आदिम लग्नाची वरात(Primitive wedding groom)

Tribal Mahavikas

नवरा मुलगा लग्नाची वरात निघण्यापूर्वी आपल्या जवळच्या नातलगाना नवीन कपडे वाटतो. ह्या कपड्यांना प्रथम थोडी हळद लावली जाते. ज्याला हे कपडे वाटावयाचे त्याच्या ते प्रथम खाद्यावर ठेवले जातात व नंतर त्याला देतात. नवऱ्या मुलाची बहीण त्याला ओवाळते व त्याबद्दल तो तिला दोन किंवा चार आणे देतो.
नवऱ्या मुलास विवाहासाठी एक वेगळाच पोशाख घालावा लागतो. आखुड धोतर, लाब कोट व डोक्याला फेटा असा त्याचा पोशाख असतो. हा फेटा म्हणजे दूसरे काही नसून केवळ डोक्याभोवती गुंडाळलेले लांब कापड असते. त्याच्या डोक्याला रुईच्या पानांच्या किंवा झेंडूच्या फुलांच्या माळा बांधतात, त्याला मुंडावळ्या असे म्हणतात व त्या पाच असतात. तो गळा, छाती व कमरेभोवती एक कपडा गुंडाळतो त्यास पचंगी असे म्हणतात. त्याच्या कपाळावर तो कुंकू लावतो. तसेच तो ठिपके असलेल्या कपड्याने आपले शरीर झाकतो. ह्या कपड्यासही हळद लावली जाते. ह्या कपड्याच्या एका पदरात भात, वाल, सुपारी व पैसा बांधून त्याला गाठ मारतात. काही वेळेला नवरा मुलगा पचंगी किंवा कोट परिधान करीत नाही. त्याच्या कमरेला चांदीची साखळी व त्याच्या मनगटाला कडे बांधलेले असते. हे कडे आदल्या रात्री देत बसविण्याच्या समारंभात घालतात. जर त्याच्याकडे वरील दोन दागिने नसतील तर तो ते दागिने सावकाराकडून लग्नापुरते उसने घेतो.
लगाची वरात वधूकडे जाण्यास संध्याकाळच्या वेळेस निघते. ह्या वरातीपुढे वाजंत्री असतात. स्त्रिया पुरुषांच्या मागून चालतात व त्या सतत गाणी म्हणत असतात. जर अंतर कमी असेल तर एकजण वराला खांद्यावरून नेतो. अंतर जर जास्त असेल तर वर पायी चालतो किंवा बैलगाडीत बसून जातो. परंतु ज्यावेळी तो तोरण बांधलेली सरहद्द ओलांडतो तेव्हा त्याला कोणाच्यातरी खांद्यावर बसावेच लागते. नवऱ्यामुलाचा मामा त्याला प्रथम स्वत:च्या खांद्यावर घेतो व त्यानंतर तो दुसऱ्याकडे सोपवतो.
ही वरात नवरीच्या घराशेजारी जे तोरण बांधलेले असते. त्याच्याबाहेर थांबते. वरातीत आलेले सर्वजण रात्रभर जमिनीवर बसून बोलत असतात. नवऱ्याला रात्रभर जागे रहावे लागते. जर तो झोपला तर त्याने फार मोठी चूक केली असे मानले जाते. त्याबद्दल त्याला वधूपक्षाकडून एक रुपया दंड केला जातो. वरातीमध्ये आलेल्या लोकांना वरपक्षाकडून भाकऱ्या व वाफवलेले वाल दिले जातात. वरपक्षाला जर शक्य असेल तर ताडीही दिली जाते. भगत व धवलेरी देव बसविण्याचा विधी करण्याकरिता नवरीच्या घरी जातात. हा विधी झाल्यानंतर वधूपक्षाकडील काही तरुण माणसे वरपक्षाकडील मंडळींमध्ये सामील होतात. ते वराला आलटूनपालटून एकमेकांच्या खांद्यावर घेऊन खूप नाचवतात. असे नाचविल्यामुळे वराला त्रास होईल अशी जर वरपक्षाकडील लोकांना भीती वाटली तर ते त्या तरुण माणसांना वराला नाचविण्यास प्रतिबंध करतात. परंतु त्याबद्दल त्यांना एक रुपया द्यावा लागतो.
