आदिवासींच्या विविध समस्येमध्ये आरोग्याची समस्या अत्यंत ज्वलंत आहे. शिक्षणाचा अभाव, धर्माचा प्रभाव व अंधश्रद्धा यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुपोषण, बालमृत्यू, गरोदर मातांचा मृत्यु इ. समस्या मोठया प्रमाणात आहे. आदिवासींमध्ये कुपोषणाची समस्या उभी ठाकली आहे. भारतातील अनेक राज्यात कुपोषणाची समस्या आहे. जागतिक दृष्टिने विचार केल्यास भारताचा कुपोषणामध्ये पहिला क्रमांक आहे. २०१२ पर्यंत भारतामध्ये जवळजवळ ७०,००० बालके मृत्युमुखी पडली. कुपोषित बालकांचा प्रारंभ आईच्या गर्भातच होतो. मातेला योग्य पोषक आहार मिळाला नाही, मातेचे दुध बाळाला पचत नाही. बाळाला कावीळ, न्युमोनिया, हगवण यासारख्या आजाराची लागण होवून बाल मृत्युमुखी पडते. बाळाला पौष्टिक आहाराची आवश्यकता असते, पण पौष्टिक आहार आदिवासींमध्ये मिळत नाही. बाळाला साधारणतः ६ महिने ते ३ वर्षाच्या कालावधीमध्ये ५०० उष्मांक व १२ ते १५ ग्रॅम प्रथीने दररोजच्या आहारातून मिळाले पाहिजे. तसेच माता गरोदर असल्यास ६०० उष्मांक व १८ ते २० ग्रॅम प्रथिने आहारातून मिळाले पाहिजे इतका योग्य आहार मिळत असेल तर बाळ व बाळंतीण सदृढ राहते, परंतु एवढा पौष्टिक आहार आदिवासी आर्थिक परीस्थितीमुळे देवू शकत नाही. त्यामुळे आदिवासी बालके कुपोषित होवून बहुतांश मृत्युमुखी पडतात. कुपोषणाने देशाच्या अनेक राज्यात तांडव घातले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा, बिहारमध्ये कुपोषण मोठया प्रमाणात आहे.
आदिवासी वास्तव्य करीत असलेल्या डोंगरात व जंगलात जुन ते सप्टेंबर हा कालावधी अती संवेदनशील असतो. या काळात अधिकाधिक बालमृत्यू होतात. आदिवासींच्या कुपोषणाची अनेक कारणे आहेत. आदिवासींवर धर्माचा प्रभाव व अंधश्रद्धेमुळे कुपोषणास वाव मिळतो. वैद्यकिय सेवा घेण्यापेक्षा जमातीमधील भूमका, भगत, मांत्रिकावर विश्वास आहे. मुल आजारी असल्यास दवाखान्यात न जाता मांत्रिकाकडून आजारावर उपचार करुन घेतात.
आदिवासी रोजगारांपासून वंचित आहे. स्थानिक ठिकाणी त्यांना रोजगार मिळत नाही. अशावेळी रोज़गारांकरीता स्थानांतर करतात, व मिळेल तेथे वस्ती करुन राहावे किंवा भर उन्हात कामे करुन तेथेच बाळाचे संगोपण केल्या जाते. आदिवासी बहुल भागात बहुसंख्य बालके कुपोषित आहेत. बहुसंख्य आदिवासी निरक्षर असल्यामुळे वैद्यकीय ज्ञान त्यांना नसते. गरोदर मातेने जास्त अन्न खाल्ल्यास पोटातील बाळ मोठे होईल आणि बाळंतपणास अडचण येईल असा गैरसमज काही जमातींमध्ये आहेत. अशावेळी बाळाला मातेच्या दुधाची गरज असते. पण मातेचे दुध बाळाला मिळत नाही, व ६ महिन्यांवरील बाळांना अन्न सुद्धा मिळत नाही. साधारणतः ६ ते २४ महिने कालावधी बाळांकरीता अतीसंवेदनशील असतो. बाळाला दुध मिळत नाही. मातापित्यामधील वेसनाधिनता असल्यामुळे पिता वेसनावर आपली कमाई खर्च करतो ज्यामुळे मुलांवर पैसा खर्च करु शकत नाही. कुटुंबातील कुटुंब प्रमुख दारुवर खर्च करतो. त्यामुळे गरोदर मातेच्या आहारावर खर्च करु शकत नाही.
आदिवार्सीमधील कुपोषणाची कारणे -
१) मातेस गर्भधारणा झाल्यानंतर औषधोपचार न करता पारंपारिक उपचार करणे.
२) कमी वयात मुलींचे लग्न करणे.
