आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन - International Right to Information Day

Tribal Mahavikas

 
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन माहिती अधिकाराने जगभर पारदर्शकतेचे नवे पर्व सुरू केले आहे. विविध देशांत झालेल्या अशा कायद्यांमुळे खुल्या शासनव्यवस्थेच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्याचा एक भाग म्हणून २८ सप्टेंबर २००२ मध्ये Freedom of Information Network या नावाने बल्गेरियामध्ये माहिती अधिकाराने भारलेल्या संघटना व कृतिगटांचे एक नवे कृतिशील संघटन जाळे उभारण्यात आले.

तेव्हापासून जगभर माहिती अधिकाराची जागृती वाढावी, तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्वाची संस्कृती गतिमान व्हावी यासाठी व खुल्या शासनव्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून पाळला जाऊ लागला.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. केआम-२००८/प्र.क्र./३७८/०८/ सहा अन्वये सर्वत्र २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, असा संदेश दिला आहे.

माहिती अधिकार सप्ताह:-
भारतामध्ये दि. १२ ऑक्टोबर २००५ पासून माहिती अधिकार अधिनियम, २००५ या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी यासाठी दि. ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र व राज्य शासन याबाबत वेळोवेळी आदेश संमत करतात. या सप्ताहादरम्यान शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करणे अपेक्षित आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवा संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकत्यांकरिता व इच्छुक गटांकरिता माहिती अधिकार मार्गदर्शन कार्यशाळा, शिबिरे, प्रशिक्षण वर्ग इ. आयोजित करून तसेच पथनाट्य, आकाशवाणीवरील व्याख्याने इ. माध्यमातून या कायद्याच्या प्रसार व प्रचारासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे अपेक्षित आहे.