वारल्यांचा कौटुंबिक देव हिरवा (Hirva, the family god of the Varlas)

Tribal Mahavikas


हिरवा हा वारल्यांचा कौटुंबिक देव असून आदिवासींचे ते दुसरे दैवत आहे. ह्या दैवताची मूर्ती चांदीच्या पत्र्याची असून ती पूर्णत: शेंदुराने रंगविलेली असते. ह्या पत्र्यावर माणसाचा मुखवटा उमटवलेला असतो की काय हे समजण्यास मार्ग नाही, कारण तो पत्रा शेंदुराने झाकलेला असतो. मात्र वारली असे म्हणतात की त्यावर माणसाची एक लहान आकृती उमटवलेली असते. ही मूर्ती भात भरलेल्या एका टोपलीत ठेवतात. प्रतिवर्षी नवीन पीक आल्यानंतर ह्या टोपलीमधील भाताचे दाणे बदलतात. ह्या टोपलीत मूर्तीच्या आकाराच्या चार सुपाऱ्या ठेवतात व त्यांनाही शेंदूर लावतात. त्या हिरवा देवाच्या चार स्त्रिया समजतात. त्यांना ते नारी असे संबोधतात. दुसऱ्या एका टोपलीत तीन आणखी सुपाऱ्या ठेवतात व त्यांना ते शेंदूर लावीत नाहीत. ह्यादेखील हिरवा देवाच्या नारी असतात. त्यांना शेंदूर न लावण्याचे कारण सांगितले जाते की वारली त्यांना कोऱ्या (शुद्ध) म्हणून संबोधतात. त्यांच्यापुढे ते कोंबड्याचा बळी देत नाहीत. अशा तऱ्हेने हिरवा देवाला एकूण सात नारी असतात. ह्या सर्व सातही सुपाऱ्या भाताच्या दाण्यात ठेवलेल्या असतात. त्याशिवाय टोपलीच्या आकाराच्या एका मडक्यात आणखी दोन सुपाऱ्या ठेवलेल्या असतात व त्यांनाही शेंदूर फासलेला असतो. त्या पारधी व त्याचा साथीदार म्हणून असतात. पारधी हा हिरवा देवाच्या सैन्यातील अधिकारी आहे.

काही वेळेस चौथी टोपली असून त्यातही अनेक सुपाऱ्या ठेवलेल्या असतात. परंतु त्यांना तेवढेसे महत्त्व नसते. वारल्यांच्या मते त्याही त्यांच्या नारी आहेत. ह्या सर्व टोपल्या झाकून त्या एका काठीला बांधलेल्या असतात व ही काठी कुडाच्या शेजारी छपराला बांधलेली असते. टोपल्यांनाही बाहेरच्या बाजूने शेंदूर लावलेला असतो.

हिरवा देवाबरोबर सतत त्याचा सैन्यातील अधिकारी पारधी हा असतो. वारली भगत म्हणतात की पारधी त्याच्या धन्यासाठी मोराची शिकार करतो. हिरवा देवाची बहीण मोराचे ताजे रक्त पिते आणि त्याची पत्नी मात्र विचारी त्यानंतर थंड झालेले रक्त पिते. हिरवा देवासाठी मोराची शिकार करण्यात आल्यामुळे त्याची मूर्ती मोराच्या पिसातही ठेवण्याची वारल्यांमध्ये प्रथा आहे. चांदीच्या पत्र्यावर माणसाची आकृती उमटवून त्याला हिरवा म्हणून संबोधून ती मूर्तीही मोराच्या पिसात बांधण्याची पद्धत आहे. ह्या मूर्तीभोवती पिसे गुंडाळल्यामुळे ती दिसत नाही. मोर आदिवासी जमातीतील कोणत्याही कुटुंबाचे कुलचिन्ह नाही. मोराची शिकार करणे व त्याचे मांस खाणे ह्यावर प्रतिबंध नाही. परंतु ज्याने मोराच्या पिसात हिरवा देव ठेवला आहे त्याला मात्र मोराची शिकार करता येत नाही किंवा त्याचे मांस खाता येत नाही. हिरवा हे नाव असण्याचे कारण मोराची पिसे हिरव्या रंगाची असतात हे असावे.

