गडचिरोली जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील "मांगली" ह्या एक दीड हजार लोकवस्ती असलेल्या गावात सुखदेवजी उईके ह्यांचा ५ फेब्रुवारी १९३२ रोजी जन्म झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य दुसरे तिसरे काही नसून अखंड सेवाव्रताचा निःस्वार्थीपणे खळाळणारा प्रवाह आहे, असेच म्हणावे लागेल. थोडक्यात अभावग्रस्त जीणे आणि अन्यायाविरूद्ध प्रखर संघर्ष ही उईके साहेबांच्या जीवन संघर्षाची खास वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. संघर्षाची पहिली प्रेरणा त्यांना जर कोणी दिली असेल तर ती पितृतुल्य नारायणसिंह उईके ह्या व्रतस्थ नेत्याने आज सुखदेव उईके त्यांच्या खऱ्या कार्याच्या रूपाने सर्वत्र जे ओळखले जातात ते बाबुजी या नावाने.
पुंडलिक दामोदर उईके आणि कान्हाबाई पुंडलिक उईके ह्यांचे मोठे चि. सुखदेव, लहान भाऊ देवराव आणि धाकटी बहीण सौ. अनसूया परतेकी हाय. त्यांचे वडील चंद्रपूर वनविभागात वनरक्षक होते. पावना या गावी असताना सुखदेवबाबूंना तीन चार कि. मी. डोंगरगाव येथे प्राथमिक शाळेला जावे लागायचे. त्यामुळे पुढे त्यांना आत्याकडे चिमूर येथे राहणे भाग पडले. पुढच्या हायस्कूलच्या शिक्षणासाठी त्यांनां वरोरा येथे दाखल करण्यात आल्यावर त्यांची आई आपल्या मुलांना घेऊन वरोरा येथे राहू लागली. वडील कधीतरी सुट्टीच्या दिवशी महिन्यातून एकदा भेटून जात होते. सुखदेवजींनी प्रत्येक संकटांना कवटाळत कसेबसे सातवीच्या वर्गापर्यंत यशस्वी मजल मारली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना नागपंचमीच्या दिवशी सकाळी रहात्या खोलीवर अचानक शेजारच्या घराची भिंत कोसळली आणि त्या अपघातात त्यांच्या आईचे निधन झाले. लहान वयातच त्यांना मोठा आघात सहन करावा लागला. आईचे छत्र हरपल्याने अनाथ बनलेल्या ह्या मुलांचे कसे होणार असा विचार न करता त्यांच्या वडिलांनी वरोरा येथेच राहून हाताने स्वयंपाक बनवून आपल्या चिमुरड्यांना दिलासा दिला. सुखदेव बाबूंनी अभ्यासाबरोबर लहान भाऊ व बहिणीचा सांभाळ केला. मात्र ही तारेवरची कसरत असल्याने त्यांच्या वडिलांनी दोन्ही भावांना चंद्रपूर येथे वीर क्रांतिसिंह नारायणसिंह उईके यांच्या वसतिगृहात दाखल केले. त्यावेळी सुखदेवबाबू कसेबसे नववीच्या वर्गात दाखल झाले होते. काहींचे योगायोग कसे बरोबर जुळून येतात. सुखदेवबाबू ज्युबोली विद्यालयात यायला आणि क्रांतिवीर नारायणसिंह ऊईके ह्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारायला एकच वेळ झाली होती.
नारायणसिंह उईके ह्यांचेकडे ४५ विद्यार्थ्यांचा सांभाळ करण्याचे महत्त्वाचे काम होते. त्याच वसतिगृहात नारायणसिंहाच्या नजरेत भरलेला चुनचुणीत मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सुखदेव उईकेच होत. सुखदेवांना लहान-सहान कामे सांगताना त्यातूनच जवळीक निर्माण झाली. क्रां. नारायणसिंह ह्यांना मूलबाळ नसल्याने अज्ञाधारक सुखदेव उभय पती- पत्नींचा आवडता झाला. शिक्षण घेतानाच काका पुतण्यांचे नाते दृढ झाले व सुखदेव नावा ऐवजी दोघेही पती-पत्नी सुखदेव उईके ह्यांना लाडाने बाबू म्हणून संबोधू लागले. त्याचा परिणाम असा झाला की, ते संपूर्ण जनतेचे बाबू बनले आणि तेवढेच लोकप्रिय झाले.
