गरोदरपण व प्रसूतीचे गाणे - A song of Pregnancy and Childbirth

Tribal Mahavikas

'देव विहिरी खोदण्याकरिता एकत्र झाले. त्यांनी टिकम देवास बोलावले. परंतु विहिरीला पाणी लागले नाही. त्यानंतर सुरूंग देवाला' बोलावण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तपेसर (प्रायश्चित्ताचा) हा एक देव होता. त्यालाही बोलाविण्यत आले. तपेसर विहिरीत बसला व त्याने बारा वर्षे तप केले. त्याच्या डोक्याला घाम आला. हा घामातील एक थेंब डोके, छाती, कंबर, गुडघा, पायाचे बोट व नख ह्यावरून हळूहळू सरकत येऊन शेवटी विहिरीत पडला. त्याबरोबर लगेच सर्व विहीर व तलाव पाण्याने भरले.

'तलावात कमळाच्या वेलीचा जन्म झाला. भोगेसर हा आनंद उपभोगणारा राजा तो आपल्या महालात सोन्याच्या पलंगावर पडला होता. तेथून त्याने पोयनार - कमळाची वेल - तलावात पाहिली. तो तेथे धावत गेला. परंतु पोयनार तलावात लपली. राजा रागावला व त्याच्या महालात परतला. परंतु कमळाची वेल तलावातच होती. भोगेसर तिच्याकडे परत गेला. त्याने तिला आलिंगन दिले व तिचा उपभोग घेतला. ही स्त्री - वेली गरोदर राहिली कारण तिच्या उदरात रेतन गेले. तिचे गरोदरपणातील नऊ महिने जेव्हा पूर्ण झाले तेव्हा तिने आपल्या पतीला दायी बोलविण्यास सांगितले. दायीने येताना बरोबर बांबूची बाटली व बोरूच्या चिपा आणल्या. तिने सूर्य व चंद्राला वाकून नमस्कार केला. हातात तेल घेतले व तेलाने स्त्रीच्या पोटाला मालीश केले व त्यानंतर मुलाचा जन्म झाला.

धवलेरी हे गाणे विवाह समारंभ झाल्यानंतर म्हणते. हे गाणे गरोदरपण व प्रसूतीस संबोधून आहे. वारल्यांच्या कल्पनेप्रमाणे विवाहाची नैसर्गिक परिणती गरोदरपण व प्रसूतीत होते. ही कल्पना काव्यरूपाने मांडली आहे. कमळाची वेल - पोयनी – हिचा भोगेसर राजाने उपभोग घेतला. पोयनीला ह्या गाण्यात आणण्यासाठी तिचा प्रथम जन्म कसा झाला हे गाण्याच्या पहिल्या भागात सांगितले आहे. त्यात देवाने पाणी कसे निर्माण केले हे नमूद केले आहे. टिकम आणि सुरुंग ह्या विहिरी खोदण्याच्या व सुरुंग लावण्याच्या वस्तूंना त्यांनी देवत्व दिले आहे. तपेसराने तप केले व त्याच्या घामाच्या थेंबातून पाणी निर्माण झाले. येथे ह्या नैसर्गिक घटनेचे त्यांनी अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे. तप किंवा तपस हे नेहमी उष्णशक्तीशी संबंधित असते. अशा तऱ्हेने उन्हाळ्यानंतर पाऊस येतो.

ह्या गाण्यात स्त्रीच्या गर्भधारणेची स्पष्ट कल्पना आली आहे. ह्या स्त्रीवेलीचा भोगेश्वराने उपभोग घेतला. ह्याचे रेतन पोटात गेल्यामुळे तिची गर्भधारणा झाली. दायी तेलाने भरलेली बांबूची बाटली व बोरू च्या चिपट्या घेऊन आली. लहान मुलाची नाळ कापण्यास दायी बोरूच्या चिपट्याचा उपयोग करते. धवलेरी व्यतिरिक्त इतर स्त्रियाही विवाह विधीच्या वेळेस गाणी म्हणतात प्रथम दोन स्त्रिया गाण्याची प्रत्येक ओळ म्हणतात. व त्यानंतर जमलेल्या सर्व स्त्रिया तीच ओळ पुहा एकत्र गातात. ह्या गाण्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या शब्द थोडे असतात पण त्यांच्या पंक्ती मात्र लांब असतात. ह्या प्रत्येक पंक्तीचा शेवटचा शब्द गाणाऱ्या स्त्रिया आणखीनच लांबवतात.