मोराच्या पिसात जेव्हा हिरव्याला बांधले जाते तेव्हा एक विशेष समारंभ करावा लागतो. त्यावेळी नेहमीप्रमाणेच देवाची आराधना करतात. ह्या विधीला 'कुसा बांधणे' असे म्हणतात. त्यावेळी घरामधील व्यक्तीला जडलेला एखादा आजार किंवा त्यांच्यावरील संकट नाहीसे व्हावे ह्यासाठी असा नवस केला जातो. एका भाजीच्या केळ्यामध्ये आठ आण्याचे नाणे भरून ते केळे उकळत्या तेलात सोडतात. पूजा करणारा भगत उकळत्या तेलात हात घालून केळे बाहेर काढतो. आपणात दैवी शक्ती आहे हे जमलेल्यांना दाखविण्यासाठी तो हे करीत असतो. भगताच्या अंगात ज्यावेळी वारे येते त्यावेळी त्याच्या शरीरात देव प्रवेश करतो. त्यामुळेच भगताने जरी उकळत्या तेलात हात घातला तरी तो भाजत नाही असे समजले जाते. जो भगत हा प्रकार यशस्वीपणे करतो त्याला फार मोठी शक्ती प्राप्त झाली आहे असे मानतात. जर त्याच्या हाताला काही दुखापत झाली तर तो पक्का भगत नाही असे समजतात. उकळत्या तेलामधून पदार्थ बाहेर काढणे ह्याचा त्यावेळच्या विधीशी तसा प्रत्यक्ष संबंध नाही. सहाजिकच आठ आण्याचे नाणे भगत घेतो व त्याचा उपयोग दारू पिण्यासाठी करतो.

हिरवा देवाची पूजा करण्याकरिता एक मोठा विधी करावा लागतो. त्यासाठी भगत पुढील पदार्थ आणण्यास सांगतो : भात, पीठ, शेंदूर, फुले (कोणतीही), भाजीची केळी (जे केळीचे झाड केवळ पावसाच्या पाण्यावर होते त्याची), सुपाऱ्या, विड्याची पाने, नारळ, तेल, मातीची पणती, कपड्याच्या वाती, दोन आणे (आठ पैसे), पाण्याने भरलेला तांब्याचा किंवा पितळी तांब्या, कोंबडी किंवा कोंबडा व ताडी.

झोपडीच्या ज्या भागात हिरवा देवाची पूजा करावयाची असेल तो भाग शेणाने लिंपून घेतात. भगत त्यावर पिठाने चौकोनी आकाराचा कणा काढतो. कण्याच्या ओळीवर शेंदुराने अर्धवर्तुळे रेखाटली जातात. पिठाने रेखाटलेल्या ओळी व अर्धवर्तुळे ह्यामधील संपूर्ण जागा भाताच्या दाण्यांनी झाकून टाकतात. भाताच्या प्रत्येक ओळीचे बोटाने दोन भाग करतात. त्यामध्ये भाताचा लहानसा ढीग रचतात. चौकोनाच्या चार कोपऱ्यांत चार फुले ठेवतात. भगत हे सर्व उजव्या हाताने करतो. त्यावेळी त्याचा डावा हात तो त्याच्या उजव्या खांद्यावर ठेवतो. ह्या कण्यावर ज्या वस्तू ठेवल्या जातात त्यांना प्रथम धूप दिला जातो. 'धूप देणे' म्हणजे विस्तवावर तेल ओतून जो धूर तयार होतो त्यावर ह्या वस्तू थोडा वेळ धरतात. धूप देण्यामुळे वस्तू शुद्ध होते असे मानतात. विड्याच्या पाच पानांवर भात व एक पैसा ठेवून ती चौकोनात ठेवतात. पाच केळी चौकोनाच्या बाहेर ठेवतात. त्यापैकी तीन केळी भगताच्या डाव्या बाजूस व दोन केळी उजव्या बाजूस असतात. चौकोनाच्या डाव्या बाजूला एक नारळ ठेवतात.

