![]() |
ही जमात जे समारंभ साजरे करते त्यामध्ये लग्न समारंभ हा सर्वांत महत्त्वाचा आहे. ह्याप्रसंगी पाड्यावरील सर्व लोक मोठ्या उत्साहाने भाग घेतात. हा समारभ समाजाच्या अत्यंत आवडीचा आहे. वारल्यांचे लग्न चार ते पाच दिवस चालते. ह्या काळात लहानसहान विधी करण्यावरही त्यांचा भर असतो.
मुलांचे विवाह कोणत्याही वयात केले जातात. परंतु सर्वसाधारणपणे मुलगी सात ते आठ वर्षे वयाची व मुलगा बारा वर्षे वयाचा असावा लागतो. काही वेळेस वयाची मर्यादा वाढविलीही जाते व मुलगा कमावता होईल हे पाहण्यात येते. पैशाची अडचण हेही वारल्यांमध्ये उशिरा विवाह होण्याचे एक कारण आहे.
विवाहावरील बंधने:-
एकाच कुळात विवाह करण्यास प्रतिबंध असतो. कूळ हे काही कुटुंबे एकत्र मिळून झालेले असते. मुलाला किंवा मुलीला ह्या कुळाच्या बाहेरच विवाह करावा लागतो. मुलाला त्याच्या आत्याच्या किंवा मामाच्या किंवा मावशीच्या मुलीशी विवाह करता येत नाही. मुलीलाही तिच्या आतेभावाशी किंवा मामेभावाशी किंवा मावसभावाशी विवाह करता येत नाही. मात्र दक्षिणेकडील वारल्यांमध्ये मुलाला त्याच्या मामेबहिणीशी विवाह करण्यास परवानगी दिली जाते. तसेच मुलीला तिच्या आतेभावाशीही विवाह करता येतो. ह्याचे कारण त्यांच्यावर मराठा व कुणबी समाजाचा असलेला प्रभाव हे होय. ह्या दोन्ही समाजांत अशा तऱ्हेचे विवाह करण्याची केवळ प्रथाच नव्हे तर ते जणू एकाअर्थी आवश्यकही असते. विवाहाची बंधने केवळ नात्यातील माणसांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सर्व माणसांनाही लागू होतात. अशा तऱ्हेने मुलगा आपल्या मावसबहिणीशी, तसेच मावशीच्या पुतणीशीही विवाह करू शकत नाही.
वाङ्निश्चय म्हणजे काय ?
प्रत्यक्ष विवाहापूर्वी काही वर्षे अगोदर वाङ्निश्चय केला जातो. काही वेळेस वाङ्निश्चयानंतर त्वरित विवाह होतो. थोडक्यात वाङ्निश्चय किंवा बोल हा दोन्ही पक्षांनी विवाहासंबंधी केलेला करार असतो. बोल म्हणजे शब्द, अशा तऱ्हेने नवऱ्या मुलाच्या बाजूने नवऱ्या मुलीला व नवऱ्या मुलीच्या बाजूने नवऱ्या मुलास शब्द दिला जातो. मुलामुलींचे वाङ्निश्चय अगदी लहान वयातही करता येतात.
बोल दोन प्रकारचे असतात. पहिला किंवा लहान व दुसरा किंवा मोठा. हे दोन बोल एकाच वेळी किंवा काही दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या वेळेस करता येतात. त्यापैकी पहिला बोल महत्त्वाचा नसतो. विवाह हा दुसऱ्या बोलावर अवलबून असतो. पहिल्या बोलाचा खर्च फक्त दोन ते तीन रुपये तर दुसऱ्याचा खर्च दहा ते वीस रुपये असतो. पहिल्या बोलाच्या वेळी दोन सुवासिनींसह नात्यामधली सात ते आठ माणसे वधूच्या घरी जातात. झोपडीच्या दरवाज्यात त्यांचे स्वागत केले जाते. त्याला 'दाराचे पाव्हणे' असे म्हणतात. ह्या लोकांबरोबर कोणतीही वाजंत्री नसते. त्यांना फक्त सहा गॅलन ताडी नेऊन ती मुलीच्या घरी जमलेल्या लोकांना द्यावी लागते. त्या व्यतिरिक्त हे लोक मुलाच्या वडिलांकडून ताडीसाठी आठ आण्याची मागणी करतात. ह्या पैशाला ‘वाटचाली' असे म्हणतात, कारण ते लोक मुलाच्या घरापासून मुलीच्या घरापर्यंत चालत आलेले असतात. दुसरा बोल केव्हा करावयाचा हे दोन्ही पक्ष त्यानंतर ठरवितात.
