आदिवासींच्या समस्या - Problems of Tribal

Tribal Mahavikas

विकसित देश असो वा विकसनशील देशामध्ये आदिवासींच्या समस्या पूर्वीपासूनच आहे. परंतु आदिवासींच्या समस्या देशनिहाय आहेत. अत्यंत कष्टमय जीवन जगणारा आदिवासी आजही मागासलेला आहे.

शासनाने कितीही कल्याणात्मक उपक्रम राबविले तरी आदिवासी समोर विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आदिवासी संस्कृतीच नष्ट होण्याची भिती वाटत आहे. भारतामध्ये आदिवासीची लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात आहे. आदिवासींच्या समस्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरकारने घटनात्मक तरतूदी करुन प्रयत्न केला आहे. सरकारच्या कल्याणात्मक कार्यक्रमाशिवाय समाज सुधारक, सामाजिक नेते व खाजगी संस्थाच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला.

भारतामध्ये विविध जमाती आहे. या सर्व जमाती अत्यंत दुर्गम भागात वास्तव करुन राहतात. दळणवळणाची साधने नसतात तर कोठे विज अजूनही पोहचली नाही. बऱ्याच भागात आरोग्य केन्द्र नाहीत. आदिवासींच्या प्रश्नांबाबत कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. आधुनिक जगात जीवनव्यतीत करतांना ज्या प्रमाणात देशाची प्रगती झाली त्या प्रमाणात आदिवासींचा विकास झालेला आढळून येत नाही. आदिवासींच्या समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत या समस्या त्यांचे आर्थिक जीवन, सांस्कृतीक जीवनाशी निगडीत आहे. आर्थिक बाबतीत झालेले शोषण, आजही आदिवासींना पोटभर अन्न मिळत नाही हि शोकांतिकाच म्हणावी लागेल. प्रगत समाजासोबत ज्या आदिवासींचा संपर्क आला व ज्यांची वस्ती सखल भागात किंवा जेथे दळणवळणाची साधने पोहचू शकतात, अशा आदिवासीची समस्या थोडीफार सुटण्याच्या मार्गावर आहे, परंतु जे आजही जनसंपर्कापासून दूर, दऱ्याखोऱ्यात वस्ती करुन राहतात त्यांचे प्रश्न जसेच्या तसेच आहे.

जे सभ्य समाजाच्या संपर्कात आले त्यांचे आर्थिक शोषण झाले. कर्जबाजारीपणा, लैंगिक शोषण इ. समस्या वाढल्या. आदिवासींच्या समस्या जमातीनिहाय जरी असल्या तरी समस्यांचे स्वरुप वेगवेगळे आहे. आदिवासीसमोर बदलत्या काळानुसार विविध प्रश्न उभे झाले आहेत. आदिवासींमधील अज्ञान धर्माचे वेगळेपण इ. मुळे प्रश्न अधिकच चिघळले आहेत. आदिमांच्या समस्येंवर प्रकाश टाकतांना पुढील समस्या लक्षात येतात.

अ) आर्थिक समस्या

ब) सामाजिक व सांस्कृतिक समस्या,

क) आरोग्य विषयक समस्या

अ) आर्थिक समस्या - भारतामधील आदिम जमातीची समस्या अत्यंत दयनिय आहे. दिवसरात्र कबाडकष्ट करुन सुद्धा आर्थिक समस्या आवासून उभ्या आहेत. अर्थाजन करण्याकरीता बहुतांश आदिवासी स्थानानंतर करतात. आदिवासी बहुल भागात पूरेसा रोजगार मिळत नाही. आपला उदरनिर्वाह होण्याकरीता गाव सोडून बाहेर जावे लागते. आदिवासीमधील असलेली आर्थिक व्यवस्था हि अत्यंत साधी व सरळ असल्याने सुद्धा आर्थिक परीस्थिती नाजुक होण्यामागे कारण आहेत. जंगलावर राज्य करणारा आदिवासी जंगल कायदयामुळे जंगलावर अवलंबून असणारी जमात पैशाच्या लालचीने दुसरीकडे काम करु लागली आहे. अशातच आर्थिक जीवन परीवर्तीत झाले आहे. त्यातल्या त्यात व्यापारी, सावकार यांनी त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला आहे. साधी अर्थव्यवस्था रुढ असलेला समाज पैशाची देवाणघेवाण करु लागला आहे. सावकारांनी कर्ज देवून व त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतल्याने आदिमांच्या जमीनी गिळंकृत केल्या आहे. जमीनीवर उदरनिर्वाह करणारी जमात आता रोजगार करु लागली आहे.

आदिवासींची शेती करण्याची पद्धत आधुनिक नसून परंपरागत आहे. संकरीत बी-बीयाणे न वापरता किंवा रासायनीक खते न वापरता पारंपारीक शेती करतात. पारंपारीक शेतीमुळे येणारे पीकांचे उत्पन्न कमी प्रमाणात होते. त्याचबरोबर सातत्याने होणारी जंगलतोडीमुळे फुले, फळे, डिंक हि अर्थाजन मिळून देणारी संपत्ती मिळेणासी झाली आहे.

काही जमातीमधील लोकांना आजही वेठबिगारीला बळी पडावे लागते. वडिल काम करीत असलेल्या मालकाकडे किंवा सावकाराकडे मुलाला सुद्धा काम करावे लागते. घरातील कामे करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, शेतातील कामे करणे इत्यादीमुळे पुढे अर्थाजन करण्यास वाव मिळत नाही.