सन १९५२ मध्ये सुखदेव उईके मॅट्रीकची अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि त्याच वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे कारकून म्हणून काम करू लागले. एव्हाना का. नारायसिंह उईके १९५२च्याच निवडणुकीत पुराडा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. चंद्रपूरचे वसतिगृह यवतमाळचे श्री. गुंडाराम मरूराम ह्यांचे हवाली करून आमदार नारायणसिंह उईके देसाईगंज येथे राहू लागले. त्यांना राहून राहून बाबूची आठवण झाली की, सुखदेव उईके ह्यांची आवर्जून भेट घेत, विचारपूस करत. त्यामुळे संपर्क कायम होता. त्यांच्या प्रोत्साहनानेच उईके ह्यांनी सकाळी कॉलेज आणि दुपारी कार्यालय सांभाळून चांगल्या पद्धतीने बी. ए. ची पदवी प्राप्त केली होती. पुढे काही दिवसात जंगलू गावंडे ह्या वसतिगृहातील सहाय्यकाची ब्रह्मापुरी येथे हत्या झाली. गुन्हेगाराचा शोध सुरू होता. त्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. काही कारणाने क्रा. ह्यांना त्या सभेसाठी येणे शक्य नव्हते. त्यावेळी लोकांनी सुखदेव उईकेंनाच भाषण देण्यास उभे केले. भव्य शोक सभेत जाहिररित्या भाषण देण्याची ही पहिलीच वेळ होती. तरी त्या सभेत गांभीर्य राखून ते चांगले चिटाईने बोलले. आदिवासी शिक्षकाच्या हत्येला जबाबदार इसमाला अटक करावी व आदिवासींना न्याय मिळावा अशी मागणी केली. एका
मोठ्या पुढारी इसमावर सर्वांचाच संशय होता. पण ते प्रकरण दाबण्यात आले आणि सुखदेव उईके ह्यांची राजूरा येथे त्वरीत बदली केली गेली. चौकशीचे नाटक पुढे केले आणि ताबडतोब उईके ह्यांना बडतर्फ करण्यात आले.
नारायणसिंह उईके ह्यांनी सदर बाब त्यावेळचे त्यांचे खंदे मित्र व न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांचेकडे नेली. प्रकरण समजावून देण्यात आले. निकाल सुखदेव उईक ह्यांच्याकडूनच लागला. क्रां. नारायणसिंह उईके ह्यांना सुखदेव उईके ह्यांच्यात काय अंतःसामर्थ्य आहे याची चांगलीच जाणीव झाली होती. त्यांनी सुखदेव उईके ह्यांचे मन वळवण्याचे काम हाती घेतले होते. ते जेव्हा जेव्हा उईके ह्यांना भेटायला येतील तेव्हा नोकरीचा राजीनामा देण्याचा आग्रह करीत असत. कां. नारायणसिंह उईकेंच्या आग्रहाखातर एकेदिवशी सुखदेव उईके ह्यांनी राजीनामा दिला आणि नारायणसिंह उईके ह्यांचेकडे देसाईगंज येथे वास्तव्याला आले. 'नाग विदर्भ आदिवासी मंडळाचे सदस्य' म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याचवेळी त्यांनी खाजगी सचिव म्हणूनही काम केल्याने सभेत भाषण करणे, अर्ज लिहिणे, निवेदने तयार करणे आणि महत्त्वाचे म्हणजे विधानसभेसाठी तारांकित, अतारांकित प्रश्न तयार करणे, चर्चेसाठी प्रस्ताव वा नोटस् बनवणे ह्या सर्व कामांचे प्रशिक्षण उत्तमरित्या झाले. एवढ्या अनुभवाच्या जोरावर सन १९६२ मध्ये त्यांना राळेगाव, येळाबारा जि.यवतमाळ मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी मिळाली. ही खरी आयुष्यातली पहिली निवडणूक, पराभव झाला तरी त्यांना त्याचे फार वाईट वाटले नाही. तर ते सावध होऊन कामाला लागले. थोड्याच दिवसात ब्रह्मापुरी येथे अन्याय पंचायतचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली.