सूर्योदयानंतर ही वरात वधूच्या लग्नमंडपात प्रवेश करते. लग्न सकाळच्या वेळी लागते. ज्या ठिकाणी विवाह संध्याकाळी लावतात तेथे वरात दुपारी निघते त्यामुळे वधूच्या मंडपाच्या तोरणापाशी रात्रभर थांबण्याचे टाळले जाते. त्याच रात्री देव बसविण्याचा विधी वेगवेगळ्या भगतांकडून प्रत्येक जागी केला जातो. काही वेळेस दोन पक्षांच्या भांडणामुळे ठरलेल्या वेळी विवाह होऊ शकत नाही. अनेकजण दारूच्या नशेत असतात, तर काहीजणांना शुद्धही नसते. मात्र एका मध्यस्थाला हे सर्व सांभाळून विवाह ठरलेल्या वेळी होईल हे पहावे लागते.
लग्नाच्या मुहूर्तासंबंधी वारली हे जोशी किंवा ब्राह्मण पुरोहितांचा सहसा सल्ला घेत नाहीत. किंबहुना वारल्यांच्या लग्नविधीत ब्राह्मण पुरोहितास कोणतेच स्थान नसते. नेहमीची मंगलाष्टके तेथे म्हटली जात नाहीत. वारल्यांचे स्वत:चे पुरोहित असून विशेष म्हणजे त्या स्त्रिया असतात. अलीकडील काळात किनारपट्टीवर राहणारे वारली लग्नविधीसाठी ब्राह्मण पुरोहितांना बोलावू लागले आहेत. अशा वेळी धवलेरीला टाळले जाते.
प्रत्यक्ष विवाह होण्यापूर्वी वधूला वरपक्षाकडून नवीन कपडे भेट म्हणून दिले जातात. हे कपडे परिधान करून वधू मामाचा हात धरून लग्नमंडपात प्रवेश करते. त्यावेळी वर मंडपातील एका घोंगडीवर बसलेला असतो. त्यानंतर वधूवरांना जमिनीवर एकमेकांसमोर उभे करतात. काही गावांमध्ये विवाहप्रसंगी वधू-वर पाटावर उभे राहतात. तर काही ठिकाणी वर पाटावर तर वधू बांबूच्या टोपलीमध्ये उभी राहते. वधू-वर हातात एक पितळी थाळी धरतात. काही वेळेला ताटाऐवजी वर वधूचा उजवा हात आपल्या हातात धरतो. अशा वेळी ते दोघेही आपल्या डाव्या हातात एक पैसा ठेवतात. वधू-वर ज्या जागेवर उभे राहतात ती जागा शेणाने सारवून त्यावर पिठाने रांगोळी काढतात. ह्या जागेवर थोडे भात टाकणे आवश्यक असते. विवाहप्रसंगी मुलीला लाल रंगाची साडी वारली पद्धतीने नेसावी लागते. तिला मुंडावळ्या व फुलांच्या वेण्यांनी सजविले जाते. धवलेरी ज्या वेळी विवाहाचे शेवटचे गीत म्हणते त्या वेळी दोन माणसे वधू-वरांमध्ये अंतरपाट धरतात. हा अंतरपाट वधू-वरांनी हातात धरलेल्या पितळी थाळीच्या वर असावा लागतो. विवाहप्रसंगी वधू-वरांच्या मामांना हजर राहावे लागते. धवलेरी हातामध्ये दिवा धरून गीत म्हणते. काही वेळेस तिला साहाय्य करणारी स्त्री हा दिवा हातात धरते. धवलेरी सुमारे तासभर लग्नाची गाणी म्हणत असते. जेव्हा तिची गाणी संपतात तेव्हा ती टाळ्या वाजविते. त्यावरून विवाह झाला असे समजले जाते. ह्या वेळी अंतरपाट बाजूला केला जातो व वधू-वर एकमेकांच्या जागा बदलतात. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालण्याची पद्धत नाही. लग्न लागले म्हणजे वाजंत्री वाजविणारे ढोल व पिपाणी वाजवितात. नातेवाईक त्यांना आलिंगन देऊन भेटतात व त्यांचे अभिनंदन करतात.
मंडपामध्ये एक लोकरीची घोंगडी पसरवून त्यावर भाताचे दाणे टाकतात. वधूवर ह्या घोंगडीवर बसून थोडावेळ विश्रांती घेतात. त्यानंतर ते वरपक्षाकडून पहिल्या दिवशी आणलेले भाताचे दाणे कांडतात. ह्या विधीला 'घाणा कांडणे' असे म्हणतात.
