विवाह समारंभ केव्हा करावयाचा हे वरपक्षाला वधूपक्षाकडे कळवावे लागते. काही थोडे लोक भाताचे भारे घेऊन वधूकडे जातात. विवाह समारंभ झाल्यानंतर वधूवरांना एकत्रितपणे भाताची झोडणी करावी लागते. ह्या भाताला 'घाणा' असे म्हणतात आणि त्या मिरवणुकीला 'घाणा नेणे' असे संबोधतात. घाणाच्या विधीत वरपक्षाला देज द्यावा लागतो. ह्या देजामध्ये बारा फरी भात (सुमारे तीन मण), दोन शेर वाल, आठ ते दहा गॅलन ताडी व बारा ते पंधरा रुपये ह्यांचा समावेश असतो. देज किंवा वधूची किंमत ही तिच्या वडिलांना आपल्या मुलीच्या विवाहाचा खर्च भागविण्यासाठी दिली जाते. घाणाच्या वेळेस देजा व्यतिरिक्त मुलीच्या पित्याला एक बाटली दारू व तंबाखूच्या पानांचा पुडा भेट म्हणून दिला जातो. मुलीच्या आईस पाच रुपये दिले जातात. ह्या पैशाकडे उसणवार म्हणून पाहिले जाते. परंतु त्याची परतफेड करावयाची किंवा नाही ते मुलीच्या आईने ठरवायचे असते. पाड्यावरील लोक मुलाच्या पित्याकडून ताडी पिण्यासाठी दीड रुपयाची मागणी करतात. गावचा पटेल एक रुपयाची मागणी करतो. मुलीचा काका व मामा प्रत्येकी आठ आण्याची मागणी करतात. गावातील पहारेकऱ्यांचाही आठ आण्याचा वाटा असतो. मुलाकडील लोकांनी आणलेली ताडी दोन्ही पक्षांतील पाहुणे एकत्र बसून पितात. त्या वेळी वऱ्हाडकी किंवा कारभारी जाहीर करतो की वराचा लग्नाचा मांडव संध्याकाळी घातला जाईल आणि तुमचा वधूकडील मांडव उद्या होईल.