काही दिवसांनी नारायणसिंह उईके ह्यांच्या जबरान जोत चळवळ, विस्तार अधिकारी चळवळ, आदिसींचे अनेक प्रश्न, क्षेत्रीय बंधनाचा प्रश्न, जंगलावरील अधिकारी अशा लोक चळवळीत उईके ह्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिले. त्यामुळे ते आमदार नारायणसिंह उईके ह्यांचे मानसपुत्र म्हणून संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र वासीयांना परिचित झाले. त्यांच्या झंझावाती दौ-यांमुळे आणि लाखोने गर्दी खेचणाऱ्या भाषणांमुळे अनेकदा त्यांना अटक झाली, जेल भोगावा लागला. एवढेच काय परंतु खुनी हल्लेही झाले. मात्र ते न जुमानता खंबीरपणे उभे राहून जिंकले. ह्याच चक्रव्यूहातून ते बाहेर पडतात कुठे नाहीतर क्रां. नारायणसिंह उईके ह्यांनी त्यांच्या मांडीवरच प्राण सोडले. काही दिवसांनी श्री. मोहन हिराबाई हिरालाल ह्या सद्गुणी आणि गरिबांची चाड असलेल्या माणसाचा निकटचा संबंध आला. म्हणतात ना चांगल्या दोन माणसांची मने एखाद्या अतिमहत्त्वाच्या कामाने प्रेरित झाली. तर त्यांच्या विचारांना कुणीही थोपवू शकत नाही. तसेच झाले. असंघटित मजूर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ह्यासाठी बाबुजींना सोबत घेऊन आरमोरी तालुक्यातील विरोरा, शंकरपूर, कोरेगाव, कुरूड, बोडदा इ. गावांमध्ये कामाची सुरूवात झाली. तसे ह्याआधी बाबुजींनी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, ह्यासाठी कित्येकदा मोर्चे काढले होते. आपण आपला मार्ग शोधू ह्या अभ्यास प्रक्रियेतून रोजगाराचा प्रश्न समोर येऊ लागला होता. त्यातूनच रोजगार हमी योजनेची कायदेशीर बाजू बांधकाम व लाकूड कामगार संघटनेच्या माध्यमातून लोकांनी समजून घेतली. बरोबर त्याच वेळी सुखदेवबाबुंकडे ह्या संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आली होती. ही योजना म्हणजे काम करणाऱ्यांना हक्क म्हणून मिळाला आहे. ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली, व पुढे ह्या प्रश्नांवर १९८० पासून १९८६ पर्यंत रो.ह.यो. अंमलबजावणीसाठी आरमोरी व कुरखेडा तालुक्यात विविध प्रकारची आंदोलने सुखदेवबाबू उईके ह्यांच्या खंबीर नेतृत्त्वाने पेलली. ह्याच काळात 'जंगल बचाव-मानव बचाव' आंदोलनाची सुरूवात झाली.
गडचिरोली जिल्हा हा जंगलबहुल जिल्हा ह्या ठिकाणी दोन मोठ्या धरणांचे नियोजन सुरू होते. भोपालपट्टनम् व इचमपल्ली ह्या धरणामुळे येथील स्थानिक आदिवासींचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होणार होते. व बहुमूल्य वनसंपदेवर कुऱ्हाड कोसळणार होती. त्या विरोधात ह्या आंदोलनाची सुरूवात झाली. त्यात सुखदेवबाबू उईके आणि हिरामण वरखेडं हे प्रमुख नेतृत्त्वाची भूमिका बजावणारे होते. त्यावेळी अतिशय कष्टाने आदिवासी संघटनेची बांधणी करण्यात आली. ह्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणूनही सुखदेवबाबू उईके यांनी धडाडीने काम केल्याचे लक्षात येते.
