पाड्यावरील सर्व लोकांना मंडपाच्या विधीसाठी आमंत्रित केले जाते. लग्नाचा मंडप झोपडीच्या समोरील अंगणात उभा करतात. तो चौकोनी आकाराचा असून त्यात नऊ खांब असतात. मंडप वाळलेल्या गवताने आच्छादलेला असतो. मंडप जरी सर्व बाजूने उघडा असला तरी एका बाजूने बांबूची अर्धवर्तुळाकार कमान केलेली असते. ही कमान मंडपाचे प्रवेशद्वार म्हणून समजली जाते. मंडपात आंब्याच्या पानाची आडवी व उभी तोरणे बांधलेली असतात. मंडपापासून थोड्या अंतरावर दोन लाकडी खांब रोवून त्यालाही तोरणे बांधतात. ही तोरणे विवाह समारंभाची सीमा मानली जाते. मंडपाचा पहिला खांब रोवण्यासाठी जो खड्डा खणला जातो त्यात भात, सुपाऱ्या व पैसा टाकतात. सुवासिनी खांबांना हळदकुंकू लावून मंडपाची ओवाळणी करते. लग्नाचा विधी करणारी पुरोहित स्त्री वाजंत्री वाजविणाऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन उंबर वृक्षाची एक फांदी आणते. पती ती फांदी कापतो व पत्नी ती फांदी हातात धरते. त्यावेळेस धवलेरी गीत म्हणते. ह्या गीतामध्ये देव फांदी कापतो व देवता ती धरते असे वर्णन आहे. जी स्त्री फांदी आणते ती त्या फांदीला थोडी हळद लावते. पुरुष ती फांदी मंडपाच्या मधोमध जमिनीमध्ये पुरतो. ही फांदी पुरताना जो खड्डा खणतात त्यात मात्र भात किंवा सुपाय टाकत नाहीत. फांदी लावताना नवरामुलगा तिला हात लावतो. तेथे जमलेल्या पाहुण्यांना ताडी किंवा शक्य झाल्यास जेवण दिले जाते.