कुटुंबाच्या व जमातीच्या देव-देवतांना जागृत करून प्रसन्न करण्याचा एक विधी त्या रात्री केला जातो. ह्यासाठी झोपडीमधील एक जागा निवडून ती शेणाने सारविली जाते. त्यावर तांदुळाच्या पिठीने रांगोळी काढली जाते. त्यावर एक लाकडी पाट ठेवून तिच्यावर भात, नारळ, सुपाऱ्या, विड्याची पाने आणि फुले ठेवतात. नारणदेव, हिरवा आणि हिमाय ह्या देवदेवतांच्या मूर्ती भाताच्या दाण्यात ठेवतात. हा विधी भगत करतो. नवरा मुलगा स्नान करून भगताच्या शेजारी बसतो. त्याची बहीण शेजारी उभी राहते. चार सुवासिनी पाण्याने भरलेली मातीची मडकी घेऊन बाजूलाच उभ्या राहतात व मडक्यातील पाणी आंब्याच्या पानांनी नवऱ्यामुलाच्या अंगावर शिंपडतात. नवऱ्या मुलाच्या अंगाला पिलही लावतात. ही पिलही तांदुळाचे पीठ, नारळाचे पाणी व काही सुवासिक पदार्थ ह्यापासून बनविलेली असते. पुरुष व स्त्रिया सभोवताली बसून हा विधी पहात असतात.
दैवी शक्ती जागृत करण्यासाठी भगत आपले कपडे काढून अंगात वारे आणतो. तो देवतांना जागृत करतो व सांगतो, 'तुझा भक्त विवाह करतो आहे. तू येऊन त्याला मदत केली पाहिजे. त्यासाठी तू माझ्या शरीरामध्ये प्रवेश कर.' हे करीत असताना तो त्याचे शरीर सतत हलवीत असतो व त्यावेळी देवादिकांच्या स्तुतीपर काही शब्द आतल्याआत पुटपुटत असतो. वेगवेगळ्या देवदेवता व शक्तींना तो जागृत करतो. ह्या प्रत्येक देवतेला जागृत करण्याच्या क्रियेस 'वारे' असे म्हणतात. काही शक्ती ह्या कुलाशी संबंधित असतात. त्यांना विशिष्ट प्रकारचीच फुले अर्पण करावी लागतात. जेव्हा शेंदराय-कोकवाय जागृत केल्या जातात तेव्हा त्यांच्या मूर्तीवर शेंदूर शिंपडतात व नवऱ्या मुलाच्या कपाळावर कुंकू लावतात. जेव्हा चित्ता जागृत करतात त्यावेळी नवऱ्या मुलाच्या अंगावर ठिपके असलेले कापड पांघरतात त्यामुळे चित्याच्या कातडीचा भास होतो. भगत कोंबड्याची मान पकडून चित्याला अर्पण करतो. त्यासाठी तो गुडघे टेकून श्वापदाप्रमाणे हुंगतो व कोंबड्याची मान पकडतो. त्याद्वारे चित्याने आपले श्वापद मिळविले असा भास निर्माण करतो. ह्या कोंबड्यावर भगताचा पूर्ण अधिकार असतो. ते कोंबडे नवऱ्यामुलाच्या घरामध्ये शिजविले जात नाही.
देव जागृत करण्याचा हा विधी बराच वेळ चालू असतो. काही वेळेस त्यासाठी सर्व रात्रही जाते. हा विधी करण्यासाठी भगताला कोणतीही दक्षिणा दिली जात नाही. त्याला फक्त ताडी दिली जाते. देव बसविण्याचा विधी आटोपल्यानंतर नवऱ्या मुलाला हळद लावली जाते. त्यास 'हळद चढणे' असे म्हणतात. त्यानंतर नवऱ्याच्या आईवडिलांना, कुटुंबातील व्यक्तींना व जमलेल्या इतर माणसांना हळद वाटतात. लग्नविधी करणारी पुरोहित स्त्री तिच्या दोन मदतनिसांबरोबर अधूनमधून लग्नाची गाणी गात असते. नवऱ्या मुलास ज्या वेळी हळद लावतात त्या वेळी ती पुरोहित स्त्री नवऱ्या मुलाच्या अंगावरील वस्त्राच्या एका पदरात थोडे मीठ, हळकुंड, भात, सुपारी व अर्ध्या आण्याचे तांब्याचे नाणे घालून त्यास गाठ मारते. लग्नविधी आटोपल्यावर ह्या सर्व वस्तूंवर तिचा हक्क असतो.
नवरीकडेही अशाच तऱ्हेचा विधी केला जातो. ज्या दिवशी देव बसवायचे असतील त्या दिवशी नवऱ्याच्या आईला उपवास करावा लागतो. त्या दिवशी जवळच्या तलावामधून अगर विहिरीतून आणलेले पाणी सांभाळून ठेवले जाते. ते पाणी नवऱ्याच्या आईने प्यायल्याशिवाय पाण्याचे मडके जमिनीवर न ठेवण्याची दक्षता घेतली जाते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या खेड्यांत राहणाऱ्या वारली स्त्रिया चहा पितात. नवरीची आईही देव बसविण्याच्या दिवशी तशाच प्रकारचा उपवास करते. लग्नाच्या दिवशी मात्र उपवास केला जात नाही. नवऱ्या मुलास हळद लावल्यानंतर बाहेर जाऊ देत नाहीत. बाहेर गेल्यास त्याला भूतबाधा होते अशी त्यांची समजूत असते. तो लग्नविधी उरकल्यानंतरच स्नान करू शकतो. अंगाला लावलेली हळद धुवून जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. त्याच्या हातामध्ये सतत एक चाकू किंवा लहान सुरी असते व त्याला कोणत्याही परिस्थितीत चाकू किंवा सुरी सोडण्याची परवानगी नसते. भूतपिशाच्च लोखंडी शस्त्राला भिते असा त्यामागचा समज आहे.