खालील गाणे हे एक तरुण स्त्री गाते असे मानले असून त्यात तिला तापट स्वभावाचा पती मिळाला आहे व सासरची सर्व माणसे तिच्याशी शत्रुत्वाने वागत आहेत. म्हणून ती आपल्या नशिबाला दोष देते असे दर्शविले आहे. ती म्हणते, 'मला कठोर व जुलमी सासू मिळाली आहे. ह्याबद्दल मी माझ्या नशिबाला दोष देते. माझा सासरा कर्जबाजारी आहे, हेही माझे कमनशीब आहे. माझा मोठा दीर उनाड तर धाकटा दीर छानशौकीन आणि माझा नवरा तापट स्वभावाचा आहे.'

अशाच तऱ्हेच्या दुसऱ्या गाण्यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीला विचारते की, 'तुला कशा तऱ्हेचा पती आवडेल ?' ती उत्तर देते, 'तो मला शोभेल असा असावा.' पहिली विचारते, 'अग सीताबाई, तुला जे पाहिजे ते मला सांग.' दुसरी उत्तर देते, मला योग्य असा जोडीदार नाही. मला तर असा पती पाहिजे की जो टोपी व सदरा घालतो, धोतर नेसतो व पायात बूट घालतो.'

तरुण स्त्रीच्या मनातील परिपूर्ण पुरुषाची कल्पना अगदी वेगळी आहे. तिला वाटते की असा पुरुष वारल्यासारखे कपडे घातलेला नसावा. तर त्याने हिंदूतील उच्च जातीच्या पुरुषाप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत कपडे परिधान करावेत. शेवटच्या दोन गाण्यांचा उगम अलीकडच्या काळात झालेला असावा. कारण ती गाताना त्यांचा सूर नेहमीच्या वारली गीतातील सुरासारखा नसतो. त्यातील सूर हे कोळी गीतातील सुरासारखे वाटतात. दुसऱ्या गाण्यातील सीताबाई ह्या शब्दाचा उल्लेखही असे दर्शवतो की हे गाणे अलीकडच्या काळातील असावे कारण हे नाव वारल्यात आढळत नाही.

तिसऱ्या गीतात शेतात काम करणाऱ्या दोन तरुण मैत्रिणींचे वर्णन केले आहे. त्यातील एक जण तक्रार करते की ती काम करू शकत नाही. तिला दुसरी वचन देते की तिने जर काम केले तर ती तिला भेटवस्तू देईल. 'अग सखी, मी ह्या शेतात बांध बांधू शकत नाही.' 'काही काळजी करू नकोस. मी तुला जोडवीच्या बाजारात घेऊन जाईन व तुला जोडवी विकत घेऊन देईन.' 'नाही, परंतु मी काम करू शकणार नाही. तुला चोळीच्या बाजारात घेऊन जाईन आणि रेशमी चोळ्या घेऊन देईन.' 'मी तुला साडीच्या बाजारात घेऊन जाईन व रेशमी साडी घेऊन देईन.'

दुसऱ्या गाण्यांचा संग्रह हा शेतीशी संबंधित आहे. ह्या गाण्यात जास्त वर्णन बगीच्यासंबंधीचे आहे. मात्र बगीचे करणे हा वारल्यांचा व्यवसाय नाही. हे गाणे असे आहे की ज्यामध्ये रहाटाचे व बागेचे वर्णन केले आहे. 'बैल रहाटाला जुंपला आहे. रहाट कुनकुन आवाज करीत आहे. पाणी बागेकडे जात आहे. रहाटाचे पाणी पानवेलीच्या बागेला येऊ दे, विड्याची पाने देवाच्या लग्नाला नेऊ द्या. रहाटाचे पाणी नारळाच्या बनात नेऊ द्या, हळदीच्या वाफ्यात येऊ द्या, हळदीचा उपयोग देवाच्या विवाह सोहळ्यात होऊ द्या.'