कण्याच्या बाहेर डाव्या बाजूस भाताचे चार लहान ढीग रचतात. हिरवा देवाची प्रतिमा त्यात ठेवली जाते. ह्या प्रतिमेच्या भोवताली चार सुपाऱ्या ठेवतात. त्या त्याच्या नारी किंवा स्त्रिया होत. त्यानंतर तीन सुपाऱ्या ह्या चौकोनाच्या आतल्या बाजूस भाताच्या ओळीलगत ठेवतात. त्यांना शेंदूर लावत नाहीत. ह्या सुपाऱ्या पारधी व त्याचे साथीदार ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. भगत पूर्वेकडे तोंड करून बसतो. त्याच्यासमोर पाण्याने भरलेला तांब्या ठेवतो. त्याच्या शेजारी भांड्यात एक पणती तेवत असते.

ह्या सर्व वस्तू व्यवस्थितपणे ठेवल्यानंतर भगत अंगात वारे आणतो व देवाला जागृत करतो. घरातील पुरुष देवाच्या मूर्तीना व भगताला पणतीने ओवाळतात. त्यानंतर भगत अंगात वारे आणून साऱ्या शरीराला कंप निर्माण करतो. तो हिरवा देवाच्या सात नारींना एकामागून एक जागृत करतो. त्यांची नावे अशी- खोदाय - वेदाय, हरनाय - कोपराय, चापाय - मोगराय, फुलाय- झेलाय, सेंदराय - कुकवाय, सेसाय- वेसाय आणि गुणाय - पळाय. भगत ज्या देवतांना जागृत करतो त्यावेळी त्यांच्यासाठी काही अस्पष्ट शब्द उच्चारतों. तो देवतांना आवाहन करतो की त्यांनी ह्या समारंभासाठी यावे व त्यांच्या यजमानाला ह्या विधीत मदत करावी. भगत प्रत्येक देवतेसाठी स्वतंत्र वारे अंगात आणतो. वारे निघून जाते वेळी तो शरीर अतिशय जोराने हलवितो व पाण्याने भरलेल्या तांब्यात भाताचे काही दाणे टाकतो. जर भाताचे दाणे पाण्यात बुडाले, एकत्रपणे वर आले आणि पसरले तर भगताला वाटते की त्याने केलेली देवतेची पूजा तिने स्वीकारली व त्याला मदत करण्यास ती तयार झाली. पाण्यात भाताचे दाणे टाकल्यानंतर ते प्रथम बुडणे, एकत्रितपणे वर येणे व पसरणे हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तो दाणे टाकणे चालूच ठेवतो. जर त्याला ह्यात यश आले नाही तर तो अंगात पुन्हा नवीन वारे आणतो व भाताचे दाणे टाकण्यास सुरुवात करतो. जोपर्यंत त्याची पूजा देवीने ऐकल्याचे त्याला समाधान लाभत नाही तोपर्यंत तो हे चालूच ठेवतो.

जेव्हा भगत सेंदराय - कुकवाय ह्या नारींना जागृत करतो त्यावेळी तो यजमान व तेथे जमलेल्या लोकांना शेंदुराचे टिळे लावतो. ज्या स्त्रिया हा विधी पहात असतात त्याना मात्र शेंदुराचे टिळे लावत नाहीत. भगत इतर नारींच्या बाबतीत अंगात वारे आणल्याशिवाय दुसरे काही करत नाही. काही वेळेस भगत सात नारींच्या ऐवजी तीन किंवा चार नार्रीच्या नावाने वारे आणतो. वरील यादीवरून असे दिसून येईल की प्रत्येक नारीची दोन नावे आहेत. त्यावरून ही नावे त्या एकाच कुळातील असाव्यात असे दर्शवितात.

