वारली लोक वाघोबा, वाघ्या अथवा वाघया ह्या वाघ देवाची पूजा करतात. प्रत्येक गावात वाघदेव असतो. हा देव लंबगोलाकार दगडाचा असून तो बहुधा एका झाडाखाली स्थापन केलेला असतो. वारल्यांना जर संधी मिळाली तर ते वाघाची शिकार करण्याचे सोडत नाहीत. वाघ ह्या प्राण्याची पूजा केली जात नाही. तर वाघदेवाची' पूजा केली जाते
वारल्यांना हे चांगल्या तऱ्हेने माहीत आहे की केवळ दगडामुळे त्यांना संरक्षण मिळत नाही. त्याशिवाय एखादी दुसरी शक्ती त्याला कारणीभूत असते. परंतु ही शक्ती नक्की कोणती हे त्यांना माहीत नाही. ते ज्या पद्धतीने वाघोबाची पूजा करतात त्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांच्या पूर्वजांनी त्यांना ही परंपरा घालून दिलेली आहे. वारल्यांच्या स्वभावामध्ये का व कसे हे विचारण्याची सवय नाही. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करणे हे ते आपले पवित्र कर्तव्य मानतात.
वाच्या 'हा वाघांचा राजा असून तो गुराख्यांचा देव असतो. तो वनात चरणाऱ्या गुरांचे संरक्षण करतो, असे समजतात. हा देव वाघाचे स्वरूप धारण करून सर्वत्र संचार करीत असतो, असे मानले जाते. वनात एखादी गाय जेव्हा विते तेव्हा हिंम्र श्वापदापासून तो तिचे रक्षण करतो. गुरांचे मालक जर त्यांच्या गाई अगर बैल जंगलात हरवले तर वाघ्याकडे अशी आळवणी करतात की तू परत आणून दे. ऋग्वेदातील पूशन हा जसा गुरांचा देव मानला जातो तसाच वाघोबा हा वारल्यांचा देव आहे. आपल्या गुरांचे वाघापासून संरक्षण व्हावे ह्यासाठी वाघांच्या राजाची आळवणी करणे, हाच त्यावर प्रभावी मार्ग आहे, असे मानतात. वाघाला ते वाघ ह्या नावाने हाक मारत नाहीत, तर खड्या किंवा चोबडा (रेडा) ह्या नावाने संबोधतात.
अश्विन वद्य द्वादशीच्या दिवशी किंवा चैत्र पौर्णिमेस वाघोबाची पूजा करतात. पहिल्या दिवसाला वाघबारस असे म्हणतात. देवासमोर दिवा लावून नारळ फोडतात व कोंबडे अर्पण करतात. वारली 'वाघबारस' हा शुभदिन म्हणून मानतात कारण तो वाघ्याचा दिवस असून त्यानंतर लगेचच दिवाळीचा सण येतो. भगत त्याच्या अंगात वारे आणून वाघ्याला जागृत करतात. भगताचे शिक्षण घेणाऱ्या लोकांच्या रवाळ ह्या सभेत ज्या शक्ती जागृत केल्या जातात त्यात वाघ्याचाही समावेश असतो. वाळ ही सभा सर्वसाधारणपणे वाघबारशीच्या आसपास भरविली जाते. इतर वन्यजमाती तसेच हिंदू धर्मातील कनिष्ठ वर्गातील लोकही वाघोबाला कोंबडे व नारळ अर्पण करतात.