अशा कांडलेल्या भाताच्या ढिगावर वधू-वरांना बसविण्यात येते. वर वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांचा एक सर बांधतो. ह्या विधीस 'गाठी बांधणे' असे म्हणतात. सवर्ण हिंदू स्त्रिया मंगळसूत्र बांधतात तसाच हा विधी असतो. हा विधी झाल्यानंतर काही उत्साही लोक वधू-वरांना आपल्या खांद्यावर बसवून खूप नाचवतात. त्या वेळी जोरजोराने वाजंत्री वाजविली जाते.
मुलाचा मामा वराला काही भेट वस्तू देतो त्यास 'मोशाळा' किंवा 'मामाशेळा' असे म्हणतात. ही पद्धत ऐच्छिक असून ती जंगलात राहणाऱ्या वारल्यांमध्ये आढळत नाही. ‘मोशाळा' म्हणजे मामाकडून दिलेली भेट. गुजराथी भाषेत 'मोशाळ' म्हणजे आईच्या वडिलांचे घर. त्यावरून हा शब्द आला आहे. ह्या भेटीमध्ये कोट, फेट्याचे कापड व सुमारे एक रुपया किमतीची चांदीची आंगठी ह्या वस्तूंचा समावेश असतो. वधूचा मामा तिला ज्या वस्तूंची भेट देतो तीत एक साडी, चोळी व काही चांदीचे दागिने ह्यांच समावेश असते
विवाह झाल्यानंतर वधू व वरपक्षाचे लोक आपापल्या लोकांना दुपारच्या वेळचे भोजन देण्याची व्यवस्था करतात. वर व त्याची बहीण हे दोघे मात्र मुलीच्या घरचे जेवण घेतात. संध्याकाळी दोन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून जेवतात. त्या वेळी मुलाकडून सर्वांना ताडी दिली जाते. हा विवाह सोहळ्यातील अखेरचा कार्यक्रम असतो. त्यात वधू-वरही हजर असतात. परंतु ते दोघे एकत्र बसत नाहीत. एका लहान मडक्याला हळद लावून त्यात ताडी भरतात. ह्या मडक्यास दगडाने किंवा चाकूने एक छिद्र पाडतात. छिद्रामधून येणारी ताडी नवदांपत्यास दिली जाते. त्यानंतर गावामधील वजनदार माणसे व पाहुण्यांना ती ताडी वाटली जाते. ह्यावेळेस ताडी छिद्रातून न देता मडक्यातून दिली जाते. ताडी असणाऱ्या मडक्यास हळद लावण्याचे कारण विवाहाच्या वेळी वधू-वरांना हळद लावली जाते हे होय. त्यानंतर एक मध्यस्थ नवविवाहित दांपत्याला उपदेश करतो. 'परणवेला त मरणवेला,' म्हणजे तुम्ही ज्याअर्थी आता विवाहबद्ध झाला आहात त्याअर्थी मृत्यूपर्यंत तुम्ही एकमेकांशी विश्वासाने वागले पाहिजे. तुम्ही एकमेकांस मदत केली पाहिजे. जर एकजण पडला तर दुसऱ्याने त्याला किंवा तिला आधार दिला पाहिजे. जर आंब्याचे झाड पडले तर चिंचेच्या झाडाने त्यास मदत करावी व चिंचेच्या झाडास आंब्याच्या झाडाने मदत करावी. आंबा पडेल तर चिंच धरेल, न चिंच पडेल तर आंबा धरेल.' त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांना विड्याची पाने वाटतात. त्यामध्ये गावातील सुईण, वाजंत्री वाजविणारे, देव बसविण्याच्या वेळी वराला स्नान घालणाऱ्या चार सुवासिनी, भगत, पटेल, धवलेरी व काही वजनदार माणसे ह्यांचा समावेश असतो. त्यानंतर वऱ्हाडकी (मध्यस्थ) जाहीर करतो. 'पाच गावचा राजा आला, विडा खाऊन हिडे ( हिरडे ) पडला, सिता जिंकला, न यो चालला' (पाच गावचा राजा आला, त्याने विड्याची पाने खाल्ली, सीतेला जिंकले आणि परत गेला). वर हा वधूचा कायदेशीर मालक असून तो तिला अविरोध घेऊन जाईल, हे जणू त्याद्वारे जाहीर केले जाते.
