समाज व्यवस्था निटपणे टिकून राहावी या हेतूने समाजामध्ये काही मापदंड असतात. समाज हा सैरावैरा जाऊ नये व समाजाचे अस्तित्व अबाधित राहावे याकरीता काही सामाजिक नियमांची उतरंड अस्तित्वात असते. समाजातील सदस्यांना स्वातंत्र्य जरी असले तरी स्वातंत्र्याचा गैरवापर होवू नये याची दक्षता समाज घेत असतो. समाजामध्ये असलेले स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक नियमांना तडा न जावू देणारे वर्तन असते. स्वातंत्र्याचा उपभोग घेतांना आचारसंहितेचा विचार करावा लागतो. समुदायातील सदस्यांनी कसे वागावे, असे वागू नये, याकरीता नियमावली असते. प्रत्येक समाजाने सामाजिक नियम तयार केले आहेत. समाजातील सदस्य नियमांना झुगारुन वर्तन करु लागले तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही. आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकण्यामागे कायदे आणि न्यायव्यवस्था कारणीभूत आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याच्यामध्ये आदानप्रदान क्रिया होत असते. मनुष्याच्या ज्या गरजा असतात त्या समाजाद्वारा भागविल्या जातात. समाजातील सदस्य आपुलकेने वागावे, त्यांच्यात संघर्ष होवू नये, सहकार्याची भावना असावी. सदस्यांनी योग्य वर्तन करावे याची काळजी समाज घेतो. समाजाच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्याच्या विरोधात शासन करण्याची व्यवस्था आहे, म्हणूनच समाजाचे ऐक्य व अस्तित्व अबाधित आहे. समाजमध्ये वर्तन किंवा नियमाचे पालन करण्याकरीता स्वतंत्र यंत्रणा असते ति म्हणजे कायदा होय. या सामाजिक कायदयाची अंमलबजावणी केल्या जाते. आदिवासी- मधील कायदयाचे प्राबल्य खालील बाबींवरुन स्पष्ट होते.
जमातीमधील कायदयाचे योग्यरित्यापालन करावे असा दंडक आहे. कायदा झुगारुन चालत नाही. कायदयाचा भंग करणाऱ्यास शिक्षा ठोठावली जाते. आदिवासींमध्ये असलेले कायदे लिखीत स्वरुपाचे नसून सुद्धा आदिवासीं- मध्ये कायदयाचे प्राबल्य दिसून येते. आधुनिक समाजात लिखीत कायदयाचे अस्तित्व दिसत असून कायदयाच्या आधारे न्यायालय निर्णय देते. परंतु आदिम जमातीत कायदेमंडळ अथवा न्यायालय नसतांना सुद्धा आदिम कायदयाची अंमलबजावणी योग्यरीत्या व तंतोतंत केल्या जाते. आदिम जमातीत सामाजिक कायदयाचे अस्तित्व अबाधित आहे. आदिमांमध्ये न्यायालये जरी नसले तरी न्यायव्यवस्था अस्तित्वात असून त्याद्वारे न्यायदान केल्या जाते.
१) समाजाचे अस्तित्व - सभ्य समाज असो वा आदिम जमात यावर सामाजिक नियंत्रण असावा. शिवाय अस्तित्व टिकू शकत नाही. आजही आदिवासी समाज व्यवस्था त्यांच्यातील कायदयाच्या प्राबल्यामुळेच टिकून आहे. त्याच्यातील टिकून आहे. सामाजिक व्यवस्थेमुळेच आदिम जमातीचे अस्तित्व प्रदिर्घ काळापासून टिकून आहे.
२) एक संघ समाज - समाज कोणताही असो सदस्यांमध्ये संघर्ष, मतभेद, वाद असतात. वाद निर्मूलन करण्याचे कान कायदा करीत असतो, त्यामुळेच समाजाची एकता व अखंडता टिकून असते. आदिम जमातीत आजही एकता आढळून येते. सदस्यांची समुह भावना, परस्पर सहकार्य, सामुहिकरीत्या अर्थाजन इ. योग्य पद्धतीने केले जाते. समाजविरोधी कृत्य करणाऱ्या सदस्यास शिक्षा केली जाते, परंतु जमातीचे नितीनियमांचे पालन करणाऱ्या सदस्यांच्या संरक्षणाची व विकासाची जबाबदारी जमात घेत असते. कायद्याच्या प्राबल्यामुळेच जमात एकसंध असते.
३) समूह भावना - आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यात, डोंगराळ भागात वास्तव्य करीत असल्यामुळे मागासलेला असून आर्थिक दुर्बलता, परावलंबी जीवन आहे. यामुळे समुह भावना निर्माण होते. समुह भावनेतून समाजाचे अस्तित्व टिकून ठेवण्याकरीता कायदयाचे पालन केल्या जाते. वरील विवेचनावरुन कायदयाचे अस्तित्व आदिम जमातीत नव्हते असे म्हणणे चूकीचे होईल. आदिम जमातीत कित्येक वर्षापासून कायदयाचे अस्तित्व आहे. सभ्य समाजासारखी विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायालय किंवा न्यायव्यवस्था अस्तित्वात नसली तरी मात्र आदिम कायदयाचे स्वरुप आगळेवेगळे लक्षात येते. आजही कायदयाची पकड असल्यामुळे पूर्वी पासूनच कायदयाचे अस्तित्व आहे हे लक्षात येते.