणी निर्माण झाले त्यांनी बेलाच्या झाडावर वस्ती केली. हिंदू शास्त्राप्रमाणे बेल वृक्षाचा संबंध शिव देवाशी आहे. हिंदू लोक जसे पिंपळ वृक्षाला पवित्र मानतात तसेच वारलीही मानतात. बरंभा हा आदिवासीचा आत्मा ह्या झाडांतच राहतो असे ते मानतात. उंबराच्या वृक्षाची एक फांदी लग्नाच्या विधीत आवश्यक असते. हे झाड इसर देवाचे आहे असे मानले जाते. धवलेरी लग्नात जी गीते गाते त्यात उंबरवृक्षाचा उल्लेख असतो. उंबरवृक्षाच्या शेजारी जर विहीर खोदली तर तिला पाणी लागते अशी त्यांची समजूत आहे. ह्या झाडाला फुले न येताच फळे लागतात. उंबर ह्या झाडाचे फूल कधीच दिसत नाही त्यामुळे ज्याला उंबराचे फूल पाहावयास मिळते तो अत्यंत नशीबवान आहे असे त्यांना वाटते. ते तुळशीलाही पवित्र मानतात. परंतु हिंदू लोक ज्याप्रमाणे देवाला तुळशी वाहतात तसे वारली करीत नाहीत. केवळ हिंदू तुळशीला मानतात म्हणूनच वारलीही त्यांचे अनुकरण करतात.