३) दोन अपत्यांमधील अंतर कमी असणे.
४) जमातीमधील मांत्रिकांकडून बाळाच्या आजारावर उपचार करुन घेणे.
५) अशुद्ध पाणी बाळास देणे.
६) गरोदर मातेमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे.
७) गरोदर माता व बाळाच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्या जाते.
८) बाळाचा जन्म होताच एक तासाच्या आत स्तनपान न करणे.
९) जन्मलेल्या बाळास कमीत कमी ६-७ महिने पौष्टिक आहार न देणे.
१०) आदिवासी वास्तव्य करीत असलेला डोंगराळ भाग असल्यामुळे दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे.
आदिवासी वस्ती असलेल्या भागामध्ये दळणवळणाची अत्यंत समस्या आहे. वैद्यकीय सेवा आदिवासींना मिळू शकत नाही. पावसाळ्यात धो-धो पाऊस त्यामुळे साथीच्या रोगांचे थैमान, हिवाळ्यात अतीशय कडक थंडी व उन्हाळ्यात कडक ऊन असते. या भागाची भौगोलिक रचना हे सुद्धा कुपोषणास कारणीभूत आहे. यामुळे वैद्यकीय सेवा वेळेवर पोहचू शकत नाही. अती डोंगराळ व घनदाट जंगलाने वेढलेला भाग असल्यामुळे वेळेवर संपर्क होवू शकत नाही.
कुपोषण म्हणजे काय ?
बालकांच्या वयाचा विचार करता वजन व उंची यांचा असमतोल म्हणजे कुपोषण होय. कुपोषणाची सुरुवात मातेच्या गर्भातच होते. माता कुपोषित असली तर गर्भाशयातील बाळही कुपोषित होते.
आदिवासीच्या कुपोषणाची लक्षणे -
१) बाळाचे हात, पाय, पोट वाढते.
३) मांसपेशी अंकुचणे
५) शरीरावर सूज येते.
७) पिवळ्या रंगाची त्वचा
९) चालतांना किंवा काम करतांना थकवा येतो.
१०) पचनक्रियेस बिघाड होतो.
२) शरीराची वाढ होत नाही.
४) वजन कमी होते.
६) चिडचिडेपणा
८) झोप येत नाही.
११) शरीरामध्ये कमजोरी येते.
महाराष्ट्रातील अमरावती, चंद्रपूर, ठाणे, नंदूरबार, गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्हयात कुपोषण मोठया प्रमाणात आहे. सरकारने २०१२ मध्ये केलेल्या तपासणीमध्ये जानेवारी २०१२ पर्यंत महाराष्ट्र राज्यात १० लाख ६७ हजार ६५९ कुपोषीत बालके असून त्यापैकी १ लाख २४ हजार ४४१ तिव्र कुपोषीत बालके होती. यापैकी २४ हजार ३६५ बालकांचा मृत्यु झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागामध्ये बहुसंख्य कोरकू आदिवासी आहेत. अमरावतीमधील मेळघाटाची गेल्या २१ वर्षातील कुपोष्णाची आकडेवारी अल्यासली असता ११ हजार २३७ बालकांचा मृत्यु झाल्याची शासकीय आकडेवारी शासन दरबारी आहे. मेळघाट मध्ये अर्भकाचा मृत्यु दर दर हजारी ४२.०५ आणि ० ते ६ वर्षे बालकांचा दर हजारी मृत्यू दर ११.२० असा आहे.
शासनाच्या आरोग्य सेवा योग्य वेळी पोहचल्यास व आदिवासींवर अंधश्रद्धेचा प्रभाव कमी झाल्यास कुपोषण समस्येला आळा बसू शकेल. याकरीता सरकार घेत असलेला अरोग्यविषयक कार्यक्रम नियोजनबद्ध आखून आरोग्याच्या व्यतिरिक्त इतन सुखसोयी पुरविणे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. जसे दळणवळणाची साधणे, रस्त्याची सोय, शाळा इत्यादि बरोबर आदिवासी भागात निवासी, आरोग्य सेवकांची नियुक्ती करणे, काळाची गरज आहे. कुपोषण हि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत ज्वलंत समस्या आहे आणि आदिवासीच्या अज्ञाणामुळे कुपोषणात वाढ होत आहे. याकरीता आदिवासींचे अज्ञान दूर करणे व योग्य वेळी आरोग्याच्या सोयी पुरविणे गरजेचे वाटते. त्याचबरोबर आदिवासीमधील शिक्षित साक्षर समाज बांधवांनी व समाज सेवकांनी कुपोषण निर्मूलनामध्ये हिररिने भाग घ्यावा.