(दिल्ली उच्च न्यायालय, रिट याचिका क्रमांक : ७२६५/२००७, दिनांक : २५.०९.२०१०, पूर्ण प्रज्ञा पब्लिक स्कूल, याचिकाकर्ता विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग व इतर, उत्तरबादी)
सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील खासगी संस्थेची माहिती त्या संस्थेकडून घेऊन देता येईल का, असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित करण्यात आला. या याचिकेमध्ये माहिती अधिकार कायद्याच्या २ (च) व २ (ञ) या कलमांची चर्चा करण्यात आली. अंतिमत: जर सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधीनस्थ एखादी ' खासगी संस्था असेल, तर या संस्थेकडून सुद्धा माहिती घेऊन सार्वजनिक प्राधिकरण अशी माहिती संबंधित व्यक्तीला किंवा अर्जदाराला देऊ शकतो असा निर्णय झाला. त्यामुळे जी माहिती एखाद्या खासगी संस्थेकडून सार्वजनिक प्राधिकरणाला उपलब्ध होऊ शकेल, अशी सर्व माहितीसुद्धा माहितीच्या अधिकाराखाली 'माहिती' या व्याख्येमध्ये येते.