ह्या दिवसापासून वराला एखादा माणूस भेटल्यावर त्याच्याशी अभिवादन करताना 'जोहार' शब्दाऐवजी 'राम-राम' हा शब्द वापरता येतो. वऱ्हाडकीमध्ये ज्या वेळेस वर असतो त्या वेळेस तो खालील शब्दांचा पुनरुच्चार करतो. 'नायका, पाटला राम-राम, सरकार दरबारा राम-राम, वाटे घाटे राम-राम. विवाहानंतर वराला परीपूर्ण मनुष्य समजण्यात येते. ह्यापुढे समूहामध्ये ताडी पिताना त्याला राम - राम असे म्हणावे लागते.
विवाह सोहळ्यात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वधूपक्षाला वरपक्षाकडील लोकांना एकही जेवण द्यावे लागत नाही किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागत नाही. वधूपक्षाकडील लोकांना फक्त त्यांच्या नातेवाईकांना व मित्रांना भोजन द्यावे लागते. अशा तऱ्हेने सर्वांचे समाधान केल्यानंतर वरपक्षाकडील लोक नवविवाहित दांपत्यासह परत घरी येतात. परत येताना वर रस्त्यातील तोरणाची पाने तोडतो. आपल्या नववधूमह घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याची आई दारातच त्यांना ओवाळते. त्यानंतर वरातीमधील सर्वजण मद्यपान करतात, नाचतात व रात्रभर मजा करतात. वाजंत्री वाजविणारे लोक वेगवेगळे सूर वाजवून त्यामध्ये सहभागी होतात. दुसरे दिवशी वधू-वरांचे समारंभपूर्वक स्नान केले जाते. त्या वेळेस चार सुवासिनी त्यांना हळद लावतात, आंब्याच्या पानांनी त्यांच्या अंगावर पाणी शिंपडून त्यांचे स्नान करतात. नंतर त्यांना एकमेकांच्या शेजारी बसवितात. वर आपल्या दातामध्ये आंब्याचे एक पान धरतो व वधू आपल्या दाताने ते पान तोडते. त्यानंतर वधू आपल्या दातामध्ये पान धरते व वर ते पान उजव्या हाताने तोडतो.
वराकडे एक दिवस राहिल्यानंतर नवीन दांपत्याला वधुपित्याकडे आमंत्रित केले जाते. तेथे ते काही दिवस राहतात. विवाह विधीच्या वेळी वराला चटई किंवा लाकडी पाटावर बसता येत नाही. मात्र तो गोणपाटावर बसू शकतो. चटई व पाट ह्या दोन्ही वस्तू झाडापासून बनविलेल्या असतात व झाडाला जीवन असते, परंतु गोणपाट हे निर्जीव आहे, अशी वारल्यांची धारणा आहे.
विवाह सोहळा पावसाळ्याव्यतिरिक्त वर्षभरात केव्हाही करता येतो. ज्या प्रमाणे हिंदू पौष महिन्यात विवाह करीत नाहीत त्याचेच अनुकरण वारलीही करतात. हिंदूंच्या पंचांगातील अमावास्येचा दिवसही कटाक्षाने टाळला जातो, कारण अमावास्येची रात्र ही सर्वांत अंधाराची समजली जाते व ती भुताखेतांना अनुकूल असते.
विवाहाचे विधी हे धवलेरीकडून केले जातात. धवलेरी ही गावातील एक वडीलधारी स्त्री असून ती विवाहाच्या वेळी पुरोहित म्हणून काम करते. विवाह समारंभात ती सारखी धावपळ करीत असते. ती विवाहाची गाणी म्हणते व त्याबद्दल तिला मोबदला दिला जातो. धवलेरीला मानाचे स्थान असून तिच्याकडे सर्वजण आदराने पाहतात. तिच्या मदतीला दोन स्त्रिया असतात. धवलेरी जी गाणी म्हणते त्यांचा त्या पुनरुउच्चार करतात. फक्त धवलेरीलाच सर्व गाणी येत असतात.
वारल्यांची अशी श्रद्धा आहे की धवलेरी जी गाणी म्हणते ती तिला मिळालेली ईश्वरी देणगी होय. अशी गाणी इतर कुणालाही म्हणता येणे शक्य नाही. धवलेरी ही तयार होऊ शकत नाही, ती उपजतच असावी लागते. परंतु एखादी हुशार स्त्री जर धार्मिक गाणी शिकली तर ती धवलेरी होऊ शकते. मला एका धवलेरीने सांगितले की तिच्या लहानपणी स्वप्नात तिला ह्या गाण्यांचा साक्षात्कार झाला. आणि जेव्हा विवाहाचे विधी सुरू झाले तेव्हा तिला वेगळ्याच प्रकारचे झटके येऊ लागले. ह्या एका लहान प्रसंगावरून वारल्यांच्या मते धवलेरीला ईश्वरी देणगी प्राप्त झाली आहे हे दिसून येते.