सेंदराय - कोकवाय हिला शेंदूर व कुंकू लावतात, परंतु चापाय- मोगराया हिला मात्र तिच्या नावाची फुले वाहिली जात नाहीत. तिला कोणतीही फुले वाहतात. नारींना जागृत करण्याचा विधी संपल्यानंतर भगत ब्राह्मणाला जागृत करतो. नाशिक व काशी ह्यांसारख्या तीर्थक्षेत्रातील उच्च ब्राह्मण पुरोहितांना भगत आमंत्रित करतो. तो त्याच्या कपाळावर, छातीवर आणि बाहूंना चंदनाऐवजी पीठ लावतो व मी बाह्मण पुरोहित आहे असे दर्शवितो. हे सर्व वारे (कोरी) शुद्ध असावे लागतात. त्यावेळी ताडी किंवा कोंबडे अर्पण केले जात नाही. त्यानंतरचे वारे मात्र अशुद्ध (बाटी) म्हणून गणतात व त्यावेळेस मूर्तीच्या अंगावर ताडीचा शिडकावा करतात आणि भगत व तेथे जमलेले लोक ताडी पितात. मूर्तीच्या अंगावर ताडी शिंपडण्याला 'देव बाटवणे' असे म्हणतात. हे झाल्यानंतर भगत काही वेळ विश्रांती घेतो, त्यावेळी तो बिडी ओढतो. त्यानंतर भगत चित्ता ह्या शक्तीला जागृत करतो. वारली लोकांची अशी समजूत आहे की चित्त्याला भक्ष्य मिळाले पहिजे, तो उपाशी पोटी जाता कामा नये. तेथे जमलेल्या लोकांपैकी एकजण भगतासमोर हातात कोंबडे घेऊन उभा राहतो. त्याचा उद्देश चित्त्याला भक्ष्य पुरविणे हा असतो. भगत श्वापदाप्रमाणे त्याच्या गुडघ्यावर व तळहातावर वाकून कण्यावरील सर्व वस्तू हुंगून आपल्या दाताने कोंबड्याची मान पकडतो. कोंबड्याचे शिर सुटे करून आपल्या जवळच्या गोणपाटात ते लपवितो व कोंबड्याचे धड फेकून देतो. ज्याप्रमाणे चित्ता आपल्या भक्ष्यावर तुटून पडतो तशीच नक्कल भगतालाही करावी लागते.

त्यानंतर कानू येतो. तो वंजारी असून आपल्याबरोबर कांदे, मिरच्या व इतर वस्तू आणतो. ह्या वस्तू बैलाच्या पाठीवरून घाटाच्या प्रदेशातून आणतो.

एक-शिऱ्या हा शिराचा देव आहे. त्याला 'शिराचा धनी' म्हणूनही संबोधतात. तो योद्धा देव म्हणून गणला जातो. एक कोंबडे आणून फक्त शिऱ्याची काही पिसे त्याला वाहिली जातात. हे वारे येण्यात भगत देवालाही स्थान आहे. हलदी भगत बालदी भगतास जागृत करून कोंबड्याच्या डोक्यावरील काही पिसे अर्पण करतात.

शेवटी हिरवा देवाला जागृत केले जाते. त्याला उद्देशून भगत म्हणतो, 'सर्व देव आले आहेत, आता तुझी पाळी आहे. आजचा यजमान व तुझा भक्त ह्याने तुझ्यासाठी खूप त्रास घेतला आहे. तुझ्या सन्मानार्थ त्याने हा जो विधी चालविला आहे तो पाहण्यास त्याचे नातेवाईक दूरदूरहून आले आहेत. आता तू ये व तुला अर्पण केलेल् प्रसादाचा स्वीकार कर. तुझ्या भक्ताने केलेला नवस तो फेडीत आहे. तुझ्या भक्ताला तू एवढे धान्य दे की ते त्याने कितीही खाल्ले तरी संपणार नाही.

हिरवा देवानंतर त्याचा सैन्यातील अधिकारी पारधी ह्याला जागृत केले जाते. त्यावेळी त्याला दुसरे कोंबडे अर्पण करतात. कोंबड्याची मान पिळवटून त्यातील रक्त भगतापुढे सांडले जाते. अशा रीतीने हा विधी संपतो.

ह्या विधीत वेगवेगळ्या शक्तींना जागृत केल्यानंतर त्याचे कोणते परिणाम होतात, हे समजणे कठीण आहे. ह्या विषयावर भगताला स्पष्टीकरण देता आले नाही. बामण, कानू, एक-शिऱ्या आणि हळदी भगत ह्यांना वास्तविक कोणतेही स्थान द्यावयास नको होते. कारण त्यांचा हिरवा देवाशी तसा संबंध नाही. हिरवा देवाच्या तीन नारी शुद्ध ( कोऱ्या ) गणल्याने त्यांना शेंदूर लावीत नाहीत. परंतु सातही नाऱ्यांच्या सन्मानार्थ जे वारे आणले जाते ते शुद्ध (कोरे) समजतात.

