एकदा दोन राजे आपणामध्ये कोण श्रेष्ठ आहे हे दर्शविण्यासाठी एकमेकांशी भांडत होते. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका धनगराने ह्या भांडणाची चौकशी केली. भांडणाचे कारण जेव्हा त्याला समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, 'तुमच्यापैकी कुणीही श्रेष्ठ नाही. मेघ हाच सर्वांत श्रेष्ठ आहे. मेघाने पाऊस पाडला नाही तर काय परिणाम होतील ह्याचा विचार करा. कापसाचे झाड वाढणार नाही व तुम्हाला कपडे मिळणार नाहीत. पाऊस जर पडला नाही तर पिके येणार नाहीत व तुम्ही उपाशी मराल. म्हणून पाऊस हा सर्वात महत्त्वाचा आहे व पाऊस देणारा हा सर्वश्रेष्ठ आहे.' धनगराचा हा उपदेश ऐकल्यानंतर ह्या दोन राजांनी आपले भांडण थांबविले.