जीवन जगतांनी अर्थाजन महत्त्वाचे असते. आर्थिक प्रश्न सुटला की साधारणपणे सर्वच प्रश्न सुटतात, म्हणून आर्थिक समस्येवर प्रकाश टाकणे योग्य आहे.

ब) सामाजिक व सांस्कृतिक समस्या - आदिम समाज संस्कृतिप्रिय आहे. आदिमांची जीवन जगण्याची आगळीवेगळी पद्धत व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भता यांचा लौकीक समाज जीवनावर होतो. आयुष्यभर संस्कृतीसोबत घेवून जगणारा आदिम समाज सभ्य समाजाच्या संपर्कामुळे सांस्कृतिक परीवर्तन घडू लागले. स्वातंत्र्याच्या पूर्वी ब्रिटीश काळाने ब्रिटीशांच्या व ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या संपर्कामुळे आदिम संस्कृतीमध्ये बदल घडवून आले. या संपर्कामुळे सांस्कृतिक समस्या वाढली आहे. ख्रिस्ती धर्म प्रचारकामुळे आदिम जीवनात परीवर्तन झाले. ख्रिश्चन धर्मीयाविषयी आदिमांच्या मनात श्रेष्ठतत्त्वाची भावना निर्माण होवून स्वतः विषयी न्युनगंड निर्माण झाला. जमातीमधील नितीनियम, प्रथा यांचा बऱ्याच लोकांनी त्याग केला. ख्रिश्चन धर्मामुळे अनेक आदिवासींनी धर्मांतर केले आणि धार्मिक बदल झाल्यामुळे अनेक आत्मसंबंध दुरावल्या गेले व आदिम जीवन दुषित झाले. सामाजिक व्यवस्थेत बदल झाला.

१) भाषेचा स्विकार - सभ्य समाजाच्या संपर्कामुळे आदिवासींवर मोठा परीणाम घडवून आला तो म्हणजे स्वतःच्या बोलीचा त्याग करुन सभ्य समाजाच्या भाषेचा स्विकार केला. भाषेच्या माध्यमातून संस्कृतीची जोपासना केली जाते, परंतु भाषाच लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

२) संपर्क - आधुनिक किंवा सभ्य समाजाच्या संपर्कामुळे आदिवासींच्या जीवनात समस्या निर्माण झाल्या आहेत. सभ्य समाजाच्या संस्कृतीमुळे आदिवासींच्या जीवनात बदल झाले. चालीरीती, धार्मिकता यामध्ये बदल दिसून येतो. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी आदिवासींमध्ये धार्मिक बदल केला. खिश्चन धर्म स्विकारल्यामुळे मुळ धार्मिकतेत बदल झाला.

३) वेशभुषा बदल - प्राचीन काळात बहुतांश आदिवासी कपड्याचा उपयोग करीत नसत. संपूर्ण जीवन दऱ्याखोऱ्यात व जंगलात व्यतित होत असल्याने कपड्याची आवश्यकता भासत नव्हती. यानंतर थोडाफार बदल होत गेला. पुरुष लंगोटी व स्त्रिया लज्जा झाकेल एवढेच वस्त्र परीधान करित होत्या, परंतु काळाच्या ओघात वेशभूषेत बदल होत गेला. सभ्य समाजाच्या संपर्कामुळे अंगभर शरीरभर कपडे परीधान करु लागले. परंतु या कपड्यांमुळे आदिवासींना खरुज, गजकर्ण इ. त्वचा रोग होवू लागले. आंगोळ करण्याची सवय नसल्यामुळे बंद वस्त्रांमध्ये शरीराचा घाम जावू लागला. त्यामुळे दुर्गंधी येवू लागली.

क) आरोग्यविषयक समस्या :
आदिवासींमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या.

१) जंगल कायदयामुळे आदिवासींना मासे, अन्न संकलन, कंद-मुळे संकलन करण्याकरीता बंदी आली, त्यामुळे योग्य आहार मिळेणासा झाला. मोहापासून मिळणारी दारु बंद झाली व ते देशी दारु प्राशन करीत असल्यामुळे व्यसनाधीनता वाढली. याचा परीणाम आरोग्यावर झाला.

२) आदिवासींच्या दारीद्रयाचा फायदा जमीनदार, ठेकेदार सावकार व सभ्य समाजातील काही लोकांनी घेतल्यामुळे स्त्रियांचे लैगीक शोषण होवू लागले. वेश्यावृत्ती व गुप्त रोग होवू लागले.

३) आदिवासी आपल्या मुलीचा व मुलाचा विवाह कमी वयात करीत असल्यामुळे त्याचा परीणाम आरोग्यावर होत आहे.

४) मुळात अठरा विश्व दारीद्रय व आहाराचे असंतुलन यामुळे कुपोषणची समस्या वाढत आहे. बहुतांश आदिवासी बालके कुपोषणाला बळी पडली आहे. गरोदर माता व जन्मलेली बालक कुपोषित होवू लागली आहे.

५) जमातीमध्ये धर्माचा व अंधश्रद्धेचा प्रभाव असल्यामुळे आदिवासी आरोग्याच्या सुविधा मिळविण्याकरीता दवाखान्यात जात नाही, औषधे घेत नाही तर अंधश्रद्धेस बळी पडतात. जमातीमधील भगतांकडून आजारी व्यक्तींवर उपचार करुन घेतात.

६) काही गावात आरोग्याच्या सुविधा उपलब्धच नाही. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी डोंगराळ भागात जात नाही. अशावेळी आदिवासी आरोग्याच्या लाभापासून वंचित राहतो.