१९८२ ते १९९० हा काळ मोर्चेबांधणीचा आणि आंदोलनांचा म्हणूनच ओळखला जात होता. मात्र सुखदेवबाबू उईके ह्यांनी आदिवासींच्या सामुदाईक विवाहाचे कार्यक्रम नियमितपणे घ्यायला सुरूवात केली होती. तो मोका साधून 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी ह्या संस्थेची स्थापना केली गेली. आज ह्या संस्थेच्या सर्व रचनात्मक संघर्षात्मक कामाला बाबुजींचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. १९८५ हे वर्ष बाबुजींच्या जीवनात एक आगळेवेगळे वादळ घेऊन आले आणि त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. त्यावर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडुका जाहीर झाल्या. त्यावेळी शरद पवार हे संयुक्त विरोधी पक्षाचे नेते होते. आरमोरी मतदारसंघासाठी चांगला लायक उमेदवार शोधण्याची मोहीम घेण्यात आली होती. विशेष म्हणजे ती जागा अनु. जमातीसाठी राखीव असल्याने आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा शोध जारी होता. वडसा येथील बापू दुपारे आणि त्यावेळचे ब्रह्मापुरीचे जनता पक्षाचे आमदार बाबसाहेब खानोरकर ह्यांनी शरद पवार ह्यांच्याकडे बाबुजींच्या नावाची शिफारस केली. बाबुजींच्या कामाची चुणूक अनेकांनी अनुभवली होती. अचानक एके दिवशी रात्री आठ-दहा मंडळी बाबुजींच्या घरी येऊन धडकली.
बाकी फारसी कल्पना न देता आपण निवणुकीकरीता फॉर्म भरण्याची तयारी ठेवावी. बस्स एवढेच त्यांना सांगण्यात आले. बाबुजींना आणि त्यांच्या कुटुंबियांना विचार करण्याची ऊसंत मिळण्याच्या आत निवडणुकीच्या खर्चासाठी म्हणून काही रक्कम शरद पवारांनी देऊनही टाकली. कधी कधी साऱ्याच गोष्टी कशा ध्यानीमनी नसताना जुळून येतात, असा तो प्रकार म्हणावा लागेल. बाबुजींना फक्त मनाची तयारी करणे बाकी होते. मग काय विचारता चालून आलेल्या संधीचे सोने करत बाबुजीं आले की भरघोस मतांनी निवडूण. मूळात त्यांचे कार्य, त्यांची धडपड आणि सामान्यांकडे असलेली त्यांची ओढ. ते कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले असते, तरी आदिवासी काय इतर समाजानेही त्यांच्यावर मतांचा पाऊस पाडला असता. झालेही तसेच. .बाबुजी आमदार म्हणून काम करू लागले. सत्ता हातात आली, परंतु त्यांनी समाजकारणाशी कधीही फारकत होऊ दिली नाही. जनता जनार्दनाला अजिबात नाराज केले नाही. विधानभवनाबाहेर राहून जसे कार्य चालू होते, तसेच विधानभवनात राहूनही. ते एक अत्यंत क्रियाशील आणि कार्यतत्पर आमदार म्हणून लोकांच्या नजरेत भरले. बाबुजींचे कार्य पाहून पवार साहेबांची चांगलीच मर्जी त्यांच्यावर झाली होती. अनेकदा कार्यकर्त्याच्या अभ्यासपूर्ण विधानसभेतल्या भाषणाने शरद पवारही आवाक झाले होते. त्यांनी बाबुजींच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत प्रोत्साहित केले होते. बाबुजींचे मूळ ध्येय रोजगार हमी योजनेकडे होते. ही योजना त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक राबवून खऱ्या अर्थाने जनआंदोलन करून रस्त्यावर उपासीतापासी असलेल्या बाया-बापुड्या उतरून त्यांच्या पोटाची गरज शासनाच्या लक्षात आणून देत लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला.
