नारी देवता हिमाय (The female deity Himaya)

Tribal Mahavikas


हिमाय किंवा हेमाय ही नारी देवता असून स्त्रियांनी तिची पूजा करावयाची असते. ह्या पूजेसाठी तसा कोणताच स्वतंत्र विधी सांगितलेला नाही. स्त्रियाही केवळ तिचीच पूजा करीत नाहीत. ज्यावेळी लग्नप्रसंगी सर्व देवांची पूजा केली जाते त्यावेळी हिमायची मूर्ती तेथे ठेवून तिचीही पूजा करतात. एखाद्या कुटुंबात ज्यावेळी देवाची पूजा केली जाते त्यावेळी कुटुंब प्रमुख व त्याची पत्नी उपवास करतात. स्त्री जो उपवास करते तो हिमायच्या सन्मानार्थ केला जातो असे मानतात.

काही वारली असे म्हणतात की हिमाय ही हिरव्याची बहीण आहे. तर काहींच्या मते ती स्वतंत्र देवता आहे. हिमायची मूर्ती वाघोळ किंवा गोरोचण ह्यांच्या रूपाने गाईच्या मुखातून आली आहे. गोरोचण हा पिवळ्या रंगाचा पदार्थ असून तो गाईच्या शरीरात अगदी अल्प प्रमाणात असतो. तो पदार्थ अत्यंत औषधी आहे असे मानले जाते. हिमायचा तसा एखाद्या घटनेशी संबंध जोडलेला नाही. दुर्गा व काली ह्यांच्या श्रेष्ठतेचे वर्णन करताना संस्कृत भाषेत जसा अंबा हा शब्द आहे, तसाच अर्थ हिमाय ह्या शब्दाचाही असावा. हिमाय हा शब्द द्रविड भाषेतील अम्मा म्हणजे माता ह्याच्याशीही संबंधित वाटतो. वारल्यांमधील स्त्रियांची नावे व विशेषतः हिरवा देवाच्या नारीची नावे 'आय' ह्या शब्दाने पूर्ण होतात. उदाहरणार्थ- हिमाय, गुणाय, सेंदराय, कुकुवाय, फुलाय वगैरे. वारल्यांच्या देवांची नावे 'बा' ह्या शब्दाने पूर्ण होतात. वाघोबा, हिरोबा हे शब्दही द्रविड भाषेशी मिळतेजुळते आहेत. कारण आप्पा ह्या शब्दाचा अर्थ कानडी भाषेत वडील असा होतो.

वारली देवांच्या मूर्ती ह्या बहुधा दगडावर किंवा लाकडाच्या मोठ्या फळीवर कोरलेल्या असतात. ह्याच्याविरुद्ध काही अनोख्या वस्तू दैवी मानल्या जातात. सोन्याची साखळी ही तशीच एक वस्तू आहे. डोंबऱ्या कुटुब तिला कुटुंब दैवत म्हणून मानते. ही साखळी चार किंवा पाच पिढ्यांच्या पूर्वी त्या कुटुंबातील एका खीला मिळाली. जंगलाशेजारील एका खेड्यात एक बाई भाताची कापणी करीत होती. त्यावेळी तिला कापलेले भात उचलता आले नाही. इतर लोक जेव्हा तेथे गेले तेव्हा त्यांना ही सोन्याची साखळी आढळली. तेव्हापासून ती साखळी त्या कुटुंबाचे दैवत म्हणून मानली जाऊ लागली. ही साखळी एका लाकडी डबीत भाताबरोबर ठेवलेली मला पहावयास मिळाली. ही साखळी ९ ते १० इंचाची असून तिच्या टोकांना गोल आकाराच्या दोन वळ्या आहेत. ही साखळी दिसण्यास सामान्य दिसते, तसेच ती सोन्याप्रमाणे चकाकतही नाही. ही साखळी ज्या माणसाकडे होती तो साखळी दाखविण्यास टाळत होता. मोठी मेहरबानी म्हणूनच त्याने मला ती साखळी दाखवली. तेथे जमलेले लोक मोठ्या अभिमानाने सांगत होते की अशी साखळी सोनाराला बनविता येणार नाही. दरवर्षी ही साखळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दुधाने धुतली जाते. लाकडी पेटीमधील जुने भात काढून टाकतात व त्यात नवीन भात भरतात. जर ही प्रथा चालू ठेवली नाही तर कुटुंबात आजार व इतर बाधा होतात.

वारल्यांची देवासंबंधीची कल्पना अस्पष्ट असून फार लवचिक आहे. कोणतीही एखादी अनोखी वस्तू जर त्यांना आढळली तर ते त्यांना गूढ वाटते व तिला ते लगेच दैवी स्वरूप देतात. डोंबऱ्या कुटुंब अनेक पिढ्यांपासून ही साखळी आपल्या कुटुंबाचा मोठा वारसा मानते व तिची पूजा करतो. कोणताही वारली ह्या साखळीकडे केवळ साखळी म्हणून न पाहता तिच्यात काहीतरी अद्भुत आहे असे मानतो. परंतु नेमके ते काय आहे हे त्यांना माहीत नाही व त्याबद्दल ते सांगूही शकत नाहीत. जे वारली लोक कुणबी, कोळी आणि ठाकूर ह्यांच्या सान्निध्यात राहतात ते काळबहिरी, भवानी, खंडोबा, भैरव, महादेव ह्या देवांची पूजा करतात. तसेच ते 'पाणधरी' ह्या गावदेवतेलाही मानतात. खंडोबाच्या चांदीच्या मूर्तीत तो घोड्यावर स्वार झाला असून त्याच्या शेजारी कुत्रा आहे असे दिसते. महादेव बैलावर व भैरव घोड्यावर बसला आहे. हे दोन शिवाचे अवतार आहेत. ही दैवते दक्षिणेकडील वारल्यांत येण्याचे! मुख्य कारण त्यांच्यावर पडलेला हिंदूंचा प्रभाव हे होय.

ह्या मूर्ती अगदी काळोख असलेल्या जागी ठेवलेल्या आढळतात. विटाळात. असलेल्या स्त्रीची सावली त्यावर पडणार नाही ह्याची ते दक्षता घेतात. मूर्ती पाहण्याची संधी मला दोन घरांमध्ये मोठ्या मुष्किलीने मिळाली. मूर्ती ठेवलेल्या खोलीत रॉकेलचा दिवा जाळला जात नाही. त्याऐवजी लाकडाच्या दोन काड्या पेटवून प्रकाश निर्माण केला जातो. घरात इतरत्र रोजच्या उपयोगासाठी मात्र रॉकेलचा दिवा वापरला जातो. मूर्तीच्या समोर लावला जाणारा दिवा तुपाचा किंवा एरंडीच्या तेलाचा असावा लागतो.