विवाह समारंभात अगदी सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत ताडीचा सर्रास वापर केला जातो. ह्या समारंभात जी भांडणे होतात, ती मुख्यत: ताडीशी संबंधित असतात. ज्या काही लोकांना ताडी दिली जात नाही किंवा ज्या जवळच्या नातेवाईकांना ताडीचा योग्य वाटा मिळत नाही, असे लोक ताडीसाठी भांडतात. विवाहाच्या मंडपात किंवा झोपडीत ताडीने भरलेली मडकी पहावयास मिळतात. शिळ्या ताडीच्या आंबट वासाने सर्व वातावरण भारलेले असते. पुरुष आणि स्त्रिया ताडीच्या नशेत असतात. काही माणसे तर जास्त ताडी प्यायल्यामुळे बेभान झालेली आढळतात. ते लोक बडबडत, ओरडत, गाणी गात फिरत असतात. ते जमिनीवर लोळत असतात, धावतात, उड्या मारतात व अनेक गोष्टी करतात की ज्यामुळे तेथे जमलेल्या लोकांची करमणूक होते.
वारल्यांच्या विवाहात त्यांना गोड पदार्थांची आवश्यकता नसते. इतकेच नव्हे तर जमलेल्या लोकांना जेवणातही फारसा रस नसतो. ताडी जर देण्यात आली नाही तर त्यांना विवाह सोहळ्याचेही महत्त्व वाटत नाही. ज्याप्रमाणे त्यांना भगत किंवा धवलेरी ह्यांच्याशिवाय चालत नाही तसेच ताडीशिवायही चालत नाही. ताडीमुळे जी भांडणे होतात त्यामुळे विवाहातील गांभीर्य नष्ट होते.
विवाहासाठी सुमारे दीडशे रुपये खर्च येतो. हा खर्च वरपक्षाला करावा लागतो. ह्यापैकी बहुतांशी रक्कम ताडीपायी खर्च केली जाते. वधूला द्यावयाचे कपडे व चांदीचे दागिने ह्यासाठी सुमारे वीस रुपये खर्च येतो, तर दारूसाठी चाळीसे रुपये खर्च करतात. रूपात दिली जाते. वाजंत्री वाजविणाऱ्यांना तीन रुपये व ते देज म्हणजे वधूची किंमत बारा ते तेरा रुपये रोख रकमेत व सहा ते सात रुपये धान्याच्या 'दुसऱ्या जमातीचे असतील तर दहा रुपये दिले जातात. जेवणाचा खर्च वीस रुपये असतो. इतर खर्च की ज्यामध्ये धवलेरीला द्यावयाची रक्कम अंतर्भूत असते, तो खर्च सुमारे वीस रुपयांचा असतो. ह्या व्यतिरिक्त बोल ह्या विधीसाठी वीस रुपये खर्च केला जातो, ही रक्कम प्रामुख्याने ताडीवरच खर्च केली जाते. वधूपक्षाकडील लोकांना त्यामानाने खर्च कमी असतो. वरपक्षाकडून जो देज येतो त्यापैकी काही रक्कम विवाहासाठी खर्च करतात. वधूच्या किंमती व्यतिरिक्त तिच्या वडिलांना वरपक्षाकडून भात व ताडी दिली जाते. वधूच्या पित्याला कोणतीही भेट द्यावी लागत नाही. तसेच त्याला स्वतःच्या खिशातून चाळीस रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत नाही. विवाहासाठी जो खर्च येतो त्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागते. जर वर वयाने लहान असला तर त्याच्या वडिलांना सावकाराकडे वेठबिगारीसाठी करारनामा लिहून द्यावा लागतो.
काहीवेळेस अशी वेठबिगार आयुष्यभर केली जाते व ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेली असते. पैसे नसल्यामुळे काही पुरुष उतार वयापर्यंत अविवाहित राहतात. काही मुलींचे आईबाप आपल्या मुलीची जास्त किंमत यावी म्हणून दुराग्रही भूमिका घेत असल्यामुळे अशा मुलीही उतार वयापर्यंत अविवाहित राहतात.
वर वर्णन केलेले विवाह विधी वारल्यांच्या सर्व विभागांत व प्रामुख्याने उत्तरेकडील वारल्यांत अनुसरले जातात. दक्षिणेकडील वारल्यांत मात्र ह्या विधीमध्ये थोडा फरक आढळतो.