सोबतच रस्ते, पाणी, लहान-मोठे २५ पूल, तलाव, बावड्या बांधून वेळ आली तर आमरण उपोषण करून शेतकऱ्यांची शेत जमिनीची मृदा संधारणाची अनेक कामे शासकीय खर्चाने करून घेतली. अशी कामे करणारे ते एकमेव आमदार होते. विधानसभेत आमदार असताना सुखदेव उईके ह्याानी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत, संपूर्ण विधानभवनाला जाग आणत भाषण केले नाही. असे त्यांच्या कारकीर्दीत कधी झालेच नाही. प्रत्येक सत्रांत त्यांचा आवाज बुलंद होत असे. त्यांचे भाषण वास्तवाने आणि दाहकतेने तुडूंब भरलेले असल्याने विरोधकांनीही बाके वा खुर्च्या वाजवण्यासाठी तिथे संधी मिळत नसे. त्यामुळे संपूर्ण सभागृह शांतपणे एक-एक प्रश्न नीट समजून घेत असे. बाबुजींनी जनतेच्या व्यक्तिगत कामासोबतच सार्वजानिक कामे व क्षेत्रीय विकासाची कामे सेवाभावी अस्तेने केली आणि जनतेला विश्वासात घेत दिलासा दिला. ते 'विधानसभा आदिवासी समितीचे चेअरमन' झाले आणि ताबडतोब नोकरीतील मागसवर्गीयांचा अनुशेष शोधून तो भरून काढला. त्याबरोबर ६० ते ६५ टक्के गैरआदिवासींचे आदिवासी म्हणून सरकारी नोकरीत अतिक्रमण असल्याचे त्यांनी शासनाच्या लक्षात आणून कारवाई करण्याची विनंती केली होती. आदिवासी विकास महामंडळाचे गवत खरेदी योजनेत झालेला भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार ह्यांनी जी समिती नेमली होती. त्या समितीचे चेअरमन जाणीवर्पूक सुखदेवबाबु ह्यांनाच नेमले होते. कोणाच्याही दबावाला अगर आमिषाला बळी न पडता ठरावीक वेळेत उईकेंनी चौकशी करून साक्ष, पुरावे कागद पत्रांच्या आधारे जमा करून स्वतः अहवाल लिहून विधानसभेला सादर केला व कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीला आणला.
सुखदेव उईके हे एकमेव आमदार असे होते की, सत्ताधारी पक्षात असूनही सरकारला अनेकदा प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असत. तरीही बाबुजींच्या विरोधात कोणीही न जाता एक अभ्यासू,निर्भीड व लोकांप्रती संवेदनशील प्रतिनिधी म्हणून सरकार पक्षात बाबुजींबद्दल कमालीचा आदरच होता. मूळात त्याचा कायद्याचा अभ्यास, भाषावर प्रभुत्व आणि विविध समस्यांचा अभ्यास असल्याने विरोधकांही त्यांना शांतपणे ऐकूण घेत असत. मध्यंतरी त्यांची एस.टी. महामंडळाचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्या वर्षांच्या काळात त्यांनी एस. टी. महामंडळातील आदिवासींच्या नोकरीचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न केला.आदिवासी युवकांचे प्रशिक्षण घेतले व स्वतंत्र गडचिरोली विभाग, कुरखेडा, वडसा व धार्मोशी येथे डेपो मंजूर केले.