हे लक्षात ठेवले पाहिजे की वारली हे बागवान नाहीत. परंतु विड्याची पाने, नारळ व हळद ह्या तीन वस्तू विवाह समारंभात आवश्यक असतात. वधू-वरांना पुष्कळ हळद लावतात. तसेच नारळ व विड्याची पाने ही विवाहाच्या प्रत्येक विधीमध्ये आवश्यक असतात. पुढील गाणे त्याच धर्तीवर आहे :

'ह्या बागेमध्ये काय लावले आहे ?
ह्या बागेमध्ये नारळाची झाडे आहेत.
ही इसर देवाची बाग आहे.
ह्या बागेमध्ये काय लावले आहे ?
ह्या बागेत पानवेली आहेत.
विड्याची पाने देवाच्या विधीत उपयोगी असतात.
ह्या बागेत काय लावले आहे ?
येथे सुपारीची झाडे आहेत.
सुपाऱ्या देवाच्या विधीसाठी लागतात.

ह्या प्रकारचे दुसरे गाणे खालीलप्रमाणे आहे :

'उंबराच्या झाडाच्या मुळाशेजारी
विहिरी खणतात.
ह्या विहिरीतील पाणी काळे व निळे असते.
दमलेला. - भागलेला पक्षी ते पाणी पितो,
पाणी प्यायल्यानंतर तो ताजातवाना होतो.
तो उडून जातो व नारळाच्या झाडावर बसतो.
नारळाचे झाड का बर कापतात ?'

वारली उंबराचे झाड फार पवित्र मानतात. त्यांना वाटते की उंबराच्या झाडाशेजारी जर विहीर खणली तर तिला गोड पाणी लागते.

खालील गाणे एका वधूचे असून ती तिच्या विवाहप्रसंगी आपल्या मामाकडून दागिने घेण्यासाठी पैसे मागते :
'मला जोडवी आणून
अरे मामा, मला त्यासाठी पैसे दे,
मला दोन चोळ्या आणून दे
अरे मामा, मला त्यासाठी पैसे दे.
मला एक चमकी आणून दे.
मामा मला त्यासाठी पैसे दे.

ह्या गाण्यात मामाने आपल्या भाचीला तिच्या विवाहप्रसंगी काही भेटी द्यावयाच्या असतात, असे सांगितले आहे. जत्रेचे वर्णन असलेले हे गाणे आहे :

'आम्ही जत्रेला गेलो, तेथे देवाचे घर आहे,
तेथे गाड्या भरून साड्या आणल्या होत्या.
तेथे गाड्या भरून आंगठ्या आल्या होत्या.
तेथे गाड्या भरून चोळ्या आल्या होत्या.
तेथे गाड्या भरून काळ्या मण्यांच्या सऱ्या आल्या होत्या.
अणि तेथे गाड्या भरून लग्नाची बाशिंगे, हळद, बांगड्या आणि
कांबळ्या आणल्या होत्या.

जत्रेचे ठिकाण म्हणजे ते देवाचे घर मानतात. वर नमूद केलेल्या सर्व वस्तू ह्या वेगवेगळ्या प्रकारचे दागिने किंवा कपडे असतात. ते गरीब असल्यामुळे त्यांचे दागिने फार थोडे असतात. दुसऱ्या गाण्यात जवळजवळ तीच नावे परंतु वेगळ्या परिस्थितीत पुन्हा सांगितली आहेत.

'डोंगरावरून कसला आवाज ऐकू येतो ?
ते माझ्याकरिता आंगठ्या पेट्यांमधून भरत आहेत.
डोंगरावरून कसला आवाज ऐकू येतो ?
माझ्यासाठी साड्यांच्या पेट्या भरल्या जात आहेत.
ते पेट्यांमधून चोळ्या भरत आहेत.
माझ्यासाठी काळ्या मण्यांचे हार आणि डाळ आहे.

