(गुजरात उच्च न्यायालय, रिट याचिका क्र. : एस. सी. ए. क्र. १६७७०/२००७, दिनांक : ३१/०८/ २०07 गोकलभाई नानाभाई पटेल वि. मुख्य माहिती आयुक्त, गुजरात व इतर )
या याचिकेमध्ये मुख्य माहिती आयुक्तांनी माहिती अधिकार कायद्याखाली असलेल्या अधिकाराचा गैरवापर केला, असा मुद्दा याचिकाकर्त्यांने उपस्थित केला होता.
मुख्य माहिती आयुक्तांनी याचिकाकर्त्याला संधी न देता त्यांचे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. सर्व पक्षकारांचे युक्तीवाद ऐकून उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, मुख्य माहिती आयुक्तांनी दिलेले आदेश हे, माहिती अधिकार कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिले आहेत. माहिती आयुक्तांचे अधिकार कायद्याच्या कलम १८,१९ व २० मध्ये नमूद केले आहेत. ते विचारात घेतले असता, त्यांनी दिलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. माहिती अधिकाराखाली एकतर माहिती पुरवता येईल अथवा अर्ज काढून टाकता येईल. परंतु अतिक्रमण दूर करण्याचे आदेश देता येणार नाहीत. अतिक्रमण असणे किंवा नसणे हा विषय पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा आहे व त्यावर माहिती आयुक्तांना निर्णय देता येणार नाही. शिवाय या प्रकरणात पहिल्या अपिलात किंवा दुसऱ्या अपिलातदेखील याचिकाकर्त्यांना पक्षकार करण्यात आले नव्हते.