शेतीशी संबंधित धार्मिक विधी (Rituals related to agriculture)

Tribal Mahavikas

धान्याची गोष्ट : शेतकरी म्हणून वारली धान्याकडे फार आदराने पाहतात. धान्याला त्यांनी देवत्व दिले आहे. कणसरी माता ही धान्याची मुख्य देवी आहे. धान्याच्या कापणीच्या हंगामात रात्रीच्या वेळी खळ्यावर धान्याची गोष्ट सांगितली जाते. त्या ठिकाणी एक जाणकार ह्या गोष्टीचे कथन करतो. त्याच्या भोवती सर्व लोक जमा झालेले असतात. स्त्रियांनाही खळ्यावर येऊ दिले जाते व गोष्ट ऐकता येते. खळ्याचा मालक गोष्ट कथन करणाऱ्याची आरती करतो व त्याच्या कपाळाला शेंदूर लावतो. त्याच्या शेजारी एक नारळही ठेवण्यात येतो. गोष्ट संपल्यानंतर नारळ फोडून तो जमलेल्या सर्व लोकांना वाटला जातो. गोष्ट सांगणारा घांगली नावाचे वाद्य वाजवितो. हे वाद्य दोन वाळलेल्या दुध्यापासून बनविलेले असते. त्यांच्या तोंडावर दोन काठ्या लावतात. ह्या काठ्या दोन आडव्या तारांनी जोडलेल्या असतात. ह्या वाद्याची रचना अगदी साधी असते.

गोष्ट कथन करणारा हे वाद्य आपल्या मांडीवर ठेवतो. तो एका टोकावर वरच्या बाजूला बोटे ठेवून तारा छेडतो त्यामुळे आवाज निर्माण होतो. तो वाद्य वाजवीत गोष्ट सांगतो. ही गोष्ट गद्य स्वरूपात असली तरी ती कथन करताना तो अशा सुरात सांगतो की त्यावेळी पद्याचा भास होतो. गोष्ट अशा प्रकारे सांगितली जाते. 'अग कणसरी माते, मी तुला अंधाऱ्या रात्री नमन करतो. हा काळ्या डोक्याचा मनुष्य तुझ्याकडून रक्षण मागतो. धान्याची देवता कुठे जन्म पावली आणि कुठे वाढली? ती देवाची करणी आहे व आठ खंडात ती भ्रमण करते.