अंत्ययात्रेची गाणी (Funeral Songs)

Tribal Mahavikas

कामडी हा मुख्य गायक आपल्या दोन सहकाऱ्यांसह मृत व्यक्तीला वंदन करून गाणे म्हणतो व अंत्यसंस्काराला सुरुवात होते

'सूर्य व चंद्र ह्यांना माझा नमस्कार
ढगांच्या राजाला माझा नमस्कार
जगांतील सर्व प्राणीमात्रांना माझा नमस्कार
ताडीच्या व माडीच्या देवांना माझा नमस्कार
गडगडाट करणाऱ्या ढगाच्या व विजेच्या राजाला माझा नमस्कार
शक्तीच्या देवाला माझा नमस्कार
लंका रामाला आमचा नमस्कार
आणि आनंद राजाला आमचा नमस्कार
ते वडाच्या झाडाकडे जातात
ते वनांतील माकडाकडे जातात
समुद्राला आम्ही नमस्कार करतो
समुद्राजवळच्या भूमीला आम्ही नमस्कार करतो
समुद्रातील भिंगार माशाला आमचा नमस्कार
पृथ्वीला आमचा नमस्कार
काळाच्या राजाला आमचा नमस्कार
बुडणाऱ्या राजाला आमचा नमस्कार
मेघराजाला आमचा नमस्कार
जगाच्या चार खंडांना नमस्कार
पाच पर्वत व पांच पाडव ह्यांना नमस्कार
हरमान (हनुमान) देवाला नमस्कार
उजळ शहराला नमस्कार
महादेवाला नमस्कार
गंगा गौरी आणि गिरिजा मातेला नमस्कार
धरती माता अणि कणसरी पातेला नमस्कार
औषधी वनस्पती (वनशी) आणि गावच्या भगताला नमस्कार
आणि ह्या सुमद्राला आमचे नमस्कार
मी अज्ञानी मूल आहे
हे माझ्या रघु 'कुलंब्या' (मृतव्यक्तीचे नाव )

गाणाऱ्या व्यक्तीने क्षमा मागावी असे हे गाणे आहे. गाणे गाणारे सर्व देवांना नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेची याचना करतात. तसे जर त्यांनी केले नाही, तर त्यांच्या हातून चुका घडतील. वेगवेगळ्या देवांची नावे घेताना त्यांत कोणतीही सुसंगती आढळत नाही. कदाचित कामडीला जशी नावे आवडत असतील तशी तो घेत असावा. ह्या गाण्यांत देवाची जी नावे अंतर्भूत केली आहेत त्यात जमातीचे देव वगळण्यात आले आहेत. गाण्याच्या अखेरीस कामडी ज्या मृत व्यक्तीच्या नावे श्राद्ध केले असेल त्याचे नाव घेतो.