'एकदा ब्राह्मणाला समजले की देव स्वर्गातून एका ठरावीक वेळेस व ठरावीक जागी उतरणार आहेत. तो त्या जागी ठरावीक वेळेस जाऊन पोहोचला व देव उतरण्याची वाट पाहू लागला. कुणबी त्यावेळेस शेतावरून परत येत होता त्याने ब्राह्मणाला विचारले, 'तू कुणाची वाट पहात आहेस ?' ब्राह्मणाने उत्तर दिले, 'मला देवाला भेटावयाचे आहे.' देव कसा असतो हे पाहण्याच्या आतुरतेने कुणबीही तेथे थांबला. परंतु देव मात्र त्यावेळेत आला नाही. ब्राह्मण घरी जाण्यास फार उत्सुक होता. त्याच्या मनात देवाच्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी होत्या. बराच काळ थांबल्यानंतर ब्राह्मण तेथून परत गेला परंतु कुणबी मात्र आकाशाकडे पाहात देवाविषयीचाच विचार करीत बसला. काही वेळाने देव मनुष्याचे रूप धारण करून तेथे प्रकट झाला. तो देव आहे हे न समजल्यामुळे कुणब्याने त्याला एका दोरीने झाड बांधून ठेवले. तेवढ्यात ब्राह्मण आपले भोजन आटोपून तेथे परत आला. देवाला बांधलेले पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. कुणब्याला शेवटी ब्राह्मणाकडून समजले की त्याने बांधलेला मनुष्य दुसरा कुणी नसून देव आहे. त्याला त्याबद्दल फार वाईट वाटले व त्याने क्षमा मागितली. कुणब्याने देवाची त्वरित सुटका केली. देवाने त्वत कुणब्याला बरोबर घेऊन आकाशात उड्डाण केले. मात्र ब्राह्मणाला त्याने तेथेच ठेवले.'