चित्ता, कानू आणि इतर शक्तींच्या मूर्ती ठेवल्या जात नाहीत. ह्यावरून इतर देवतांच्या पूजेसाठी जी पद्धत अनुसरली जाते तीमध्ये थोडाफार बदल करून तीच पद्धत ह्या विधीतही उपयोगात आणतात. उदाहरणार्थ- एका विशिष्ट देवतेला जागृत करण्याकरिता अंगात वारे आणतात.

भगताने पाणी भरलेल्या तांब्यात भाताचे दाणे टाकल्यानंतर जर ते वर आले नाहीत तर तो त्या देवाला शिव्या देण्यासही कमी करीत नाही. तो देवाला म्हणतो की तू तुझ्या भक्ताला आशीर्वाद देण्यास तयार नाहीस. पूजा करण्याचा उद्देश द्वेष करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी अथवा त्याने आपल्यावर खूष व्हावे हा असतो. वारली देवाला काही वेळेस ज्या शिव्या खाव्या लागतात त्या त्याला व्यक्तिगत उद्देशून नसतात. कारण हिंदू शास्त्रातही विरोध भक्तीला मान्यता आहे. त्यामुळे देव आणि मनुष्यप्राणी ह्यांना यश प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हा विधी झाल्यानंतर भगत कोंबड्याचे डोके ठेवलेले गोणपाटाचे पोते लांब फेकून देतो. शेजारीच उभा असलेला माणूस हे पोते पकडतो. हा विधी करण्यासाठी भगताला दोन आणे मिळतात. त्यानंतर नारळ फोडून सर्वांना वाटतात. मूर्तीना परत शेंदूर लावून योग्य जागी ठेवल्या जातात. कोंबडे भाजून खातात. त्यावेळी ताडीही दिली जाते. यजमान मात्र देवाची पूजा केल्यानंतर आपला उपवास सोडतो व त्यानंतर जेवतो.

हिरवा देवाची पूजा बहुधा धान्यपीक उभे असताना अथवा धान्यपिकाची कापणी झाल्यानंतर केली जाते. वारल्यांना असे वाटते की हिरवा हा इतर देवांपेक्षा अधिक सूड घेणारा देव आहे. जर त्याची नियमित पूजा केली नाही तर तो कुटुंबात आजार घडवून आणतो. ह्यासाठी वारली प्रतिवर्षी त्याची पूजा करतात. कुटुंबात जर कुणी आजारी झाले तर त्याची खास पूजा केली जाते.

हिरवा हा संपत्तीचाही देव आहे, असे मानले जाते. त्यासाठीच त्याची मूर्ती चांदीची बनवतात. वारली चांदीला संपत्तीचे प्रतीक मानतात. एका भगताने मला हिरवा व धान्य देवता - कणसरी ह्यांची गोष्ट सांगितली. एकदा ह्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ह्यासंबंधी वाद चालला होता. ते दोघेही जग पाहण्यासाठी प्रवासास निघाले. ह्या प्रवासात हिरव्याला फार तहान लागली. शेजारीच एक विहीर होती. परंतु तिच्यातून पाणी काढण्याचे कोणतेच साधन नव्हते. कणसरीने एखाद्या शहाण्या बाईप्रमाणे मडके व लांब दोरी बरोबर घेतली होती. हिरव्याने कणसरीचा मोठेपणा मान्य केला. तिच्याकडून दोरी व मडके मागून घेतले. अशा तऱ्हेने त्या दोघांमध्ये कणसरी श्रेष्ठ आहे, हे मान्य झाले. धान्याच्या ह्या श्रेष्ठतेमुळेच हिरवा देव धान्याकडून संरक्षण मागतो. धान्य असल्याशिवाय दुसरी कोणतीही संपत्ती निर्माण होणार नाही.

देवाला जे कोंबडे अर्पण केले जाते त्यासंबंधी भगत म्हणाला की देवाला दिलेली कोणतीही वस्तू तो स्वतः खात नाही. देव फक्त त्या वस्तू पाहतो व खरेतर माणसेच त्याचा आनंद लुटतात.