दुसऱ्या बोलाच्या वेळी मुलाचे नातेवाईक व आईबाप वाजंत्री घेऊन मिरवणुक मुलीच्या घरी जातात. त्यावेळी वाजंत्री वाजविण्याबद्दल वाजंत्री वाजविणारे एक रुपयाची मागणी करतात. मुलाकडील पक्षातील लोक सुमारे बारा गॅलन ताडी आपल्याबरोबर नेतात. त्यांना ती ताडी मुलीकडे जमलेल्या लोकांना द्यावी लागते. तसेच दोन फरे भातही त्यांना बरोबर न्यावे लागते. मुलीसाठी ज्या भेट वस्तू न्याव्या लागतात त्यामध्ये एक रुपया किंमतीची साडी, चार आणे किंमतीची चोळी व तीन आणे किंमतीच्या बांगड्या ह्याचा समावेश असतो. मुलीच्या पक्षाकडील एक स्त्री तेथे जमलेल्या स्त्रियांना त्यांच्या केसांना लावण्यासाठी खोबरेल तेल वाटते. मुली व तरुण स्त्रिया त्यांच्या कपाळास कुंकू लावतात. प्रौढ व वृद्ध स्त्रिया मात्र तसे करीत नाहीत. काही स्त्रिया आपल्या केसामधील भांगात शेंदूर भरतात.
गावातील एक वजनदार मनुष्य ज्याला कारभारी म्हणून संबोधतात तो मुला-मुलीच्या पक्षात मध्यस्थ म्हणून काम करतो. तो मुला-मुलीच्या वडिलांना एकत्र आणतो. ते दोघे आपल्या हातात ताडीने भरलेले द्रोण घेतात. त्यानंतर कारभारी मुलाच्या वडिलांना विचारतो, 'ही पहा मुलगी, ती आंधळी, लुळी किंवा भुताळी असू शकेल. तुला जर ती पसंत असेल तर तू तिला सून म्हणून स्वीकार कर. मात्र नंतर तुला दोष देता येणार नाही. तुला हे कबूल आहे का ?' त्यानंतर मुलाचा बाप मुलीच्या बापाच्या द्रोणात ताडीचे दोन थेंब टाकतो. मुलीचा बापही तसेच करतो. त्यानंतर ते दोघेही ताडी पितात. मुला-मुलीच्या आया त्यांचे अनुकरण करतात. कारभारी वरपक्षाच्या बाजूने मुलीला नवीन कपडे देतो. मुलगी हे कपडे परिधान करून ज्या विधीसाठी येते त्या विधीला 'ओटी भरणे' असे म्हणतात. ह्या विधीमध्ये मुलीच्या साडीच्या पदरात नारळ, सुपाऱ्या, तांदूळ आणि आठ आण्याचे नाणे ठेवतात, हे काम सुवासिनी करते. हा विधी चालू असताना धवलेरी गाणी म्हणत मुलीची ओवाळणी करते. त्याबद्दल धवलेरीला एक रुपया दिला जातो. त्यानंतर जमलेल्या सर्व स्त्रीपुरुषांना ताडी दिली जाते. जर दोन्ही पक्ष सधन असतील तर वानिश्चयानंतर लवकरच विवाह उरकण्यात येतो. जर तसे करणे शक्य झाले नाही तर काही वर्षांनंतर विवाह केला जातो. सहसा वाङ्निश्चय मोडला जात नाही. जर वाङ्निश्चय मुलाच्या बाजूने मोडला गेला तर मुलाकडील लोकांना मुलीकडच्यांना काही द्यावे लागत नाही. कारण बोल करण्याचा सर्व खर्च मुलाच्या पक्षाने केलेला असतो. परंतु वाङ्निश्चय मुलीकडून जर मोडला गेला तर मुलीकडील पक्षाला मुलाला सर्व खर्च भरून द्यावा लागतो.
वाङ्निश्चयाच्या ह्या समारंभात मुलगा भाग घेत नाही. तसेच तो मुलीच्या घरीही जात नाही. परंतु उत्तरेकडील डावर वारली मात्र मुलाला मुलीकडे घेऊन जातात. बोल झाल्यानंतर मुलीचा बाप आपल्या जावयाला दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी जेवणास आमंत्रित करतो. हे आमंत्रण स्वीकारणे अगर न स्वीकारणे हे मुलावर सोपविले जाते. काही वेळेस मुलगा आपला विवाह होईपर्यंत सासऱ्याच्या घरी जाणे पसंत करीत नाही, परंतु मुलगा सुस्वभावी व नम्र असला तर तो सासऱ्याचे आमंत्रण नाकारत नाही. मुलीलाही सणाच्या दिवशी सासरी बोलावले जाते. दिवाळीच्या दिवशी तिला काचेच्या बांगड्या व चोळी सासूकडून भेट म्हणून दिली जाते.
काही वेळा वाडूनिश्चयाचा समारंभ स्वतंत्रपणे केला जात नाही. अशा वेळी विवाह आणि बोल एकत्रच उरकण्यात येतात, बोल हा विधी केला जात नाही. फक्त मुलीकडील लोकांना ताडी वाटली जाते आणि मुलीला भेटवस्तू दिल्या जातात.