तसेच आरमोरी बस स्थानकाचे बांधकामही मंजूर करून घेतले होते. सुखदेव उईक ह्यांनी जमातीच्या प्रमाणपत्रांबाबत मोघे समितीत सदस्य म्हणून काम केले. त्यांचे म्हणणे असे की, सरकारने मोघे समितीचा अहवाल अंमलात आणला तर आदिवासींना जमातीचे प्रमाणापत्र मिळण्यास सध्या होणारा त्रास आपोआप बंद होईल. बाबुजींची तळमळ, प्रमाणिकपणा, रोखठोक थेट विषयांशी भिडणे आणि चारचौघांत खुलेआम कोणताही विषय चर्चेला घेणे, एखाद्यावर समोरासमोर हल्ला करणे चालूच होते. त्यामुळे त्यांचे काही निकटवर्तीय म्हणतात, बाबुजींना राजकारणातील खाच-खळगे कळले नाहीत. एवढेच कशाला त्यांना राजकीय स्पर्धेत टिकून राहण्याचे सूत्र देखील उमगले नव्हते. त्यामुळे शेवटी शेवटी पक्षात व पक्षाबाहेरही त्यांना विरोध होताना दिसू लागला होता. त्याचा परिणाम असा झाला की, १९९० मध्ये दुसऱ्यांदा निवडणुकीत ते पराभूत झाले. मात्र त्यांनी सरकारी व विरोकांना टीकेचे लक्ष करण्याचे अजिबात सोडले नाही. त्यामुळे की काय काही हितशत्रूंनी त्यांच्यावर जीवघेणारे तीन वेळा खुनी हल्ले केले.
आजमितीला बाबुजी लोकांच्या लोकचळवळींमध्ये सहभागी होऊन निर्व्याज मार्गदर्शकाची भूमिका आंनदाने बजावित आहेत. अनेक सामाजिक संघटनांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे. विदर्भातील काही संघटना, संस्था आणि लोकचळवळींना त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होत आहे. मागील दोन तपांपासून त्यांनी लोकजागृतीसाठी अविरत प्रयत्न चालविले आहेत. पंचायतराज प्रणाली संकल्पना लोकांना कळावी म्हणून १९९६ मध्ये त्यांनी 'आम्ही आमच्या आरोग्या'साठी ह्या संस्थेमार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या माध्यमातून जाणीव जागृती केली आहे.आजही बाबुजींची राहणी अत्यंत साधी अशीच आहे.माजी आमदार म्हणून कुठेही डाम-डौल आणि बडेजावपणा नाही. घरी- वावरताना ते शांतच दिसतात. मात्र एखादीबाब नियमबाह्य असेल, नियमांचे उल्लघन होत असेल तर मग मात्र समोरच्याची चिरफाड करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. मग तो कितीही मोठा अधिकारी असो वा गावातील सामान्य माणूस. आजही अनेक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येत असतात. ह्या घडीलाही सर्व लोकांचे समाधान होईल असे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. एवढी धडपड नि चिकाटी असताना बाबुजी नेहमी प्रसिद्धीपासून दोन हात लांब राहिले. फार पूर्वी म्हणजे १९६५ साली त्यांचा आदिवासी समाज बांधवांनी नागपूर येथे सत्कार समारंभ घडवून आणला होता. हाच काय तो त्यांच्या जीवनातील प्रसिद्धीचा एकमेव प्रसंग, मात्र बाबुजींनी आजही
आपले कार्य तेवढ्याच नेटाने सुरू ठेवले आहे. भले आज ते 'एकला चलोरे' या उक्तीप्रमाणे असले तरी त्यात कुठेही खंड पडलेला नाही. बाबूजींच्या हयातभर कार्याचा गौरव होण्यासाठी 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी ह्या संस्थेचे पदाधिकारी डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख ह्यांनी त्यांच्या पंच्च्याहत्तरीच्या निमित्ताने 'अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा' आयोजित केला होता. त्या र्काक्रमाला न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला