अनेक देव एकत्र जमून त्यांची सभा कशी होते व त्यात नारणदेव सर्व व्यवस्था कशी करतो ह्याचे वर्णन खालील गाण्यात आले आहे :
'कानूमातेच्या महालात सभा भरली आहे.
परंतु नारणवदेव सर्व व्यवस्था करत आहे.
कणसरीच्या! 'अंगणात सभा भरली आहे.
परंतु नारणदेव सर्व करत आहे.
तपेसराच्या महालात सभा भरली आहे.
महादेवाच्या महालात सभा भरली आहे.
परंतु नारणदेव तेथे व्यवस्थापक आहे.
सूर्यनारायणाच्या महालात दरबार भरले आहेत.
इंद्रदेव, गोकुळ, नोकूल
सहिदेव आणि भीवा-बाल्या (भीम)
परंतु नारणदेवाने त्यांची व्यवस्था केली.
'हे नारणदेवा, तू भिक्षा मागण्यास गेलास,
परंतु धरतीमाता बसली होती.
कणसरी माता कपडे परिधान करीत होती.
नारणदेवा, तू भिक्षा मागण्यास गेलास,
परंतु चंद्रकला खांबाशेजारी उभी होती,
नारणदेव वर बनला,
हळदाई विवाहित स्त्री बनली
लखमापत लक्ष्मी वधू झाली,
आणि देवांची कुटुंबे पाहुणे बनले.
जमातीच्या देवांच्या सन्मानार्थ आणखी एक गाणे दिले आहे:
'कुणाची सभा आहे ?
लोण्याचा दिवा जळत आहे
ही सोन्याची सभा आहे
ही कुणाची सभा आहे ?
ही हिरोबादेवाची सभा आहे,
ही हिमायीची सभा आहे,
ही छेडोबाची सभा आहे,
ही नारणदेवाची सभा आहे'
'हे देवा, मी तुझ्या पाया पडतो,
कोलम जातीचे भात मोठे धान्य आहे, उंच झाले की ते कापा,
धान्य आणि गाय ह्या माता आहेत.
'तू वरच्या रस्त्याने जा,
मी खालच्या रस्त्याने जातो,
तू पूर्वेकडील रस्त्याने जा,
मी पश्चिमेच्या रस्त्याने जातो.
'शेतकऱ्याचा मुलगा खरोखरच शहाणा आहे,
विड्याची बत्तीस पाने रचली आहेत
'दुधाच्या तलावात जन्मलेले भाताचे रोप,
ह्या रोपाला मूळही नाही आणि बुंधाही नाही '
'चिंभी पक्षी बांबूच्या काट्यात राहतो आणि तेच काटे खातो,
त्याला हात नाहीत, पाय नाहीत, नाक नाही, डोळा नाही.'
'कणसरीने साडी नेसली व ती धरतीबरोबर निघाली,
हे नारणदेवा, तुझी पत्नी गंगा विवस्त्र गेली,
रस्त्यात तिने साडी परिधान केली,
आणि धरतीने तिला सोबत केली.
हे देवा, आई संरक्षण देते,
बाप दूध पाजतो,
मूल कसे वाढेल?
'आई म्हा तांब्याची नळी
त्यांतून जन्माला आले चांदीचे मूल
आणि त्याचे झाले सोन्याचे मूल
देवा, प्रथम मुलाचा जन्म झाला
परंतु त्याच्या आईचा मागून जन्म झाला.'
'तू चंदनाचे तोडलेस,
माझ्यासाठी फळ मिळविलेस.
मुलाचे फूल वेणीत गुंफले आहे.
'पंख मोठे होतात, मग गंगा का वाहते ?
मात्र पार्वत ( पर्वतांचा देव ) स्नान करत आहे.
इसारच्या घरामध्ये कांथ आणि वाद्याच्या तारा छेडल्या जात आहेत
परंतु पार्वत देव सर्वत्र नृत्य करत आहे.
इसार देवाची कन्या आई झाली.
पण झोळी मात्र लाकडी खांबाला बांधली आहे.'
'सातशे स्त्रिया पाणी आणावयास गेल्या
सर्वांनी मडक्यात पाणी भरले आणि तळे आटले.
'तुम्ही जगाची स्त्री पाहिली आहे का ?'
ती भूतलावावर उतरली.
नातलग नाहीत, कुटुंब नाही; देवा, मला भाऊही नाहीत,
आईबापांनी मला हद्दपार केले.
'देवा मोरा, पाणी बिघडवू नकोस.
तलाव जवळजवळ कोरडा झाला आहे,
देवा मोरा, तू रस्त्यामध्ये का उभा आहेस ?
परंतु पारध्याने डोंगराला वेढा घातला आहे'
'आकाशाएवढे उंच व पृथ्वीएवढे विशाल.
पृथ्वी पायरी होती.
देवाने सागराचे पाणी प्याले.'
'बारा वर्षाने झाड बहरले,
त्याचे नाव काय ?'
'आकाशाची स्त्री खालच्या पृथ्वीवर अवतरली,
परंतु पाण्यावर लक्ष ठेवा.'
'कान्हा खेळावयास गेला आणि त्याचा चेंडू हरवला,
सलद पाहावयास गेला, परंतु सलद तेथे नव्हते.'
'माझ्या भावा, ती फार दूर आहे का ? चल जाऊ या.
परंतु रस्त्यामध्ये केसाची वेणी सैल झाली,
मी आता वेणी कुठे बांधू?'
तिने तिच्या भावाकडे जेवण घेतले व त्याच्या मागोमाग चालू लागली
भावा, येथे खूप चिखल आहे, मी कुठे बरं बसू.'