एका दुसऱ्या गाण्यामध्ये त्याच प्रकारची कल्पना वेगळ्या पार्श्वभूमीवर मांडली आहे :

'इसरदेव ह्या वाटेवर पहारा करीत आहे
आमच्या हळदीच्या पिशव्या ह्या वाटेने आणा.
आमच्या नारळ-सुपारीच्या पिशव्या ह्या वाटेने आणा.
तसेच आमच्या साड्यांच्या पिशव्या, काळ्या मण्यांचे हार
आणि लग्नाची बाशिंगे ह्या वाटेने येऊ द्या.'

खालील गाण्यामध्ये मुलगी स्वत: पतीच्या शोधार्थ कशी जाते ह्या संबंधीचे वर्णन आहे. :

'आई, मी चिंचणी' गावात गेले,
बाबा, मी चिंचणी गावात गेले होते.
मी चिंचणी गावभर फिरले.
परंतु जीवनाचा जोडीदार काही मिळाला नाही.

काही वेळेस वारली मुलीला स्वत: नवरा पसंत करण्याची परवानगी दिली जाते. विशेषत: जर ती आईबापाची एकुलती एक मुलगी असली तर अशी संमती मिळते.

डावर वारल्यांच्या बोलीवर गुजराथी भाषेचा प्रभाव आहे. काही वेळेस संपूर्ण गाणेच गुजराथी भाषेत रचलेले असते. शेजारचे दुबळे किंवा धोडी ह्या गुजराथी भाषा बोलणाऱ्या जमातीकडून त्यांनी ही गाणी स्वीकारली असावीत. हे एक गुजराथी गाणे आहे :

'माझ्या भावाचे लग्न आहे
आपण माझ्या भावाला भेटू या
माझ्या भावाचा लग्नसोहळा चालला आहे
चला लग्नाचा मंडप पाहायला
हिरोजीच्या मानासाठी लग्नविधी चालले आहेत
चला माझ्या भावाला भेटायला.

असेच एक दुसरे गुजराथी गाणे आहे, परंतु त्याचा लग्नविधीशी संबंध नाही :

'हे भावोजी, विहिरीच्या बाजूला बकऱ्या चरत आहेत.
हे भावोजी, ही मुलगी माझ्याशी चेष्टा करीत आहे.
हे भावोजी, मुलगा विनोद करीत आहे.
हा वृद्ध माणूस व वृद्ध स्त्री दोघंही विनोद करीत आहेत.

वरील गाण्यावरून असे आढळून येते की वारल्यांची कल्पनाशक्ती अगदीच मर्दादित आहे. त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे तसेच गाण्याच्या सुरांतही फारसा बदल नसल्यामुळे ती ऐकणे कंटाळवाणे होते. परंतु काहीवेळेस मात्र त्यांच्या गाण्यांत काव्य कल्पकतेची भरारी पहावयास मिळते. खालील गाणे हे काव्यमय आहे, असे मला खात्रीपूर्वक वाटते :
डोंगराच्या कडेला फुले फुलली आहेत.
शहराच्या कडेला फुले फुलली आहेत.
बहरलेल्या फुलांमधून चांदणं डोकावत आहे.
ह्या चांदण्यात कनूदेव खेळत आहे.
ह्या चांदण्यात नारणदेव चालत आहे.'

डोंगरावर किंवा गावाच्या कडेला चंद्रोदय होत आहे. वारली कवीला ही कल्पना करणे स्वाभाविक आहे की चंद्रामुळे फुले बहरतात व ह्या फुलाच्या बहरातून चंद्राचा प्रकाश पसरतो. हे गाणे रचणाऱ्या कवीने 'चंद्र' हा शब्द जाणून बुजून टाळला आहे, चंद्रप्रकाशाचा चांदणे असा उल्लेख केला आहे. दुसऱ्याही दोन ओळी अशाच काव्यमय आहेत :

सासू सांगते, 'माझा जावई पौर्णिमेचा चंद्र आहे.' ह्यावर दुसरी उत्तर देते, ‘माझी अंगणातील तुळस आहे.' ह्या दोन्ही उपमा मोठ्या काव्यमय आहेत