होता. तवेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्राचार्य मदन धनकर हे उपस्थित होते. सुखदेवबाबू उईके हे गडचिरोली जिल्ह्यात प्रखर पर्यावरणवादी व निसर्ग प्रेमी म्हणून लोकप्रिय असले तरी अनेकदा त्यांना पर्यावरण आणि निसर्ग ह्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. ६ फेब्रुवारी १९८६ची ही गोष्ट आहे. गडचिरोली परिसरात भारताचे लाडके पंतप्रधान येणार होते. ६०-७० कि. मी. वरून माय-भगिनी आपली चिलीपिली पोटाला बांधून मजल-दरमज करत सभेच्या ठिकाणी पोहचले आणि त्या खेड्यात जणूकाही जत्राच भरली होती. आपल्या लाडक्या पंतप्रधानाला बघण्यासाठी ही गर्दी नव्हती तर हाताला काही तरी काम मिळावे अशी
भीक मागण्यासाठी ही गर्दी उसळली होती. ह्या जत्रेचे नेतृत्त्व केले होते, सुखदेवबाबू उईके ह्यांनी. रो.ह.यो. कायद्याची अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी काम दो या जेल दो' हे आंदोलन करण्याची पाळी गरीब जनतेवर शासनाने आणली होती. अशा प्रकारे हे आंदोलन व स्वतःला वडसा येथील अटक करून घेण्याचा संपूर्ण महाराष्ट्रीतील हा पहिलावहिला प्रसंग असावा. वडसा येथील हजारोंच्या अटक सत्राने पुन्हा एकदा बाबूजी ह्यांचे नाव थेट भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन धडकले.
बाबूजी समाजिक कार्यात व्यस्त असताना साहित्याची देखील चांगलीच जाण ठेवून आहेत. त्यांचे कवी मन आजही शब्दांची गेय रचना करण्यात सक्रीय आहे. त्यांनी समाजजागृतीसाठी आणि विशेषत्वाने तरूणांसाठी प्रबोधनगीते लोकगीते रलचेली आहेत. त्यांचे ओबड़ीचे विषय ग्रामसभा, सक्षमीकरण रोहयो, जबरान जोत, जंगल, जमीन ह्या सामन्य लोकांना जगण्याच्या विषयाला धरून लोकगीतांची अतिशय मर्मस्पर्धी रचना केली आहे. त्यांचे 'मेटा पुंगार अर्थात पहाडी फुल भाग -१ व भाग -२ हे लोकगीतांचे संग्रह यासर्व गोष्टींचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. बाबूजी आजही कुठेही भेटले तरी गुणगुणतच असतात. त्यांची असंख्य लोकगीते अजूनही अप्रकाशित आहेत. त्यांनी ग्रामीण भूमिहिनांना माहिती व्हावी म्हणून 'जबरान जोत' ही पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. आपला धर्म व संस्कृती ह्यासंबंधी अजूनही ते जागरूक असून सर्व समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबुजींना एक गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आदिवासी समाजात जो वर्ग शिकला आणि नोकरीला लागला, त्यांनी आपल्या बांधवांकडे पाठ फिरविली असून त्यांचा वेगळाच पांढरपेशा वर्ग निर्माण झाला आहे. अशा लोकांनी आपण धर्म व संस्कृती विसरू नये म्हणून बाबुजींनी 'कोयतुर' संस्कृती ही प्रकाशित केली आहे. बाबुजी आज शरीराने थोडे थकले असले तरीही कामाची स्फूर्ती अजूनही युवकाला लाजवेल अशीच आहे. अजूनही त्यांना खूप काही रणे बाकी असल्याची हुरहूर आहे. ते सतत युवकांच्या संपर्कात असतात. संस्था-संघटना, चळवळीच्या सभेला जातात. एक दुर्दम्य आशा आहे,ह्या तळागाळातील बांधवांना सुखाने दोन घास मिळतील काय याची अशा सेवाव्रती खळाळत्या प्रवाहाला आणि संघर्ष हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव समजणाऱ्या बाबूजींना आदिवासी बांधवांचा मानाचा मुजरा…..