जमातीचे देव (God of the tribe)

Tribal Mahavikas

वारल्यांचे प्रमुख देव म्हणजे नारणदेव, हिरवा आणि हिमाय हे होत. नारदेव हा सर्व आदिवासींचा देव असून तो हिरवा किंवा वाघ्या ह्यांच्याप्रमाणे त्रासदायक नाही असे ते समजतात. ठाणे जिल्ह्यातील धोडी, दुबळे व ठाकूर ह्या जात नारणदेवाची पूजा करतात. त्यांचे काही लहानसहान देव आहेत. परंतु नारणदेव हा सर्वांत श्रेष्ठ असून तो सर्व जमातींचा देव आहे असे मानले जाते. प्रत्येक कुटुंबात नारणदेवाची स्थापना केलेली असते. तो दगड किंवा शेंदूर लावलेल्या सुपारीच्या स्वरूपात असतो. एका मोठ्या टोपलीत भात भरून त्यात ज्या मूर्ती ठेवलेल्या असतात त्यातच नारणदेवाची मूर्तीही असते. सुपारीच्या मूर्ती मात्र एका वेगळ्या टोपलीत ठेवलेल्या असतात. ही टोपली एका काठीला बांधलेली असून ती काठी बांबूच्या कुडात भरवलेली असते. ह्या टोपलीवर झाकण असून ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळीच मूर्ती बाहेर काढल्या जातात.

नारणदेवाची दगडी मूर्ती मूळ पुरुषाच्या वंशजाकडे ठेवली जाते. काही वेळेस कुळातील लोक दूरच्या गावी जर राहात असतील तर ते पूजा करण्याकरिता ही मूर्ती तेथे घेऊन जातात. सर्वसाधारणपणे प्रत्येक धार्मिक विधीच्या वेळी नारणदेवाची पूजा केली जाते. परंतु माघ महिन्यात मात्र त्याची खास पूजा असते. त्यावेळी तरुण स्त्रिया व पुरुष रात्रभर नाचत व गात असतात. नारणदेवाने जर एखाद्या माणसाला मोठ्या आजारातून बरे केले तर त्याच्यापुढे नवस करण्याची प्रथा आहे. ह्यावेळी एका पाटावर भात पसरवून त्यात ही दगडी मूर्ती ठेवली जाते. एका मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून ते भांडे मूर्तीच्या शेजारी ठेवतात. भगत अंगात वारे आणून देवाला जागृत करतो. नारणदेवाची पूजा का करावयाची ह्याचे कारण तो जाहीरपणे सांगतो. भक्ताकडून त्याला जो नैवेद्य दाखविला गेला त्याने तो संतुष्ट झाला किंवा नाही ते त्याच्याकडून शोधून काढतो. भगत नारणदेवाच्या भक्ताला आश्वासन देतो की त्याने जो नवस केला होता त्या नवसाला नारणदेव पावला आहे. त्यावेळी देवाला एक कोंबडा अर्पण करतात व नारळ फोडून त्याचा प्रसाद तेथे जमलेल्यांना वाटतात. त्यांना ताडी देतात व सर्व रात्र आनंदाने नाचून व गाणी गाऊन घालवितात.

नारणदेव हा मानवी स्वरूप धारण करून एका पांढऱ्या रंगाच्या बैलावर बसतो व रात्रीच्या वेळी दिसतो अशी वारल्यांची समजूत आहे. वारल्यांना नारणदेव हा देवांचा देव वाटतो. कारण तो पाऊस थांबवून देवांनाही शिक्षा करू शकतो. तसेच तो पाऊस पाडणारा असल्यामुळे तो सर्वांत मोठा देव आहे. शेतकऱ्यांना पाऊस हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा वाटतो. नारणदेव हा त्याची आई विटाळ अवस्थेत असताना तिने परिधान केलेल्या वस्त्रातून व बांबूच्या कोंबातून जन्माला आला. नारणदेवाचा जन्म बांबूतून झाला असल्यामुळे भगत बांबूचा आपल्या घरात जळणासाठी उपयोग करीत नाहीत. होळीच्या मध्यभागी बांबूचा खांब रोवून मगच होळीला अनी दिला जातो. नवरदेवाला वधूच्या मंडपात प्रवेश करतेसमयी प्रथम बांबूने अडविले जाते. श्राद्धाच्या वेळी जो मांडव बनवितात तो पूर्ण बांबूचा असतो.

धर्मिक विधीच्या वेळी नारणदेवासंबंधी जी गाणी गातात त्यांत हिंदू देवांचे वर्णन असते. हे देव दरबार भरवतात, सभा घेतात, परंतु ह्या प्रत्येकाचे व्यवस्थापन मात्र नारणदेव करतो. नारणदेवासंबंधीचे गाणे खालीलप्रमाणे आहे.

'कानू मातेच्या दारी भरला दरबार
पन नारणदेव कर कारभार
कणसरीच्या दारी भरला दरबार
पन नारणदेव कर कारभार
तापे सरियाचे दारी भरला दरबार
ह्या यादीत महादेव, सूर्यनारायण, चांदसूर्य, इन्द्र, गोकुळ, नोकुल, सहीदेव भीनवाबाळ्या (भीम) ह्यांचाही समावेश आहे.
दुसऱ्या एका गीतात नारणदेवाचा पालक म्हणून उल्लेख केला आहे. ती ओळ
अशी आहे. -
'नारणदेव हा पालक आहे
आम्ही तुझी लेकरे असून तुझ्या खांद्याला बिलगतो.

हे असे दर्शविते की नारणदेव हा वारल्यांचा मोठा देव आहे. देव हा पालक असून सर्व मानव व प्राणी ही त्याची लेकरे असल्याचा हा एकमेव उहे ख वाटतो. ही कल्पना हिंदूंपासून घेतली असण्याचा संभव आहे.