चंदर-सूर्य निघाले आणि दुपारी आले,
चंदर सूर्य हा शुद्ध नाही, परंतु नारणदेव मात्र शुद्ध आहे.
'शेवटच्या पंधरवड्यात पाणी संपले,
मग आम्ही गुरे कशी चारावी ?
आणि आम्ही त्यांना उपाशी कसे ठेवू?'
'शेवटी एक झाड लावले, परंतु त्याची मुळे कुठे आहेत ?
परंतु त्रिंबक येथे रानटी फळे दिसली.'
'अरे वनात हरणे आहेत.
आम्ही हरणे परत आणण्यासाठी उतरू शकत नाही.'
सागर काळा आहे आणि नारण गोरा आहे.
परंतु त्यांची भेटण्याची जागा लाट आहे.'
'चिंतनाची बारा गाणी गायली, पण ती ऐकता आली नाहीत.
आम्ही सासऱ्याकडे गेलो पण त्यानेही ऐकली नाहीत.'
'पाण्यासाठी मडके घे. परंतु मी एकटी जाणार नाही.
डोंगराच्या कडेला पाऊस पडतो आहे.
'वनात चरत असलेले हरीण पाहिले
त्याच्या डोक्यावर सोनेरी शिंग होते.
हे दसमाय, विहिरीत मोती पडला.
'माझ्या धाकट्या दीरा, माझा मोती शोधून काढ.
निपुत्रिक स्त्री एकटीच वनात फिरते
निपुत्रिक स्त्री हुशार नसते.
परंतु मुले असलेली स्त्री हुशार असते.
ह्या कवितेत कोणताच विषय सातत्याने मांडलेला नाही. त्यात एकाच यमकाच्या दोन ओळी संग्रहित केल्या आहेत. बऱ्याच जागी त्यांचा अर्थही स्पष्ट होत नाही. काही ओळी कमी-जास्त प्रमाणात गूढ स्वरूपाच्या आहेत. ते गूढ उलगडण्याची अपेक्षा श्रोत्यावर सोपविली आहे. गायक प्रश्न करतो 'कोणते झाड बारा वर्षांनी फुलावर येते ?' ह्या प्रश्नाचे उत्तर वाघीण आहे, कारण वाघीण बारा वर्षांनी एकदा गाभण राहते असा समज आहे. नारणदेवाच्या पूजेसंबधीचे संदर्भही फार थोडे आहेत. इसार ह्याला पारवत म्हणून संबोधण्यात आले आहे. तो पर्वतांचा देव समजला जातो. चौदाव्या गाण्यात त्याच्या नृत्याचा जो संदर्भ आहे तो शिवाच्या तांडवनृत्याशी थोडा मिळता-जुळता वाटतो.
नारणदेवाच्या सन्मानार्थ पूजा झाल्यानंतर तरुण पुरुष व स्त्रिया नित्याची गाणी म्हणतात. ही गाणी फार लहान असतात. सर्व साधारणपणे पुरुष प्रथम गातात व स्त्रिया त्याचे अनुकरण करतात.
भाताच्या शेतात पाणी कोणी सोडीले ?
हिरवा देव मोठा, त्याने पाणी सोडीले
पानवेलीच्या बागेत पाणी कोणी सोडीले
हिमाय देवी मोठी, तिने ते केले.
लसणाच्या शेतात पाणी कुणी सोडीले ?
तो छेडोबा मोठा देव, त्याने ते केले
कुंकवाच्या बागेत पाणी कुणी आणले ?
नारणदेव मोठा, त्याने ते आणले.
'काळ्या नागाची कन्या
तिच्या चांदीच्या आंगठ्या विसरली
काळ्या नागाची कन्या
तिची साडी विसरली
तिची चोळी विसरली
तिच्या बांगड्या विसरली
आणि तिचा हार विसरली.
'बोरूच्या बनात डुक्कर आले
बोरू मोडून ते निघून गेले
बोरूच्या बनात सांबर आले
त्याने बोरू मोडून टाकला.
'उंचवट्यावर बांबूचे बन आहे
ते कसे डुलत आहे
खरोखरच हे मित्रा वाल्या, तुझी पत्नी
झोप येत असताना कशी हालत आहे ?
गिबल्या तुझी पत्नी
झोपत असताना कशी झोके घेत आहे.
काही वेळेस ही गाणी म्हणीच्या रूपात असतात. त्यापैकी एक गाणे खालील प्रमाणे आहे :
मोठे तेवढे निरर्थक
गरीब हे खरोखरच चांगले
अंगणात झोपडी बांधावी.'
खालील गाणे औषधी वनस्पतीसंबंधी आहे. ह्या वनस्पतीमुळे स्त्रीला गर्भधारणा होते.
'उंच शिखर असलेल्या पर्वतावर
माझा मार्ग कुणी मोकळा केला ?
कुणाकडून हा मार्ग मोकळा झाला ?
भगताच्या मुलाकडून
भगताच्या मुलाने तो मोकळा केला.
औषधी वनस्पती आणण्यासाठी
माझ्या नणंदेला देण्यासाठी
औषधी वनस्पती देण्यासाठी
त्याने तिला देण्यासाठी
त्यामुळे तिला मुले होतील.
खालील गाण्यात पती त्याच्या पत्नीला लग्न समारंभास जाण्यास सांगतो. परंतु पत्नी ते नाकारते.
'वाटेत आथरोनीचे झुडूप
चला लग्नाला जाऊ
वाटेत जाताना करवंदीचे. झुडूप
चला लग्नाला जाऊ
माझी चोळी फाटली
मी लग्नाला येणार नाही
माझी साडी फाटली
मी लग्नाला येणार नाही.'